क्रिकेटचा महासंग्राम : २०१९ क्रिकेट विश्वचषकाबद्दल पडद्यामागच्या दहा गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

दीड महिना चालणारी आयपीएल स्पर्धा नुकतीच संपली आहे पण क्रिकेट आवडणाऱ्या लोकांसाठी मुख्य पर्वणी तर पुढेच आहे ती म्हणजे एकदिवशीय आंतराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा!

क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील पहिल्या ८ देशांना ह्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो आणि पुढच्या आठ संघात एक स्पर्धा होऊन त्यातून २ संघ ह्या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. अशाप्रकारे एकूण १० संघाच्या दरम्यान ही स्पर्धा खेळली जाते.

 

world cup inmarathi
Twitter

ह्या स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षांनी होत असले तरी ह्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेची काही वेगळी वैशिष्ठे आहेत ज्यावर आपण ह्या लेखातून आज नजर टाकू.


१) बाराव्या विश्वचषक स्पर्धेचा यजमान इंग्लंड

ह्या वर्षी होणारी ही बारावी विश्वचषक स्पर्धा असून तिचे आयोजन इंग्लंडमध्ये होणार आहे.

England-Cricket-Board-Logo inmarathi
FetchLogos.com

क्रिकेटचा शोध इंग्लंडमध्येच लागला आणि क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ आहे तरीही हा देश आतापर्यंत कधीच विश्वचषक स्पर्धा जिंकू शकला नाही .

ह्या वर्षी आपल्या घरगुती वातावरणात होणारा विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंड प्रयत्नशील आहे.

२) पाचव्या वेळी यजमानपद भूषवणार इंग्लंड, मात्र अजून एक सुद्धा विश्वचषक जिंकण्यात इंग्लंडला यश आलेले नाही.

इंग्लंड ह्यावेळी पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. ह्या आधी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ च्या विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या आहेत.

 

England-Cricket-Team inmarathi
Cricket Australia

पहिल्या नऊ विश्वचषक स्पर्धांत कोणताही यजमान देश ही स्पर्धा जिंकू शकला नव्हता मात्र २०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकून ही मालिका खंडित केली.

त्यानंतर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये झालेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकून भारताचाच कित्ता गिरवला. आता ह्या वर्षी इंग्लंड सुद्धा हीच परंपरा पुढे नेणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

३) सर्वाधिक अंतिम सामने खेळले गेलेले मैदान “ लॉर्डस ”

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे इंग्लंडमधील लॉर्डस मैदान हे जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी फार महत्वाचे मैदान आहे. ह्या मैदानावर आता पर्यंत चार विश्वचषकांचे अंतिम सामने संपन्न झाले आहेत.

 

lords cricket ground inmarathi
Danubius Hotels

भारताने कपिल देव ह्यांच्या नेतृत्वात इथेच जिंकलेल्या विश्वचषकाच्या स्मृती तर प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमस्वरूपी कोरलेल्या आहेत.

लॉर्डच्या बाल्कनीत विश्वचषक घेऊन जल्लोष करणारा भारतीय संघ हा तमाम भारतीयांच्या आठवणीतला अमुल्य क्षण आहे.

ह्या वर्षी पाचव्यांदा लॉर्डसच्या मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. हा बहुमान सर्वाधिकवेळा मिळवणारे हे एकमेव मैदान आहे.

४) कसोटी मान्यता असलेला एखादा देश विश्वचषक न खेळण्याची पहिलीच वेळ

ह्यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रमसुद्धा वेगळा आहे. ह्यावर्षी फक्त दहा संघ सहभागी होणार आहेत. मागच्या काही विश्वचषक स्पर्धात दहापेक्षा जास्त संघ सहभागी असत. त्यामुळे कसोटी मान्यता प्राप्त सगळे संघ प्रत्येकवेळी सहभागी असत.

 

ireland and zimbambwe inmarathi
BBC

मात्र ह्यावेळी फक्त दहा संघ असल्यामुळे कसोटी मान्यता मिळालेले आयर्लंड आणि झिम्बाबे हे संघ विश्वचषकात सहभागी होऊ शकले नाहीत.

कसोटी मान्यता असलेला एखादा देश सहभागी नसलेला हा पहिलाच विश्वचषक आहे.

