‘मॅक्डोनाल्ड्स’ने अशी कोणती शक्कल लढवली की ज्याने लहान मुलांना वाचनाची गोडी लागतेय?! जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

हल्ली वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. लोकांचे वाचन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. लोकांना हल्ली चांगले काही वाचायलाच आवडत नाही. टीव्ही आणि स्मार्ट फोन मुळे लोक वाचेनासेच झाले आहेत. अशी ओरड सगळीकडे ऐकायला येते.

जर मोठी माणसेच वाचनाचा कंटाळा करीत असतील तर लहान मुलांना दोष देण्यात तर काही अर्थच नाही.

त्यांच्या पुढ्यातली मोठी माणसेच जर सदानकदा टीव्हीवरच्या निरर्थक सिरियल्स आणि स्मार्टफोन वर सोशल मीडिया आणि चॅटिंगमध्ये बिझी असतील तर बिचाऱ्या लहान मुलांवरही तेच संस्कार होतील.

ज्या घरात आई वडील, आजी आजोबा छान छान पुस्तके आणून ती वाचत असतील किंवा मुलांना लहानपणापासूनच मजा वाटेल अशी पुस्तके वाचून दाखवत असतील त्या घरातली लहान मुलांना आपसूकच वाचनाची गोडी लागते.

 

reading-inmarathi
https%3A%2F%2Ffee.org

एखाद्याला वाचनाची आवड असते पण इतर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड रुजावी म्हणून घरातील पालक व इतर लोकांना प्रयत्न करावे लागतात. एकदा का वाचनाची आवड लागली की मग माणूस एकटा असला तरी कंटाळत नाहीत.

हे ग्रंथ गुरु प्रसंगी सोबती म्हणून, प्रसंगी गुरु म्हणून शेवटपर्यंत आपली साथ सोडत नाहीत.

उद्याचे चांगले नागरिक घडवणे ही फक्त पालकांचीच जबाबदारी नाही. तर लहान मूल घडवणे ही एक सामूहिक व सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे.

आई-वडील, घरातील इतर लोक, शेजारचे-पाजारचे मामा-मावशी, आत्या-काका, ह्यांच्यासह शाळेतील शिक्षक हे सुद्धा कळत नकळत मुलांवर चांगले वाईट संस्कार करत असतात.

त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी घरातल्या लोकांबरोबरच समाजाने सुद्धा आपले चांगले योगदान देणे गरजेचे आहे.

वाचनाची सवय लावण्यासाठी असेच सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर त्याचा चांगलाच परिणाम आपल्याला दिसून येईल. सध्या न्यूझीलंड मध्ये असाच प्रयत्न होताना दिसतो आहे.

 

macdonalds-inmarathi
readersdigest.com

मॅकडॉनल्ड्स ही फास्ट फूड चेन जगात सगळीकडे पसरलेली आहे. त्यांच्या बर्गर्स आणि इतर खाद्यपदार्थांबरोबरच त्यांच्या हॅपी मील्स मधून फ्री मिळणाऱ्या खेळण्यांचे जगभरातील लहान मुलांमध्ये खुप आकर्षण आहे.

अर्थात हॅपी मील हे मॅकडॉनल्ड्सचे एक मार्केटींग गिमिक आहे. हॅपी मीलमधून फ्री मिळणाऱ्या लिमिटेड एडिशन खेळण्यांसाठी मॅकडी मध्ये जाण्याच हट्ट करणारी अनेक लहान मुले आहेत.

पण आता न्यूझीलंड मध्ये मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून मॅकडॉनल्ड्सने त्यांच्या हॅपी मीलबरोबर लहान मुलांसाठी पुस्तके देणे सुरु केले आहे.

लहान मुलांना आवडतील अशीच ही पुस्तके आहेत. त्यामुळे मुलांना वाचनाची सवय लागण्यास मदतच होईल.

न्यूझीलंडमध्ये मॅकडॉनल्ड्समध्ये मुलांना हॅपी मील बरोबर रॉल्ड डाहल ह्या प्रसिद्ध लेखकाची पुस्तके दिली जाणार आहेत. रॉल्ड डाहल हे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक,कादंबरीकार, कवी, पटकथाकार व फायटर पायलट सुद्धा होते.

