' राधिका मसालेची ३०० कोटींची शॉपिंग – मराठी प्रेक्षकांना मूर्ख समजता काय? – InMarathi

राधिका मसालेची ३०० कोटींची शॉपिंग – मराठी प्रेक्षकांना मूर्ख समजता काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

फोर्ब्स ह्या जगप्रसिद्ध बिझनेस मासिकाने एका भारतीय व्यावसायिक महिलेची दखल घेतली आहे. त्या महिलेचे नाव वाचून अभिमानाने उर भरून आला.

अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये अतोनात कष्ट करून ह्या महिलेने तिच्या भारतीय कंपनीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले.

ते नाव तुम्हीही वाचलेत तर तुमच्याही मनात आनंद दाटून येईल.

अवघ्या एका वर्षात घराघरात जेवणाची रंगत वाढविणाऱ्या “राधिका मसाले” च्या सर्वेसर्वा राधिका सुभेदार ह्यांनी एएलएफ ही मोठी कंपनी टेकओव्हर करून मसाल्यांच्या क्षेत्रात व कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडवून दिली आहे.

 

radhika-masale-inmarathi
Charmboard.com

टीव्हीवरच्या मालिका अगदी नेमाने व भक्तिभावाने बघणाऱ्या प्रेक्षकांना हे बघून आनंद झाला की अखेर अन्यायाचा पराजय करून न्यायाचा व सत्याचा विजय झाला.

सत्याची व न्यायाची बाजू कधीही हरत नाही हेच आपल्याकडील मालिकांमध्ये कायम दाखवण्यात येते.

ह्यात गंमत अशी की मालिकेचे ७०% भाग हे मुख्य नायक किंवा नायिका ह्यांच्यावर टोकाचे अन्याय दाखविण्यात घालवण्यात येतात.

जो खलनायक किंवा खलनायिका असते तिचा पराजय अगदी शेवटी शेवटी दाखवून मालिका घाईघाईत गुंडाळण्यात येते.

अगदी शेवटच्या दोन ते तीन भागात खलप्रवृत्तीच्या लोकांचे अगदी १८० डिग्रीज मध्ये हृदयपरिवर्तन होऊन त्यांना सगळ्या कृष्णकृत्यांचा पश्चाताप होतो आणि ते सर्वांची माफी मागतात.

मग विशाल हृदयाचे आपले नायक नायिका त्या माजी खलनायक खलनायिकेला मोठ्या मनाने माफ करतात व शेवट गोड होऊन (एकदाची ) मालिका संपते.

गेल्या काही वर्षात आलेल्या ह्या मालिका बघितल्या की एक असे लक्षात येते की काही सन्माननीय अपवाद सोडल्यास निर्माते व दिग्दर्शक प्रेक्षकांना अत्यंत गृहीत धरून वाट्टेल ते दाखवून मोकळे होत आहेत.

आपण काहीही दाखवले तरी प्रेक्षक बघतात आणि कशातही लॉजिक वगैरेचा काहीही संबंध नसतो असा प्रेक्षकांना मूर्ख समजण्याचा ऍटिट्यूड हल्ली दिसून येतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

एकदा मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे असे दिसल्यावर मग ती शक्य तितकी खेचायची म्हणून ओढूनताणून ऍक्सीडेन्ट करवून मुख्य पात्राची स्मृती घालवणे, त्यांच्यावर कसले तरी आर्थिक संकट येणे, अचानक कुठला तरी भयावह आजार उद्भवणे असे प्रकार दाखवले जातात.

नाहीतर १२ महिने गरोदरपणा दाखवून त्या नावाखाली नायिकेचे डोहाळे व कोडकौतुक दाखवून त्यात एपिसोड वाढवतात.

 

Honaar_Soon_Mee_Hyaa_Gharchi_inmarathi
youtube.com

ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षक निमूट बघत आहेत हे कळल्यावर “के वाल्या” मालिकांनी तर मेलेली माणसे पुन्हा पुन्हा जिवंत करून व अचानक १०, १५, २० वर्षांची लीप घेऊन मध्यंतरी कहर केला होता.

नशीब हे लोण मराठी मालिकांत अजून आले नाही. परंतु आता मात्र कोट्यावधींची घरे, गडगंज श्रीमंती व कोटीच्या कोटी उड्डाणे असलेल्या बिझनेस डील्स हे लोण मराठीत सुद्धा येऊ घातले आहे.

ह्यापूर्वी मराठी मालिकांची कथा एखाद्या मध्यमवर्गीय फार तर उच्च मध्यमवर्गीय घरात घडत असे.

परंतु आता मात्र चकचकीत श्रीमंती व कोट्यावधींच्या डील्सचा मोह मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शकांनाही पडला आहे असे सध्याच्या सुरु असलेल्या मालिका बघून दिसून येते.

आपण मघाशी ज्या मालिकेबद्दल बोलत होतो ती राधिका सुभेदारची मालिका म्हणजे “माझ्या नवऱ्याची बायको”! ही मालिका सुरु झाली तेव्हा असे वाटले होते की ही एका सामान्य गृहिणीच्या संघर्षाची कथा असेल.

