' कोरोना रुग्णसंख्या वाढतेच आहे, मग लॉकडाऊन “चुकीची” स्टेप होती का? वाचा वस्तुनिष्ठ विश्लेषण – InMarathi

कोरोना रुग्णसंख्या वाढतेच आहे, मग लॉकडाऊन “चुकीची” स्टेप होती का? वाचा वस्तुनिष्ठ विश्लेषण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : डॉ अजय ब्रह्मनाळकर, एम.डी. (मेडिसीन)
कराड

===

इतका कडक लॉकडाउन आवश्यक होता का? यामुळे आपण कोरोना व्हायरस पूर्णपणे रोखू शकू का? आणि जर पूर्णतः रोखू शकणारच नसू तर इतकी जबर आर्थिक किंमत मोजायला लावणाऱ्या लॉकडाउनची खरंच गरज होती का?

सर्वसामान्य लोकांनी लॉकडाउनचा निर्णय बहुशः स्वीकारला असला तरी काहींच्या चिकित्सक मनात हे प्रश्न उद्भवतात. यांची उत्तरे शोधण्यासाठी काही बाबी आपल्याला अगोदर समजावून घ्याव्या लागतील.

आपण कोणत्याही व्हायरसचा मुकाबला आपल्या प्रतिकारशक्तीच्या सहाय्यानेच करू शकतो.

आजारी पडायचेच नसेल तर अशा व्हायरसच्याप्रती आपल्या अंगी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असणे आवश्यक असते. अशी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी व्हायरसचा शरीराला एकदा अनुभव यावा लागतो.

तो अनुभव जेव्हा नसतो तेव्हा, शरीर अंगभूत प्रतिकारशक्तीने व्हायरसच्या हल्ल्याचा सामना करते परंतु, तेव्हा व्यक्ती आजारी पडतेच.

 

unwell woman inmarathi
therightmoves.com

 

हा व्हायरस संपूर्णतः नवा असल्याने अनुभवाअंती शरीरात निर्माण होणारी, आजारपासून संपूर्ण संरक्षण पुरवणारी प्रतिकारशक्ती कोणाच्याच अंगी या घटकेला नाही.

अल्पावधीत हा व्हायरस पावणे दोनशे देशांत पसरल्याने संपूर्ण जगातील सर्व लोक एकाच वेळी एकच आजाराने आजारी पडण्याचा धोका प्रथमच निर्माण झाला आहे. १९१८च्या स्पेन फ्लूच्या वेळेस काहीशी अशी स्थिति निर्माण झाली होती.

हा व्हायरस संसर्गात आलेल्यांपैकी जवळपास वीस ते तीस टक्के लोकांवर आघात करतो. (तबलीग लोकांत हेच प्रमाण आढळले आहे) बाधित झालेल्या शंभर व्यक्तींपैकी वीस व्यक्ती गंभीर आजारी होतात.

या वीस गंभीर आजारी व्यक्तींपैकी पांच ते सहा मृत्यू पावतात. घशाच्या स्रावाच्या तपासणी अंती या आजारचे नक्की निदान होते.

 

corona and sari inmarathi
scroll.in

 

नक्की निदान झालेल्या शंभर रुग्णांपैकी साठ रुग्णांत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. (भारतातील आकडेवारी). केवळ चाचणीत बाधित आढळलेले हे लोक आपल्या अंगभूत प्रतिकारशक्तीच्या जोरावर यातून बाहेर पडतात.

परंतु हा व्हायरस त्यांच्या शरीरातून पूर्ण निघून जाण्यापूर्वीच्या काळात (म्हणजे जवळपास १४ ते २१ दिवस) अशी आजारी न पडलेली व्यक्ती संपर्कात आलेल्यांना व्हायरसचा प्रसाद देऊ शकते.

हे मूळातून टाळायचे तर आजारी पडलेल्या पहिल्याच व्यक्तीला ती व्हायरसमुक्त होई पर्यन्त वेगळे काढणे आवश्यक होते. तरच व्हायरस तिथेच संपला असता. कम्युनिटीत पसरला नसता. ती वेळ साधता आली नाही हे उघड आहे.

परंतु व्हायरस हा विषाणू असल्याने तो परजीवी आहे, पॅरॅसाइट किंवा बांडगूळ. सबब तो कुठल्यातरी शरीरातच जीवंत राहू शकतो. शरीर मिळाले की तिथे तो वाढतो.

