' ४१ वर्ष त्याने गुप्तपणे असंख्य मुर्ती घडवल्या, त्याच्या मृत्यूनंतर दरवर्षी २५००० पर्यटक तिथे भेट देतात – InMarathi

४१ वर्ष त्याने गुप्तपणे असंख्य मुर्ती घडवल्या, त्याच्या मृत्यूनंतर दरवर्षी २५००० पर्यटक तिथे भेट देतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फिनलँडमध्ये रशियाच्या बॉर्डरला लागून परिक्कला नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या सामान्य गावाच्या एका अतिसामान्य रहिवाश्याने वसवलेल्या अविष्काराची ही गोष्ट.

आयुष्यभर जगाला टाळून स्वतःचंच एक नवं जग निर्माण करणाऱ्या एका माणसाची गोष्ट.

हा माणूस वयाच्या सोळाव्या वर्षी एका पेपरमिल मध्ये कामगार म्हणून रुजू झाला. आपल्या पहिल्याच पगारातून त्याने सफरचंदाची रोपे आणि काँक्रीटच्या गोण्या विकत आणल्या.

त्याच्या पहिल्याच पगारातून विकत घेतल्या गेलेल्या या दोन गोष्टींतून एक अचंबित करून सोडणारे उद्यान तयार होणार होते..

 

 

रोज संध्याकाळी कामावरून आल्यानंतर, न चुकता अशी आपल्या वयाची ४१ वर्षे अत्यंत गुप्ततेत हा माणूस हे उद्यान आणि त्यात त्याचं स्वतःचं असलेलं काँक्रीटच्या मूर्त्यांचं जग घडवीत होता.

१९६० दरम्यान हे काम सुरू केल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने त्या उद्यानात अशी ५५० शिल्पे घडवली होती!

 

 

२०१० साली त्याच्या मृत्यूनंतर या ठिकाणचा पत्ता बाह्य जगाला लागला, आणि आता त्या माणसाने – फिनलँडच्या वेइयो रोंक्योनेनने वसवलेल्या स्कल्प्चर पार्कला दरवर्षी जवळपास २५,००० पर्यटक भेट देत असतात!

सामाजिक जीवनात एकलकोंड्या असणाऱ्या वेइयो रोंक्योनेनला मानवी समाजाची आणि भावभावनांची पुरेपूर समज होती.

त्याने वसवलेले हे उद्यान म्हणजे त्याच्या जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न होता. जणू काँक्रीटच्या त्या शिल्पांद्वारे वेइयो जगाला एक लांबलचक पत्रच लिहीत होता!

 

 

वेइयोने निर्माण केलेल्या शिल्पाकृती अनेक मानवी भावभावनांच्या व कृतींच्या निदर्शक आहेत. ही शिल्पे म्हणजे योगा करत असलेले लोक, स्त्रिया, लहान मुले, दैनंदिन कार्य करणारे स्त्री पुरुष तर काही चक्क भुते देखील आहेत!

असं म्हटलं जातं की वेइयोची शिल्पे ही संस्कृती, धर्म आणि रीतीरिवाज प्रदर्शित करणारी एक विस्तृत शृंखला आहे.

वेइयो रोंक्योनेन स्वतः एकलकोंडा आणि सामाजिक जीवनापासून दूर पळणारा असला तरीही तो एक उत्तम वाचक आणि मानवी स्वभावाची जाण असणारा होता, हे त्याने निर्माण केलेल्या शिल्पांतून समजतं.

१९६० साली वेइयोने योगाभ्यास करायला सुरुवात केली, आणि त्याचेच मूर्तिमंत रूप म्हणजे त्याने घडवलेली २५० योगाभ्यासात लीन असणारी शिल्पे!

त्याच्याच म्हणण्यानुसार, हे उद्यान म्हणजे त्याच्या तरुण शरीराच्या आठवणींचंच प्रतीक आहे!

 

वेइयोने त्याचे उद्यान पहावयास आलेल्यांना कधीही बंदी केली नाही. तो स्वतः संभाषण सुरू करत नसला तरीही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मात्र देत असे. त्यांचे निरीक्षण करत असे आणि आणखी शिल्पे घडवीत असे.

वेइयोला जेव्हा केव्हा या शिल्पांना म्युझियम्स मध्ये देण्याबद्दल विचारलं जाई, तेव्हा तो म्हणत असे, “मी त्यांनाच विचारून सांगतो”.

त्यांचं उत्तर कायमच “नाही” असं येई आणि ती शिल्पे आपसूकच वेइयोच्या उद्यानातच राहत!

फिनलँडच्या परिक्कला गावात कधीच शिल्पकलेचा एकही धडा न घेतलेल्या, समाजापासून दूर दूर पळणाऱ्या एका माणसाने आपलं स्वतःच एक गूढ जग निर्माण करून ठेवलंय, जे पुढे पिढ्यानपिढ्या जगाला अचंबित करून सोडणार आहे..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?