गांजाची शेती : स्थिरतेच्या प्रतीक्षेतला शेती व्यवसाय आणि नशेच्या विळख्यातली तरुणाई

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज भारत सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. येथील जवळपास ३६ कोटी लोकसंख्या ही १०-२४ या वयोगटातील आहे.

ही आपल्यासाठी जशी आनंदाची बाब आहे तशीच काळजी घेण्यासारखी देखील. कारण या तरुणवर्गाला योग्य दिशा मिळाली नाही तर यांचा देशाला फायदा सोडून नुकसानच होईल.

पंजाब हरियाणा या राज्यात तेथील तरुण कसा नशेच्या आहारी गेला यावर विविध माध्यमातून होत असलेली चर्चा आपण ऐकतो.

हरियाणा आणि पंजाब मध्ये ही स्थिती भीषण म्हणण्याइतकी असेलही, पण उर्वरित देशात, आपल्यापुरते बोलायचे तर महाराष्ट्रात तरुण वर्गातील नशेच्या प्रश्नावर कानाडोळा करण्या इतकी परिस्थितीतर नक्कीच नाही.

 

ganja-inmarathi
hiveminer.com

परंतु या परिस्थितीला बदलण्यासाठी सरकार अन समाज या पातळीवर कोणती धोरणे आहेत याचा कधी उघड विचार/चर्चा होते का?

कुठल्याही एखाद्या समाजाशी, राजकारणाशी निगडित विषयांवर ‘प्राईम टाईम’ भरवणारे पत्रकार या विषयांवर घसा कोरडा करत नाहीत.

महाराष्ट्रातील काही भागात गांजाची शेती आढळून आली, अशा बातम्या वृत्तपत्रातून अधुन मधून येत राहतात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. पुढे या गांजाच्या शेतीच काय होत हे कळायला मार्ग उरत नाही.

कारवाई करावी तर शेतकऱ्यांच्या संघटना पीक स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढतात अन गांजाच्या शेतीची परवानगी द्यावी तर सामाजिक नैतिकतेचा मुद्दा करून समाजासाठी काम करणारे लोक समोर येतात.

१८८५ पर्यंत भारतात कायदेशीर असणारा गांजा राजीव गांधी सरकार ने १९८५ च्या ‘नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉफीक सबस्टन्सेस ऍक्ट ( मादक द्रव्ये आणि मनोवैज्ञानिक पदार्थ कायदा) ने बेकायदेशीर ठरवला.

तेंव्हा पासून आजही पाश्चिमात्य देशांच्या दबावाला बळी पडून हा कायदा संमत केला असा आरोप होतो.

मादक द्रव्ये, त्यांची तस्करी आणि त्या मागचे आंतरराष्ट्रीय राजकारण या सगळ्यांच्या दबावाखाली येऊन भारतात गांजा उत्पादन बंदी करण्यात आली अशी ओरड अधून मधून होत राहते. निमित्त असते ते गांजाच्या शेतीची परवानगी मिळावी हे.

 

Lakshmipuram-ganja-inmarathi
thenewsminute.com

भारत किंवा भारतीय उपखंडासाठी गांजाची ओळख फार जुनी आहे. सुमारे ४००० वर्षे. सोमरस आणि चिलीम ओढणे यातुन इथले देव ही सुटले नाहीत, त्या अर्थाने हा इथल्या संस्कृतीचा भाग.

पंजाब हरियाणात सर्रास दिसणारे प्रातिनिधिक चित्र म्हणजे, अंगणात खाटेवर बसून किंवा एखाद्या पारावर बसून पाईप ओढणारे म्हातारे…१८८५ नंतर यावर बंदी घातली आणि उपाययोजनेत अथवा कायद्यात पळवाटा असल्या की काळाबाजार सुरू होतो.

त्याआधी सोन्यावर घालण्यात आलेल्या बंदीने ही गोष्ट सिद्ध केली होती.

सोने तस्करी कितीतरी वाढलेली होती. गुन्हेगारी जगात सोने तस्करी आणि मादक द्रव्य विक्री याने गलेलठ्ठ पैसे उभारू शकले. हत्यारे खरेदी करू शकले.

याला कारण सरकारचे जाणीवपूर्वक या विषयाकडे होत असलेले दुर्लक्ष असे आरोप सतत होत असतात.

गांजा हे वार्षिक पीक. स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार केला तर, ग्रामीण भागात तंबाखू सोबत गांजाही तेवढाच दैनंदिन जीवनाचा भाग होता. गांजाच्या शेतीपासून मिळणारे उत्पन्न त्याला असलेल्या मागणीमुळे चांगला परतावा देत असे.

त्यामुळे आजही गांजाच्या शेतीला परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. फक्त सरकारला परत विकायच्या अटीवर देशातील काही गावात गांजाचे पीक घ्यायची परवानगी सरकारने दिली आहे.

पण त्यातील जाचक अटींमुळे तेथील शेतकरीही नाखूष दिसून येतात. हे असे निर्बंध असताना आज शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात गांजा सहज मिळतो.

खसखशीच्या झाडापासून गांजा सोबतच चरस आणि अफू बनवण्यात येते. पण त्याला असणाऱ्या उग्र वासाने ही गोष्ट लपवून करणे शक्य नाही.

म्हणजे यंत्रणा कुठेतरी या सगळ्यांना राजरोसपणे पाठीशी घालत असली पाहिजे.

 

ganja-india-police-inmarathi
reggae-agenda.nl

२००३ नंतर महाराष्ट्रात तरी मोठया प्रमाणात गांजाची तस्करी करताना छापे घातलेत असे प्रकरण पुढे आले नाही. २००३ मध्ये २ ट्रक गांजा जप्त करण्यात आला होता.

त्यानंतर जणू सर्व परिस्थिती आटोक्यात आली आहे. शहरात चालणाऱ्या रेव्ह पार्ट्या, त्यांना होणारी गर्दी, सर्व प्रकारचे ड्रग्स उपलब्ध असणे यात व्यवस्थेची अवस्था दिसून येते.

तात्पुरत्या उत्तेजनासाठी मादक द्रव्ये घेण्यातून तंबाखू आणि दारूने जेवढी हानी होते तेवढी होत नाही, असे काही संशोधनातून समोर येत आहे.

परंतु मादकद्रव्यांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम आणि मादक द्रव्यांच्या शेतीतून शेतीला स्थैर्य मिळू शकेल का? या विषयावर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे.

कदाचित सरकारी धोरणात आलेल्या खुलेपणाने शेतीचे आर्थिक गणितही बदलू शकेल, त्यातून आत्महत्येकडे वळणाऱ्या शेतकऱ्याला कदाचित चांगला परतावा देणारा एखादा पर्याय उपलब्ध होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?