शरीरात वाढलेला व्हायरस शरीराबाहेर पडतो आणि दुसरे शरीर मिळताच तिथे वाढू लागतो. शरीराबाहेर तो फार थोडाकाळ जीवंत राहू शकतो.

कोरोना व्हायरस, खोकताना किंवा शिंकताना बाधित व्यक्तीच्या नाकातोंडातून फवारा उडतो, त्यातून बाहेर पडतो. परंतु, फवाऱ्यातील त्यातल्या त्यात मोठ्या थेंबातच तो सामावू शकत असल्याने १मीटरपेक्षा अधिक अंतर हवेतून ओलांडू शकत नाही.

 

corona outbreak inmarathi
indiatoday.com

 

तो जवळपासच्या पृष्ठभागावर स्थिरवतो. म्हणून हे ड्रॉपलेट इन्फेक्शन; हवेतून पसरणारे इन्फेक्शन नाही. (हवेतून पसरणारे इन्फेक्शन असते तर आपण सामाजिक अंतर राखण्याने लॉकडाउन करून ते रोखू शकलो नसतो.)

व्यक्तीकडून व्यक्तीकडे संक्रमित होणारे असे जे आजार असतात त्यांच्या बाबतीत एका व्यक्तीने जर एक किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तीला आजार संक्रमित केला तर संक्रमण पूर्णपणे रोखले गेले असे मानले जाते. ही अर्थातच आदर्श स्थिती झाली.

आपल्याकडे सर्वसाधारणतः एक व्यक्ती इतरांना बाधित करू शकेल अशा काळात चारशे व्यक्तींच्या संपर्कात येईल असे मानले गेले आहे.

व्हायरसची प्रादुर्भावक्षमता २५ टक्के लोकांना बाधित करण्याची आहे हे लक्षात घेतले तर आपण ही रेस व्यक्तीसंपर्क पूर्णतः रोखल्याखेरीज कधीच जिंकू शकणार नाही हे अगदी स्पष्ट आहे.

म्हणून संपूर्ण लॉकडाउन हा तज्ज्ञांचा सल्ला ज्या धोरणकर्त्यांनी मानला नाही त्यांची धोरणे फसली. इटली, स्पेन, अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांत घडलेल्या घटनांनी हे दाखवून दिले आहे.

या व्हायरसची घातकता आणि आपली जनसंख्या हे पाहता आपण लॉकडाउनचा निर्णय घेण्यास दिरंगाई केली असती पुढे काय वाढून ठेवले होते याची कल्पना आपण करू शकतो.

व्हायरसचे संक्रमण रोखायचे तर माणसाचे संक्रमण जवळ जवळ ठप्प करणे आवश्यकच होते. कमी अधिक उशिराने का होईना सगळ्या जगाने तेच केले. आपण ते वेळेत केले का याची साक्ष कालांतराने इतिहास देईल.

 

corona lockdown inmarathi
amarujala.com

 

लॉकडाउन साथीच्या कोणत्या टप्प्यावर केला गेला आणि किती सर्वंकष केला गेला यावर तो किती परिणामकारक ठरणार हे अवलंबून असते.

इटली आणि स्पेनमध्ये सुरुवातीस काही परगणे लॉक केले गेले. हे पूर्णपणे निरुपयोगी ठरले. त्यानंतर सर्वंकष लॉकडाउन करण्यात आला. त्यात आठ ते दहा दिवस गेले.

चीनने वुहान संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्याआधी तिथे तीस रुग्ण आढळले होते आणि इटलीत आठशे रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण लॉकडाउन झाला. आणि त्यांची ही परिस्थिती झाली. स्पेनमध्ये हेच घडले आणि अमेरिकेतही हेच घडते आहे.

संपूर्ण लॉकडाउन केल्यानंतर जवळपास तीन आठवड्यांच्या अवधीनंतर नव्या बाधितांची आणि बळींच्या संख्येतील वाढीचा वेग थोडा कमी होताना दिसतो.

संपूर्ण कडक लॉकडाउनच्याऐवजी अधिकाधिक लोकांच्या चाचण्या कराव्यात आणि त्यात पॉझिटिव आढळतील त्यांना फक्त वेगळे करावे असा तोडगा यावर सुचवला जात आहे. हे या नंतरच्या टप्प्यावर करावे लागणारच आहे.

