' सृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर – InMarathi

सृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

झुंडीतली माणसं (लेखांक दहावा)

लेखांक नववा – खरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर

===

सृजनशील माणसे गरीबीत वावरली तरी मनाने सुखी असतात. मानसिक वैफ़ल्यापासून मुक्त असतात. हे जसे सृजनशील कारागिरांच्या बाबतीत खरे आहे तसेच ते सृजनशील लेखक कलावंत अणि शास्त्रज्ञ यांच्याही बाबतीत खरे आहे. सृजनशीलतेइतके समाधान अन्य कशाहीमुळे मिळत नाही. आपल्या हातून काही नवे निर्माण होत आहे या केवळ विचाराने सुद्धा माणसाआ उत्साह वाढतो. एवढेच नव्हेतर त्याचे स्वत:बरोबरचे भांडणही संपूष्टात येते.

आपला जेव्हा स्वत:वरच रोष नसतो, तेव्हा जगावरही रोष नसतो. पुर्वीच्या काळी समाजात हस्तकलांना बर्‍यापैकी वाव होता आणि मानही होता. आज हस्तकलांना तो वाव आणि मान राहिलेला नाही.

हस्तकलांचा र्‍हास हे वैफ़ल्यग्रस्ततेच्या वाढीचे एक कारण आहे. जनता चळवळीमागे लोक ओढले जाण्यामागेही तेच कारण दाखवता येईल.

सर्जनशीलता कमी होताच व्यक्ती जनता चळवळीकडे कशी आकृष्ट होऊ लागते हे समजून घेण्यासारखे आहे. कुचकामी ठरलेल्या, जीवनाच्या लढ्यात विफ़ल ठरलेल्या व्यक्ती ‘स्व’पासून दूर पळून जाण्यासाठी जनता लढ्यामध्ये उतरतात, हे समाजशास्त्राने आता सिद्ध केले आहे. ज्यांची निर्मितीक्षमता संपुष्टात आलेली आहे, असे लेखक, कलावंत, शास्त्रज्ञ ही मंडळी आयुष्यात केव्हा ना केव्हा जहाल राष्ट्रवादी, वांशिक जातीयवादी अशा चळवळीत उतरल्यावाचून रहात नाहीत. समाजसुधारणेचा झेंडा खांद्यावर घेऊन, पवित्र लढ्याचे नारे देऊन घराबाहेर पडलेली मंडळी, हे सर्वजण वरील वर्गातच मोडतात. लैंगिक उणिवेने त्रस्त झालेल्यांच्याही बाबतीत हाच नियम सांगता येईल. ( झुंडीचे मानसशास्त्र, पृष्ठ १२१)

 

mob-lg-inmarathi
snowder.com

कालपरवाच बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा पार पडला. त्यात जी क्रांतीकारी भूमिका संमेलनाध्यक्षांनी मांडली वा अन्य लोकांनी त्यावर चर्चा करून सामाजिक बदलाचे नारे दिले, त्याचे विश्लेषण उपरोक्त उतार्‍यात सापडू शकते. जेव्हापासून लिहीण्याची व छपाईची कला माणसाला अवगत झालेली आहे, तेव्हापासून सृजनशील लेखक, कलावंत, शास्त्रज्ञ यांचा प्रस्थापिताशी झगडा चाललेला आहे.

सृजनशील माणूस आपल्या कल्पना व प्रतिभेच्या जोरावर नवनवे काही निर्माण करीत असतो व प्रस्थापित असलेल्या कल्पना मूल्यांना धक्के देत असतो. पण तो कृतीतून असे धक्के देत असतो. त्याची चळवळ उभारण्यात वा लढ्याचा पवित्रा घेऊन संघटना उभी करण्याच्या फ़ंदात असा सृजनशील माणूस कधी पडत नाही.

संत तुकाराम वा गॅलिलीओ अशा अनेकांची उदाहरणे देता येतील. त्यांनी आपल्या कृतीने वा निर्मितीतून समाजातील प्रस्थापित कल्पना व मूल्यांना धक्के दिलेले आहेत. पण अशा जगाला सतत बदलत ठेवलेल्या सृजनशील माणसांनी कधी चळवळीचा झेंडा खांद्यावर घेतला नाही वा लढ्याचा पवित्रा घेतला नाही. तुकारामाने त्याच्या विरोधात काहूर माजल्यावर इंद्रायणीत आपल्या अभंगांचे लिखीत बुडवल्याचे म्हटले जाते आणि तिकडे युरोपात खगोलशास्त्राचे वेध घेणार्‍या गॅलिलीओने पोपशी हुज्जत करण्यापेक्षा माफ़ी मागून आपले संशोधनकार्य पुढे चालू ठेवले.

कारण त्याचा आपल्या सृजनशीलतेवर आणि त्यातल्या अफ़ाट क्षमतेवर पुर्ण विश्वास होता. आपली कृती व निर्मिती जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे, हा आत्मविश्वास त्यांना सृजनापासून दुर घेऊन जाऊ शकला नाही.

पर्यायाने जग त्यावेळपेक्षा आज आमुलाग्र बदलून गेले आहे. आपले सृजनाचे काम सोडून या लोकांनी क्रांतीची चळवळ उभारली असती, त्यासाठी संघटना उभारण्यात आयुष्य खर्ची घातले असते, तर आजच्यापेक्षा समाज व जग खुप मागासलेले राहिले असते. अशा लोकांनी शेकडो वर्षात असे काही सृजन घडवले आहे, की ते पुढल्या काळात जगाला व प्रस्थापितालाही स्विकारावे लागलेले आहे. मग त्यांचाच वारसा सांगणारे आजचे तथाकथित सृजनशील कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ चळवळीचा आडोसा कशाला घेत असतात? क्रांतीचा झेंडा खांद्यावर घेऊन कशाला उभे असतात? तोच त्यांची सृजनशीलता संपल्याचा व त्यातून आलेल्या वैफ़ल्यग्रस्त मानसिकतेचा पुरावा नसतो काय? आपला भाकडपणा लपवण्याची ती केविलवाणी धडपड नसते काय?

 

simpsons-mob-inmarathi
assets.pando.com

राजकारणापासून समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अशा वैफ़ल्यग्रस्त लोकांच्या झुंडी बघायला मिळतील. साहित्य संमेलन संपल्यावर महाराष्ट्र टाईम्सने योजलेल्या एका समारंभात आजी व दोन माजी संमेलनाध्यक्षांचा परिसंवाद झाला. त्यात प्रत्येकाने सृजनशीलतेला किंमत उरली नसल्याचा आग्रहाने दावा केलेला होता. कोतापल्ले यांनी तर समाजात नवे काही वाचण्यापेक्षा पुराणे व गाथा वगैरे आजही अधिक खपतात, अशी तक्रारही केली.

जुन्या साहित्यिकांची पुस्तके आजही अधिक खपतात वा आजच्या नामवंतांच्या पुस्तकांना उठाव नसल्याची ही नाराजी काय सांगते? अशी तक्रार गाथा लिहून जीवनदर्शन घडवणार्‍या तुकोबांनी कुठे केल्याचे आपल्या ऐकिवात आहे काय?

अगदी शंभर सव्वाशे वर्षापुर्वीच्या कुणा मराठी साहित्यिक वा लेखकांच्या अशा तक्रारी आपण कधी वाचल्या ऐकल्या आहेत काय? आचार्य अत्रे, फ़डके वा खांडेकर यापैकी कोणी तेव्हाच्या काळात अशा तक्रारी केल्या नव्हत्या. त्यांच्या लिखाणावर उड्या पडत होत्या आणि त्यांच्यातले वैचारिक वा साहित्यिक वाद वाचकांनाही भुरळ घालत होते. त्यांच्यातली खडाजंगी लोकांना ऐकायला वाचायला आवडत होती. तशा आज शेकडो सुविधा आहेत, पण त्यासाठी किती श्रोते जमा होतात?

