देव आहे देव आहे । जवळी आह्मां अंतरबाहे ।। – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ५

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४

===

कान्होबांनी अभ्यासाची सुरुवात करून दिली याचा आबाला फार आनंद झाला. त्याने मनाशी एक निश्चय केला की तुकोबांची वचने ऐकताना सावध असायचे. आपल्याला सहज कळेल अशा कल्पनेत राहायचे नाही. त्याचबरोबर, आपल्याला कळणार नाही, कसे कळेल असे निराशेचे विचारही येऊ द्यायचे नाहीत. “कळायला वेळ लागेल पण मला कळेल, कळेपर्यंत मी प्रयत्न करीन” असे मात्र मनात सतत म्हणत राहायचे. आपण स्वतःहून तुकोबांच्या दारी आलो आणि त्यांनी तर आपल्याला घरातच घेतले! आता आपण कमी पडायचे नाही. शारीरकष्ट आपण करूच पण मन तुकोबा काय सांगतात तिकडे ठेवू. तुकोबा सांगत आहेतच आणि काही अडले तर सांगायला कान्होबाही आहेत.

नवीन आलेला असताना कावराबावरा असलेला आबा पाटलाचा चेहेरा आता असा विचार करून काहीसा सैलावला. तुकोबांनी त्या दिवशी कीर्तनात काय सांगितले होते ते तो सारखे आठवू लागला. त्या दिवशी तुकोबांनी देव म्हणजे काय हे सांगितले होते.

तुकोबा म्हणाले होते –

देव आहे देव आहे । जवळी आह्मां अंतरबाहे ।।

आबाला सारखी ही ओळ आठवू लागली. यात तुकोबांनी देव आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला होता आणि तो कुठे आहे या विषयी काही संदेहही उरू दिला नव्हता. त्यांनी त्या दिवशी विवरूनही सांगितले होते की – देव आम्हां जवळी आहे! अंतरबाहे जवळी आहे!

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

आबा मनात विस्तार करू लागला. देव अंतरी आहे, देव बाहेरही आहे. अंतरात आहे तो देव आहे, बाहेर आहे तो ही देव आहे!


आबा पुन्हा पुन्हा मनावर ठसवू लागला, देव आंत आहे, आंत आहे तो देव आहे –

देव बाहेरही आहे, बाहेर आहे तो देव आहे – अंतरबाहे जो आहे – तो देव आहे!

आबाने ह्या ओळी कितींदा म्हटल्या याची गणती नाही. पण त्याचे समाधान होईना. ह्या वचनांचा नेमका अर्थ काय हे त्याला कळेना. जिवाची घालमेल होऊ लागली. शब्द समजले आहेत, अर्थही सांगता येतो आहे पण हाताला काही लागलेले नाही अशी त्याची अवस्था झाली.
कान्होबांच्या लक्षात आले, गडी गोंधळलाय. त्याला मदत केली पाहिजे. अभंग जाणून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नांचे त्यांना कौतुक वाटू लागले. एका ओळीवर इतकी मेहनत करणारा आबा पुढे जाणार याची त्यांना खात्री पटली. मात्र त्याला अजून खाद्य द्यायला हवे हे उमजून कान्होबा आबाला म्हणाले – “असाच अजून एक अभंग आहे तो घ्या. –

गोडीपणे जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ।।
आता भजो कवणे परी । देव सबाह्य अंतरी ।।
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ।।
हेम अळंकारा नामी । तुका ह्मणे तैसे आम्ही ।।

यात तुकोबांनी प्रतिमा वापरून विषय अजून सोपा केलाय. गुळ आणि गोडी, पाणी आणि त्यावरील तरंग, सोन्याचे अलंकार आणि सोने ह्यांत वेगळे काही काढता येईल का असे विचारून ते म्हणतात तसाच देव सबाह्य अंतरी म्हणजेच सर्वत्र आहे. तो वेगळा काढून दाखविता येणार नाही.”

आबाने हे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला –

आता माजं आसं झालया की येक गुंता सोडवाया गेलो की दुसरा उभा ऱ्हातुया.

कान्होबा म्हणाले, “का बरं असं? आता कुठं अडलं?”
आबा म्हणाला, ” बघा की. त्ये म्हन्तात, तुका ह्मने तैसे आमी. म्हन्जे आपल्या आत द्येव हाय, बाह्येर द्येव हाय आणि आपुण बी द्येव हाय!”

