दिवंगत कादर खान ह्यांचा हा जीवन प्रवास प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायक आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते, संवादलेखक, पटकथाकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले कादर खान ह्यांचे आज १ जानेवारी रोजी कॅनडा येथे निधन झाले.

“विजय दीनानाथ चौहान” अशी अमिताभ बच्चन ह्यांची ओळख निर्माण होण्यात कादर खान ह्यांचा मोठा वाट आहे.

कारण संवादफेक अमिताभ बच्चन ह्यांची असली तरीही ,”विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान…” हा अजरामर संवाद कादर खान ह्यांच्याच लेखणीतून जन्माला आला होता.

हे आणि असे अनेक प्रसिद्ध संवाद कादर खान ह्यांनी लिहिले आणि अनेक हिंदी चित्रपटांनी तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता.

 

kader-khan-inmarathi
hindustantimes.com

अनेक हिंदी चित्रपटांना आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे यशाकडे नेणाऱ्या कादर खान ह्यांचे आज ८१ व्या वर्षी कॅनडामधील टोरोंटो शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. गेले अनेक दिवस ते प्रोग्रेसिव्ह सुपरन्युक्लिअर पाल्सी या व्याधीशी लढा देत होते.

आज काळ जिंकला आणि कॉमेडीच्या ह्या बादशहाने रंगमंचावरून अखेरची एक्झीट घेतली.

२२ ऑक्टोबर १९३७ रोजी अफगाणिस्थानातील काबुल ह्या शहरात कादर खान ह्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अब्दुल रहमान खान हे कंदाहारचे होते तर त्यांची आई इकबाल बेगम ह्या पिश्चिन (बलुचिस्तान, पाकिस्तान) येथील होत्या. कादर खान ह्यांना तीन भाऊ होते.

त्यांनी स्थानिक सरकारी शाळेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले व त्यानंतर इस्माईल युसूफ कॉलेज मधून पुढचे शिक्षण घेतले.

 

kader-inmarathi
youtube.com

त्यानंतर भारतातील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स मधून मास्टर्स डिप्लोमा इन इंजिनियरिंगची पदवी मिळवली.

शिक्षण संपल्यानंतर त्यांनी १९७० ते ७५ ह्या काळात भायखळ्यातील एम एच साबू सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे सिव्हिल इंजिनीयरींगचे प्रोफेसर म्हणून शिकवले.

कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एका नाटकात त्यांनी काम केले तेव्हा ते नाटक बघायला आलेल्या दिलीप कुमार ह्यांनी कादर खान ह्यांची प्रतिभा बघून त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटात घेतले.

ते थिएटरसाठी नाटके लिहीत असत आणि हे करता करता त्यांना जवानी दिवानी ह्या चित्रपटाची स्क्रीन लिहिण्याची संधी मिळाली. येथेच त्यांचा बॉलिवूड मधील प्रवास सुरु झाला.

 

kaderkhan-inmarathi
timesnow.com

कादर खान ह्यांनी तीनशे पेक्षाही जास्त चित्रपटांत भूमिका केल्या. आणि अडीचशे पेक्षाही जास्त चित्रपटांचे संवाद लिहिले.

कादर खान ह्यांनी भूमिका केलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९७३ सालचा “दाग: हा चित्रपट होय. ह्यात राजेश खन्ना ह्यांची प्रमुख भूमिका होती तर कादर खान ह्यांनी वकिलाची सहाय्यकी भूमिका साकारली होती.

त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, फिरोज खान ह्यांच्या बरोबर अनेक चित्रपट केले.

त्यांची गोविंदा बरोबरची जोडी तर सर्वांच्याच लक्षात आहे. त्यांचे व गोविंदाचे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी वडील, काका, भाऊ, कॉमेडियन अश्या सहाय्यक भूमिका केल्या. काही चित्रपटात त्यांनी खलनायकाचीही भूमिका साकारली.

 

kader-govinda-inmarathi
abpmaza.abplive.com

हिम्मतवाला, जानी दोस्त, सरफरोश, जस्टीस चौधरी, तोहफा, कैदी ह्यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संवादलेखक म्हणून काम केले.

तर स्क्रीनरायटर म्हणून धरम वीर, गंगा जमुना सरस्वती, देश प्रेमी, सुहाग, परवरीश , अमर अकबर ऍंथोनी, कूली ,शराबी, लावारीस, मुकद्दर का सिकंदर, सत्ते पे सत्ता, अग्निपथ , हम ह्यासारख्या अनेक अजरामर चित्रपटांत त्यांनी काम केले.

त्यांना तब्बल ९ वेळा फिल्मफेअरचा बेस्ट कॉमीडियन म्हणून नामांकन मिळाले होते.

तर १९८२ साली फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संवादलेखक म्हणून पुरस्कार मिळाला होता. तर १९९१ सालचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला होता.

 

kader-khan_inmarathi
bollywoodmantra.com

२०१३ साली त्यांना हिंदी चित्रपटसृष्टितील त्यांच्या मोठ्या योगदानासाठी साहित्य शिरोमणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

कादर खान ह्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे परवरीश, शालिमार, मिस्टर नटवरलाल, सुहाग,बुलंदी, नसीब, याराना, कालिया, कूली , तोहफा, मास्टरजी, खून भारी मांग, चालबाझ, घर हो तो ऐसा, हम, बोल राधा बोल, राजा बाबू, मैं खिलाडी तू अनाडी, कूली नंबर वन ,साजन चले ससुराल, हिरो नंबर वन, जुदाई, दुल्हे राजा हे आहेत.

त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे अमन के फरिश्ते हा होता.

 

Aman-Ke-Farishtey-inmarathi
postman.com

कादर खान ह्यांच्या पश्चात तीन मुले आहेत. त्यांनी काही काळापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते.

२८ डिसेम्बर रोजी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कॅनडातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. अखेर आज त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.

कादर खान ह्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या आत्म्यास चिरशांती लाभो. कादर खान ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?