तेव्हाच्या काळात ज्यांना भरपूर लोकाश्रय मिळाला नाही वा प्रतिसाद मिळाला नाही, त्यांनीही अशा तक्रारी केलेल्या नाहीत. आपल्या सृजनशील लेखनाला भविष्यातला वाचक टाळू शकणार नाही. पुढल्या पिढ्यांना तरी आपल्याला बगल देऊन पुढे सरकता येणार नसल्याचा आत्मविश्वास, त्यांना सृजनाचे काम चालू ठेवण्यास प्रवृत्त करीत होता. त्यातून येणारी श्रीमंती वा असलेली गरिबी याबद्दल कुठली तक्रार नव्हती. मग आजचेच ‘महान’ साहित्यिक लेखक तशी नाराजी कशाला ओरडून सांगत असतात? ती त्यांच्यातली सृजनशीलता आटोपल्याचे व वैफ़ल्याचे लक्षण नाही काय?

यातली मजेची गोष्ट अशी आहे, की या लोकांना आपण सृजनशील आहोत अशा भ्रमाने पछाडलेले आहे. तसे नसते तर त्यांनी अशा तक्रारी केल्या नसत्या आणि आपले सृजनाचे काम कसलीही अपेक्षा बाळगल्याशिवाय चालू ठेवले असते. त्यांना आपल्या सृजनशीलतेचा डंका पिटण्याची काहीही गरज नव्हती.

पण वास्तव असे आहे, की आपण सृजनशील नाहीत वा आपल्यातली किरकोळ सृजनशीलता कधीच आटोपली आहे, ही व्यर्थता त्यांना शांत बसू देत नाही., ती व्यर्थता लपवण्यासाठी मग चळवळ वा लढ्याचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागत असतो.

 

naxal-inmarathi
encrypted-tbn0.gstatic.com

खरेतर सृजनशीलता ही प्रस्थापित मूल्यांना झुगारणारी असते. फ़ुले शाहू आंबेडकरांचे नाव असे लोक अगत्याने घेत असतात. तोच नामजप करीत विद्यमान संमेलनाध्यक्षांनी ‘राजा चुकला’ अशी एक थिअरी मांडलेली आहे. पण त्यात त्यांनी या उपरोक्त तीन महात्म्यांनी कधी ‘राजा चुकला’ असा आवाज उठवला, ते सांगायचे कष्ट घेतलेले नाहीत. ही तीन नावे उच्चारणे ही आजकाल फ़ॅशन झाली आहे.

कुठल्याही चळवळीत एल्गार पुकारताना हीच नावे घेतली जातात. पण त्याच तिघांनी कधी कुठल्या राजसत्तेला आव्हान दिले, त्याचे विवरण दिले जात नाही.

उलट सत्य लपवण्यासाठीच ह्या थोरांची नावे उच्चारली जात असतात. राजा चुकला म्हणायचा, तर शाहू महाराज स्वत:च राजा होते. त्यांनी चुकलेल्या कुठल्या राजाकडे बोट दाखवायचे होते? दाखवले होते? तेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती आणि महाराजांनी कधीच समाजबदलासाठी ब्रिटिश सत्तेला चुकीचे ठरवण्याचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला नव्हता. पण तरीही त्यांनी समाज बदलाचे काम हाती घेतलेले होते आणि ते कोणाला व कोणत्या सत्तेला आव्हान देत होते? कोणाच्या चुकांकडे बोट दाखवत होते? शरद पवारांपासून संमेलनाध्यक्षांपर्यंत कोणीही कधी ‘त्या बोटाचा’ रोख वा दिशा सांगत नाहीत. फ़ुले आंबेडकरांनी तरी कोणत्या राजाला चुक दाखवली होती?

फ़ुले शाहू आंबेडकरांचा लढा वा चळवळ कुठल्याही राजा वा राजसंस्थेच्या विरोधतला एल्गार नव्हता. तर समाजातील प्रस्थापित व कालबाह्य होत चाललेल्या संस्कृती व सभ्यतेच्या विरोधातला आवाज होता. तो त्यांच्या त्यांच्या कालखंडातील तथाकथित बुद्धीमंत, विचारवंत व लेखक सृजनशीलतेचा ठेका घेतलेल्यांच्या विरोधतला आवाज होता. जे प्रस्थापित ठेकेदार राजसत्तेलाही झुकवत असतात आणि प्रचलीत कायदा व्यवस्थेलाही झुगारून नतमस्तक व्हायला लावतात, अशा प्रस्थापिताला आव्हान देणारा पवित्रा त्यांनी घेतलेला होता.

