आणि गहिवरली ‘ती’ बांग्लादेशी माय: नागपूरच्या मनोरुग्णालयातील मातेची बांग्लादेशी लेकराशी भेट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

शासकीय रुग्णालये म्हटली की सर्वसामान्य लोकांच्या मनात उदासीन वातावरण,भोंगळ कारभार, उर्मट कर्मचारी आणि दुर्लक्षित रुग्ण अशीच प्रतिमा उभी राहते.

आणि त्यातल्या त्यात मनोरुग्णालय म्हटलं की आपल्यापुढे उदासीन आणि विचित्र वातावरण व तिथे शून्यात नजर लावून बसलेले, विचित्र हावभाव करणारे, कधी हिंसक होणारे मनोरुग्ण आणि त्यांना बळाने कण्ट्रोल करू बघणारा कर्मचारी वर्ग असेच चित्र येते.

असायलम पॅटर्न असलेल्या मनोरुग्णालयांत पूर्वी असे चित्र असेलही! आता मात्र ह्यात सकारात्मक बदल घडताना दिसून येतो आहे.

कालच म्हणजे ३ जानेवारी रोजी नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात माय लेकरांच्या भेटीचा एक हृद्य प्रसंग मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी अनुभवला. हा हृद्य प्रसंग बघून तिथल्या कर्मचारी व अधिकारी वर्गाला आनंद व समाधान वाटले.

गेली दहा वर्षे नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात मानसिक आजारांवर उपचार घेत असलेली एक मनोरुग्ण बांगलादेशी महिला संपूर्णपणे बरी होऊन तिच्या मुलाबरोबर काल आपल्या घरी परत गेली.

 

lokmat-inmarathi
lokmat.com

आपल्या आजारामुळे काहीही भान नसताना घरातून ही महिला निघून गेली आणि गेली सतरा ते अठरा वर्षे ती घराबाहेरच भटकत होती. मनोरुग्णालयात ऍडमिट केल्यानंतर ती उपचारांमुळे बरी झाली. तिच्या मुलाने बांगलादेशहुन येऊन तिला परत नेले.

मनोरुग्णालयातील सुरक्षित वातावरण, नियमितपणे घेतलेले औषधोपचार, सायकोथेरपी, बिहेव्हयरल थेरपी ह्या सगळ्यामुळे ती अवचेतन अवस्थेतून बाहेर जाणिवांच्या जगात परत आली.

तिने तिचे रोजचे आयुष्य परत सुरु केले. आता ती तिचे नॉर्मल आयुष्य जगू शकते. एक गृहिणी म्हणून तिची सगळी कामे करू शकते. आता तिचा आजार बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी अनघा राजे-मोहरील ह्या शासकीय मनोरुग्णालयातील सामाजिक अधीक्षक तिला थेरपी देत असताना तिने अचानक ढाका असे नाव उच्चारले आणि नंतर अनघा राजे- मोहरील ह्यांनी तिच्याकडून हळूहळू तिच्या घराबद्दल माहिती काढून घेतली.

तिला फक्त तिच्या गावाचे नाव आठवत होते. इतक्या क्ल्यू वरून अनघा मोहरील ह्यांनी तिचे गाव शोधून काढले व तिथल्या पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने तिच्या घरच्यांचा पत्ता शोधून काढला. व्हिडीओ कॉल वर तिच्या घरच्यांशी तिला बोलायला दिले.

तिच्या घरच्यांनी तिला ओळखले व तिनेही तिच्या कुटुंबियांना ओळखले. सपना असे तिचे मनोरुग्णालयातील नाव तर खरे नाव आलिया बेगम आहे!

साधारण पन्नाशीत असलेली ही महिला बांगलादेश मधील कपानीगंज ह्या गावातील आहे.

 

kaptanganjstation-inmarathi
indianrailinfo.com

बशूरहाट ह्या तालुक्यात असलेले हे गाव आहे. ह्या गावातील रहिवासी असलेली आलीय बेगम वीस वर्षांपासून स्किझोफ्रेनिया ह्या मनोविकाराने ग्रस्त होती. गरीब कुटुंबातील असल्याने तिच्या कुटुंबात ह्या आजाराविषयी फार माहिती नव्हती.

तरीही आजार कळल्यानंतर काही दिवस तिने ढाका येथील मनोरुग्णालयात उपचार घेतले. परंतु मानसिक आजार व त्याविषयीचे उपचार ह्याविषयी जनजागृतीचा अभाव ह्यामुळे तिचे उपचार मधेच थांबले.

काही वर्षांपूर्वी तिच्या मुलीच्या लग्नात आनंदाने ती एक्साईट झाली आणि मुलीची पाठवणी केल्यानंतर तिच्याच वरातीमागे चालत गेली.

