ह्या तमिळ नेत्यामुळे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनू शकल्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कुमारासामी कामराज, हे नाव आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदाच ऐकत असतील आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की याच माणसाने नेहरूंची पुत्री इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यात मोलाची भूमिका बजावली होती, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या राजकीय खेळाचा नंतर त्यांनीच पश्चाताप व्यक्त केला होता.

या केवळ एकाच गोष्टीसाठी त्यांची राजकीय क्षेत्रात आठवण काढली जाते असे नाही, तर त्यांनी इतरही समाजपयोगी कामे केली.

मुलांसाठी मिड डे मील स्कीम सर्वात पहिल्यांदा त्यांनीच लागू केली होती. तामिळनाडूच्या प्रत्येक गावात स्वातंत्र्याच्या फक्त १५ वर्षाच्या नंतर वीज त्यांच्यामुळेच आली होती.

 

K.Kamraj-marathipizza01
wikipedia.org

स्वातंत्र्या नंतर १९६४ साला पर्यंत पंडित नेहरूंनी सलग देशाचे पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळला. पण त्यांच्या नंतर कोण हा यक्षप्रश्न उभा राहिला.

नेहरूंच्या मृत्युनंतर भारतात सुद्धा पाकिस्तानसारखे वातावरण निर्माण होईल अशी चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली जाऊ लागली. शेजारील शत्रू देश देखील नेहरू नंतर अराजकता माजेल असा विचार करत भारताचे वाईट चिंतून होते.

१९५४ पासून के. कामराज तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांनी संघटनेसाठी दशके खपवली होती. ते तामिळनाडूच्या गावागावात पोहचले होते.

नेहरूंचे पहिले सर्वात मोठे राजकीय विरोधी आणि भारताचे पहिले गवर्नर जनरल राजगोपालाचारी यांना देखील कामराज यांनीच आपल्या राज्यातून नेस्तनाबूत केले होते. कामराज यांच्या नेतृत्वामूळेच डीएमकेचे मोठे आव्हान समोर असताना देखील तामिळनाडू मध्ये कॉंग्रेस सत्तेमध्ये आली.

यानंतरच नेहरूंनी ती गुप्त कामगिरी के. कामराज यांच्यावर सोपवली आणि भारतीय राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय खेळाला १९६३ साली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात झाली.

 

K.Kamraj-marathipizza02
intoday.in

कामराज यांनी हैदराबाद मध्ये झालेल्या एका मिटिंगमध्ये नेहरुंना सांगितले की,

मला मुख्यमंत्री पद सोडून राज्याचा पक्षाध्यक्ष बनून पुन्हा एकदा संघटनेसाठी काम करायचे आहे. इतरही नेत्यांनी आता पुन्हा पक्षात परतून लोकांना पक्षाशी जोडण्याची गरज आहे.

नेहरूंनी देखील त्यांच्या विनंतीला मान दिला. त्यांना देखील कामराज यांचे म्हणणे पटले. या संदर्भात कामराज यांनी एक अॅक्शन प्लान बनवला.

या प्लाननुसार कॉंग्रेसच्या सहा कॅबिनेट मंत्र्यांना आणि सहा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना पुन्हा पक्षाच्या कार्यात सामील करण्यात आले. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मोरारजी देसाई, लाल बहादूर शास्त्री, जगजीवन राम यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रभानू गुप्त, मंडलोई, बिजू पटनायक यांचा समावेश होता.

ही खेळी खेळून नेहरूंनी भविष्यातील पंतप्रधानपदासाठी इंदिरा गांधीसमोरील संभाव्य स्पर्धक बाजूला सारले. काहीच महिन्यांत त्यांनी कामराज यांना कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवले.

एके दिवशी कामराज यांनी नेहरुंना विचारले की,

तुमच्यानंतर तुमचा उत्तराधिकारी कोण असणार, याबद्दल तुमचा विचार काय आहे.

त्यावर नेहरू म्हणाले की,

इंदिरा….

१९६४ च्या मे महिन्यामध्ये नेहरूंचा मृत्यू झाला. कॉंग्रेसमध्ये दोन दावेदारांमध्ये संघर्ष सुरु झाला. मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये. शास्त्री यांना नेहरूंच्या निकटचे मानले जात असे. कामराज यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या गटाने देखील शास्त्रींनाच समर्थन दिले. सर्वसंमतीने शास्त्री हे पीएम बनले आणि त्यांच्या कॅबिनेट मध्ये इंदिरा गांधी यांना जागा मिळाली.

 

K.Kamraj-marathipizza04
thelallantop.com

पण १९६६ मध्ये शास्त्री यांचा मृत्यू झाला. यावेळस पंतप्रधान म्हणून कामराज यांनी इंदिरा गांधींचे नाव पुढे केले. आता मात्र मोरारजी देसाई देखील खवळले. त्यांनी मतदान घेण्याचा आग्रह धरला.

कामराज यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून सर्व महत्वाच्या नेत्यांच इंदिरा गांधींना समर्थन मिळवून दिले. कामराज यांचा हा डाव यशस्वी झाला आणि नेहरूंच्या पुत्री भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्या.

आता तुमच्या लक्षात आले असेल की नेहरूंनी कामराज यांना राज्यातून थेट राष्ट्रीय स्तरावर का सक्रीय केले.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या १९६७ च्या निवडणुकीमध्ये मात्र कॉंग्रेसने सपाटून मार खाल्ला. खुद्द कामराज यांना आपल्या राज्यात हार स्वीकारावी लागली.

इंदिरा गांधी यांनी पराभूत झालेल्या नेत्यांनी पद सोडावे असे आदेश दिले. कामराज यांना देखील नाईलाजाने पद सोडावे लागले. या खेळीला प्रत्युत्तर म्हणून कामराज यांनी मोरारजी देसाई यांची इंदिरा गांधींच्या कॅबिनेट मध्ये रवानगी केली.

मोरारजी वेळ मिळेल तसा इंदिरांना कमीपणा दाखवायचा प्रयत्न करायचे. इकडे कामराज इंदिरांना दुसरा पर्याय शोधू लागले.

हे युद्ध इतके पेटले की कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. कामराज मूळ कॉंग्रेसमध्ये राहिले तर इंदिरांनी स्वत:ची वेगळी कॉंग्रेस स्थापन केली. या धक्क्यानंतर कामराज वैयक्तिक आणि राजकीय जीवनातही कमजोर पडू लागले.

दिल्लीमध्ये त्यांची सक्रियता कमी झाली. २ ओक्टोंबर १९७५ रोजी कामराज यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

 

K.Kamraj-marathipizza03

इंदिरा गांधींनी कामराज यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. कामराज यांची इच्छा होती, इंदिरा गांधींच्या साथीने कॉंग्रेस अधिक बळकट करण्याची. पण राजकारणाच्या ह्या अनिश्चिततेच्या क्षेत्रात मनासारखे सगळं व्हायला लागले तर विचारायची सोय नाही.

असो, एक नेता म्हणून कुमारसामी कामराज हे नेहमीच कट्टर कॉंग्रेशी म्हणून ओळखले गेले. शास्त्री यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे नेता अतुल्य घोष यांनी त्यांना सल्ला दिला की,

विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष असल्याने भारताच्या पंतप्रधान पदावर बसण्याचा तुम्हाला थेट अधिकार आहे.

त्यावर त्यांचे उत्तर होते की,

ज्या व्यक्तीला हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा नीट बोलता येत नाही त्याने या देशाचा पीएम बनू नये असे माझे स्पष्ट मत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?