आज हे तीन महात्मे हयात असते, तर त्यांनी आपल्याच नावाने चाललेल्या प्रस्थापित ठेकेदारीच्या विरोधात आवाज प्रथम उठवला असता. माझ्या पत्रकारी कारकिर्दीला आरंभ झाला, त्या काळात मराठीत तरी संपादक मालकांची नियतकालिके होती. अत्र्यांचा ‘मराठा; परुळेकरांचा ‘सकाळ’, भालेरावांचा मराठवाडा, रंगा वैद्यांचा ‘संचार’, माडखोलकरांचा ‘तरूण भारत’ ही दैनिके होती. बेहर्‍यांचा ‘सोबत’ वा माजगावकरांचा ‘माणूस’ सामान्यांचे आवाज होते.

तेव्हा ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाईम्स’ बहुतेक इंग्रजी मोठी राष्ट्रीय वर्तमानपत्रे प्रस्थापित भांडवलशाहीची म्हणजे शोषकांची पत्रे मानली जायची.

आज काय स्थिती आहे? त्याच भांडवली गुंतवणूकदारांचे आश्रीत झालेल्या लेखक संपादकांना शोषितांचा आवाज बनवला गेला आहे. ज्या एल्गार परिषदेत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालला होता, त्यापैकी कितीजणांनी डोळसपणे पानसरे वाचले ऐकलेले असतात? त्यांनी अशा भामटेगिरीला आव्हान दिलेले होते. शोषितांचे दु:ख मांडणार्‍या विधारवंतांनाच चतुर शोषक आपला विचारवंत बनवून टाकतात आणि शोषितांच्या चळवळी आपल्या दारातले आश्रित करून टाकतात, ही वेदना पानसर्‍यांनी आपल्या एका लेखातून सविस्तर मांडलेली आहे. पण त्याचा मागमूस त्यांच्याच नावाने भरवलेल्या परिषदेतही दिसून येत नाही.

 

elgaar-inmarathi
siasat.com

आजकाल अशा वैफ़ल्यग्रस्त ठेकदारांनी क्रांती व एल्गार आपल्या दावणीला बांधलेला आहे. त्यांना सरकारी अनुदान वा परकीय देणग्यांच्या भांडवलावर सृजनशीलता पोसली जावी असे वाटते. नव्हेतर तसा आग्रह आहे. सरकारी मलिदा घेऊन चाललेल्या साहित्य अकादमी संस्थेच्या पुरस्कृतांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेताना पुरस्कार परत करायचे आणि त्यासाठी मिळालेल्या रकमेचा अपहार करायचा, इतक्या रसातळाला सृजनशीलता जाऊन पोहोचली आहे. उरलेला एल्गार फ़ोर्ड वा रॉकफ़ेलर फ़ौंडेशन यांचा रमणा घेऊन चालत असतो.

सरकारी अनुदान घेऊन कुठले सृजन होऊ शकते? सृजन हे प्रस्थापित मूल्ये व कल्पनांना धक्का देणारे असावे लागते. आजकालचे क्रांतीकारी लेखन पुरस्कारासाठीच निर्माण होत असते.

कुणा शेठजीच्या वा सरकारच्या आश्रयाने चाललेल्या विविध संस्थांच्या पुरस्काराची आशाळभूत प्रतिक्षा करणार्‍या लोकांना सॄजनशील कसे म्हणता येईल? असली बंडाची भाषा करणार्‍यांनी, साहित्य संमेलनाच्या आमंत्रणाला नाकारताना महात्मा फ़ुल्यांनी लिहीलेले पत्र तरी वाचलेले असते काय? साहित्य संमेलन व त्यातल्या प्रस्थापित मूल्यांना धक्का देण्याचा पवित्रा घेणार्‍या त्या महात्म्याने कोणाला झुगारलेले होते? कुणा व्यक्तीला नव्हेतर ठेकेदारीला झुगारलेले होते.