५) कोणताही असोसिएट संघ सहभागी नसलेला पहिलाच विश्वचषक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना म्हणजेच आयसीसीचे पूर्णवेळ सभासद बारा देश आहेत.जवळपास ९३ देश हे पूर्णवेळ सभासद नसले तरी त्या देशात क्रिकेटच्या प्रसारासाठी आयसीसी प्रयत्न करते. अशा देशांना असोसिएट देश म्हटले जाते.

 

associate countries in cricket inmarathi
ESPNcricinfo.com

प्रत्येक विश्वचषकात कुठला ना कुठला असोसिएट देश सहभागी असायचाच मात्र ह्या वर्षीचा हा पहिला विश्वचषक असेल.

ज्यात सहभागी सर्व संघ हे पूर्णवेळ सभासद आहेत.

६) वेस्टइंडीजचा प्रवेशफेरीतून संघर्षपूर्ण प्रवेश

वेस्टइंडीज हा एकेकाळचा सर्वात बलाढ्य संघ. १९७५ आणि १९७९ चे विश्वचषक ह्या संघाने अगदी आरामात जिंकले होते. त्याकाळी त्यांचा संघ अपराजित होता. मात्र आता अनेक कारणांमुळे हा संघ अत्यंत कमकुवत संघ म्हणून ओळखला जातो.

 

west indies cricket team inmarathi
Hindustan Times

विश्वचषकात जागतिक क्रमवारीमधील पहिल्या आठ संघाना थेट प्रवेश दिला जातो आणि उरलेल्या दोन जागांसाठी उरलेले संघ प्रवेश स्पर्धेत खेळून येतात.

ह्यावर्षी पहिल्यांदाच वेस्टइंडीज वर प्रवेश स्पर्धेत खेळण्याची नामुष्की आली होती. मात्र ती स्पर्धा जिंकून त्यांनी आपला विश्वचषक प्रवेश नक्की केला.

७) १९८३ नंतर पहिल्यांदाच झिम्बाबेचा संघ विश्वचषकात नसेल

झिम्बावेचा संघ हा कधीच बलवान संघ किंवा संभाव्य विजेता संघ समजला गेला नाही मात्र हा संघ नेहमीच मोठमोठ्या संघाना मोक्याच्या क्षणी पराजित करण्याची क्षमता ठेवून होता.

 

Zimbabwe cricket team inmarathi
International Cricket Council

प्रत्येक विश्वचषकात ह्या संघाने कुठल्यातरी मोठ्या संघाला हरवण्याचा पराक्रम केला आहेच.

मात्र ह्यावर्षी १९८३ नंतर पहिल्यांदाच हा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला नाही , त्यामुळे ह्या संघाचा खेळ बघण्यापासून चाहते ह्यावर्षी वंचित राहतील.

८) ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या विजयासाठी ह्या स्पर्धेत उतरेल.

ऑस्ट्रेलियाचा संघ हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि बलवान संघ मानला जातो.

 

australia cricket team inmarathi
Rediff.com

ह्या संघाने आता पर्यंत एकूण पाच विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८७, १९९९,२००३,२००७ आणि २०१५ साली ऑस्ट्रेलियाने हि स्पर्धा जिंकली आहे.

सर्वाधिक विश्वचषक जिंकणाऱ्या संघाच्या यादीत हा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ह्यावर्षी हा संघ आपल्या सहाव्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे.

९) अकरा किलो वजनाचा विश्वचषक

ह्या वर्षीचा विश्वचषक सुद्धा वैशिष्टपूर्ण आहे .

 

world cup trophy inmarathi
ICC Cricket

ह्या चषकाचे वजन ११ किलो म्हणजेच साधारण २४.२५ पौंड आहे. ह्या चषकाची उंची ६५० मि.मी. एवढी आहे.

अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला हा चषक मान्यवरांच्या हस्ते लॉर्डसच्या प्रसिद्ध बाल्कनीत दिला जाईल.

१०) ह्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीचे सामने नसतील.

ह्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी सगळे संघ एकमेकांशी साखळी फेरीत प्रत्येकी एक सामना खेळतील आणि साखळी फेरीच्या समाप्तीनंतर पहिल्या चार संघात उपांत्य फेरीचे सामने होतील.

पहिल्यांदाच अशा प्रकारची रचना ह्या स्पर्धेत वापरण्यात येत आहे त्यामुळे उपांत्यपूर्व सामन्यांच्या थरारला दर्शकांना मुकावे लागणार आहे.

चला तर मग तयार होऊया ह्या क्रिकेटच्या महाउत्सवासाठी !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *