शिवाजी महाराजांचा कुर्निसात : घाणेकरांचा संभाजी आणि अटल बिहारींचा शिवाजी : दोन जबरदस्त आठवणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


विधान भवनाच्या आवारात आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश करून एका वरिष्ठ नेत्याला मुजरा केला. हे प्रकरण सध्या सोशल मीडियात चांगलंच गाजतंय. शिवस्मारकाचे रखडलेले बांधकाम पूर्ण होण्याचा आग्रह धरत विधान भवनात आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचा वेश केला होता.

समोर रामराजे निंबाळकर आल्यानंतर त्यांनी त्यांना वाकून मुजरा केला. हा प्रकार कमेऱ्यात कैद झाला आणि गजभिये यांच्यावर चारी बाजूने टीकेची झोड उठली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश घालून मुजरा वगैरे केल्यानंतर हे होणे स्वाभाविकच होते. महाराष्ट्रात शिवाजी महाराज हा आपल्या  सर्वांच्याच अस्मितेचा विषय असल्याने असा काही प्रकार खपवून घेतला जाणे शक्य नाही.

मकरंद करंदीकर यांनी अशाच दोन आठवणींवर आपल्या फेसबुक पोस्टमधून प्रकाश टाकला आहे. एखाद्या महान व्यक्तीचा वेश करताना त्याचा मान राखला न जाणे किती वाईट असते हे यातून दिसून येईल.

===

आणि… काशिनाथ घाणेकर !

आणि अटलबिहारी वाजपेयी, बाबासाहेब पुरंदरे !!

सध्या मराठीमध्ये “आणि… काशिनाथ घाणेकर” चित्रपटाने इतिहास घडविला आहे.


 

subodh-Kashinath1-inmarathi
timesnownews.com

डॉ. काशिनाथ घाणेकर जोशात असतांना त्यांच्या भूमिका असलेली नाटके पाहण्याचे भाग्य मला लाभले. अस्सल अभिनयाला दाद देऊन मायबाप प्रेक्षकांनी बालगंधर्वांना अढळपदी नेऊन बसविले.

त्यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत हे भाग्य डॉ. काशिनाथ घाणेकर यांना लाभले.

परंतु दोघांचेही उत्तरायुष्य चांगले गेले नाही. जुन्या अभिजात रंगभूमीच्या सम्राटाचे केविलवाणे उत्तरायुष्य ‘नटसम्राट’ या अजरामर नाटकामध्ये रेखाटले आहे.

डॉ. घाणेकर यांच्या आयुष्यावर ‘आणि … मकरंद राजाध्यक्ष’ हे नाटक मराठी रंगभूमीवर येऊन गेले. विक्रम गोखले यांनी या नाटकात मुख्य भूमिका केली होती.

एखादी व्यक्तिरेखा एखादा नट अगदी जीव ओतून सादर करतो. त्याची रंगभूषा, वेशभूषा, त्याच्या अभिनयातील सहजता यामुळे प्रेक्षक त्याला त्याच व्यक्तिरेखेत पाहतात. संत तुकाराम चित्रपटातील श्री. विष्णुपंत पागनीस हे इतके तुकाराम महाराजमय झाले होते की लोकं त्यांच्या पाया पडत असत.

 

sant-tukaram-inmarathi
mg.co.za

रामायण मालिकेतील राम – सीता – लक्ष्मण यांनाही भारतात अनेक ठिकाणी त्या त्या देवांचा मान मिळत होता. ती त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच पावती म्हणायची ! पण अशावेळी त्या त्या कलावंताची जबाबदारी मात्र खूप वाढते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे मराठी माणसाच्या हृदयात एक वेगळेच स्थान आहे. त्यांच्या जीवनावर अनेक नाटके आणि चित्रपट मराठीत निर्माण झाले. अशाच नाटकांच्या संदर्भात दोन आठवणी खूप महत्वाच्या आहेत.

एका सुप्रसिद्ध ऐतिहासिक मराठी नाटकाला श्री. अटलबिहारी वाजपेयी आले होते. त्यांना मराठी उत्तम समजत असे. मध्यंतरात नाट्यनिर्माते त्यांना रंगमंचावर सर्वांची ओळख करून द्यायला घेऊन गेले.

शिवाजी महाराजांच्या पूर्ण वेशभूषेत असलेला आणि त्या नाटकात बाल शिवाजीचे काम करणारा मुलगा पुढे येऊन अटलजींना वाकून नमस्कार करू लागल्यावर अटलजींनी त्याला अडविले.

ते त्याला म्हणाले की “तुम्ही शिवाजीमहाराज आहात, तुम्ही माझ्यापुढे वाकायचे नाही….”

खरेतर अगदी साधी गोष्ट आणि तीही पडद्यामागे घडणार होती. तरीही अटलजींनी ती टाळली.

 

vajpayee-inmarathi
youtube.com

याच्या बरोबर उलट गोष्ट डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्या बाबतीत घडल्याचे ऐकले आहे. संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा ते खूप तन्मयतेने रंगवीत अस. साक्षात संभाजी महाराजच रंगमंचावर अवतरल्यासारखे वाटत असे आणि त्याला सभागृहातून प्रचंड दाद मिळत असे.

एका प्रयोगाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आले होते. नाटकातील संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा पाहून ते खुश झाले आणि या कलावंताचे कौतुक करण्यासाठी ते मध्यंतरात रंगपटात गेले.

डॉ.काशिनाथ घाणेकर यांना या भूमिकेचा ताण येत असे म्हणून ते मध्यंतरात सिगारेट ओढत असत. उत्साहाने आलेल्या बाबासाहेबांनी, संपूर्ण वेशभूषेत असताना घाणेकरांना सिगारेट ओढताना पहिले.

ते पाहून दु:खी झालेले बाबासाहेब, एकही शब्द न बोलता खाली मान घालून तेथून निघून गेले.

खुद्द घाणेकरांना आपल्या या अभावितपणे घडलेल्या कृतीबद्दल आणि त्यावरील बाबासाहेबांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप वाईट वाटले. त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात वाईट क्षण असे त्याचे वर्णन केले होते.

एखाद्या महापुरुषाबद्दल मनापासून आदर असेल तर, त्याचा सन्मान किती अभावितपणे राखला जातो, त्याची ही उत्तम उदाहरणे आहेत.

===

यात महत्वाची गोष्ट ही की कोणत्याही महापुरुषाचा वेश धारण करताना फक्त तो वेशच नव्हे तर त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव वेश करणाऱ्याला असायला हवी. ती नसेल तर आपण ज्या महापुरुषाचा वेश करतो त्यांचा अपमान होऊ शकतो.


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on “शिवाजी महाराजांचा कुर्निसात : घाणेकरांचा संभाजी आणि अटल बिहारींचा शिवाजी : दोन जबरदस्त आठवणी!

 • November 21, 2018 at 6:32 pm
  Permalink

  मला इतिहास, वर्तमान काळातील वाचनाची खूप आवड आहे मी निवेदक म्हणून त्याचा माझ्या जीवनामध्ये मीच उपयोग करे त्यामुळे अशा आमच्या माझ्या उपयोगी असणाऱ्या नवनवीन गोष्टींची माहिती मला मिळाल्यास मला जाणवते

  Reply
 • November 23, 2018 at 1:58 pm
  Permalink

  nice

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?