एकट्या महिलेचा दररोज नदीतून प्रवास नि डोंगरांची चढण- जंगलात जाऊन मुलांना शिकवण्यासाठी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

माणसाला जर योग्य गुरु भेटला तर त्याचे आयुष्य आमूलाग्र बदलते. त्याच्या आयुष्याला दिशा मिळते. अनेक थोर लोक आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना, गुरूंना देतात. म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना एक महत्वाचे स्थान असते.

शालेय शिक्षकांपासून तर कॉलेज मधील शिक्षकांपर्यंत ते रिसर्च करताना गाईड असलेले हे शिक्षक पदोपदी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असेल ते सर्व ज्ञान देण्याचे ध्येय बाळगतात.

आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप शिकून आयुष्यात एक चांगली व यशस्वी व्यक्ती व्हावे असा प्रत्येक शिक्षकाचा प्रामाणिक प्रयत्न असतो. हाडाचे शिक्षक कधी मायेने समजावून तर कधी गरज पडल्यास कठोर शिक्षा करून चांगले विद्यार्थी घडवतात.

पण चांगला शिक्षक होणे हे सोपे काम नाही.

 

indian-teacher-marathipizza
teachingto.com


आणि एखाद्या एकाकी दुर्गम भागात एकमेव शिक्षक म्हणून काम करणे हे तर अतिशय अवघड काम आहे. केरळच्या उषाकुमारी हे अवघड कार्य गेली १६ वर्षे करत आहेत.

द हिंदू ह्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार आर. उषाकुमारी ह्या दक्षिण केरळ येथील कुन्नाथुमला अगस्थ्य एका अध्यापका स्कुल मधील एकमेव शिक्षिका आहेत.

रोज नित्यनियमाने त्या खडतर प्रवास करून अगस्थ्यवनं मध्ये असलेल्या त्यांच्या शाळेत जातात.

त्यांचा प्रवास गाव पूर्ण जागे होण्याआधीच म्हणजे सकाळी ७लाच आंबुरी ह्या गावापासून सुरु होतो व त्या पुढे तिरुवनंतपूरम गावातील कुंबीकल कडावू ह्या गावापर्यंत जातात.

तिथून नदीच्या पाण्यातून होडीने प्रवास करतात आणि नंतर जंगलातील एका मोठ्या चढावावर दोन तास चालून कुन्नथुमला ह्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या कन्नी ह्या आदिवासी जमातीच्या वस्तीपर्यंत पोचतात.

 

ushakumari-inmarathi
thehindu.com

महत्वाची गोष्ट अशी, ह्या दुर्गम ठिकाणी असणाऱ्या शाळेत जाण्यासाठी इतका खडतर प्रवास करावा लागत असून देखील त्या कधीही उशिराने पोचत नाहीत. नेहेमी शाळेच्या वेळेवरच पोचतात. शाळेची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ४ अशी आहे.

ह्या शाळेत त्या एकमेव शिक्षिका आहेत आणि त्याच तिथल्या विद्यार्थ्यांना सगळे विषय शिकवतात.

ह्या शाळेत पहिली ती चौथीचे वर्ग आहेत. विद्यार्थ्यांना शालेय विषय शिकवण्याबरोबरच त्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पोषण व एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजची सुद्धा जबाबदारी सांभाळतात. त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना स्वतः पोषण आहार खाऊ घालतात.

कधी कधी तर शाळेतल्या मुलांसाठी दूध व अंडी आणण्यासाठी त्या स्वतःचे पैसे खर्च करतात. इतक्या अडचणी असून देखील त्यांना हे काम सोडून द्यावेसे वाटत नाही उलट विद्यार्थ्यांना शिकवणे हेच त्यांचे ध्येय आहे.

 

ushakumari-inmarathi
thehindu.com

पावसाळ्यात जेव्हा इकडे खूप पाऊस पडतो तेव्हा कधी कधी त्या शाळेची वेळ संपल्यानंतर घरी न जाता त्यांच्या एखाद्या विद्यार्थ्याकडेच राहतात. कारण दुसऱ्या दिवशी त्यांना शाळा परत सुरु करायची असते.

पावसाच्या किंवा वैयक्तिक आजारपणाच्या कारणाने शाळा बंद राहू नये हाच त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी त्या कायम झटतात.

ह्या शाळेची इमारत २००० साली उभी राहिली. त्या आधी उषाकुमारी विद्यार्थ्यांची शाळा निसर्गाच्या सानिध्यातच झाडाखाली घ्यायच्या.

विद्यार्थी दगडांवर बसून अभ्यास करत असत. शिक्षक कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उषाकुमारी आहेत. १९९७ साली केरळ सरकारच्या डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्रॅमच्या अंतर्गत स्वयंसेविका म्हणून उषाकुमारी पहिल्यांदा ह्या वस्तीवर गेल्या.

त्यांना त्या भागातील शाळा सोडलेल्या मुलांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच त्या मुलांनी परत शाळेत यावे म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यावे ही जबाबदारी सुद्धा उषाकुमारी ह्यांनी घेतली होती.

 

ushakumari-inmarathi
thehindu.com

आज ह्या भागातील लोक उषाकुमारींना आपल्या घरची सदस्यच मानतात. ह्या भागातील ४० आदिवासी कुटुंब आपापल्या मुलांना ह्या शाळेत नियमितपणे पाठवतात. आणि मुलीसुद्धा शाळेत नियमित उपस्थित असतात.

उषाकुमारींचे इतके प्रयत्न असून देखील आता मात्र शाळेचे अस्तित्वच संकटात सापडले आहे. कारण तेथील सरकारने एकापेक्षा अधिक इयत्ता असलेल्या व उषाकुमारींसारखे एकमेव शिक्षक असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणि शाळांच्या ऐवजी रेग्युलर प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. ह्या भागात डांबरी रस्ते तयार होत आहेत.

जेव्हा रस्ते पूर्ण बांधून होतील तेव्हा उषाकुमारींची ही शाळा बंद होईल. आणि त्याबरोबर उषाकुमारींची नोकरी सुद्धा जाईल.

कारण दुर्दैवाने प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेची नोकरी मिळण्याइतके त्यांचे शिक्षण झाले नाहीये. पण ह्या गोष्टीचे त्यांना दु:ख होत नाही.

 

ushakumari-inmarathi
thehindu.com

त्या म्हणतात की, “ह्या भागात डांबरी रस्ते होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता वैद्यकीय सुविधांवाचून इथल्या लोकांचे जीव जाणार नाहीत. लोकांसाठी सोयी होणे ,रस्ते होणे महत्वाचे आहे. त्यापुढे माझी नोकरी तितकी महत्वाची नाही.”

उषाकुमारींच्या ह्या निस्वार्थ भावनेसाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आणि त्यांच्या कार्याप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेला व प्रामाणिकपणाला सलाम!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “एकट्या महिलेचा दररोज नदीतून प्रवास नि डोंगरांची चढण- जंगलात जाऊन मुलांना शिकवण्यासाठी!

 • January 7, 2019 at 8:19 pm
  Permalink

  त्याच्या कष्टचे चीज व्हायला पाहिजे. मुलांच्या पुढिल शिक्षणाचे तीथल्या सरकारने विचार केला आहे का?

  Reply
 • January 7, 2019 at 9:51 pm
  Permalink

  Nice

  Reply
 • January 10, 2019 at 10:01 am
  Permalink

  अप्रतिम

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *