तुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं । उतरला कसीं खरा माल ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ७

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ६

===

जे सांगून झाले होते तेच सांगणारा अजून एक अभंग तुकोबांनी म्हटला आणि आपले कीर्तन आटोपते घेतले.

सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥
तुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं । उतरला कसीं खरा माल ॥

ह्या वेळी आबा पाटील मंदिराच्या बाहेर एका भिंतीला टेकून सारे कीर्तन ऐकत होता. त्याच्या मनात येत होते, केवढा मोठा माणूस हा! गावोगांव ह्यांच्या नावाची इतकी ख्याती झाली आहे आणि हे इकडे लोकांच्या पायी दंडवत घालीत आहेत, लोकांच्या चरणी मस्तक ठेवीत आहेत! अहो श्रोते, अहो वक्ते, अहो सकल जन अशी साद घालीत आहेत!

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

आणि सांगत काय आहेत? तर, माल चांगला पारखून गाठी बांधा म्हणत आहेत. हे का सांगावे लागते? बाजारात गेलेला मनुष्य छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती जीव पाखडतो, घासाघीस घालतो आणि अशा ह्या लोकांसाठी तुकोबांनी आज असा आर्त सूर लाविला आहे! ज्या विचारांनी मनुष्याला मनुष्यपण यायचे ते लोकांना कळावे म्हणून स्वतःला हमाल म्हणवून घेण्यापर्यंत तुकोबा पोहोचले आहेत. आपण सांगितलेला मार्ग आपला नव्हे, तो चालत आलेला, आधीच सिद्ध झालेला आहे, काळाच्या कसाला उतरलेला आहे हे सांगत आहेत. ते म्हणत आहेत, जो मार्ग आपण सांगितला तो चहूंदिशांना यापूर्वीच फैलावलेला आहे, मी इतकेच करतो आहे की तो विचार सांगणारे भांडार फोडून तुमच्यापर्यंत विषय पोहोचविण्याची हमाली करीत आहे!

तुकोबांना ह्यातून असे सांगायचे आहे की आपण सांगतो तो सिद्ध व योग्य मार्ग न सांगता इतर आमीषे दाखवून लोकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांचा मार्ग यांतील योग्य तो निवडा. कुणी सांगतात म्हणून विश्वास ठेवू नका! इतर लोक आपल्या मनचे बोलतात, मी मनचे बोलत नाही. मी तुम्हांसमोर सादर करीत असलेला विचारांचा माल तुम्ही पारखा! पारखा आणि मगच स्वीकारा असे तुकोबांचे सांगणे आहे.

आबाच्या मनात आजच्या कीर्तनाचा हा विषय आणि तुकोबांची कळकळ अशी भरली की तिकडे कीर्तन संपले आणि लोकांची पांगापांग झाली हे त्याच्या लक्षातही आले नाही!

आत देवळात तुकोबा आणि त्यांची शिष्य मंडळी तेवढी उरली. एक म्हणाला,

येताना आबा पाटील संग हुते, आता कुठं गेले?

तुकोबांनी आबाच्या दिशेने खूण केली आणि म्हणाले,

नवा आहे, बोलवा त्याला आंत

एक गडी चटकन बाहेर धावला आणि आबाजवळ जाऊन उभा राहिला. आबाला ते कळलेही नाही! तुकोबांसारखा थोर मनुष्य सामान्यांसमोर इतका लीन होतो ह्या आश्चर्यातून बाहेर यायला तो काही तयार नाही! आबाची अशी लागलेली तंद्री त्या माणसास मोडवेना! तरी त्याने आबाच्या खांद्याला हात लावला आणि तुकोबा बोलवीत असल्याचा निरोप दिला. तो ऐकून मात्र आबा एकदम भानावर आला आणि तुकोबांसमोर येऊन हात जोडून उभा राहिला!

तुकोबांनी विचारले,

काय आबा, काय विचार करताय?

तुकोबांचा हा छोटासा प्रश्न आज आबाला पुरला. तुकोबांसमोर नेहमी गप्प गप्प राहणाऱ्या आबाला आज सहज कंठ फुटला. तो म्हणू लागला,

इचार करीत हुतो, ह्ये लोकांच्या पायी दंडवत कशाला? पाय का म्हनून धरता? आवो, तुमी कुटं, लोक कुटं? इतकं जीव तोडून सांगतायसा, कुनी आईकत नाही म्हणतायसा तरी इनवनी करतायसा. तुमी आसं वाकलेलं पाहून आमाला बरं नाई वाटत. महाराज, खरं सांगा, तुमी आसं का करता?”

