यूपीएससीचा निकाल लागला की ह्या गावात “कुठल्या घरात कोणती पोस्ट” एवढीच चर्चा होते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
युपीएसचीची परीक्षा भारतातील काही कठीण परीक्षांपैकी एक समजली जाते. दर वर्षी लाखो लोक ही परीक्षा देतात पण अगदी बोटांवर मोजण्याइतक्या लोकांना ह्यात यश मिळते. ह्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी लोकांना दिवसरात्र मेहनत घ्यावी लागते.
दिवसातले अनेक तास अभ्यास करावा लागतो. तरीही पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही परीक्षा पास होणे अवघडच असते.
अनेकांना ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दोन तीन अटेम्प्ट सुद्धा द्यावे लागतात. परीक्षेला बसणाऱ्या लाखो लोकांपैकी फक्त ०.००४ टक्के लोक आयएएस होतात.
पण उत्तर प्रदेशातील माधोपट्टी ह्या लहानश्या गावात मात्र आयएएस होणे अगदी सामान्य बाब आहे. माधोपट्टी ह्या छोट्याश्या गावात ७५ घरे आहेत त्यातील ४७ लोक आयएएस अधिकारी आहेत.

द बेटर इंडियाच्या बातमीप्रमाणे माधोपट्टी हे गाव उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर जिल्ह्यात आहे. ह्या गावातील एका घरातील चार भावंडांनी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
हा एक रेकॉर्डच आहे. हे चार भाऊ विनयकुमार सिंह, छत्रपाल सिंह, अजय कुमार सिंह आणि शशिकांत सिंह आयएएस उत्तीर्ण झाले आहेत.
ह्यातील विनय कुमार सिंह हे भावंडांत सगळ्यात थोरले आहेत आणि त्यांनी १९५५ साली आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते बिहारचे चीफ सेक्रेटरी म्हणून निवृत्त झाले आहेत.
आणि छत्रपाल सिंह हे तामिळनाडूचे चीफ सेक्रेटरी होते. छत्रपाल सिंह व अजय कुमार सिंह ह्यांनी १९६४ साली आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली आणि शशिकांत सिंह १९६८ साली आयएएस झाले.
खान बहादूर सय्यद मोहम्मद मुस्तफा हे माधोपट्टी गावातील पहिले सरकारी अधिकारी होते. ते प्रसिद्ध शायर व उर्दू गझलकार वामीक जौनपुरी ह्यांचे वडील होते.

खान बहादूर हे ब्रिटिशांच्या काळात म्हणजेच १९१४ साली सरकारी अधिकारी म्हणून नोकरीत रुजू झाले होते. त्यानंतर ह्या गावातून कुणी आयएएस होण्यास अनेक वर्षांचा कालावधी जावा लागला.
स्वतंत्र भारतात माधोपट्टीतुन इंदू प्रकाश हे १९५२ साली आयएएस झाले. आणि त्यानंतर इथल्या लोकांनी ठरवूनच टाकले की आपल्या गावातील तरुण लोक आयएएस झालेच पाहिजेत.
एशियन एजला दिलेल्या मुलाखतीत माधोपट्टीमध्ये शिक्षक असलेले अरविंद कुमार म्हणाले की,
“आमच्या गावात तुम्हाला दिसेल की मुले बारावी झाल्यानंतरच आयएएस आणि पीसीएस परीक्षांच्या गाईड व पुस्तके वाचण्यास व अभ्यास करण्यास सुरुवात करतात.
–
ते अगदी लहानपणापासूनच ह्या अभ्यासाला सुरुवात करतात आणि सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषा चांगळू व्हावी ह्यावर भर देतात. आमच्या गावातील बहुतांश शाळा हिंदी माध्यमाच्या आहेत त्यामुळे मुले इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अगदी आधीपासूनच प्रयत्न करतात.”
ह्या गावातील मुलांना त्यांचे आईवडील लहानपणापासूनच आयएएस होण्याचे स्वप्न बघण्यास प्रेरणा देतात आणि त्यासाठी ते स्वतः सुद्धा मेहनत घेतात.