 

rald-dahl-inmarathi
emertainmentmonthly.com

त्यांच्या लघुकथा जगभरात खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या २५० मिलियन्स पेक्षाही जास्त प्रति विकल्या गेल्या आहेत. आपल्या कथांचा अनपेक्षित अंत करण्यात त्यांची हातोटी होती.

त्यांच्या कथेत हास्यरसाचा प्रयोग प्रामुख्याने झालेला आढळतो. म्हणूनच वाचक त्यांच्या कथेत अगदी हरवून जातो.

त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. लहान मुलांना आवडतील अश्या अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या. त्यापैकी जेम्स अँड द जायंट पीच, मटिल्डा, चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी, द विचेस, फँटॅस्टिक मिस्टर फॉक्स, जॉर्जस मार्व्हल्स मेडिसिन ही पुस्तके जगभरात प्रसिद्ध आहेत.

म्हणूनच लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मॅकडॉनल्ड्सने ह्या बेस्टसेलर लेखकाची पुस्तके हॅपी मील बरोबर देण्याचा निर्णय घेतला आहे.

मागच्या पिढीतील अनेक लोक ही पुस्तके वाचत मोठे झाले आहे. आता आपली मुलेही चांगली पुस्तके वाचतील म्हणून न्यूझीलंडमधील पालकही खूष झाले आहेत, आणि हॅपी मील बरोबर गोष्टी वाचायला मिळतील म्हणून मुलेही आनंदात आहेत.

 

book-inmarathi
cbc.com

मॅकडॉनल्ड्स ह्या पुस्तकांच्या ८,००,००० प्रति हॅपी मील बरोबर मोफत देणार आहे.

“द हॅपी मील रीडर्स प्रोग्रॅम हा पालकांना मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात मदत करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे ” असे मॅकडॉनल्डसचे न्यूझीलंडचे डायरेक्टर ऑफ मार्केटिंग जो मिचेल ह्यांनी सांगितले.

आता पुढचे काही आठवडे येथील मुलांना चटपटीत खाऊबरोबरच चांगली पुस्तके देखील मिळणार आहेत.

मॅकडॉनल्ड्सने असाच उपक्रम २०१८ साली युनायटेड किंग्डम मध्येही राबवला होता आणि त्यात लहान मुलांना सहा आठवड्याच्या काळात बालसाहित्याच्या १४ दशलक्ष प्रति देण्यात आल्या होत्या.

अर्थात ह्यावरही अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की हे सुद्धा मॅकडॉनल्ड्सचे एक प्रकारचे मार्केटिंग गिमिकच आहे. परंतु ते निदान त्यांच्या पदार्थांबरोबर पुस्तके तरी देत आहेत.

 

macd-food-inmarathi
bargainmoose.ca

लहान मुलांना ही मुलींची खेळणी, ही मुलांची खेळणी असे जेंडर बायस शिकवणारी स्टिरिओटिपिकल तकलादू प्लास्टिकची खेळणी देऊन प्रदूषणात भर घालण्यापेक्षा पुस्तके देणे चांगलेच आहे.

आपल्या देशात सुद्धा असे काही सुरु झाल्यास निदान काही मुलांना तरी वाचनाची आवड लागू शकेल. व्हिडीओ गेम्स, स्मार्ट फोन्स ह्यापासून मुले काही वेळ तरी लांब राहतील.

अनेक वेफर्सच्या पाकिटात, जंक फूड च्या पाकिटांतून फुटकळ खेळणी, टॅटू फ्री देण्याच्या जाहिरातींचा रोज भडीमार केला जातो.

मुलेही त्या खेळण्यांसाठी आई वडिलांकडे त्या जंक फूडची मागणी करतात. वर म्हटल्याप्रमाणे उत्तम पिढी घडवण्यासाठी समाजाला सुद्धा प्रयत्न करावे लागतात.

समाजाचा एक भाग म्हणून ह्या फास्ट फूड, जंक फूड विकणाऱ्या कंपन्यांनी असा उपक्रम सुरु केल्यास आपल्याही देशातील लहान मुले वाचनाकडे वळू शकतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?