सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या शापित यक्ष कन्येचे आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक – आदित्य कोरडे

लीला नायडू ही दिसायला नि:संशय सुंदर होती. ती १९५४ साली मिस इंडिया बनली होती पण तिला अभिनेत्री म्हणावे की नाही ह्याबाबत मात्र माझ्या मनात संशय आहे.

एक तर तिने फार थोड्या चित्रपटातून काम केले आहे. तिचे हिंदी उच्चार सदोष होते, ती संवाद नीट म्हणू शकत नसे, चेहरा मोहक होता पण त्यात भारतीय अपील नव्हते. तरीही तिचा चित्रपटातला एकंदर वावर हवाहवासा वाटे.

ती पडद्यावर आली कि जाऊच  नये असे वाटते. प्रसंग काहीही असला तरी हिने त्या प्रसंगात कुठे तरी स्वत:ला adjust करून बसून घ्यावे असे उगाच वाटत राहते .

 

 

‘अनुराधा’ हा बहुधा तिचा सगळ्यात गाजलेला चित्रपट. एक तर हा तिचा पहिला चित्रपट पण त्यात तिला अगदी मध्यवर्ती भूमिका नव्हे तर चक्क टायटल रोल मिळाला शिवाय बरोबर बलराज सहानी, अभी भट्टाचार्य, नाझीर हुसेन असले बाप लोक होते.

तरीही चित्रपटपाहून झाल्यावर अन त्यात तिचा सुमार आणि बलराज चा जबरदस्त अभिनय पाहूनही ती आपल्या अगदी आवर्जून लक्षात राहते. ह्या चित्रपटातली गाणी अतिशय सुरेख म्हणजे नुसती श्रवणीय नाहीत तर तिच्यामुळे प्रेक्षणीय आहेतच आणि तिनेही त्यात अत्यंत मोहक अभिनय केलाय.

ह्यातली मला विशेष आवडलेली गाणी म्हणजे “ जाने कैसे सापनोमे खो गयी अखिया…” आणि “कैसे दिन बिते कैसे बीती रतिया …”  खाली लिंक दिलेल्या आहेत. आवर्जून बघा

ह्यात “ मन उजियारा छाया, जग उजियारा छाया …” हे कडवे गाताना तिचे विभ्रम, चेहऱ्यावरचे मोहक हास्य पाहिलेत …अप्रतिम !

 

leela naidu InMarathi

 

तर वरच्या “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना..” लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका. ‘पिया’ च्या पि आणि या मधली ती सूक्ष्म, नाजूक थरथर, अनुराधाचे दबलेले दु:खं उघड करते.

ह्या गाण्यात “ कजरा ना सोहे…” हे कडवं सुरु होण्याच्या अगदी थोड आधी डॉ. निर्मल (बलराज सहानी) अनुराधा गात असतानाच (त्याचे तिच्या कडे लक्ष नसते) शेजारच्या खोलीत जातो त्यावेळी अनुराधाने म्हणजे लीला नायडूने चेहऱ्यावरचे दु:ख, निराशा फार उत्तम दाखवली आहे.

ती गाण्यात इतका सहज सुंदर अभिनय करू शकत असे मग ऐन चित्रपटात काय होई कुणास ठावूक! असो, तिने फार चित्रपट केले नाहीत पण जे केले त्यातले अनुराधा, ये रस्ते है प्यार के हे विशेष गाजले.

 

YEH RASTEYHAIN PYAR KE InMarathi

 

हल्लीचा अक्षय कुमार आणि इलियाना डीक्रुझ चा “रुस्तम” हा चित्रपट त्याचा रिमेक होता आणि हे दोन्ही चित्रपट हे १९५६ सालच्या अत्यंत गाजलेल्या नानावटी केस वर बेतलेले होते.

नानावटी केस भारतातली शेवटची ज्युरी पद्धतीने चाललेली केस होती त्यानंतर ज्युरी पद्धत आपल्याकडे बंद झाली अर्थात अजूनही पारशी लोकांसाठी म्हणजे त्यांच्या कौटुंबिक प्रकरणात मात्र अजुनही ज्युरी पद्धतच वापरली जाते…

असो  – मला वाटते मराठीत ह्या विषयावर एक नाटक ही आले होते. बहुधा रमेश भाटकर त्यात काम करीत असे. तसेच विनोद खन्ना, फरीदा जलाल चा ‘अचानक’ हा जरासा त्यावरच बेतलेला चित्रपट  होता.)

 

Shashikapoor-inmarathi
openthemagazine.com

लीला नायडू चे वडील पत्तीपती रामय्या नायडू हे नावाजलेले अणु शास्त्रज्ञ होते ( खरे खुरे बरका, संभाजी भिडेन्प्रमाणे नव्हे)त्यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञा मारी क्युरी हिच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट केली होती तर लीनाची आई डॉ मार्था ही मुळची स्वित्झर्लंडची अन पेशाने पत्रकार आणि indologist होती.

लीनाने ओबेरॉय हॉटेलचे मालक मोहन सिंग ओबेराय ह्यांचा मुलगा तिलकराज ह्याच्याशी लग्न केले. त्यांना जुळ्या मुली ही झाल्या पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.

 

leela naidu 1 InMarathi

त्यानंतर तिने प्रसिद्ध कवी डोम मोरीयास ह्याच्याशी लग्न केले आणि ते चांगले २५ वर्षे टिकले. २००९ साली ती वारली. तिच्या उत्तर आयुष्यात ती एकटी आणि काहीशी खिन्नच होती.

एखाद्या यक्ष किंवा गंधर्वकन्ये प्रमाणे तिचे आयुष्य शापित होते की काय कुणास ठावूक! पण ती पडद्यावर मात्र एखाद्या यक्ष किंवा गंधर्व कन्ये सारखी सुंदर, मोहक, जिच्यावरून क्षणभरही नजर हटवाविशी वाटत नाही अशी आणि तरीही अप्राप्य वाटे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?