घरापासून खूप लांब गेल्यानंतर ती परत येताना घराचा रस्ता चुकली आणि नंतर हरवली. तिच्या घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती त्यांना सापडली नाही.

भ्रमिष्ठ अवस्थेत अनेक दिवस इकडे तिकडे भटकल्यानंतर कधीतरी इतर बांगलादेशी लोकांबरोबर बॉर्डर पार करून ती कोलकाता येथे आली व कोलकाताच्या रेल्वे स्टेशन वरून भ्रमिष्ठावस्थेतच नागपूरला जाणाऱ्या गाडीत बसली आणि नागपूरला आली.

नागपूर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ती उमरेड मधील कुही गावापर्यंत पायी चालत गेली. तिथे पोलिसांनी तिला हटकले असता त्यांच्या लक्षात आले की ही स्त्री मानसिक रुग्ण असू शकते.

तिला नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्या तपासण्या करण्यात आल्या आणि नंतर ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे हे सिद्ध झाल्यावर तिला उपचारांची गरज आहे हे ही लक्षात आले म्हणूनच मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आलिया बेगम हीस नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात भरती करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे तिला शासकीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिचे नियमित उपचार सुरु झाले. हळू हळू तिने उपचारांस प्रतिसाद देणे सुरु केले.

शासकीय मनोरुग्णालय नागपूर येथे गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अनघा राजे-मोहरील ह्यांनी तिची सायकोथेरपी करता करता तिच्याशी संवाद साधणे सुरु केले.

त्या स्त्रीच्या एकूण दिसणे व भाषेवरून ती बंगाली भाषिक असावी असा अंदाज त्यांना आला.

त्यांनी तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. तिला इतर बंगाली भाषिक रुग्णांबरोबर ठेवले. त्यांच्याबरोबर ती हळूहळू बोलू लागली. ती जरा नॉर्मल झाल्यावर तिला तिच्या आवडीचे काम करायला दिले. तिला बरे झालेल्या रुग्णांमध्ये मिसळू दिले.

त्या बंगाली भाषिक रुग्णांपैकी एक मुलगी बरी झाल्यानंतर तिच्या उडीसा येथील घरी परत गेली तेव्हा आलीय बेगमला पॅनिक अटॅक आला आणि तिने मला घरी जायचंय म्हणून धोशा लावला.

तिला शांत करताना अनघा मोहरील ह्यांनी तिला तिच्या घरचा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने कपानीगंज असे नाव घेतले. तेव्हा अनघा ह्यांनी ते गाव पश्चिम बंगालमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला कारण आलिया बंगाली भाषिक होती.

पश्चिम बंगालच्या पोलीस कंट्रोल रूम शी संपर्क केला असता त्यांना समजले की हे गाव बांगलादेश मध्ये आहे.

तिथल्या पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क केला असता स्थानिक पोलिसांशी त्यांचा संपर्क करून देण्यात आला. तेव्हा अनघा मोहरील ह्यांनी त्या पोलिसांना आलियाविषयी कल्पना दिली आणि तिच्या घरच्यांची माहिती काढण्याची विनंती केली.

तिथल्या पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावत काहीच दिवसांत आलियाच्या घरच्यांशी संपर्क साधून नागपूरला संपर्क केला. अनघा मोहरील ह्यांनी त्वरित सामाजिक जबाबदारी ओळखून व्हिडीओ कॉल द्वारे आलिया व तिच्या घरच्यांचे बोलणे करवून दिले.

आलियाला तिच्या हा घरच्यांनी ओळखले व आलियाने सुद्धा तिच्या पती व मुलाला ओळखले.

अनघा मोहरील ह्यांनी तिच्या मुलाला सल्ला दिला त्याने येऊन त्याच्या आईला घेऊन जावे, व त्या साठी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेऊन निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावे. त्याप्रमाणे राजू अबुल हसन ह्या आलिया बेगमच्या मुलाने सर्व प्रयत्न केले.

त्याला तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सहकार्य केले व अखेर राजू आपल्या आईला भेटण्यास नागपूर पर्यंत आला.

मनोरुग्णालयात आईला भेटताच त्याने आईला वाकून नमस्कार केला व आईने सुद्धा त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला जवळ घेतले. इतक्या वर्षांनी आपल्या मुलाला बघून आलियाच्या अश्रूंचा बांध फुटला व माय लेकराची अशी ही भेट बघून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

आलियाचा आजार आता आटोक्यात आला आहे व ती सामान्य जीवन जगू शकते म्हणून रुग्णालयाने तिला घरी जाण्याची परवानगी दिली.

जाताना तिचा सत्कार करून व तिला साडी व बांगड्या असा आहेर करून तिची पाठवणी केली. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाचा हा संवेदनाशील अनुभव पहिलाच नाहीये. ह्या आधी सुद्धा एका ८५ वर्षीय आजोबांना अनघा मोहरील ह्यांनी त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचवले होते.

जसिन करिया उर्फ गिरिधारी हे सुद्धा सिझोफ्रेनिया ह्या आजाराने ग्रस्त असल्याने भ्रमिष्ठ अवस्थेत घर सोडून निघून गेले होते. भूक लागली म्हणून दुकानातून काहीतरी उचलले म्हणून पोलिसांनी त्यांना गुन्हेगार म्हणून नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात भरती केले होते.

अनेक दिवस मनोरुग्णालयात राहिल्यानंतर मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही म्हणून रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना सामान्य रुग्णांच्या वॉर्ड मध्ये ठेवले व त्यांचे उपचार सुरु केले.

हळू हळू त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधत अनघा मोहरील त्यांना सायकोथेरपी देत असताना त्यांचा अनघा मोहरील ह्यांच्यावर विश्वास बसला आणि ते फक्त त्यांच्याशी येऊन बोलत असत. होळीच्या दिवशी त्या अनुषंगाने अनघा मोहरील ह्यांनी त्या आजोबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

ते हिंदीभाषिक असल्याचा अंदाज घेऊन त्यांना त्यांच्या गावच्या होळीबद्दल, कुटुंबाबद्दल , मुलाबद्दल विचारले तेव्हा अचानक त्यांनी त्यांच्या गावचे नाव सांगितले.

तसेच त्यांना गावातल्या पोलीस स्टेशनचेही नाव आठवले. त्यांनी ते अनघा मोहरील ह्यांना सांगितले. तेव्हा झटपट ऍक्शन घेत अनघा मोहरील ह्यांनी त्या पोलीस कण्ट्रोल रूमशी संपर्क साधत उत्तर प्रदेश मधील गिरिधारी ह्यांच्या गावच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. व पोलिसांनी गिरिधारी ह्यांचे घर व नातलग शोधून काढले.

तब्बल ३५ वर्ष आपल्या घरापासून लांब असलेले गिरिधारी अखेर कुटुंबियांना सापडले. मनोरुग्णालयातील सर्वांचे आभार मानून त्यांचा मुलगा त्यांना घरी घेऊन गेला.

अनघा राजे- मोहरील ह्या गेली २५ वर्षे ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अश्या अनेक हरवलेल्या मनोरुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवले आहे. त्या म्हणतात की,

“हे माझ्या एकटीचे काम नसून आमच्या रुग्णालयाचे टीम वर्क आहे. ह्याचे श्रेय आमच्या सर्व स्टाफ व डॉक्टरांना जाते. आमचा रुग्ण जेव्हा बरा होऊन घरी जातो तेव्हा आम्हाला मानसिक समाधान लाभते.

अनेक रुग्ण हे वर्षानुवर्षे आपली ओळख विसरलेले असतात. त्यामुळे रुग्णालयातील ओळख हीच त्यांची ओळख बनून राहते.

त्यांना कधी कधी त्यांचे खरे नाव सुद्धा आठवत नाही. मात्र स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या आपले जन्मगाव व नवऱ्याचे गाव सहसा विसरत नाहीत.

त्या अनुषंगाने त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधत,त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करत त्यांच्याकडूनहळू हळू माहिती काढून घ्यावी लागते. कधी कधी एका क्ल्यू वरून त्यांचे घर आणि कुटुंबीय शोधावे लागतात. परंतु हे हरवलेले रुग्ण जेव्हा आपल्या कुटुंबाला परत भेटतात तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो.

मानसिक आजार हा शारीरिक आजारासारखा दृश्य नसल्याने म्हणजे थोडक्यात मन हा दृश्य अवयव नसल्याने हे आजार लवकर कुटुंबाच्या आणि रुग्णाच्याही लक्षातच येत नाहीत.

आणि जेव्हा आजार लक्षात येतो तेव्हा त्याला बाहेरची बाधा वगैरे मानून त्यावर गंडे दोरे, झाड फुक उपचार , मांत्रिक , बाबा, दर्गा असले उपचार केले जातात. त्यातून रुग्ण बरा होण्य ऐवजी त्याची स्थिती आणखी बिघडते. आणि शेवटी सगळे उपाय करून थकतात तेव्हा त्यांच्यासमोर मनोरुग्णालय हा पर्याय उरतो.

ह्या सगळ्यात बरीच वर्षं गेल्याने नातलग सुद्धा कंटाळले असतात. रुग्ण तर काही समजण्याच्या अवस्थेतच नसतो. त्याला हळू हळू संपूर्ण उपचार देत सामान्य स्थितीत आणावे लागते.

ह्या सगळ्यात बराच काळ लागतो. तितका पेशंस घरच्यांनी ठेवायला हवा व उपचार मध्येच सोडून न देता ते पूर्ण करायला हवेत. हे उपचार खर्चिक नाहीत, पण वेळखाऊ असल्याने व रुग्ण कधी कधी फार असंतुलित झाल्याने पूर्ण होत नाहीत.

मानसिक आजार हे निश्चितच उपचारांनी बरे होऊ शकतात. त्यासाठी आपल्या समाजात त्याविषयीची जागृती व्हायला हवी.

एकदा उपचार घेतल्यानंतर रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो आणि त्याला त्याच्या घरच्यांनी व समाजानेही स्वीकारणे आवश्यक आहे. आलिया व गिरीधर ह्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाने त्यांना स्वीकारले ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. असेच सर्व समाजाने मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मोकळेपणाने स्वीकारायला हवे.”

पण सहसा असे घडत नाही. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होते आणि मग तो आजार बळावल्यानंतर बुवाबाजी, तंत्र मंत्र ह्यात पडून आणखी वेळ दवडला जातो. हे रिलिजियस हीलर्स ज्या प्रकारे दर्ग्यात रुग्णांना उपचाराच्या नावाखाली अमानुष मारझोड करतात ते बघून आपल्या अंगावर काटा येतो.

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आल्यापासून अनेक मांत्रिक कायद्याला घाबरतात पण अनेक दर्ग्यांत आजही असे मारझोड करून उपचार करण्याचा प्रयत्न करणारे बुवा दिसून येतात.

मानसिक आजार हा मेंदूत निर्माण झालेल्या असंतुलनाने होतो. स्किझोफ्रेनिया मध्ये मेंदूतील डोपामिनची लेव्हल कमी होते तर डिमेंशियामध्ये ही लेव्हल वाढते. ह्या मानसिक आजारांना शास्त्रीय आधार आहे. त्यामुळे ते बरे होण्यासाठी योग्य औषधोपचार व थेरपीच घ्यायला हवी.

ह्या आजारांत रुग्ण बरा व्हायला वेळ लागतो कारण मेंदूतील डोपामिनची पातळी सामान्य व्हायला तेवढा वेळ लागतोच. तेवढा वेळ नातलगांनी डॉक्टरांना व रुग्णालाही देणे आवश्यक आहे.

हे रुग्ण परावलंबी होतात त्यामुळे त्यांना कुटुंबाने व समाजाने भक्कम आधार देण्याची आवश्यकता असते.आता मनोरुग्णालये सुद्धा आधुनिक उपचारपद्धतीचा वापर करून रुग्णांची शक्य तेवढी काळजी घेतात. त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतात.

अनघा मोहरील ह्यांच्या २५ वर्षांच्या सेवेत त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने १५० रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवले आहे.

ह्यातील अनेक रुग्ण नेपाळ, बांगलादेश तसेच उत्तर प्रदेश, बिहार,पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश ,छत्तीसगड व महाराष्ट्रातील अनेक भागातून आलेले होते.

गेल्या वर्षात नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात प्रायव्हेट संस्था व इतर लोकांनी १०० रुग्ण दाखल केले होते. त्यापैकी ९० रुग्ण हे बरे होऊन सामान्य स्थितीत परत आले. दहा रुग्ण ही तीव्र स्वरूपाच्या मतिमंदत्वाने ग्रस्त असल्याने त्यांना मतिमंदांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्द करण्यात आले.

कारण मतिमंदत्व हा मानसिक आजार नसल्याने ह्या रुग्णांना मनोरुग्णालयात ठेवणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने बरोबर नाही. जे अल्पवयीन मतिमंद रुग्ण असतात त्यांना चाईल्डलाईन कडे सुपूर्द करण्यात येते आणि त्यांची जबाबदारी चाईल्ड वेल्फेअर बोर्ड घेते.

मानसिक आजार हे इतर आजारांप्रमाणेच बरे होऊ शकतात. काळाच्या ओघात समाजाने कुष्ठरोगी स्वीकारले. क्षयरोगाचे रुग्ण देखील स्वीकारले. पण मानसिक रुग्णांना अजूनही समाज स्वीकारत नाही. मानसिक रुग्णांचे पुनर्वसन करायचे असल्यास त्यात त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी व समाजाने सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजाने त्यांना स्वीकारण्याची गरज आहे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?