कान्होबांनी उगीचच चेहेरा गंभीर केला आणि ते म्हणाले, “मग? तक्रार काय तुमची?”

आबाच्या काही ती गंमत लक्षात आली नाही. तो म्हणू लागला, ” तसं न्हाई वो. तुकोबा द्येवच हायीत. पण तरी त्यांनी तसं म्हननं येगळं आणि आपन तसं आपल्याबद्दल माननं येगळं. आपन आपल्यालाच द्येव कसं म्हनायचं सांगा. कान्होबा, जरा इस्कटून सांगा की. आपुनच द्येव अासं म्हनतात का तुकोबा?”

कान्होबा उत्तरले, “होय आबा. तुकोबा म्हणतात सोन्याचा जसा छानसा अलंकार होतो तसे त्या जीवाचे म्हणजेच देवाचे आपण बनलेले आहोत. आपल्यापासून देव वेगळा काढता येणारच नाही. इतकेच नव्हे तर पाहा, ते ह्या अभंगात म्हणतात, जेव्हा माझा जीव, मी आणि देव हे एकच आहो तेव्हा मी भजू तरी कोणाला?

देव सबाह्य अंतरी । आता भजू कवणे परि?

हे ऐकून आबा एकदम गप्पच झाला.

कान्होबांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि सांगितलं, “एक एक विचार मनात रूजवत जावा. हळूहळू सर्वांची संगती लागेल. एकदम सगळे लक्षात यायचे नाही. विचारांचा गोंधळ अवश्य होऊ द्या. तुम्हाला शंका येतात आणि तुम्ही विचारता हे छान आहे. ह्या विषयावरचा अजून एक अभंग तुम्हाला सांगतो. त्याचा अर्थ आता तुम्ही मला सांगायचा.

रवि रश्मिकळा । न यें काढिता निराळा ।।
तैसा आह्मां झाला भाव । अंगी जडोनी ठेला देव ।।
गोडी साकरेपासूनी । कैसी निवडती दोनी ।।
तुका म्हणे नाद उठी । विरोनी जाय नभा पोटी ।।

आबा चटकन बोलेना…!

कान्होबा म्हणाले, ” तुम्ही अर्थ सांगू शकता आबा. भय धरू नका. बोला.”

आबाने कान्होबांचे पाय शिवले आणि म्हणाला, “धाडस करतु. काई चुकलं माकलं तर सांबाळून घ्या मंजी झालं. रवि म्हंजी सूर्य. रश्मि म्हंजी त्याची किरनं. आता रवि न् त्याची किरनं का येगळी हायेत? येकच ती. त्यांना येगळं येगळं करताच न्हाई येत. तसं आमचं झालंया. द्येव आंगभर भरून राहिलया. आता मनात त्योच भाव उरलया. साकरेपासून गोडी निवडता येती हुय? तुकोबाचं त्येच म्हननं हाय.”

कान्होबांनी आबाला मिठीच मारली. म्हणाले, “किती छान बोललात आबा. वा वा! फार आनंद वाटला बघा. पण शेवटचा भाग का सोडलात? अभंग पुरा करा की.”


आबा म्हणाला, “त्ये जरा जड हाय. त्येवढं तुमी सांगा की.”

कान्होबांनी मान डोलावली आणि म्हणाले, ” अहो, एखादा नाद होतो तो कसा? तर ही हवा असते ना, तिचाच नाद होतो आणि त्याच हवेत नंतर तो विरूनही जातो. पाहावं तिकडे हे आकाश कसं पसरलेलं आहे? त्यात हवेचे नाद होत असतात आणि विरतही असतात. तसे देवाचे आहे. तो तसाच सर्वत्र भरलेला आहे. सबाह्य अंतरी तोच आहे. आपल्यात तोच आहे आणि दुसऱ्यातही तोच आहे. तुकोबांचं मन असं अंतरबाह्य एका भावाचं झालेलं आहे. आलं ना लक्षात?”

आबा म्हणाला, “शब्दांचा आर्थ कळला. पन समदं कळाया येळच लागनार आसं वाटतुया.”

कान्होबा म्हणाले –

तुम्ही कष्ट करताय, तुम्हाला कळणार. तुकोबांचे शब्द आहेत. दोन अर्थ नाहीत त्यात. नक्की समजतील तुम्हाला.

आबाने मान डोलावली आणि त्या दोघांचा हा सुखसंवाद तात्पुरता थांबला.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?