हॉलंड सरकारने सर्वोच्च पूरस्काराने सन्मानित केलेल्या भारतीय पक्षीतज्ञांचा असामान्य प्रवास…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===  

मागच्या वर्षी २.०  हा रजनीकांतचा चित्रपट येऊन गेला. त्यात मोबाईल फोनच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणावर व खास करून पक्ष्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या घातक परिणामांविषयी भाष्य केले होते.

मोबाईल फोनच्या हानिकारक लहरींमुळे पक्ष्यांच्या जीवावर बेतते, त्यामुळे सृष्टीचे चक्रच बिघडते असे त्यात दाखवले होते. ह्याविषयी जागृती करणारा पक्षीतज्ज्ञ “पक्षिराजन” त्यात दाखवण्यात आला होता.

हा पक्षिराजन आपले संपूर्ण आयुष्य पक्ष्यांच्या अभ्यासासाठी वेचतो. असाच एक खराखुरा पक्षिराजन भारतात होऊन गेला आहे ज्याने आपले संपूर्ण आयुष्य पक्ष्यांच्या अभ्यासात व्यतीत केले. ह्या पक्षी-समर्पित व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर सलीम मोइझुद्दीन अब्दुल अली.

 

SALIM ALI INMARATHI
StarsUnfolded

डॉक्टर सलीम अली ह्यांचा जन्म १२ नोव्हेम्बर १८९६ साली झाला होता. सलीम अली ह्यांना भारतातील आद्य पक्षीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी म्हटले जाते.

त्यांनी भारतात आढळले जाणारे पक्षी, त्यांच्या सवयी, त्यांच्या विविध प्रजाती आणि त्यांतील वैविध्य ह्या सर्व बाबींचा अतिशय बारकाईने अभ्यास केला.

त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन भारतातील असे लोक ज्यांना पक्ष्यांच्या निरीक्षणाचा व अभ्यासाचा छंद आहे असे लोक हौशी पक्षीनिरीक्षक होऊ लागले. हे सर्व पक्षीनिरीक्षक डॉक्टर अली ह्यांना आपल्या गुरुस्थानी मानतात.

डॉक्टर सलीम अली ह्यांना “बर्डमॅन ऑफ इंडिया” असे संबोधले जाते. ते भारतातील असे सर्वात पहिले पक्षीतज्ज्ञ होते ज्यांनी संपूर्ण देशात पक्षी सर्व्हेक्षणाचे आयोजन केले. त्यांनी पक्ष्यांवर अनेक पुस्तके लिहिली ज्यामुळे पक्षी-विज्ञानाचा अभ्यास करणे नंतरच्या पिढीसाठी सुकर झाले.

सलीम अली ह्यांचा जन्म मुंबईच्या एका सुलेमानी बोहरा मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्याच्या आईवडिलांचे ते नववे अपत्य होते आणि सगळ्यात धाकटे होते.

ते केवळ एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि ते तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे झीनत-उन-निस्सा ह्यांचेही निधन झाले. त्यांचे मामा अमीरुद्दीन तैयबजी व काकू हमिदा बेगम ह्यांनी त्यांचा सांभाळ केला.

त्यांचे बालपण खेतवाडी येथे गेले. त्यांचे काका अब्बास तैयबजी एक स्वातंत्र्यसैनिक होते.

सलीम अली ह्यांच्याकडे लहानपणी एक खेळण्यातली छर्ऱ्याची बंदूक होती. त्या बंदुकीने लहान लहान पक्षी टिपणे हा त्यांचा छंद होता.एक दिवस त्यांनी टिपलेल्या चिमण्यांपैकी एक वेगळीच चिमणी सापडली. त्या चिमणीच्या गळ्याजवळ एक पिवळा ठिपका होता.

ही चिमणी नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे त्यांना जाणवले आणि उत्सुकता म्हणून त्यांनी त्यांच्या मामांना ती चिमणी दाखवली आणि ह्या पक्ष्याचे नाव काय असे विचारले.

 

SALIM ALI 1 INMARATHI
Realbharat

मामांनी त्यांना थेट बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकांकडे नेले. तेथे त्या संचालकांनी (डब्ल्यू. एस. मिलार्ड) अलींना तो पक्षी कोणता आहे ह्याची सविस्तर माहिती दिली. आणि तिथे असलेल्या भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला.

इतके विविध प्रकारचे पक्षी बघून अली भारावून गेले आणि त्यांना जी पक्ष्यांची भुरळ पडली ती शेवटपर्यंत कायम राहिली.

त्यानंतर काही काळ सलीम अली ह्यांचा पक्षिनिरीक्षणाचा छंद फक्त पक्षी टिपणे आणि त्यांच्या नोंदी करणे इतपतच मर्यादित होता.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची प्राणीशास्त्राच्या पदवी घेण्याची इच्छा होती पण त्यांना शास्त्रातील काही विषय अवघड वाटल्यामुळे त्यांनी त्यातून माघार घेतली. काही काळाने ते ब्रह्मदेशातील आपल्या भावांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी रंगूनला गेले.

तेथे भावाला व्यवसायात मदत करण्याबरोबरच त्यांनी ब्रह्मदेशातील जंगलांत फिरून तिथले पक्षी टिपून त्यांच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. १९१८ साली तेहमिना ह्यांच्याबरोबर अलींचा विवाह झाला.

१९२४ रंगून येथे व्यवसायात अपयश आल्यामुळे ते भारतात परत आले.

इतक्या काळात तेहमिना ह्यांनी आपल्या पतीला पक्ष्यांच्या अभ्यासात रस आहे हे जाणले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पतींना “तुमचा जो पक्षिनिरीक्षणाचा आणि अभ्यासाचा छंद आहे त्यातच नोकरी करा” असा सल्ला दिला व त्यांना ती नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले.

पण अशी नोकरी मिळावी इतके शिक्षण अलींकडे नव्हते. त्यांना एका जवळच्या ओळखीमुळे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली. पण अलींसाठी हे पुरेसे नव्हते.

त्याकाळी भारतात पक्षीशास्त्र म्हणजेच ornithology हा विषयच कोणाला माहित नव्हता आणि भारतात त्याबद्दल काहीच जनजागृती नव्हती. त्यामुळे त्यांनी जर्मनीला जाऊन पक्षीशास्त्राचे प्रशिक्षण घेतले व ते काही काळ इंग्लंडमध्ये राहिले.

काही काळाने ते भारतात परत आले पण तेव्हाही भारतात ह्या विषयात नोकरी मिळणे अत्यंत अवघड होते. ह्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली आणि ते अलिबागजवळील किहीम येथे आपल्या पत्नीसह वास्तव्याला गेले.

 

SALIM ALI 3 INMARATHI
TopYaps

तिथल्या मुक्कामात त्यांनी “सुगरण” ह्या पक्ष्याच्या वर्तनाचा अतिशय बारकाईने अभ्यास केला व एक प्रदीर्घ शोधनिबंध लिहून काढला.

तो शोधनिबंध “बी एच एन एस” च्या जर्नलमध्ये छापला गेला आणि त्यामुळे सलीम अली जे तोवर केवळ हौशी पक्षिनिरीक्षक म्हणून ओळखले जात होते त्यांना जगात पक्षीशास्त्रज्ञ अशी नवी ओळख मिळाली. त्यांना नावलौकिक मिळाला.

त्यांनी जगाला हे दाखवून दिले की केवळ पक्ष्यांना टिपून त्यांच्यात भुसा भरून ठेवण्यापुरतेच पक्षीशास्त्र मर्यादित नाही. पक्षीशास्त्र हा एक गहन आणि मोठा विषय आहे असे त्यांनी जगापुढे आणले व त्यांच्यामुळे पक्षीशास्त्राला एक वेगळी दिशा लाभली.

त्यानंतर १९३० साली त्यांना अनेक पक्षी मोहिमांसाठी आमंत्रणे येऊ लागली. ह्या मोहीमा ब्रिटिश सरकारने किंवा विविध संस्थानांनी पुरस्कृत केलेल्या होत्या. “ह्या मोहिमांमध्ये मी पक्ष्यांच्या नोंदी तसेच त्यांच्या जीवनशैलीवर अभ्यास करणार आहे.

केवळ पक्षी टिपून त्यांच्या नोंदी करणात मला रस नाही. ते काम कुठलाही स्थानिक कामगार करेल”, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले. त्यावेळी त्यांना पक्षीतज्ज्ञ म्हणून मान्यता मिळाली असल्याने त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली व सलीम अलींचे काम जोमाने सुरु झाले.

 

SALIM ALI 2 INMARATHI
hindustantimes.com

भारताच्या वायव्य सरहद्दीपासून ते पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत व कच्छच्या दलदलीपासून ते केरळच्या घनदाट जंगलांपर्यंत सगळीकडे जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. त्यांनी संपूर्ण देशातच पक्षी निरीक्षण मोहिमा आखल्या.

ह्यात त्यांनी पक्ष्यांचे वर्तन, त्यांच्यात वेळोवेळी हवामानानुसार होणारे बदल, त्यांचे नियमित होणारे स्थलांतर, विणीचे हंगाम ह्या सर्व बाबींची प्रचंड माहिती गोळा केली. त्यांच्या ह्या कामात त्यांच्या पत्नीने त्यांना खूप मदत केली.

अलींच्या सर्व मोहिमांच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी त्या सांभाळत असत. त्यांनी अलींना पुस्तके लिहिण्यासाठी देखील मदत केली. १९३९ साली दुर्दैवाने अलींच्या पत्नीचे तेहमिना ह्यांचे निधन झाले.

ह्यामुळे अली खूप व्यथित झाले कारण त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यांनी पुन्हा लग्न न करण्याचा निर्धार करत त्यानंतरचे त्यांचे संपूर्ण आयुष्य पक्ष्यांचा अभ्यास करण्यात वाहून घेतले.

ते मुंबईला त्यांच्या बहिणीच्या घरी वास्तव्याला आले व तिथेच त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य त्यांच्या ध्येयासाठी व्यतीत केले.

त्यांनी जी प्रचंड माहिती गोळा केली ती त्यांनी सर्वसामान्यांना कळेल अश्या शैलीत लिहून काढली. त्यांचे पहिले पुस्तक ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड्स ” ला आजही पक्षी ओळखण्यासाठी लोकांची पहिली पसंती मिळते.

आज ह्या पुस्तकाची १३वी आवृत्ती बाजारात आहे. ‘हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान” ह्या पुस्तकाचे दहा खंड त्यांनी लिहिले आणि ह्यामुळे ते इतिहासात अजरामर झाले. पक्षिनिरीक्षकांच्या आणि पक्षी अभ्यासकांच्या गुरुस्थानी पोहोचले.

 

SALIM ALI 4 INMARATHI
Antiquariat Löwenstein

त्यांच्या पुस्तकांत भारतीय पक्ष्यांच्या १२०० प्रजाती व २१०० उपजातींच्या नोंदी, त्यांच्या सवयी वगैरे शास्त्रशुद्ध चित्रांसहित माहिती एकाच ठिकाणी आपल्याला मिळते.

डॉ. सिडने डिलन रिप्ली ह्यांच्यासह काम करून त्यांनी पुढच्या पिढीसाठी एक अनमोल ठेवाच तयार केला आहे.

त्यांनी लिहिलेली इतर काही पुस्तके म्हणजे इंडियन हिल बर्ड्‌स,फॉल ऑफ स्पॅरो (त्यांचे आत्मचरित्र), अ पिक्टोरियल गाइड टू द बर्ड्‌स आॅफ इन्डियन सबकाँटिनन्ट, बर्ड स्टडी इन इंडिया, इट्स हिस्टरी ॲन्ड इंपॉर्टन्स , कॉमन बर्ड्‌स ही आहेत.

ह्यांसह त्यांनी अनेक प्रादेशिक मार्गदर्शिका आणि तांत्रिक अभ्यास व अहवालांचे सुद्धा लेखन केले आहे ज्यामुळे आजही पक्षी अभ्यासकांना पक्ष्यांचा एकूण सर्वांगीण अभ्यास करण्यास खूप मदत होते.

 

SALIM ALI 5 INMARATHI
beaninspirer.com

 

१९५० व ६० च्या दशकांत जेव्हा भारतात पर्यावरणाविषयी फार आस्था नव्हती किंवा लोकांमध्ये जागरूकता नव्हती तेव्हा डॉक्टर अलींनी दूरदृष्टी दाखवून भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान व केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात होणाऱ्या पर्यावरणास हानिकारक ठरतील अश्या प्रकल्पांना विरोध केला.

त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की ,”एकवेळ ताजमहाल नष्ट झाला तर पुन्हा बांधता येऊ शकेल पण सायलेन्ट व्हॅली सारखे जंगल नष्ट झाले तर पुन्हा उभारता येणार नाही”.

त्यांच्या प्रयत्नांमुळे तत्कालीन सरकारने हे प्रकल्प स्थगित केले आणि ह्या उद्यानांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन त्यांना कायमचे संरक्षित केले. डॉक्टर अली ह्यांनी अनेक दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांबाबतीत सरकार आणि सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती केली.

त्यांनी भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया रचला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणूनच भारताच्या आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉक्टर सलीम अली ह्यांचा समावेश होतो.

डॉक्टर अलींच्या ह्याच महान कार्यासाठी त्यांचा सन्मान म्हणून १९५८ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार व १९७६ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तसेच १९६७ साली त्यांना ब्रिटिश पक्षितज्ज्ञ संघाचे (British Ornithologists Union) राष्ट्रीय पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

१९६९ साली त्यांना वर्लड कंजर्वेशन युनियनकडून द जॉन सी. फिलिप्स मेडल फोर डिस्टिंग्विश्ड सर्विस इन इंटरनॅशनल कंजर्वेशन मिळाले आणि १९८६ साली हॉलंड सरकारने त्यांचा ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क देऊन गौरव केला.

 

SALIM ALI 6 INMARATHI
Wikipedia

आपले संपूर्ण आयुष्य पक्ष्यांच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले डॉक्टर सलीम अली आयुष्याच्या शेवटी बराच काळ प्रोस्ट्रेट कॅन्सरने ग्रस्त होते. अखेर २० जून १९८७ रोजी त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला.

२० जून रोजी त्यांचे पुण्यस्मरण! ते जाऊन आज ३२ वर्षे होतील. तरीही त्यांनी त्या काळी इतके कष्ट घेऊन केलेल्या नोंदी आजही लोकांच्या मदतीस धावून येत आहेत. त्यांची पुस्तके आणि त्यांचे कार्य अजरामर आहेत. डॉक्टर सलीम अलींना विनम्र अभिवादन!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “हॉलंड सरकारने सर्वोच्च पूरस्काराने सन्मानित केलेल्या भारतीय पक्षीतज्ञांचा असामान्य प्रवास…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?