हे ऐकून तुकोबा थोडे गंभीर झाले आणि म्हणाले,

आबा, तुम्हाला मी मोठा वाटतो तसा मी मला वाटत नाही हो! आणि जर तुम्ही म्हणता तसा मी मोठा असेन तर माझे काम काय ते सांगा बरं? आपण जे काम निवडलं ते करताना आपण स्वतःला विसरायला नको का? जे आपल्याला मिळालं ते लोकांना वाटायला नको का?

जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ।।
सहज पूजा या चिं नावे । गळित अभिमाने व्हावे ।।
अवघें भोगितां गोसावी । आदीं अवसांनीं जीवी ।।
तुका ह्मणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ।।

बरं का आबा, आपल्याला जे जे पावलं ते ते लोकांना वाटून टाकावं हीच खरी देवाची सेवा आहे. तीच खरी पूजा आहे. आपलं काम पूजा म्हणून करावं. ती करता करता आपला अभिमान गळून पडला पाहिजे. पूजा म्हणून सेवा केली की तो गळून पडतो.

आबा, अवघे भोगतो तो गोसावी. तोच ह्या विश्वाचा आदि. त्याने ह्या जीवात अवसान धरलेले आहे. आपण त्या गोसाव्याचे अंश आहो हे लक्षात घेऊन त्या आदि गोसाव्यासारखे वागावे. आपण संसारी आणि तो गोसावी असे म्हणून नये. तो भिन्नत्वाचा विचार सुटला की कशाचा शीण होत नाही, कशाचा भार होत नाही.

आबा, ज्याला अभिमान नाही त्याने अवश्य दंडवत घालावे व काम होईल हे पाहावे. आपण तर गोसावी बनावेच आणि इतरही बनतील असे ही पाहावे. ऐका,

नम्र झाला भूतां । तेणें कोंडिले अनंता ।।
हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ।।
अवघा झाला पण । लवणे सकळां कारण ।।
तुका ह्मणे पाणी । पाताळ ते परी खणी ।।

आबा, आपण कसे असावे हे आपणच ठरवायचे आहे. माझा पूर्ण निश्चय झालेला आहे. (अवघा झाला पण) मी सर्वांसाठी लवतो. पाण्यासारखं पातळ व्हायचं आणि वाहायचं आपण. खाणीपाताळांपासून सर्वत्र.

पाण्याप्रमाणेच आबा, लोकांपाशी पोहोचायचे तर नम्रच व्हायला हवे. तसे आपण स्वतःला बनविले तरच लोक जवळ येतील. अभिमान धरून राहण्यात काय पराक्रम आहे? नम्रता हेच शूरत्वाचे लक्षण आहे! हा जनता जनार्दनरूपी अनंत कोंडून धरायचा असेल तर नम्रतेशिवाय दुसरा मार्ग नाही, आबा.

हे कळण्यासाठी श्रीकृष्णाचे उदाहरण बघा. नम्रता आणि शौर्य कसे एक होतात हे दाखविण्यासाठीच जणू हरीने त्या श्रीरंगाला आपल्यासमोर आणला! अर्जुनाच्या रथाचा सारथी होण्यासाठी तो किती लवला आणि नंतर घरांघरांत पोहोचला!

आबा, आपले गुणदोष आपण विसरून जावे आणि त्या श्रीरंगासारखे व्हायचा प्रयत्न करावा. मी नेहमी पांडुरंगाला म्हणतो :

आपुल्या महिमाने । धातु परिसे केले सोने ।।
तैसे न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ।।
गावाखालील वाहाळ । गंगा न मानी अमंगळ ।।
तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ।।

हे पंढरीनाथा, माझे गुणदोष आता मी मनात आणीतच नाही! तो विषय मी सोडूनच दिला! मी हे पाहातो की, आपली क्षमता वापरून परीस सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करतो! मी हे पाहातो की गावाच्या खालच्या अंगाचे ओहोळ गंगा अमंगळ म्हणून नाकारीत नाही! एकदा कस्तुरी मिसळली की मातीचे मातीपण सरते!

जे जे सामान्य म्हणायचे ते अशा मार्गाने असामान्यत्व पावतात. ते पाहून मी ही माझा निश्चय केलेला आहे,

अवघा झाला पण । लवणे सकळां कारण ……

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?