जगातली पहिली ‘हॉस्पिटल ट्रेन’ आहे आपल्या देशात! वाचा, लाईफ लाईन एक्सप्रेसची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

हॉस्पिटल्स, दवाखाने,औषध, औषधोपचार, डॉक्टर्स ह्या सगळ्या गोष्टी शहरांमध्ये किती सहजपणे आपल्याला मिळतात. परंतु भारतासारख्या विकसनशील देशांत खेड्यांमध्ये, अतिदुर्गम भागात या कोणत्याही सोयीसुविधा सहजासहजी मिळत नाहीत.

त्याचाच परिणाम म्हणजे औषधोपचारांअभावी परिस्थिती गंभीर बनते. फक्त डॉक्टर्स, दवाखाने, औषधोपचारच नाही तर,आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे, दळणवळणाची साधने नसल्यामुळे, आरोग्य संदर्भात जागृती नसल्यामुळे तिथे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असतं.

 

 

doctors 4 inmarathi

 

आणि हेच टाळण्यासाठी सरकारने जुलै १९९१ साली भारतीय रेल्वेच्या मदतीने एक अनोखी अशी कल्पना अस्तित्वात आणली आणि ती म्हणजे हॉस्पिटल ट्रेन. जी लाईफ लाईन एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते.

Impact India foundation, Indian railways, आणि Health ministry यांच्या समन्वयाने ही रेल्वे सुविधा अस्तित्वात आली. सुरुवातीला केवळ तीन डब्यांची ही रेल्वे सुरू झाली.

त्यामध्ये लोकांची तपासणी, तातडीचे उपचार, प्रतिबंधात्मक लसीकरण, अपंगांसाठी काही उपचार अशा सुविधा देण्यात आल्या होत्या.

 

life line express inmarathi
free press journal

ही ट्रेन ओळखू यावी म्हणून हिला वेगळ्या रंगाने रंगवण्यात आले आहे. या रेल्वेची इतकीच अपेक्षा होती की, तिथल्या स्थानिक सरकारची मदत, मदतीसाठी तत्पर असलेले आरोग्य स्वयंसेवक असतील तर ही सुविधा चालवणे सोपे होईल.

त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना यात सहभागी करून घेतले तर ट्रेन गेल्यावरही तिथल्या पेशंटचा फॉलोअप ठेवला जाईल आणि लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती वाढेल.

आज २६ वर्षानंतरही ही रेल्वे, आपली सेवा संपूर्ण देशभर देत आहे आणि ते ही मोफत. यामध्ये तपासणी, चिकित्सा,औषध ,ऑपरेशन्स या सगळ्या सुविधा मोफत मिळतात.

ही रेल्वे ज्या ठिकाणी जाणार असते त्या ठिकाणचा सगळा डेटा तिथल्या स्वयंसेवकांकडून कलेक्ट केला जातो. दिव्यांगांच्या डेटा, आरोग्य निर्देशांक आणि उपलब्ध सुविधा किती आहेत याची माहिती गोळा केली जाते. आणि त्यानुसार ती ट्रेन सोयीसुविधांनी सज्ज होऊन त्या गावात जाते.

 

life line express inmarathi 2
jharkhand state news

 

आता या रेल्वेचे डबे वाढवण्यात आले असून सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा आता इथल्या डब्यांमध्ये आहेत. रेल्वे डब्यामध्ये तपासणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

यामध्ये रुग्णांचा नंबर लावण्यासाठी वगैरे गोष्टी सुद्धा आता तिथल्या स्थानिक लोकांच्या सहभागाने शिस्तीत आणि व्यवस्थित होत आहेत. वॉर्ड तयार केले जातात. ऑपरेशन केले जात आहेत, ऑपरेशन झाल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना राहण्याची सोयही या रेल्वेत करण्यात आली आहे.

तसंच तिथे सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस आदी लोकांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था या रेल्वे मध्ये करण्यात आली आहे. ही ट्रेन देशाच्या सर्व भागात धावते. म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर आणि गुजरात ते ईशान्येकडील राज्य अशी धावते.

जिकडे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती आलेली असेल त्याठिकाणी आरोग्य सुविधा देण्यासाठी ही ट्रेन मदत करते.

 

life line express inmarathi 6
the better india

 

जिकडे मेडिकल कॅम्प लावला जातो त्यामध्ये तिथले लोकल डॉक्टर्स, स्वयंसेवक, कॉलेजमधील विद्यार्थी यांना सहभागी करून घेतलं जातं. यांच्यासाठी एक ट्रेनिंग दिलं जातं ज्यामध्ये आरोग्य सेवाविषयक कार्यक्रम कसा राबवायचा याचं प्रात्यक्षिक दिलं जात.

जो मेडिकल कॅम्प लावला जातो तो साधारणपणे तीन ते पाच आठवड्यांचा असतो आणि एका कॅम्पमध्ये सर्वसाधारण ५००० रुग्णांचा इलाज केला जातो. खाजगी आणि सार्वजनिक संस्थांकडून कॅम्पसाठी अर्थसहाय्य घेतलं जातं.

१९९१ नंतर आतापर्यंत जवळजवळ दहा दशलक्ष रुग्णांवर तिकडे उपचार केले गेले आहेत. त्यासाठी जगभरातून जवळजवळ दोन लाख डॉक्टर आणि आरोग्य सेवाअधिकारी यांनी या कॅम्पना भेट दिली आहे, आणि भारताच्या खेडेगावात, दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरवल्या आहेत.

 

life line express inmarathi 7
reasearch gate

 

सुरुवातीला या रेल्वेचा उपयोग हा मोतीबिंदू, दुभंगलेले ओठ आणि पोलिओ यांच्या इलाजासाठी व्हायचा. पण आता मात्र कॅन्सरचे ऑपरेशन पण या रेल्वेमध्ये होत आहेत. सुरुवातीला तीन डब्यांची असलेली ही ट्रेन आता सात डब्यांची आहे.

संपूर्ण ट्रेन ही वातानुकूलित आहे. ट्रेनमध्ये एक अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, एक पॅथॉलॉजी लॅब, एक मॅमोग्राफी युनिट, स्त्रीरोगशास्त्र परीक्षा केंद्र, एक दंतयुनिट, एक्स-रे युनिट, फार्मसी, आरोग्यविषयक सल्लाकेंद्र, ऑन बोर्ड वीज जनरेटर, रुग्णांसाठी वॉर्ड, सुस्सज पँट्री, आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था आहे.

 

life line express inmarathi 4
the telegraph india

 

आणि आता ही ट्रेन वायफाय सक्षम आहे, ज्यामुळे शहरातील मोठमोठे डॉक्टर, तज्ज्ञांना तेथील रुग्णांचे report दाखवून त्यानुसार उपचाराविषयी सल्ला घेण्यात येतो. आता तिकडे प्लास्टिक सर्जरी, दंत शस्त्रक्रिया, बर्न कॉट्रँक्ट आणि कॅन्सर वरील उपचारही केले जातात.

आज या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब रुग्ण या रेल्वेची वाट पाहत असतात आणि जेव्हा तिकडे मेडिकल कॅम्प लागतो त्यावेळेस हे गरीब रुग्ण कृतज्ञतेपोटी डॉक्टरांना फुलं, फळ आणि भाज्या भेट म्हणून देतात. त्यांच्यासाठी ते देवदूतच आहेत.

डिसेंबर २०१६ मध्ये मध्यप्रदेशातील पिपरी कला या खेड्यातील, हिरालाल लोधी नावाच्या रुग्णावर ह्या ट्रेनमध्ये पहिल्यांदा कॅन्सर वरील ऑपरेशन करण्यात आले.

हिरालाल लोधी हा तिथला चहा विक्रेता होता. त्याची रोजची कमाई सातशे रुपये होती. जेव्हा त्याला तोंडाचा कॅन्सर झाला आणि पुढे पुढे त्याला खायला आणि बोलायला त्रास व्हायला लागला.

तेव्हा त्याने त्या वरील उपचारासाठी वीस हजार रुपये खर्च केले. पण गुण येणं कठीणचं व ऑपरेशनसाठी होणारा खर्च न झेपणारा. लोकांकडून अजून उधार घेणे त्याला शक्य नव्हते.

 

life line express inmarathi 3

 

त्याच वेळेस त्यांनी या ट्रेन विषयी ऐकले आणि जेव्हा ही ट्रेन सतना ला गेली त्यावेळेस त्याने तिकडे जाऊन तपासून घेतले. तिकडे त्याची नुसती तपासणी झाली नाही तर त्याच्या तोंडातील tumor काढण्यासाठी पाच तासांचंं ऑपरेशन करण्यात आलं.

त्यामुळे त्याला आता बोलता येतंय. त्याच्यासाठी हा चमत्कारच आहे, कारण यासाठी त्याला एकही पैसा खर्च करावा लागला नाही.

ह्या ट्रेन वर कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी सांगितलेला एक किस्सा देखील, ग्रामीण भागात धावणाऱ्या या ट्रेनचे महत्व अधोरेखित करतो. मुळचे मुंबईचे असलेले बालरोग तज्ञ डॉक्टर तरल नागदा हे गेली सोळा वर्ष या ट्रेनवर स्वेच्छेने सेवा देतात.

ट्रेन मध्ये उपचार घेतलेल्या एका मुलीच्या लग्नाचं आमंत्रण तिच्या वडिलांनी त्यांना दिल होतं. त्याविषयी सांगताना डॉक्टर म्हणाले की, जेव्हा उपचारासाठी ही मुलगी त्यांच्याकडे आली त्यावेळेस तिच्या पायांमध्ये दोष होता, तिला नीट चालता येत नव्हतं.

 

life line express inmarathi 1
the financial express

 

डॉक्टरांनी जेव्हा तिला तपासून, तिच्या वडिलांना सांगितलं की, ऑपरेशन नंतर ही चालू शकेल आणि शाळेत जाऊ शकेल. मात्र तिच्या वडिलांना तिच्या लग्नाची काळजी होती.

डॉक्टरांनी त्या मुलीचं ऑपरेशन केलं आणि त्या मुलीचे पाय सरळ झाले. पुढे मुलगी शाळेत गेली, कॉलेजमध्ये गेली, शिकली आणि आता स्वतःचा जीवनसाथी हे तिने स्वतः निवडला आहे. म्हणून डॉक्टर म्हणतात की, केवळ उपचारांपुरती ही ट्रेन मर्यादित नसून ती लोकांच्या जीवनात बदल घडवत आहे.

या ट्रेन पासून प्रेरणा घेऊन बरेच विकसनशील आणि गरीब देश हे अशा प्रकारची ट्रेन चालू करता येईल का हे पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य, आपल्या राज्यासाठी स्वतंत्र लाईफ लाईन एक्सप्रेस ची योजना आखत आहे.

लाईफ लाईन एक्सप्रेसमुळे भारतातील इतर रेल्वे प्रकल्पनाही चालना मिळाली आहे. २००० साली एच आय व्ही, एड्स जनजागृतीसाठी अशी ट्रेन तयार झाली तसेच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी यासाठी विज्ञान एक्स्प्रेसही सुरू झाली आहे.

 

life line express inmarathi 5

 

आपल्या नावाला जागणारी लाईफ लाईन एक्सप्रेस हजारो गरीब रुग्णांच्या दारात पोहोचत आहे आणि आता अजून यात सुधारणा करण्यासाठी रक्तपेढी उभारण्याचा विचारही या ट्रेनसाठी होत आहे.

कारण ऑपरेशनच्या वेळेस लागणारे रक्त तिथेच उपलब्ध व्हावे हा उद्देश आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या सहकार्याने आता कॅन्सर, स्त्रियांमधील स्तन कॅन्सर, तोंडातील कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

ही लाईफ लाइन एक्सप्रेस भारतातल्या गरीब लोकांसाठी एक वरदान आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?