स्त्री शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह – “सच्च्या फेमिनिझम”साठी आयुष्य वेचणारे मराठी सुपुत्र…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : सर्वेश फडणवीस 

===

आपल्या पूर्वजांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोतच. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगातील साऱ्या मानवांना आपले हे सांस्कृतिक धन एक कुतूहलाचा विषय आहे. याच श्रेणीत शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे.

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांना विनम्र अभिवादन 

त्यांचा जन्म जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.

इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

बालपण आणि तारूण्य

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.

 

Dhondo-Keshav-Karve inmarathi
mapsofindia.com

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.

त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली.

अण्णा गणित विषयाचे तज्ञ होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले.

इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

वयाच्या १४ वर्षीच अण्णांचे लग्न झाले होते. इ.स. १८९१ मध्ये त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे.

ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला.

ही गोष्ट त्या काळी पटणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदीबाई कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात आनंदीबाई कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली.

 

vidhva vivaha inmarathi
ekbihari.com

विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली.

रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले.

या उजाड माळरानावर १९०० मध्ये अण्णांनी एक झोपडी बांधली. गावोगाव फिरून अण्णांनी यासाठी पैसा गोळा केला. आश्रम चालवताना अण्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

रोज सायंकाळी त्यांना पुण्याहून हिंगण्याला चार मैल पायी जावे लागायचे. वारा असो,पाऊस असो किंवा थंडी असो त्रेचाळीस वर्षाचे अण्णा पाठीवर स्वयंपाकाला लागणारे सगळं सामान घेऊन रस्त्याने पायी जात असत. सतत दोन वर्षे त्यांची ही सेवा सुरू होती. याविषयी अण्णांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे.

१९०७ साली अण्णांनी पुण्यात ‘ महिला विद्यालय’ सुरू केले. मुख्य उद्देश स्त्रियांमध्ये ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा हा होता. यासाठी दोन निधी उभारले गेले . एक ‘ ब्रह्मचर्य निधी’व दुसरा ‘शिक्षण निधी’.उद्देश असा होता की मुलीने वीस वर्षाची होईपर्यंत विवाह करु नये व तोपर्यंत शिकत रहावे.

अनाथ बलिकाश्रम व महिला विद्यालय यासारख्या संस्था चालवायला सेवाभावी कार्यकर्त्यांची गरज होती. अण्णांना एक कल्पना सुचली आपल्या लोकांनी आपल्याच समाजाची सेवा केली तर आपलाच विकास होईल.

समाजसेवेची परंपरा निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ‘सेवाभावी कार्यकर्ते’ निर्माण करणारी संस्था काढली.

अण्णांनी निःस्वार्थ बुद्धीने सेवा करणारी संस्था स्थापण्याची शपथ घेतली. आपली सगळी कमाई संस्थेला अर्पण करायची व अत्यंत साधे जीवन जगायला आवश्यक असणारा पैसाच फक्त संस्थेकडून घ्यायचा असे त्यांनी ठरवले.

 

karve inmarathi
indiapost.com

१९१६ ला अण्णांच्या डोक्यात भारतीय स्त्रियांसाठी आपण एखादे विद्यापीठ स्थापन करावे अशी कल्पना साकारत गेली. विद्यापीठ स्थापनेचे उद्देश होते की

१. स्त्रियांना असे शिक्षण मिळावे की जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा.

२.जर विवाहित असतील तर त्या सक्षम पत्नी व माता व्हाव्यात आणि

३. राष्ट्र उभारणीत आपलाही सहभाग आहे या दृष्टीने त्यांचे प्रशिक्षण व्हावे.

विद्यापीठाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असायला हवे. विद्यार्थ्याला मातृभाषा सोडून इतर भाषेच्या माध्यमातून जर शिकावे लागले तर ते त्याच्यावर अकारण ओझे होईल. अण्णांना माहिती होते की ज्ञानप्राप्तीचे सर्वात मोठे साधन म्हणजे फक्त मातृभाषा होय.

मान्यताप्राप्त मोठेपणा

१८ एप्रिल १९२८ वयाच्या एकाहत्तरी ला पुणे नगरपालिकेने एक मोठा सत्कार करून पुण्यातील एका प्रमुख रस्त्याला ‘कर्वे रोड’असे नाव देण्यात आले. १९२९ मध्ये अण्णा युरोप, अमेरिका व आशिया खंडातील अनेक देशांना भेटी देऊन आलेत.

या प्रवासात बर्लिनमध्ये जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन बरोबर शिक्षण या विषयावर विचार विनिमय केला. परदेश दौऱ्यातुन आल्यावर अण्णांच्या जनसेवेच्या कार्यातील उत्साह किंचितही कमी झाला नव्हता. पुढे त्यांनी आपले लक्ष लहान मुलांच्या शिक्षणाकडे वळवले.

महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये त्याकाळी प्राथमिक शाळा नव्हत्या. त्यांनी सामूहिक प्रयत्नातून अशा शाळा सुरू केल्या. यासाठी त्यांनी ‘प्राथमिक शिक्षण संस्थेची’स्थापना केली. १९४८ मध्ये सरकारने या शाळांचा ताबा घेतला. तोपर्यंत अण्णांनी त्या चालविल्या.

 

karve sanstha inmarathi
eduhub.com

माणसा माणसात कुठलाही भेद नाही,सर्व एकच आहेत.’ अशाप्रकारची वृत्ती जनमानसात रुजावी ही अण्णांची इच्छा होती. म्हणून त्यांनी ‘एकता परिषद’ ही संस्था सुरू केली. त्यावेळी त्यांचे वय छाऐंशी होते. हा एकतेचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशाने त्यांनी तेव्हा साऱ्या देशभर प्रवास केला.

अण्णांनी आपले सारे आयुष्य जनसेवसाठी वेचले. सरकार व अन्य संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित केले. बनारस हिंदू विद्यापीठाने ‘साहित्याचार्य’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

१९५५ मध्ये भारत सरकारने ‘ पद्मविभूषण’ हा किताब देऊन त्यांना भूषविले. अण्णांचा १९५८ मध्ये शंभरावा वाढदिवस मोठ्या समारंभापूर्वक साजरा करण्यात आला. त्याचवेळी त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट ही प्रसिद्ध करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपतीनी त्यांना ‘भारतरत्न’देऊन गौरविले.संपूर्ण देशाने त्यांना सन्मानित केले. त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

९ नोव्हेंबर १९६२ ला अण्णांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूशय्येवर असताना ते म्हणाले होते,

‘जर स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करायचे असेल तर सर्वांनी एकाच पवित्र मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. तो मंत्र म्हणजे आपल्या पुरातन धर्मग्रंथानी जे सांगितले, की ‘ सर्वांचं चांगलं व्हावे’हा विचार.

भारतीय स्त्रीला अंधकारातून प्रकाशाकडे व अज्ञानातून ज्ञानाकडे नेले. दुष्ट अशा अंधश्रद्धांच्या रुढीच्या विळख्यातून तिला मुक्त केले अशी थोर व्यक्ती एक महर्षी ऋषितुल्य व्यक्तित्वच म्हणता येईल.

आज अण्णांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. नागपुरात पहिले महिला अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून कार्यरत आहे. अनेक मुली आज या क्षेत्रात दैदीप्यमान अशी कामगिरी करत आहेत. आजची स्त्री शिक्षित होऊन आपले उजज्वल ध्येय गाठण्यासाठी जागृत आहे. व यात कर्वे शिक्षण संस्थेचे बहुमूल्य असेच योगदान आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?