 

corona in india inmarathi
hindustantimes.com

 

परंतु संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाचणी कीट उपलब्ध नव्हती. आजार नवा असल्याने आजार उपटल्यानंतरच याची चाचणी विकसित केली गेली. जगभरात सर्वत्र एकाचवेळी चाचणीचे कीट बनवण्यासाठी लागणारी रसायने आणि इतर साहित्यासाठी मागणी वाढली.

ते साहित्य मिळू लागल्यानंतरही प्रत्यक्ष चाचणी कीट तयार करण्यासदेखील वेळ लागणारच. चाचणीची उपलब्धता जसजशी वाढू लागली आहे तसतशी अधिक चाचणीकेंद्रांना परवानगी शासन देत आहे.

दुसरे असे की, हे धोरण, की जे दक्षिण कोरियाने अमलात आणले आणि यशस्वी करून दाखवले, ते आपल्याकडे यशस्वी होण्याकरता आपले लोक तितके सुशिक्षित आणि हवे होते आणि लोकसंख्याही माफक हवी होती.

त्यामुळे दक्षिण कोरियासारखे धोरण आपल्याला या नंतरच्या टप्प्यावरदेखील राबवता यायचे नाही. आपण क्लस्टर कुठे कुठे निर्माण होतात ते पाहणार आणि तिथेच व्यापक चाचणी धोरण अवलंबणार.

इतके सगळे करूनही रौद्र निसर्गासमोर मानवी प्रयत्नांना मर्यादित यशच मिळणार आहे. निसर्गात हा वणवा तीन महिन्यांच्या थैमानानंतर थोडा ओसरताना दिसतो.

परंतु या तीन महिन्यांच्या छोट्या कालावधीत आजारी लोकांची संख्या इतकी भीषण होते की आरोग्य-व्यवस्था असली तरी ती कोलमडून पडते. इटली, स्पेनमध्ये हा अनुभव आला.

 

corona inmarathi
aljazeera.com

 

जिथे बळकट सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे तिथेही थोडी उसंत मिळणे आवश्यक होते. आपल्याकडे जिथे ती नाही तिथे तर हवीच हवी होती.

सर्व देशांचे धोरणकर्ते लॉकडाउन करून उसंत मिळवण्याच्या प्रयत्नांत आहेत. यामुळे उपचार न मिळाल्याने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या तरी निश्चित कमी होईल.

एवढे करून आपण एकूण कोरोना बाधितांची संख्या रोखू शकणार आहोत का? कळपी प्रतिकारशक्ती (हऱ्ड इम्युनिटी) जोवर निर्माण होत नाही तोवर साथ हटकली जाणार नाही आहे.

या तर्काने काहीच हालचाल केली नाही आणि साथ पसरू दिली तर तीन महिन्यांत ती कळस गाठते. सुमारे ८०टक्के लोक तेव्हा बाधित होतात. अमेरिकेत हे घडले तर मृत्यू पावणाऱ्यांची संख्या २२ लाख असेल आणि ब्रिटनमध्ये ती पांच लाख असेल.

आपल्याकडे ती किती झाली असती? अमेरिकेच्या चौपट आपली जनसंख्या. गणित करून बघा. साथीचा कळस आपण दोन ते तीन महिन्यांनी पुढे ढकलू शकलो तर ही संख्या आपण निम्म्याने कमी करू शकतो असे कॉम्प्युटर मॉडेल सांगते.

जनसंख्येतील बहुसंख्य लोक (८० ते ९५%) बाधित होतात तेव्हाच कळपी प्रतिकारशक्ती निर्माण होते. (गोवरच्या बाबतीत ही टक्केवारी सुमारे पंच्याण्णव टक्के आहे) आजारा शिवाय लसीकरणाने ही प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते.

परंतु त्यासाठी अगोदर लस निर्माण व्हावही लागेल आणि त्यानंतर युद्धपातळीवर सामाजिक लसीकारण करावे लागेल. लोकांनीही सामाजिक कर्तव्य समजून लस घेण्यास आपणहून पुढे यावे लागेल.

 

corona israel scientist inmarathi 2
thetimesofisrael.com

 

थोडा अवधी मिळाला तर आणखीन एका कारणाने साथ मंदावू शकते. कोरोना व्हायरस हा आर एन ए व्हायरस असल्याने तो सारखी रुपे बदलतो. त्याचे थोडे बदलेले रूप कमी घातक असू शकते. ते कम्युनिटीत पसरू शकते. त्याने होणारा आजार हा सौम्य सामान्य सर्दी पडशा सारखा असेल.