आज त्यांचेच नाव घेऊन साहित्यातले, चळवळीतले वा वैचारिक प्रांतातले प्रस्थापित मक्तेदारच बंडाची नाटके करून आपली वैफ़ल्यग्रस्तता लपवायचा केविलवाणा प्रयत्न करतात. त्यासाठी शोषकांच्या आश्रयाला जातात आणि शोषितांची दिशाभूल करण्यात धन्यता मानतात. त्यांचे सृजन समाजाला बदलणारे, भविष्यात घेऊन जाणारे नसल्याने, लोकही त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नसतात.

कुणाच्यातरी वा सरकारच्या पैशावर त्यांचे लिखाण वा कलासॄजन जगत असते. त्यामुळेच ते सृजन उरलेले नाही. त्या सत्यापासून पळण्याचा प्रयास म्हणजे एल्गारची भाषा वा राजाला चुकला ठरवण्याची सर्कस होऊन जाते.

कोतापल्ले ज्या पुस्तकांचा खप अधिक होतो म्हणून तक्रार करतात, ती पुस्तके कुठल्याही सरकारी अनुदान वा देणगीशिवाय निर्माण केली जातात आणि खपतात. पण आश्रित सृजनशील लेखकांचे अनुदानित पुस्तकांचे गठ्ठे कमी किंमतीत उपलब्ध असूनही धुळ खात पडलेले असतात. ते गठ्ठे बघून आलेले वैफ़ल्य, मग वाचकाविषयी तक्रार करते. वाचकाच्या आवडीनिवडीला नावे ठेवू लागते. मग आपल्या वैफ़ल्यालाच एल्गार ठरवण्याचे आणखी एक नाटक सुरू होते.

मुळात आपण सृजनशील वा निर्मितीक्षम राहिलो नाही वा समाजाला उत्क्रांत करू शकणारे आपल्यापाशी काही नाही, असल्या नाकर्त्या भावनेतून आलेला तो अपराधगंड आहे. त्यातून मग एल्गारची एक नवी झुंड तयार होते.

 

mob-inmarathi
winstonchurchill.hillsdale.edu

आपापले नैराश्य वा अपयश झाकण्यासाठी असे विफ़ल लोक एकत्र येऊन चळवळ वा बंडाचा तमाशा सुरू करतात. वास्तवात तेच प्रस्थापित असतात. आपल्या ठेकदारीला आव्हान देणारे कोणी दुसरे सृजनशील व समाजोपयोगी लोक शिरजोर होऊ नयेत, ही भिती त्या बंडामागचे खरे कारण असते. आपल्या जोखडातून समाज सुटत चालल्याची वेदना त्या वैफ़ल्याचे खरे कारण असते.

पण अशा चळवळी कधीच खर्‍या नसतात, त्य मतलबी झुंडी असतात. खुप कांगावखोर असतात. त्यांचे आपल्याशीच भांडण चालू असते. म्हणून ते सृजनात रममाण होत नाहीत, तर त्यांना आपण सृजनशील असल्याचे तमाशे मांडावे लागतात. वास्तवात आपल्या नाकर्तेपणा व वांझोटेपणाला झाकण्यासाठी चाललेली ती कसरत असते.

त्यासाठी मग इतिहासातील वा अन्य काळातील थोरामोठ्यांची नावे घ्यावी लागतात. ज्यांचा वारसा आपण चालवित नाही, त्यांच्या प्रतिमा सरसकट वापराव्या लागतात. वास्तवात कुठल्याही गल्ली नाक्यावर टपोरीपणा करणार्‍या झुंडीपेक्षा अशा लोकांची लायकी अधिक नसते. तेही एक पुंडगिरी करणार्‍यांची झुंड असतात. सभ्यता संस्कृतीचा मुखवटा चढवून चाललेली ती झुंडशाहीच असते.

(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?