मृत्यूच्या समीप असलेल्या अनाथ लहान लेकरांचा सांभाळ करणारा “बापमाणूस”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असे आपण म्हणतो. त्या इवल्या इवल्या बाळांचे निर्व्याज हसू ,त्यांच्या बाललीला बघून प्रत्येकच सहृदयी व्यक्तीचे मन प्रफुल्लित होऊन त्या बाळाविषयी माया वाटू लागते.

पण जगात असेही काही निर्विकार आणि भावनाशून्य लोक आहेत जे ह्या निरागस बाळांना वाऱ्यावर सोडून देतात.

केवळ जबाबदारी नको म्हणून कितीतरी लहान मुलं वाटेल तिथे,अगदी कचराकुंडीत सुद्धा सापडतात. धडधाकट असलेल्या बाळांना असे टाकून देणारे लोक आहेत, तर ज्यांना जन्मतःच काही व्यंग असते किंवा काही दिव्यांग बाळे असतात.

त्यांची जबाबदारी तर असले बेजाबदार लोक घेऊ इच्छितच नाहीत.

कारण ह्या स्पेशल बाळांना सांभाळण्यासाठी प्रचंड प्रेमाची आणि पेशन्सची गरज असते. कोणी टाकून दिलेली किंवा दुर्दैवाने आई वडीलच ह्या जगात नसलेली आणि अनाथालयात असलेली ही लहान मुले तर बिचारी आई बाबांच्या प्रेमाला कायम पारखीच राहतात.

 

orphan child inmarathi
thefinancialexpress.com.bd

कारण काही सन्माननीय अपवाद सोडल्यास दत्तक घेणारी माणसे सुद्धा धडधाकट मुलांनाच दत्तक घेऊ इच्छितात. सटवाई सुद्धा ह्या बाळांचे नशीब असे का लिहिते कुणास ठाऊक!

आधीच नशिबाने आलेले काहीतरी व्यंग, आणि त्यात प्रेमाने करणारे कोणी नाही, अश्या परिस्थितीत ह्या बाळांना प्रेमाचा साधा स्पर्श सुद्धा लाभत नाही.

जेनेटिक आजार असलेली आणि त्यामुळे मृत्यूच्या दारात असलेली अशी अनेक अनाथ लहान मुले एकटीच आपापले दुःख सहन करीत आयुष्याचे उरलेले दिवस काढत असतात. त्या बिचाऱ्यांना ठाऊक देखील नसते की त्यांच्या आयुष्यात नेमके काय चालले आहे.


अश्या लेकरांचा देव देखील वाली नसतो की काय अशी शंका कधी कधी मनात येते!

पण अमेरिकेच्या लॉस अँजेलिस येथील मोहमद बझीक ह्यांच्याकडे बघितल्यास जगात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची खात्री पटते. पाश्चात्य देशांत अनेक अनाथ लहान मुलांचा फॉस्टर पेरेंट्स काही काळासाठी सांभाळ करतात.

त्या मुलांना कुणीतरी कायद्याने दत्तक घेईपर्यंत ही मुले फॉस्टर आईवडिलांकडे राहतात. तेच त्यांचा सांभाळ करतात. कधी कधी ह्या मुलांचे नशीब चांगले असेल तर फॉस्टर पेरेंट्सच कायदेशीर प्रक्रिया करून ह्या मुलांना दत्तक घेऊन त्या मुलांचे कायमचे पालकत्व स्वीकारतात.

 

father inmarathi
www.inmarathi.com

पण मृत्यूच्या दारात असलेल्या लेकरांच्या नशिबी मात्र हे ही नसते. त्यांचा सांभाळ करायला फार कमी लोक तयार होतात त्यातील एक म्हणजे मोहमद बझीक हे आहेत.

मूळचे लिबियाचे असलेले ६३ वर्षीय मोहम्मद बझीक गेली कित्येक वर्षे त्यांच्या लॉस अँजेलिसच्या घरात ह्या अत्यन्त आजारी असलेल्या मुलांचा आपल्या स्वतःच्या बाळांप्रमाणे सांभाळ करीत आहेत.

त्यांना ह्यासाठी सरकारकडून जो आर्थिक मोबदला मिळतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आणि माया ते ह्या मुलांवर करतात आणि आपल्या स्वतःच्या बाळाप्रमाणे ते ह्या लेकरांची काळजी घेतात.

त्यांनी आजवर मृत्यूच्या समीप असलेल्या दहा लेकरांची एखाद्या तान्ह्या बाळाप्रमाणे मरेपर्यंत काळजी घेऊन नंतर त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा केले आहेत.

आणि वेळोवेळी ते त्या त्यांच्या दफन केलेल्या बाळांना भेटायला जात असतात. त्यातील कित्येक लेकरांनी तर त्यांच्या ह्या वडिलांच्या कुशीतच प्राण सोडले आहेत.

आजवर त्यांनी एकूण ८० अत्यवस्थ लहान मुलांचे फॉस्टर पॅरेंटिंग केले आहे. त्यांना ह्या मुलांचे संगोपन करण्याची प्रेरणा त्यांच्या पत्नीकडून मिळाली. त्यांची पत्नी डॉन ही अत्यवस्थ असणाऱ्या मुलांच्या शेल्टर मध्ये नर्स होती. तेव्हापासूनच त्यांनी स्वतःच्या घरात ह्या अतिशय आजारी असलेल्या मुलांचा सांभाळ करणे सुरु केले.

 

 

काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पण मोहम्मद ह्यांनी मात्र ह्या मुलांचा शेवटपर्यंत सांभाळ करणे सुरूच ठेवले. मोहम्मद ह्यांना त्यांचे पहिले बाळ गेले तो दिवस आठवतो. ते बाळ गेले तो दिवस ४ जुलै १९९१ हा होता.

त्या बाळाची आई एका शेतात काम करीत असे आणि त्या ठिकाणी अतिशय विषारी कीटनाशके वापरल्यामुळे त्या बाळाच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाले होते.

दुर्दैवाने ते बाळ एक वर्ष सुद्धा जगू शकले नाही. मोहम्मद ह्यांना त्या बाळाचे जाणे सहन करणे खूप कठीण गेले.

सध्या मोहम्मद ज्या बाळाची काळजी घेत आहेत, ती मुलगी सहा वर्षांची आहे. ते बाळ एक महिन्याचे असल्यापासून मोहम्मद सांभाळत आहेत. ही मुलगी मूक बधिर आहे, शिवाय पॅरालीसीस मुळे ती अजिबात हलू शकत नाही. तसेच तिला रोज अटॅक सुद्धा येतात. त्या बाळाला बोलता येत नाही, ऐकू येत नाही.

ह्या बाळाला केवळ स्पर्शाची भाषा कळते. तान्ह्या बाळाचं जितकं करावं लागतं तितकीच काळजी मोहम्मद त्यांच्या मुलीची घेतात. ते रोज तिच्याशी बोलतात.

ते म्हणतात माझ्या ह्या बाळाकडे एक सुंदर हृदय आहे आणि आत्मा आहे. आणि माझ्यासाठी तेच महत्वाचे आहे.

ह्या बाळाला जेव्हा मोहम्मद ह्यांनी त्यांच्या घरी आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते की हे बाळ फार तर महिना,दोन महिने काढेल.

पण मोहम्मद ह्यांनी आजवर इतक्या प्रेमाने ह्या बाळाची इतकी काळजी घेतली आहे की हे बाळ आज सहा वर्षांचे आहे.

 

bazeek inmarathi
india.com

ते कायम त्यांच्या ह्या बाळाला त्यांच्या बरोबरच ठेवतात. ह्या बाळाची काळजी घेताना कधी कधी तर त्यांना रात्रभरात फक्त दोन ते तीन तास झोप मिळते. पण त्यांच्याच ह्या काळजीमुळे त्यांच्या ह्या लेकराला इतके आयुष्य मिळाले आहे.


२०१६ मोहम्मद ह्यांना पोटाचा कॅन्सर झाला आणि त्यांचे ऑपरेशन झाले. त्यांची पत्नी ह्या जगात नसल्याने ह्या कठीण काळात सुद्धा ते एकटे होते.

आजारी असताना माणसाला एकटेपणा भोगावा लागला, काळजी घेणारे,प्रेम करणारे कुणी नसेल तर किती त्रास होतो हे तेव्हा त्यांना कळले. सुदैवाने त्यांचा कॅन्सर आता आटोक्यात आहे.

मोहम्मद म्हणतात की, “त्यांच्यावर आपल्या पोटच्या बाळाप्रमाणे प्रेम करणे हेच माझ्या हातात आहे. मला माहितेय की ते खूप आजारी आहेत. मला हे ही माहितेय की ते जाणार आहेत. पण मी एक माणूस म्हणून जे करू शकतो ते करतो आणि बाकी गोष्टी परमेश्वरावर सोडून देतो.”

त्यांच्या ह्या कामाची दखल घेऊन टर्किश राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. एक टर्किश सिनेनिर्माता त्यांच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंट्री सुद्धा तयार करणार आहे.

ह्या मुलांची काळजी घेणे इतके सोपे नाही. त्यांचा त्रास बघून सामान्य माणसाच्या काळजात चर्र होते.

 

 

त्यांच्या औषधांची काळजी घेणे, त्यांचा आहार, पथ्य सांभाळणे, डोळ्यात तेल घालून त्यांच्या तब्येतीला जपणे आणि शक्य होईल तितके त्यां

च्या शेवटच्या दिवसांत त्यांचा त्रास कमी करणे आणि त्यांच्या त्रासावर प्रेमाची हळुवार फुंकर घालून त्यांचे मरण सुसह्य करणे हे सगळे मोहम्मद अतिशय प्रेमाने करतात. पण त्यांच्या प्रत्येक लेकराचे मरण म्हणजे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण काळ असतो.

मोहम्मद बझीक हे माणसाच्या रूपात असलेले देवदूतच आहेत. त्यांच्या रूपात ह्या दुःखी कष्टी लेकरांना आईवडिलांची माया मिळते आणि त्यांच्या शेवटच्या दिवसात का होईना आपल्या वडिलांच्या कुशीत झोपण्याचे सुख ह्या लेकरांना मिळते.

मोहम्मद बझीक ह्यांच्या ह्या कार्याला सलाम!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?