ह्या मुलांना आधीपासूनच कठीण स्पर्धेची जाणीव करून दिली जाते आणि त्याप्रमाणे त्यांना अभ्यासाची निवड करण्यास भाग पाडले जाते. म्हणूनच ह्या गावातील ७५ घरांतून देशाला ४७ आयएएस अधिकारी मिळाले आहेत.
ह्या मुलांच्या नैसर्गिक हुशारी, अभ्यासाची चिकाटी आणि इतर गुणांना पॉलिश करून त्यांना यशाच्या मार्गाकडे नेण्याचे श्रेय जौनपूरच्या तिलक धारी सिंह पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कॉलेज ऑफ जौनपूरला जाते.
बहुतांश आयएएस अधिकाऱ्यांनी ह्याच कॉलेजातून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यानंतर त्यांनी IAS किंवा PCS च्या परीक्षा दिल्या.
पण दुर्दैवाची बाब अशी की ह्या गावात आजही प्राथमिक सुविधांचा अभाव असलेला दिसतो. ह्या गावातून इतके लोक आयएएस अधिकारी झालेत, मोठमोठ्या पदांवर नोकरी करून ते निवृत्त झालेत.
–
- वीस वर्षांत एकदाही सुट्टी न घेतलेला, निवृत्तीनंतरही काम करणारा पोलीस अधिकारी
- भारतात खरे “चांगले दिवस” आणण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी
–
आजही ह्या गावातील अनेक लोक सरकारी सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत पण गावाची अवस्था मात्र फारशी बरी नाही. भारतातील इतर खेड्यांमध्ये जशी अवस्था आहे तसेच माधोपट्टीमध्ये देखील रस्ते खराब आहेत.

रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यातून रस्ता शोधत जावे असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडतो. विजेचा मनमानी कारभार आहे. कधी वीज असते तर कधी नसते.
विजेच्या बाबतीत सगळं अनियमित कारभार आहे आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीत तर आनंदच आहे.
अगदी प्राथमिक आरोग्य सुविधा फक्त जेमतेम उपलब्ध आहेत.आरोग्य केंद्रात एकच नर्स आहे आणि त्या प्राथमिक उपचार करतात. मोठ्या आजारांसाठी गावकऱ्यांना शहरात जावे लागते.
शाळा आहेत पण आयएएसच्या परीक्षेला बसणाऱ्या मेहनती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे अजूनही एकही कोचिंग संस्था अस्तित्वात नाही. ह्या गावात एटीएम सुद्धा नाही. गावकऱ्यांना पैसे काढण्यासाठी दुसरीकडे जावे लागते.
हे गाव तर तसे अगदी दुर्गम प्रदेशातही नाही. शहरापासून हे गाव फक्त पाच किमी अंतरावर आहे आणि प्रतापगड-जौनपूर फाट्यापासून हे गाव फक्त २ किमी अंतरावर आहे.
तरीही ह्या गावाकडे सरकारी यंत्रणांकडून दुर्लक्ष होते आहे. मुख्य रस्त्यावर ह्या गावाकडे जाणारा एखादा सूचनाफलक सुद्धा नाही.

तरीही अश्या परिस्थिती सुद्धा इथले विद्यार्थी मेहनत करतात. परीक्षा उत्तीर्ण होतात, यश मिळवतात. पण मग नंतर सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर आपल्या गावाला विसरून जातात की काय?
इतके आयएएस अधिकारी ह्या गावातून सरकारी सेवेत असल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या गावाची अवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न तरी केले आहेत की नाहीत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
अनेक आयएएस अधिकारी ह्या गावचे आहेत म्हटल्यावर ह्या गावात बऱ्याच वेळा विविध माध्यमांचे पत्रकार येतात, स्टोरी करतात आणि गावाला प्रसिद्धी मिळते.
पण सरकारी अधिकाऱ्यांच्या नजरेत ह्या गावची दुर्दशा कशी येत नसावी बरे?
–
- भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठीच्या “एनडीए” परीक्षेची तयारी कशी करावी? समजून घ्या..
- भारतीय पोलीस खात्याची शान वाढवणाऱ्या निडर महिला IPS अधिकारी!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.