लाडकी लेक वयात येताना : भाग १

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आज बहुतांशी घरात मुलगी जन्माला येणं हा हर्ष सोहळा, आणि तिचे संगोपन हा आनंदाचा ठेवा आहे. मुलगा-मुलगी समान असली, तरी सारखी नसतात; मुलींच्या काही आरोग्यविषयक गरजा, समस्या वेगळ्या असतात, आणि साधारणपणे preadolescent (९ ते १२) वयापासून याबद्दल सजग असावे लागते.

 

girl-child-india-marathipizza
india.com

स्त्रीत्वाच्या दृष्टीने मोठे शारीरिक, भावनिक बदल होण्यापूर्वीचा हा तयारीचा काळ असतो. या काळात काही सर्वसाधारण गोष्टींची, आणि काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

आहार :

 

girl-marathipizza01
stylecraze.com

साधारण नवव्या दहाव्या वर्षांपासून मुलींमध्ये वयात येण्याची चाहूल लागते व तशी बाह्यलक्षणे हळूहळू दिसू लागतात . या वयात सकस आणि चौफेर आहाराची नितांत गरज असते, आणि याच वयात दुर्दैवाने मुलांमध्ये बाहेरचे खाणे, जंक फूड, याविषयी आकर्षण वाढू लागते . या वयात लागलेल्या खाण्याच्या सवयी आयष्यभर साथ देतात, म्हणून घरगुती संपूर्ण आहार द्या; स्वतःही त्याचं पालन करा.

स्वच्छता :

 

girl-marathipizza02
youtube.com

आता मुली स्वतःचं सगळं आवरायला लागलेल्या असतात. सकाळी शाळेच्या घाईत नीट ब्रश करण्याचे टाळतात; त्यांना योग्य पद्धतीने ब्रश करायला शिकवा, दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावा. (भारतात दात किडण्याचे प्रमाण प्रचंड आहे, आणि ते वाढतच आहे). नीट घासून अंग, केस, धुवायला शिकवा. तसेच कानातला मळ नियमितपणे काढत जा. जननेंद्रियांची स्वच्छता ठेवायला सांगा.

ह्या गोष्टी वाचायला क्षुल्लक वाटत असतील, पण मूलभूत स्वच्छतेकडे खरच खूप दुर्लक्ष केले जाते आणि नंतर वय वाढल्यावर नवीन सवयी लावणे फार जड जाते.

व्यायाम :

 

girl-marathipizza03
asiantown.net

मुलींमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करा; व्यायाम त्यांना आयुष्यभर साथ देणारी अतिउत्तम सवय आहे, ती या वयातच त्यांच्यात रुजू द्या. त्यांना सोबत घेऊन आऊटडोअर ऍक्टिव्हिटीज प्लॅन करा; त्यानिमित्ताने तुम्हालाही चांगली सवय लागेल. सकाळी करण्यासाठी15- 20 मिनिटांचे सोपे व्यायाम प्रकार शिकवा (योगासने, सूर्यनमस्कार).

झोप :

 

girl-marathipizza04
hutterstock.com

तज्ञांच्या मतानुसार पौगंडावस्थेतील मुलांना साधारण नऊ तासांची झोप गरजेची आहे, पण प्रत्यक्षात खूप कमी मुले इतकी विश्रांती घेतात. वाढलेला शाळेचा, अभ्यासाचा वेळ,इतर उपक्रम या सगळ्या मध्ये झोपेची वेळ कमी होते; पण शरीराला त्याची खूप गरज असते. टीव्ही बघणे, एखादा क्लास, यात जाणारा वेळ कमी करून आपल्या मुलीला पुरेशी विश्रांती घेऊ द्या.

शारीरिक बदल :

 

girl-marathipizza05
menstrupedia.com

या वयात मुलींच्या शरीरात बदल व्हायला सुरुवात होते.

अचानक ऊंची खूप वाढू शकते (growth spurt). प्रत्यक्ष पाळी सुरू होण्यापूर्वी साधारण दीड दोन वर्षे आधी स्तनांची वाढ, तसेच पायावर, काखेत, योनीवर केस येणे हे बदल सुरू होतात. हे बदल नैसर्गिक आहेत, या बद्दल मुलींना आश्वस्त करणे आवश्यक आहे.

तसेच योग्य मापाची ब्रा (सुरुवातीला स्पोर्ट्स ब्रा) घालायला देणे, पोक काढून चालू नये म्हणून सांगणे, या गोष्टी कराव्या लागतील. काही मुली पिंपल्स च्या त्रासाने खूप बेजार होतात, त्यांना बेसिक सूचना (पिंपल्स फोडू नये, चेहरा स्वच्छ ठेवावा, इ) आणि आवश्यक वाटल्यास उपचार द्यावे लागतात.

सांवेगिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता (EQ आणि SQ) :

 

girl-marathipizza06
aljazeera.com

या वयात मुलींना स्वतःच्या स्त्री असण्याची नकळत जाणीव होऊ लागते. शाळांमध्ये मासिक पाळी बद्दल ही माहिती दिली जाते. कधी कधी मुली या गोष्टींनी थोड्या बिचकतात, त्यांचं सामाजिक वर्तन ही थोडे बदलू शकते; अशा वेळी त्यांच्याशी संवाद असणे खूप महत्वाचे आहे.

मुलींनी पाळी विषयी, मुलं होण्याविषयी, त्यासंबंधित एखाद्या टीव्ही जाहिरातीविषयी प्रश्न विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देऊ नका; त्यांना जमेल तसं समजावून सांगा, वाटल्यास वेळ मागून घ्या, थोड्या वेळाने विचार करून उत्तरे द्या, पण टाळू नका.

हा संवादाचा पूल फार आवश्यक आहे; विशेषतः त्या पौगंडावस्थेत पोहोचल्यावर हे फार फायदेशीर होईल… गुड टच, बॅड टच, बद्दल व्हिडियोज आहेत, ते मुलींना दाखवू शकता; पण त्याचवेळी मुली घाबरून जाणार नाहीत, त्यांचं निरागस बालपण गढूळणार नाही याचीही काळजी घ्या.

जगात अत्यल्प प्रमाणात वाईट लोक असतात आणि त्यांच्यापासून सावध राहायला हवे, पण त्याचवेळी खूप सारी चांगली लोक ही असतात, हे आवर्जून सांगा.

Adolescence (वयात येणे ) :

 

girl-marathipizza07
साधारण 12- 13 व्या वर्षी मुलींना पाळी येते, त्यांचे मासिक चक्र सुरू होते; एखादा वर्ष पुढे मागे होऊ शकते. सुरुवातीला पाळी अनियमित असणे, जास्त स्त्राव होणे,जास्त दिवस स्त्राव होणे, अशा समस्या उद्भवू शकतात, पण हळूहळू नियमित पाळी सुरू होते. रक्तस्त्राव खूप जास्त होत असल्यास, किंवा दैनंदिन काम न करू शकण्याइतका त्रास होत असल्यास, एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यावे. काही मुलींमध्ये रक्तक्षय (रक्तात हिमोग्लोबीन कमी होणे) होतो, तो गोळ्या देऊन बरा करता येतो.

मुलगी आता पौगंडावस्थेत येते; तिच्या शरीरात आणि मनोवस्थेत अनेक बदल होत असतात; त्याच वेळी शैक्षणिक आघाडीवर ही वर्ष महत्वाची असतात. हा सगळा काळ अस्वस्थतेचा असतो, आणि पालकांच्या मानसिक आधाराची तिला गरज असते. टीनेज मुळे ती ते दाखवत नाही, खूप स्वावलंबी, कणखर असल्याचे दाखवते. अशावेळी तिचा स्वाभिमान न दुखावता तिच्याशी मैत्री टिकवणं, आपण पाठीशी आहोत हा विश्वास तिच्यात रुजवणे गरजेचे आहे.

आजकाल शाळांमध्ये मुलींना पाळीविषयी सांगितले जात असते, पण लैंगिक शिक्षण दिले जात नाही; पालक, विशेषतः आई, काही गोष्टी तिला सांगू शकते; सुसंवाद असेल तर हे इतके कठीण होत नाही. आपल्या मुलीतून एक उत्साही, सकारात्मक व्यक्तिमत्व घडवण्याची ही वेळ असते, आणि आताची जडण घडण पुढे आयुष्यभर कायम राहते .

ही सर्वसाधारण ढोबळ माहिती आहे; विशिष्ट, किंवा गंभीर आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पौगंडावस्थेत आणि तरुण वयात स्त्रियांना भेडसावणाऱ्या काही आरोग्याशी निगडीत आणि भावनिक समस्यांबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “लाडकी लेक वयात येताना : भाग १

 • April 20, 2017 at 12:00 pm
  Permalink

  Excellent… Up to da mark… Optimum information..

  Reply
  • April 20, 2017 at 12:01 pm
   Permalink

   Very nice n important information

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?