हा आजार होऊन गेल्यानंतर मूळ कोरोनाप्रती पाऱ्शल इम्युनिटी मिळू शकते. व्यक्ती संपर्कातून व्हायरस संक्रमित होऊन या व्हायरसप्रती कळपी प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. ती मूळ कोरोनाची साथ रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

अशा तऱ्हेचा फायदा नॉर्वेतील जनतेला एच१एन१च्या साथीच्या वेळेस झाला होता असे त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाचे रूप उत्तरोत्तर बदलत जाणार हे निश्चित आहे. परंतु त्यासाठीही वेळच हवा. वेळ मिळाला तर दगावणाऱ्यांची संख्या घटू शकते.

कोरोनाचा अनोखा व्हायरस, त्याची अल्पावधीत जगभर फैलावण्याची कुवत, त्याची संहारकता आणि प्रादुर्भावशक्ती हे सारे बघता, तो व्यक्ती-व्यक्ती संपर्कातूनच संक्रमित होतो आहे. एवढाच काय तो उःशाप या संकटात आपल्याला मिळालेला आहे.

संक्रमणाची गती कमी केल्याने मानवी जीवांची क्षती कमी होईल. संक्रमणाची गती तेव्हाच कमी होईल जेव्हा व्यक्ती-व्यक्तींतील संपर्क कमी होईल. काही काळा करता सर्व व्यवहार ठप्प केले तर हे होणार आहे.

म्हणून सर्वंकष लॉकडाउन. या लॉकडाउनची आर्थिक किंमत संपूर्ण जगाला द्यावी लागणार आहे त्याप्रमाणेच आपल्यालाही द्यावी लागणार आहे. ती आपण सोसू शकू का? हा एक वेगळा प्रश्न आहे.

परंतु जीवित हानी महत्वाची मानली आणि ती रोखण्यासाठी हाती असलेले उपाय लक्षात घेतले तर सर्वंकष लॉकडाउन करणे हा निर्णय योग्य होता असेच म्हणावे लागेल.

 

corona lockdown inmarathi
npnews24.com

 

एवढ्यावर ही लढाई संपणार नाहीच आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. लॉकडाउन टप्प्या टप्प्यानेच उठवावा लागणार आहे. लॉकडाउन जिथे उठेल तिथे नंतरदेखील सामाजिक अंतर ठेवणे चालूच ठेवावे लागणार आहे.

हात स्वच्छ ठेवण्याची दक्षता सर्वांनी घ्यावीच लागणार आहे. कोरोनाच्या प्रत्येक केसची चोख.नोंद ठेवावी लागणार आहे. तिच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

त्यांच्या आसपासच्या लोकांची मोठ्या प्रमाणावर चाचणी करत राहावे लागणार आहे. आजारी व्यक्ती आणि तिच्या संपर्कतील व्यक्ती यांना कडेकोटपणे विलग ठेवावे लागणार आहे.

येत्या काळात जिथे जिथे बाधित व्यक्तींची संख्या अधिक आढळेल तिथे तिथे रहिवाश्यांवर कडक बंधने चालूच राहतील. लसीकरण, व्हायरस बाधा या वेगवेगळ्या मार्गांनी कळपी प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर किंवा व्हायरस आपले रूप सौम्य करेल. त्यानंतरच हे वादळ कायमचे शमेल.

भविष्याचा अचूक अंदाज कधीच वर्तवता येत नाही. त्यामुळे भविष्यकाळातील विविध परिस्थितींचा आढावा घेऊन वर्तमानात उपलब्ध ज्ञानाच्या आधारे काही निर्णय घ्यावे लागतात. तसे ते आत्ता घेतलेत.

हे सारे शास्त्र समजून घेतले आणि आर्थिक गणित बाजूला ठेवले तरी कोणताही पूर्वानुभव नसलेल्या सर्वस्वी नव्या परिस्थितीला हातळताना कोणता निर्णय योग्य, हे ‘आज’ ठरवणे हा मूळ पेच तसाच राहतो.

आर्थिक गुंतागुंत त्यात येऊन मिसळली की तो आणखीन गहन होतो. म्हणून कोणतेही भाकीत करणे अशक्यच आहे आणि निर्णयाची योग्यायोग्यता ठरवणेही अशक्यच आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?