एक सामान्य गृहिणी जिचं जग म्हणजे तिचा नवरा, तिचा मुलगा व तिचे घर इतकेच आहे.

ती मनाने चांगली आहे. तिला शक्य होईल तेवढी ती सर्वांना मदत करते. पण ह्या सर्व प्रकारात ती एक बावळट गावंढळ बाई दाखवली हे प्रेक्षक म्हणून मनाला पटत नाही.

आजच्या काळात ज्या सोसायटीमध्ये ती राहते त्यात ती अगदी ओढूनताणून मिसफिट दाखवली आहे.

त्यात तिचा नवरा एक अत्यंत अहंकारी, मेल शॉव्हिनिस्ट, खोटारडा, बाहेरख्याली बेजाबदार माणूस आहे. हा माणूस बायकोला फुकटात मिळालेली नोकर असल्यासारखी वागवतो.

त्याला बायकोविषयी प्रेम ,काळजी नाही. तिचा सतत अपमान करण्यात त्याच्या आयुष्याची धन्यता आहे.

 

radhika-housewife-inmarathi
Charmboard.com

अशातच जेव्हा तिला त्याच्या अफेयरबद्दल कळतं तेव्हा ती त्याला परत मिळवून आपला संसार वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करते.

पण शेवटी जेव्हा तिला हे कळतं की नवरा आणि त्यांचं नातं सुधारण्याच्या पलीकडे गेले आहे तेव्हा ती पेटून उठून नवऱ्याविरुद्ध व प्रस्थापित समाजाविरुद्ध स्वतःला सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करते. कष्ट करते.

स्वतःच्या व्यक्तीमत्वात १८० डिग्रीचा फरक आणून एक स्मार्ट, अप टू डेट मॉडर्न बिझनेस वूमन बनते. मसाल्यांचा बिझनेस उभा करते.

इथपर्यंत काही अतिशयोक्ती गोष्टी वगळता कथा बऱ्यापैकी सुरु होती. परंतु आता मात्र त्यात अतिशय विसंगत व तर्काला न पटणाऱ्या गोष्टी दाखविणे सुरु आहे.

एक मसाल्यांचा बिझनेस जो काही महिन्यांपूर्वी दारोदार जाऊन मसाले विकण्यापर्यंत मर्यादित होता तीच कंपनी आता अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. इतकी एक्स्पोनेन्शियल ग्रोथ कुठल्याही बिझनेसमध्ये नसते.

एकाच वर्षात कुठल्याही लहान कंपनीचा टर्न ओव्हर कोटीत होत नसतो हे सामान्य प्रेक्षकांना कळते पण निर्माता व दिग्दर्शकांना कळू नये?

कुठलाच बिझनेस इतका साधा सोपा नसतो व तो मोठा होण्यास काही कालावधी जावा लागतो. तसेच कुठलाही व्यवसाय करणे म्हणजे डाव्या हाताचा मळ नसून त्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात.

अनेक टक्के टोणपे खाऊन अनेक बऱ्यावाईट अनुभवातून जावे लागते हे होमवर्क “माझ्या नवऱ्याची बायको” च्या कथालेखक, निर्माते तसेच दिग्दर्शकांनी केले नाही असे दिसते.

तसेच त्यांनी प्रेक्षकांना इतके गृहीत धरले आहे की राधिकाने एका छोट्या कंपनीच्या भरवशावर अचानक ३०० कोटी कुठून आणले?

तिने ३००० रुपयांचीची साडी विकत घ्यावी तशी ३०० कोटींची एक मोठी कंपनी विकत घेतली ह्याचे कुठलेही लॉजिकल स्पष्टीकरण देण्याची गरज कथालेखक, निर्माते तसेच दिग्दर्शकांना वाटली नाही.

 

anita-date-inmarathi
Charmboard.com

तसेच मसाल्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर ३०० कोटी असू शकतो का हा ही मोठा प्रश्न आहेच.

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निर्माते व दिग्दर्शक प्रेक्षकांना देत नाहीत म्हणजेच हा सगळा प्रेक्षकांना गृहीत धरून त्यांना मूर्ख समजून वाट्टेल ते त्यांच्या गळी उतरवण्याचा प्रकार आहे.

कुठे गेल्या त्या हसत खेळत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिका व कुठे ह्या मालिका ज्यांचा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नाही!

आपण अतिशयोक्तीपूर्ण व फिजिक्सच्या नियमांना धाब्यावर बसवतात म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांची मजेत टिंगल करतो, रजनीकांत व्हर्सेस सीआयडी जोक्सवर पोट दुखेस्तोवर हसतो.

ह्याचप्रमाणे ह्या मालिका सुद्धा लॉजिकला चॅलेंज देणाऱ्या अतिशयोक्तीच्या रांगेत जाऊन बसणाऱ्या आहेत असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

वर्षानुवर्षे प्रेक्षकांना मूर्ख समजून टीव्ही वर काहीही दाखवणे सुरु आहे व आता हे चित्र बदलणे आपल्या म्हणजे प्रेक्षकांच्याच हातात आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?