' “आबा, तुम्ही भांडलेच पाहिजे!” – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ८ – InMarathi

“आबा, तुम्ही भांडलेच पाहिजे!” – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ८

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ७

===

अवघा झाला पण । लवणे सकळां कारण ।।

तुकोबांचे हे उद्गार ऐकून आबाची अवस्था कशी झाली ते सांगणे शब्दांत कठीण आहे.

तुम्हीच माझे पंढरीराव । तुम्हीच माझे गुरू ।
तुम्हीच माझे मायबाप । तुम्हीच माझे तारू ।

असे मनात म्हणत तो तुकोबांच्या चरणांवर झेपावला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला तुकोबांनी उठविले, प्रेमाने जवळ धरले आणि मृदू आवाजात विचारले, “आबा, काय हवंय तुम्हाला?”

“मला शिष्य म्हना इतकंच मागतुया”….

आबाचे हे शब्द ऐकले मात्र तुकोबा झर्रकन मागे सरकले आणि म्हणाले “हे शक्य नाही!”

तुकोबांची ती कृती आणि बोलणे इतके अनपेक्षित होते की आबाच नव्हे तर सगळेच अवाक् झाले. तुकोबा प्रसंगी खूप कठोर बोलतात हे सर्वांना माहीत होते पण हा प्रसंग वेगळा होता. बाहेरगावचा एक तरूण तुकोबांचा शिष्य होऊ पाहात होता. तेथे उपस्थित असलेल्या तुकोबांच्या भक्त मंडळींच्या लक्षात आले की हा असा प्रश्न आपण तुकोबांना कधी विचारलाच नव्हता! आपण तुकोबांच्या सहवासात आलो आणि त्यांचे झालो इतकेच काय ते आपल्याला सांगता येते. तुकोबांचे आणि आपले नाते काय हा प्रश्न आपल्याला कधी पडलाच नाही!

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

काही क्षण गेले आणि आबा पुन्हा म्हणाला, “आसं नगा म्हनू. मी शिकंन म्हनाल ते. सांगाल तसा वागंन. तुमी सांगाल ती कामं करंन. पन माला दूर लोटू नगा. माला शिष्य म्हना. माजे सारं गुनदोष जाई तवंर मी कष्ट करीन. कंटाळायचा न्हाई.”

यावर तुकोबा उत्तरले, “आबा, शिष्य जमविणे हे माझे काम नाही! कारण,

गुरुशिष्यपण । हें तों अधमलक्षण ।।
भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ।।
न कळता दोरी साप । राहूं नेंदावा तो कांप ।।
तुका ह्मणे गुणदोषी । ऐसे न पडावें सोसीं ।।

आबा, तुम्ही शिष्य आणि मी किंवा कुणी गुरु असा भेदविषय तुम्ही मनातून काढूनच टाका! तसे मानणे हे काही शहाण्या माणसाचे लक्षण नव्हे!

अहो आबा, प्रत्येक भूतमात्रात देव आहे. सर्व भूतांत देव आहे. तो कां वेगळा असेल? सर्व सारखेच आहेत! जसे आपण तसा दुसरा! जसा मी तसे तुम्ही! मी मला गुरू म्हणावे आणि तुम्हाला शिष्य समजावे हे अधमलक्षण झाले! माझ्याच्याने ते व्हायचे नाही!

आबा, मला गुरु करण्याचा आणि आपण शिष्य होण्याचा सोस तुम्ही धरू नका. त्या फंदात तुम्ही पडूच नका! आपल्या गुणदोषांचे निवारण व्हावे यावरील उपाय गुरुशिष्यपण हा नव्हे. अहो, आपल्यात गुण किती आणि दोष किती कोणते हे आपल्याला कुठे ठाऊक असते? जोवर दिसते ती दोरी आहे की सांप हेच नक्की कळलेले नाही तोवर अंगाला कापरे भरवून घेण्यात अर्थ तो काय?

आबा, शिष्य होण्यासाठी कामं करीन म्हणता! म्हणजे मी तुमच्याकडून कामाचं मोल घ्यायचं? आणि द्यायचं काय तुम्हाला? ही देवघेव हवी कशाला? तुम्हाला काही कमी नाही आणि मलाही काही कमी नाही! तुम्ही तुमचे घर सोडून इथे आलात ते काय शिष्य होण्यासाठी? आबा, ऐका,

धनवंता घरी । करी धन चि चाकरी ।।
होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावे चि घर ।।
रानीं वनीं द्वीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ।।
तुका ह्मणे मोल । देता काही नव्हे खोल ।।

हे ऐकून आबा म्हणतो

मंजी तुमी गुरु हुनार न्हाई आणि मला बी शिष्य होऊ देनार न्हाई! मग चांगलं काय वायीट काय ह्ये मानसाला कळावं तरी कासं? चांगले इचार कुनी सांगावे, कुनी ऐकावे? आवो, मी रानात न्हाई, वनात न्हाई की कंच्या बेटावर बी न्हाई. मी इथं द्येहूत हाये. तुकोबांसमोर हाये. त्यांनी सांगावं, म्यां ऐकावं. गुरु आनी शिष्य आसनं चूक म्हन्ता तरी हे शब्द आलं कुठनं? सगळे गुरुशिष्य म्हंजे काय वायीट मान्सं हुती? महाराज, आपन थोर हात आनी म्हनून मी इनंती करतुया. मला काय चूक काय बराेबर त्ये जानून घ्यायची इच्छा हाय. तुमच्यासारखं न्हाई कुनी सांगायचं ते.

तुकोबा हसले आणि म्हणाले, “आबा, विचार करा, काय चांगले विचार इथेच आहेत? जगात दुसरीकडे कुठे नाहीत? ते चांगले विचार कुणी पेरले?

कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ।।
नेले वाऱ्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ।
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ।
तुका ह्मणे ह्या निश्चयें । माझे निरसलें भय ।

आबा, आज तुमची जी अवस्था आहे तशी प्रत्येक जाणत्याची अवस्था केव्हा ना केव्हा होते. मी ही गेलो आहे यातून. मला तर भयच वाटत असे की चांगलेवाईट, योग्यायोग्य हे आपल्याला कळेल कसे? हे आपल्याला सांगणारा कुणी भेटला नाही तर आपण असेच जगत राहायचे का?

असा विचार करता करता एक दिवस ही गोष्ट लक्षात आली की देशोदेशी कोण कुणाला काय सांगायला का गेले? योग्य विचार जगभर पोहोचले कसे? कोणी पोहचविले?

आबा, विचार केलात तर उत्तर सोपे आहे! कुणी समर्थाने ते विचार वाऱ्याहाती पसरवले हेच खरे! असा जो असेल, तो समर्थच माझा बाप! तोच तुमचाही बाप! मी तुम्हाला काही सांगावे म्हणजे मला बोलायला हवे? मला बोलते करणारा कोण आहे? माझ्या वाचेवर कुणाची सत्ता चालते?
थोडक्यात आबा, जो सर्वांत समर्थ आहे त्याला धरले पाहिजे. जगावे कसे हे शिकण्यासाठी तुम्हाला शिष्य व्हायचे आहे ना? मग ह्या जगावर ज्याची सत्ता चालते त्याला तुम्ही पकडा.

मी तसेच केले आणि माझा संशय फिटला. समर्थाविषयीचा हा निश्चय झाल्यावर मार्ग कसा सापडेल याचे भय गेले. तुमचाही संशय असाच जाईल.

असे बोलत असताना तुकोबांनी आबाकडे जरा लक्ष देऊन पाहिले तर पुन्हा त्याच्या डोळ्यात पाणी जमलेले! ते म्हणाले, “आबा, तुम्हाला माझा राग आला का हो? मी खूप कठोर बोललो का? फार दुखावलात का तुम्ही?”

हे ऐकून आबा म्हणालो, “आवो, आसं काय म्हन्ता? तुमी न्हाई म्यांच तुमच्याशी वंगाळ बोललु आसं वाटून लई वायीट वाटतंया माला. भांडावं तसं प्रश्न इचारले म्यां. तुमच्याशी म्या आसं कसं बोललु ह्ये मनात यीऊन माजाच माला राग यीऊ लागलाय.”

यावर तुकोबा म्हणाले, “अहो आबा, तुम्ही जे बोललात ते काय भांडण का होतं? मी तर म्हणतो भांडा तुम्ही!

भांडावे तो हित । ठायी पडां तें उचित ।।
नये खंडो देऊं वाद । आह्मां भांडवलभेद ।।
शब्दसरसें भेटी । नये पडों देऊं तुटी ।।
तुका ह्मणे आळस । तो चि कारणांचा नास ।।

आबा, तुम्ही भांडले पाहिजे! तुम्ही भांडा. प्रश्न विचारा. समाधान होईपर्यंत तुम्ही वाद घातला पाहिजे! वाद कराल तरच मुक्कामी पडाल आणि तेच उचित होय.

आबा, तुम्ही अवश्य प्रश्न विचारा. मात्र एक लक्षात घ्या की तड लागेपर्यंत वाद खंडित होता कामा नये. विचारभेद झाल्याने, वेगवेगळे शब्द वापरले गेल्याने आपल्यातील अंतर वाढता कामा नये.

आबा, वाद करणे मोठी अवघड गोष्ट आहे. माणसाला शारीरिक श्रमांचा जेवढा कंटाळा असतो त्याहून जास्त आळस विचार करण्याचा असतो. आणि त्या आळसाने ज्या कारणाने वादविचार सुरू झाला तो तुटतो आणि माणसाचा सारा नास होतो. तसे होऊ देऊ नका.”

इतके बोलून तुकोबा इतर मंडळींकडे वळून म्हणाले –

उद्यापासून रोज सायंकाळी जेवणं झाली यायचं इकडे. आबा प्रश्न विचारतील. माझा पांडुरंग त्यांना उत्तर देईल. आबा, हे आवडेल ना तुम्हाला?

आबाचा चेहेरा हसरा झाला आणि सगळे घराकडे निघाले.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?