मोदी आणि केजरीवाल : खरी ‘लहर’ कुणाची?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गेल्या 3 वर्षात भारतीय राष्ट्रीय राजकारणात कमालीचा बदल झाला, काँग्रेसच्या ढिसाळ कामगिरीमुळे पर्याय म्हणून एकीकडे गुजरातचे विकासपुरुष नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व उदयास आले तर दुसरी कडे अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचा भारतीय राजकारणात शिरकाव झाला.

भारतीय जनता पक्षाद्वारे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारा मोदींची प्रतिमा विकास पुरुष म्हणून चमकवण्यासाठी पक्षाने शर्थीचे प्रयत्न केलेत आणि त्याला यश सुद्धा मिळाले, नरेंद्र मोदींची स्वच्छ प्रतिमा, निर्णय घेण्याची क्षमता व केवळ विकासाचे राजकारण या गोष्टींना लक्षात घेऊन भारतीय जनतेने भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी केले.

दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी सुशासनाचा नारा देऊन राजकारणात उडी घेतली.

modi-kejriwal-marathipizza

काँग्रेस च्या भ्रष्टाचारी धोरणांना लक्ष करीत त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली. सरकार बनवण्यासाठी लागणार संख्याबळ केजरीवालांकडे नसल्यामुळे त्यांना त्याच भ्रष्टाचारी काँग्रेस ची साथ घ्यावी लागली ज्यांच्या भ्रष्टाचारी धोरणांचा विरोध करण्यासाठी केजरीवाल राजकारणात उतरले होते.


आप-काँग्रेस च हे सरकार फार काळ टिकू शकल नाही…

त्या नंतरच्या निवडणुकीत मात्र दिल्लीकरांनी केजरीवालांवर विश्वास दाखवत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले, केजरीवालांची लहर इतकी जबरदस्त होती कि 70 जागांच्या विधानसभेत आम आदमी पार्टी ला 67 जागांवर विजय मिळवला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला प्रचंड विजय होता.. केजरीवालांच्या या विजयामुळे मोदींची लहर ओसरली असे भाकीत कित्येक पॉलिटिकल पंडितांनी केले.

नुकत्याच झालेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला मात्र दिल्ली विधानसभेत सरकार स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाची या निवडणुकीतील कामगिरी अत्यंत निराशाजनक होती.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, छत्तीसगढ, झारखंड, हरियाणा, राजस्थान, मणिपूर व जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये आपले सरकार स्थापन केले. या निवडणुका जरी प्रादेशिक निवडणूका असल्या तरी त्या मोदींच्या नावानेच लढल्या व जिंकल्या गेल्या. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच या प्रादेशिक निवडणुकीत सुद्धा मोदी लहर चालली.

एकीकडे मोदींची लोकप्रियता वाढत असताना केजरीवालांची लोकप्रियता मात्र कमी होताना दिसते आहे. याची कारणीमीमांसा केल्यास लक्षात येईल कि गेल्या 3 वर्षात दोन्ही नेत्यांची काम करण्याची पद्धती बघता त्यांच्या लोकप्रियतेत वाढ वा घट का झाली असावी.

निवडून यायच्या आधी निवडणूक प्रचारात मोदी व केजरीवालांनी विरोधकांवर प्रचंड प्रहार केले, त्यांचा उणीवा जनतेला दाखवून दिल्या व सत्ता काबीज केली, मात्र सत्ता स्थापने नंतर मोदींनी आरोप प्रत्यारोप बाजूला सारून आपले लक्ष केवळ विकासावर केंद्रित केले, अनेक योजना उत्तम प्रकारे राबवून त्या जनते पर्यंत पोहोचवल्या. या उलट केजरीवालांनी आरोपाचे राजकारण सुरूच ठेवले, प्रत्येक गोष्टीला मोदींना जबाबदार सांगत स्वतःला असहाय दाखवण्याचा प्रयत्न ते करत आले.

शिवाय आप च्या नेत्यांचे स्टिंग ऑपरेशन्स, भ्रष्टाचाराच्या केसेस, त्या वर केजरीवालांनी पाळलेले मौन इत्यादी बाबींमुळे केजरीवालांच्या भ्रष्टाचार विरोधी प्रतिमेला धक्का बसला व जनतेतला त्यांच्या प्रतीचा विश्वास हळू हळू कमी होऊ लागला ज्याचा परिणाम नुकत्याच लागलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या निकालात दिसून आला! सुरवातीच्या काळात मोदी व केजरीवाल या दोन्ही नेत्यांची लोकप्रियता सारखीच होती, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीमुळे लोकप्रियतेत हळू हळू बदल होत गेले. आज मोदी विकासाची धोरणं घेऊन लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहेत तर केजरीवाल ब्लेम गेम मुळे स्वतःच्याच जाळ्यात फसल्या गेले.

येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा निश्चित होईलच कि भारतीय जनमानसात लोकप्रिय नेता कोण?

खरी लहर कुणाची…नरेंद्र मोदींची कि अरविंद केजरीवालांची…?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *