पकोडे विकणारा ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : धीरूभाई अंबानींचा संघर्षमय प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

रिलायन्स उद्योगसमूहाचा आज असलेला दबदबा वेगळा काही सांगण्याची गरज नाही. अनेक क्षेत्रात त्यांची घौडदौड अव्याहतपणे सुरु आहे. आज उभा राहिलेला हा वटवृक्ष अनेक दशकांच्या संघर्षाचं फळ आहे आणि या यशोगाथेचे नायक म्हणजे धीरूभाई अंबानी!

मोठं स्वप्न पाहण्याची कुवत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली कठोर मेहनत हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. हा प्रवास काही खूप अनुकूलतेतून सुरु झाला नव्हता पण आज त्यांच्या नावाभोवती असलेलं वलय त्यांच्या यशाची साक्ष देते.

धीरूभाईंचं बालपण 

वडील शाळाशिक्षक तर आई गृहिणी अशा सामान्य कुटुंबात धीरूभाईंचा जन्म २८ डिसेंबर १९३२ मध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असून चोरवाड जि. जुनागढ (तत्कालीन जुनागढ संस्थान) हे त्यांचे जन्मगाव होत. लहानपणी घरात असलेल्या आर्थिक समस्या आणि उद्योगी स्वभाव यामुळे ते  छोटा व्यवसाय करण्याकडे वळले.

तेल विकण्याचा व्यवसाय असो वा भजी (हो! पकोडे) विकण्याचा व्यवसाय त्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु केला होता. वयाच्या अवघ्या १२-१३ व्या वर्षी ते व्यवसायाकडे वळले, अर्थात शाळा शिकत असतांना.

गावात तसेच हिंदू-जैन धर्मातील श्रद्धाळू गिरनार या जुनागढ जिल्ह्यातील पवित्र स्थानाची यात्रा करीत असत तेथे ते भजी विकत असत.

अशाप्रकारे त्यांनी परिवाराला आर्थिक साहाय्य केलेच शिवाय यातून व्यवसायाचे प्राथमिक धडे पण गिरवले. त्यांचा कल व्यवसायाकडे अधिक होता. शाळेत ते हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात नव्हते. सुरुवातीची प्राथमिक शाळा चोरवाड आणि नंतर जुनागढ असे त्यांनी शिक्षण घेतले.

जुनागढ संस्थानात त्यावेळी होणाऱ्या राजकीय आंदोलनात ते सक्रिय होते पुढे स्वतंत्र भारतात त्यांनी काँग्रेस पक्षातून वेगळ्या निघालेल्या समाजवादी पक्ष्याच्या निवडणुकीत सहकाऱ्या वतीने प्रचार केला पण पुढे राजकारणापासून लांब राहिले आणि आपली वेगळी निवडली.

नोकरीसाठी एडनला रवाना

१९४८ मध्ये त्यांनी आपले बंधू रामणिकलाल यांच्या मदतीने अजून एका मित्रासोबत एडनला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे सुरुवातीला त्यांनी पेट्रोल पंप वर काम केले. पुढे ए. बीज अँड कंपनी साठी कारकून म्हणून काम करू लागले. ही कंपनी त्या भागातील व्यापार व आयात निर्यात क्षेत्रातील एक मोठी कंपनी होती.

या कामात त्यांनी व्यापारातील बारकावे तर शिकलेच पण व्यवस्थापक म्हणून बढती देखील मिळवली. या कामाव्यतिरिक्त ते अजून लहान सहान काम करत असत याचबरोबर एका गुजराथी व्यापारी पेढी सोबत देखील ते काम करत होते. पुढे १९५८ मध्ये येमेनमध्ये आंदोलन सुरु होऊन अस्थिरता निर्माण झाल्याने परत यावे लागले. दरम्यान १९५५ मध्ये त्यांचा कोकिलाबेन यांच्याशी विवाह झाला होता.

 

dhirubhai-ambani-inmarathi
slideshare.net

भारतात व्यवसायाला सुरुवात 

पुढे भारतात परतल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले व त्यांनी त्यांचे चुलत भाऊ चंपकलाल दमाणी यांच्यासोबत येमेनमधून पॉलीस्टर धागा आयात करणे आणि मसाले, साखर, गूळ, सुपारी यांची निर्यात करणे हा व्यवसाय रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन या नावाने सुरु केला.

पुढे १९६५ मध्ये चंपकलाल दमाणी यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांची भागीदारी संपुष्टात आली.

रिलायन्स टेक्सटाईल प्रा. लि. या नावाने धीरूभाईंनी १९६६ मध्ये नरोदा, अहमदाबाद येथे  सिन्थेटिक फेब्रिकची निर्मिती सुरु केली. पुढे याचा विस्तार होऊन १९७५ मध्ये कापड व्यवसायात त्यांनी जम बसवला आणि हाच ब्रँड नावाजला गेला तो म्हणजे ‘विमल. १९७७ साली त्यांनी आपला पहिला आयपीओ  बाजारात आणला.

आता व्यवसायाचा विस्तार होऊ लागला होता, म्हणूनच १९८५ मध्ये व्यवसायाचे नामकरण होऊन रिलायन्स टेक्सटाईल प्रा. लि. चे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. असे झाले होते.

१९९१-९२ मध्ये हझिरा इथे पेट्रोकेमिकल कारखाना सुरु झाला होता, १९९३ मध्ये भांडवल उभारणीसाठी रिलायन्स जागतिक भांडवली बाजारात उतरली.

 

dhirubhai-ambani-inmarathi01
rupindianarts.blogspot.com

१९९५ -९६ मध्ये टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करून हा उद्योगसमूह अधिकच बलाढ्य होत चालला होता. काळानुरूप रिलायन्स इंडस्ट्रीजने अनेक व्यवसायात पाऊल टाकले होते. ज्यात रसायन, टेलिकॉम, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, रिटेल, दळणवळण, पेट्रोकेमिकल अशा क्षेत्रांचा समावेश होता.

१९९९ मध्ये कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. जामनगर येथे जगातला सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कार्यान्वित झाला होता.

२००२ मधील कृष्णा-गोदावरी खोऱ्यात गॅसचा शोध हा पण रिलायन्स उद्योगासाठी एक महत्वपूर्ण टप्पा होता. हा एखाद्या खाजगी भारतीय उद्योगाने लावलेला पहिला शोध होता.

धीरूभाईंचा मृत्यू आणि रिलायन्स 

६ जुलै २००२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्याआधी ते काही दिवस कोमात होते. त्यांच्यानंतर मुकेश आणि अनिल अंबानी यांच्याकडे व्यवसायाची धुरा आली. काही वर्षातच या भावांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने व्यवसायाचे विभाजन करण्यात आले.

आजही रिलायन्सची बाजारात घट्ट पकड असून मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली ‘जिओ’ या ब्रँडनेम ने दूरसंचार सेवा सुरु करण्यात आली आहे.

त्यांचा दावा आहे की, ‘ऑइल’ ने रिलायन्स ला जे वैभव प्राप्त करून दिले तीच ऊर्जा या क्षेत्रात आहे. कंपनीचा विस्तार अजून थांबलेला नाही, मीडिया, सौरऊर्जा, जीवविज्ञान यांसारख्या क्षेत्रातही व्यवसायवृद्धी होत आहे.

 

dhirubhai-ambani-inmarathi02
outlookindia.com

यशस्वी टप्पे आणि  पुरस्कार

रिलायन्स ही भारताची पहिली अशी कंपनी होती, जी फोर्बस् च्या यादीत जगातील ५०० सर्वात यशस्वी कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होती.

 मैन ऑफ द २० सेंचुरी, डीन मैडल और कॉर्पोरेट एक्सीलेंस चा लाइफ टाइम अचीवमेंट (जीवनगौरव) पुरस्कार, (२०१६) मरणोत्तर पदमविभूषण या पुरस्काराने धीरूभाईंना सन्मानित करण्यात आले आहे. यांसह अनेक मोठ्या पुरस्काराने ते नावाजले गेले होते.

काय सांगते धीरूभाईंची यशोगाथा?

कुठलाही व्यवसाय छोटा नाही, भजी विकून त्यांनी आपल्या घराला हातभार लावला. म्हणजे त्यांच्यासमोर समस्या होत्या तर त्यांनी संधी शोधली. छोट्या व्यवसायातूनही त्यांना ही गरुडभरारी घेता आली कारण स्वप्न मोठे पाहिले होते.

सुरुवात म्हणून छोटा व्यवसाय पण त्यात अडकून न पडता सतत नावीन्याच्या शोधात राहिलं तर आपणही यशोशिखर गाठू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?