' पार्थ की श्रीरंग? गोपाळ शेट्टी की उर्मिला मातोंडकर?: महाराष्ट्रातील दहा तुफान लक्षवेधी सुपरफाइट्स! – InMarathi

पार्थ की श्रीरंग? गोपाळ शेट्टी की उर्मिला मातोंडकर?: महाराष्ट्रातील दहा तुफान लक्षवेधी सुपरफाइट्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रत्येक निवडणुचे एक  वैशिष्ट्य असते. २०१९ ची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. भारतीय जनता पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येणार का?  इथपासून राहुल गांधी त्यांचे नेतृत्व सिद्ध करू शकतील का?

यांसह असंख्य प्रश्न चर्चिले जात आहेत. २३ मे च्या निकालानंतर काही प्रश्नांची उत्तरे निश्चितच मिळतील.

ही निवडणूक जशी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांसाठी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांच्या नेतृत्वासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

देवेंद्र फडणवीस, शरद पवार हे ज्या गांभीर्याने  मैदानात उतरले आहेत त्यावरून याची कल्पना येतेच.

 

election-inmarathi
MyMahanagar.com

महाराष्ट्राच्या राजकारणाची भावी दिशा काय असेल याची चुणूक या निवडणुकीतून मिळेल. तूर्तास या निवडणुकीत अशा कोणत्या लक्षवेधी लढती आहेत ज्यामुळे तिथे रंगत निर्माण झाली आहे.

अशा या प्रतिष्ठेच्या आहेत तरी कोणत्या आणि त्यामागची कारणे काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.

१) डॉ. सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप

 

sangram inmarathi
hindustan times

लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले तोच सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर होय.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जागावाटपाची बोलणी सुरळीत सुरू होती.

मात्र विखे – पवार  घराण्याच्या वर्चस्वाच्या लढाईने तोंड वर काढले आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र भारतीय जनता पक्षात येऊन दाखल झाले. त्यांना लगेच खासदारकीचे तिकीटही मिळाले.

आता काँग्रेस पक्षात असूनही राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मित्र पक्षाचा याठिकाणी प्रचार करणार नाहीत तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस खरंच एवढी मजबूत स्थितीत होती का? की ही जागा त्यांना सोडता आली नाही. याचे उत्तर निकालानंतर स्पष्ट होईलच. एवढे मात्र नक्की की ही निवडणूक विखे विरुद्ध पवार अशीच आहे.

२) सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल

 

kanchan kul inmarathi
yahoonews.com

बारामती मध्ये शरद पवारांची सत्ता कायम राहिली आहे. पराभव करणे तर दूरच पण विरोधी पक्षाने या ठिकाणची निवडणूक गांभीर्याने लढवण्याची फारशी कुणाला आठवण  देखील नाही. मात्र यावेळेस भारतीय जनता पक्ष बारामतीची जागा सुद्धा जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आणि तो एक चर्चेचा विषय झाला.

कांचन कुल यांना भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आता मुख्यमंत्री आपला शब्द खरा करून दाखवतात की पवार आपला गड कायम राहतात याची उत्सुकता आहेच.

खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीपूर्ण सामने काही नवीन नाहीत. २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी झाले. जर कमळाच्या चिन्हावर महादेव जानकर लढले असते तर जिंकले असते असा भाजप वारंवार दावा करताना दिसतो.

तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात छुपा समझोता असल्याची देखील बरीच चर्चा होती. मात्र यंदा मुख्यमंत्री स्वतः ही जागा जिंकण्याविषयी आत्मविश्वास बाळगून आहेत.

३) शिवाजीराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे

 

kolhe inmarathi
MyMahanagar.com

शिवाजीराव आढळराव पाटील याचे शिरूर मतदारसंघात तसे चांगले प्राबल्य आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत छोट्या पडद्यावरील कलावंत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका गाजवणारे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.

शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट घेत आपले नशीब आजमावयाचे ठरवले आहे.

४) श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार

 

Parth-and-Barane inmarathi
mpcnews.com

अजित पवार यांची पुत्र पार्थ पवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत अवघ्या महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरली आहे. शरद पवार यांची तिसरी पिढी यानिमित्ताने निवडणुकीत  उतरल्याने पवार घराण्यासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची आहे.

५)  डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी विरुद्ध सुशील कुमार शिंदे

 

sushilkumar inmarathi
mpcnews.com

सोलापूरचा सामना हा तसा रंगतदार अवस्थेत नव्हता. कारण यापूर्वी देखील सुशील कुमार शिंदे यांनी पराभवाची चव चाखली आहे.

मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस आणि त्यासोबत वंचित बहुजन आघाडी कडून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या जागेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 ६) अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे

 

suni-gite inmarathi
loksatta.com

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना गेल्या निवडणुकीतही रंगला होता. सुनील तटकरे मागील निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाले होते. मोदी लाटेतही त्यांनी चांगलीच टक्कर दिल्याने ही निवडणूक काय अशी अटीतटीची होईल.

मात्र ही जागा लक्षवेधी ठरली ती वेगळ्याच कारणाने! गेल्या निवडणुकीत सुनील तटकरे जरी अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाले असले तरी त्याच नावाच्या “डमी” उमेदवाराने नऊ हजार मते मिळवली होती.

गमतीची बाब म्हणजे हे “डमी” प्रकरण यंदाही पहायला मिळणार आहे. कारण शिवसेनेच्या अनंत गीते यांच्याशिवाय अजून एक अनंत गीते या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.

७) आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत कौर राणा 

 

adsul inmarathi
india.com

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवनीत कौर राणा यांनी निवडणूक लढवली होती. मात्र यंदा आपल्या युवा स्वाभिमानी पक्षाकडून त्या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे.

आमदार रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा यांनी गेल्या निवडणुकीत देखील आनंदराव अडसूळ यांना चांगलीच टक्कर दिली होती. तेव्हा या जागेवर चुरशीचा सामना होईल असे मानले जात आहे.

८) संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील

 

vishal patil inmarathi
hindustantimes.com

२०१४ च्या  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी लाट होती की नाही  याचे उत्तर तेव्हा मिळाले जेव्हा सांगलीची जागा काँग्रेसने गमावली.  सांगली आणि नंदुरबार या दोन्ही जागा काँग्रेसने पहिल्यांदाच गमावल्या होत्या. त्यामुळे यंदा सांगलीची जागा काँग्रेस राखणार का याबाबत उत्सुकता होती.

पण काँग्रेसने ती उत्सुकता निवडणुकीआधीच आपल्या मित्रपक्षाला जागा सोडत संपुष्टात आणली.

मग पुढे नाराजी नाट्यानंतर अखेर  माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नातू विशाल पाटील राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची असल्याने या लढतीच्या निकालावर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असेल.

९) गोपाळ शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर

 

shetty inmarathi
indiatoday.com

भारतीय जनता पक्षाचे गोपाळ शेट्टी यांच्यासाठी उत्तर मुंबई हा तसा एक सुरक्षित मतदारसंघ आहे.

मात्र चित्रपट तारका उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षातर्फे ही निवडणूक लढत असल्याने इथे काहीशी रंगत बघायला मिळत आहे. अर्थात गोपाळ शेट्टी यांच्यासाठी  ही निवडणूक सोपी मानली जात होती शिवाय संसदेत त्यांची कामगिरीही उत्तम राहिली आहे. अशा वेळेस जनता कुणाच्या पाठीशी उभी राहते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

१०) रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे

 

shinde inmarathi
abolive.com

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार असल्याच्या निर्णयानंतर इथे खूप घडामोडी घडल्या मात्र पुढे  शरद पवार यांनी माघार घेतल्याचे समोर आले. तोपर्यंत रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातील मोठे नाव भाजपच्या गळाला लागले होते.

मात्र भाजप मध्ये देखील तिढा काही सुटलाच नाही आणि अखेर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी अगदी कालपर्यंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली.

मात्र आधी पवारांच्या माघारीमुळे तर दुसरीकडे मोहिते पाटील कुटुंबीय  शरद पवारांपासून दूर झाल्याने या जागेचा निकाल काय असेल याचबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. परिणामी ही निवडणूक शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्हींसाठी प्रतिष्ठेची आहे.

महाराष्ट्रातील अशा या लक्षवेधी लढतींचे निकाल समोर येतीलच मात्र तोपर्यंत मतदार राजा सजग राहून योग्य उमेदवाराला मत देतील आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करतील यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?