' काश्मीर, पॅलेट गन आणि दात नसलेला सिंह! – InMarathi

काश्मीर, पॅलेट गन आणि दात नसलेला सिंह!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : प्रवीण कुलकर्णी

===

निग्रोंच्या गुलामगिरीच्या प्रश्नावर दक्षिण व उत्तर अमेरिका यात निकराचा वाद चालला होता. दक्षिण अमेरीकेला गुलामगिरी हवी होती. कारण तिथे कापसाची लागवड मोठया प्रमाणावर होत असे. त्याकरता आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर निग्रो आणले जात होते. म्हणून दक्षिण अमेरिका संघराज्यातून फुटून निघाला व यादवी सुरु झाली.

civil-war-marathipizza01
findingdulcinea.com

तेव्हा दक्षिण अमेरीकेचे एक शिष्टमंडळ लिंकनला भेटायला आले व म्हणाले.

तुम्ही दक्षिण अमेरिकेच्या कलाकलाने घ्या.

तेव्हा लिंकनने त्यांना इसापनीती  मधील एक गोष्ट सांगितली.

एका रानात एक सिंह रहात होता. त्याचे त्याच जंगलात राहणाऱ्या एका लाकुडतोड्याच्या मुलीवर प्रेम बसले. तो त्या मुलीला म्हणाला,

माझे तुझ्यावर फार प्रेम आहे तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे.

त्यावर मुलीने त्याला तिच्या वडिलांकडे जाण्यास सांगितले. सिंह लाकूड तोड्याकडे गेला. लाकूड तोड्या म्हणाला,

तू म्हणतोस ते ठीक आहे. पण तुझे दात फारच भयंकर आहेत. त्यामुळे तिला तुझी भीती वाटते.

तेव्हा सिंह एका दंत वैद्याकडे गेला, सारे दात उपटून घेतले व लाकूडतोड्याकडे गेला. त्याला म्हणाला,

बघ मी सारे दात काढलेत आता तुझ्या मुलीला भ्यायचे कारण नाही.

तेव्हा लाकुडतोड्या म्हणाला,

पण हे तीक्ष्ण अणुकुचीदार नखे आहेत त्याचे काय? तो पर्यंत माझी मुलगी तुझ्याजवळ येईल कशी ?

तेव्हा तो सिंह न्हाव्याकडे गेला. सर्व नखे काढून घेतली व पुन्हा लाकूडतोड्याकडे आला.लाकूड तोड्याने एक काठी घेतली व त्या सिंहाला बदड बदड बदडले. ही गोष्ट सांगून झाल्यावर लिंकन म्हणाला, दक्षिण अमेरिकेला त्या  भागातील महत्वाची ठाणी मी घेऊ दिली तर संघराज्याची हालत त्या सिंहासारखी होईल.

आचार्य अत्रे यांनी सांगितलेली ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे काश्मीर मध्ये सैन्य दलाकडून वापरल्या जाणाऱ्या पॅलेट गनचा वापर बंद करावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश जे.एस.खेहर आणि न्या.चंद्रचूड यांच्या पिठासमोर सुनावणी चालू आहे.

pallet-gun-marathipizzza

फुटीरतावाद्यांवर बळाचा वापर करू नये तर चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. यावर न्यायालयाने उपरोधाने विचारले की,

तेथे (काश्मीरमध्ये) चर्चा कोणाशी करायची?

आणि जोपर्यंत हिंसाचार थांबत नाही तोवर चर्चा शक्य नाही. अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये सैन्य दलांवर दगडफेक केली जाते, जवानांचे, अधिकाऱ्यांचे डोळे फोडले जातात, त्यांना जीवे मारलं जातं. शत्रूपासून रक्षण करणाऱ्यालाच शत्रूसारखी किंबहुना त्यापेक्षाही जास्त वाईट वागणूक दिली जात आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी काश्मीरला विशेष आर्थिक पॅकेज दिले. तेथील जनतेला विशेषतः युवकांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर आला, तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर राज्याला सर्वतोपरी मदत केली. भारतीय सैन्याने विशेष मोहीम राबवली व हजारो लोकांचे प्राण वाचवले. कारण हे सर्व लोक धर्माने मुसलमान असले तरी भारतीय नागरीक आहेत. केंद्र सरकारने किंवा भारतीय लष्कराने नागरीकांच्या जीविताच्या घटनादत्त अधिकाराचे रक्षण करण्यात कोणतीही कसूर केली नाही. तरीही नैसर्गिक आपत्ती नाहीशी होताच फुटीरतावाद्यांनी पुन्हा त्यांचे उद्योग चालू केले. शेवटी सैन्याने पॅलेट गनचा वापर सुरू केला आणि फुटीरतावाद्यांचे धाबे दणाणले. म्हणून यांच्या तथाकथित ‘मानवतावादी’ हस्तकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

pallet-gun-marathipizza011
img.etimg.com

गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर कारवाई करताना कठोर पावलं उचलली आहेत. त्यांना हवाला मार्गे मिळणाऱ्या पैशाचे मार्ग बंद झाले आहेत. हुरीयत चे सगळे नेते कोणत्याही वेळी तुरुंगात असल्याचे चित्र दिसू लागले तर नवल वाटायला नको. त्याचबरोबर सैन्याला अतिरेक्यांशी लढताना पूर्ण मोकळीक- ‘फ्री हॅन्ड’ दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्यात बऱ्याच अंशी यश आले. पूर्वोत्तर राज्यात देखील अतिरेकी कारवायांमध्ये ८५% घट झाली आहे.

आता निर्णायक भूमिका घेऊन फुटीरतावादाचा बिमोड करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सैन्यदलाचे हात मजबूत करणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. ‘मानवतावादाचे’ ढोल वाजवून पॅलेट गन वापरणे किंवा अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देणे बंद केल्यास आपल्या सैन्यदलाची अवस्था दात आणि नखं काढलेल्या सिंहासारखी होईल हे मात्र नक्की.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?