या गावात नवस फेडण्यासाठी पुरुषांचं जे केलं जातं ते पाहून हसावं की रडावं कळणार नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आयुष्यात बहुतेक जण देवाजवळ काही मागणं मागतात, नवस करतात, गाऱ्हाणं सांगतात, इच्छा व्यक्त करतात. मनातल्या इच्छा मोठ्या असतील आणि त्या आपल्या जवळच्या नात्यातल्या मंडळींकडून पूर्ण होऊ शकणाऱ्या नसतील तर त्या आपण देवासमोर व्यक्त करतो.

भले तो देव लगेच त्या इच्छांची पूर्तता न करो, पण कधी कधी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कुठूनतरी प्रेरणा मिळते. काहीतरी मार्ग सापडतो आणि इच्छापूर्तीकडे आपली वाटचाल सुरू होते आणि ती इच्छा पूर्ण होते.

त्यावेळी आपण देवाचे आभार मानतो, मनात काही देवासाठी कबूल केले असेल तर त्याप्रमाणे आपण देवाला ते देतो, म्हणजे नवस फेडतो. असे अनेक लोक नवस फेडताना आपण पाहतो.

शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे अनेक दागिने, मुकुट, पादुकांना सोन्याचे आवरण, वगैरे गोष्टी लोक श्रद्धेने अर्पण करत असतात. कारण त्यांनी साईबाबांसमोर एखादी इच्छा बोलून दाखवलेली असते आणि ती पूर्ण झाली असेल तर लोक नवस फेडायचा म्हणून देवाला असे काही अर्पण करतात.


 

saibaba-temple-inmarathi
khabrokiduniya.com

काही लोक आपल्या घरापासून ते देवाच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालत घालत जातात आणि आपल्या नवसाची फेड अशी आदराने करतात.

काही जण वेगळ्या पद्धतीने नवस फेडतात. मुक्या प्राण्यांचा देवाच्या नावावर जीव घेऊन, काही जण कोंबडी, तर काही बकरे कापून देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतात. प्रत्येक ठिकाणची प्रथा वेगळी असते.

तिरुपतीच्या दर्शनाला गेल्यावर काही लोक आपले सुंदर केस देवासाठी काढून टाकतात. तर काही लोक आपल्या आवडत्या पदार्थाचा त्याग करतात. म्हणजे त्या पदार्थाचे सेवन बंद करतात. त्यांना आपला अत्यंत आवडीचा पदार्थ खाणे सोडून देणे ही एक आदर भावना व्यक्त करण्याची पद्धत वाटते.


काही लोक एकवीस नारळ, एकशे एक नारळ बांधून एक मोठे तोरण तयार करतात आणि ते देवाला अर्पण करतात. काही लोक देवळाचा संपूर्ण गाभारा भरून जाईल इतकी मिठाई किंवा लाडू यांचा नैवेद्य देवाला अर्पण करतात.

 

laddus-in-temple-inmarathi
rajasthantourismbuzz.com

तर काही लोक देवाची सतत आठवण राहावी म्हणून गादीवर झोपणे सोडून जमिनीवर फक्त एका सतरंजीवर झोपून देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

काही रोज स्नान केल्यावर ओल्या अंगानेच देवपूजा अथवा पोथी वाचन करतात. हा ही एक नवस फेडण्याचाच प्रकार आहे. असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

अशीच एका गावातली एक प्रथा गेल्या २०० वर्षांपासून चालत आलेली आहे. शेतात भरपूर धान्य पिकू दे म्हणून संपूर्ण गाव नवस बोलते. भरघोस पीक हाती आलं की देवाला भंडारा म्हणून त्याच गावातल्या गाव देवाच्या मंदिरात गाव जेवण घातले जाते.


त्याप्रमाणेच ‘करनूल’ जिल्ह्यातलं अतिशय दुर्गम भागात वसलेलं एक “संथेकोडलूर” गाव आहे. अतिशय छोटं गाव. त्या गावात शेती हाच व्यवसाय आणि ‘कामप्पा’ देवाचं एक छानसं मंदिर ह्या गावाचं श्रद्धास्थान. तिथे कामाला सुरुवात कामप्पा देवाच्या दर्शनाने होते.

मागणं मागायचं तर ह्याच देवाकडे असा तिथल्या लोकांचा दृढ विश्वास. संपूर्ण कुटुंब किंवा संपूर्ण गाव ह्या देवाकडे नवस करते आणि त्यात यश मिळालं की भक्ती भावाने त्या नवसाची परतफेडही त्यांच्या पारंपरिक पद्धतीने होते.


काय आहे ही नवस फेडीची पारंपरिक पद्धत?

गेली २०० वर्षे चालत आलेली ही नवस फेडण्याची पद्धत तुम्ही ऐकली नसेल किंवा पहिली नसेल अशीच आहे.

 

men-in-sarees-inmarathi
punjabkesri.com

ह्या “संथेकोडलूर” गावात कामप्पा देवाच्या देवळात संपूर्ण कुटुंब किंवा संपूर्ण गाव नवस करते आणि ह्या नवसाची पूर्तता कामप्पा देव करतोच अशी अढळ श्रद्धा ह्या लोकांची आहे. म्हणून ही प्रथा गेली २०० वर्षे अखंड चालू आहे.


त्या नवसाची पूर्तता झाली की सगळेच्या सगळे पुरुष त्यांच्या जमातीतील  स्त्रियांच्या वेशभूषेप्रमाणेच वेशभूषा करतात. म्हणजे सगळे पुरुष साड्या नेसतात, छान दाग-दागिने घालतात, स्त्रियांप्रमाणेच साजशृंगार करतात.

छान मेकअप सुद्धा करतात, लिपस्टीक वगैरेचाही वापर हल्ली केला जातो. काहीजण स्त्रियांचे गॉगल्स सुद्धा घालतात आणि नटून थटून नवस फेडायला जाण्यासाठी तयार होतात.

काहींच्या हातात पूजेचे छान नक्षीदार तबक साहित्यानिशी सजलेले असते. काहींच्या डोक्यावर पाने, फुले, रंग, हार ह्यांनी सजवलेले धान्याचे मातीचे मोठे मोठे घडे (बारीक तोंडाचे मातीचे माठ)असतात, ते सगळे असेच सजवलेले असतात.

असा हा पुरुषाचा लवाजमा स्त्रियांच्या वेशात मंदिरात ढोल, ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात येतो. साग्रसंगीत देवाची पूजा होते आणि आणलेले सगळे साहित्य देवाला मोठ्या श्रद्धेने अर्पण केले जाते. प्रार्थना केली जाते आणि नवस, इच्छा पूर्ण केल्याबद्दल देवाजवळ भक्ती भावाने कृतज्ञता व्यक्त केली जाते.

संपूर्ण गावाचा जेंव्हा नवस फेडायचा असतो त्यावेळी संपूर्ण गावातले पुरुष आपापल्या जमातीतल्या स्त्रियांच्या वेशभूषेप्रमाणे वेशभूषा करतात. अशा विविध स्त्री वेशातले पुरुष स्त्रियांप्रमाणेच नवस फेडायला जातात. ह्यात काही पुरुष आपल्या मिशा अथवा दाढी असेल तर ती सुद्धा काढून टाकतात.

 

men-in-saree-inmarathi
flickr.com

अशी ही सगळ्यात वेगळी नवस फेडण्याची प्रथा ऐकून नवल वाटते.

पण ही अनेक वर्षे चालू आहे असे कामप्पा मंदिराच्या कमिटीचे अध्यक्ष सागर सरण बसप्पा सांगतात. गावाच्या नवसफेडीचा सोहळा होळीच्या दिवशी साजरा होतो. ह्या दिवसाला तिकडे कामुनी – पुंनमी असे म्हणतात.

त्यादिवशी हत्ती सुद्धा खास सोहळ्यासाठी सजवून आणले जातात आणि मोठा उत्सव साजरा केला जातो. अनेक वाद्ये वाजवू मोठ्या थाटात ही मिरवणूक मंदिरात येते आणि तिथे पूजा, आरती होते, प्रसाद दिला जातो.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?