आपण ब्राह्मण, तो शूद्र, तरी त्याची वाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी? : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक :  जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३२

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

रामभटांनी आपली कथा पुढे सुरू केली. ते सांगू लागले,

देहू गावात कुणी तुकाराम नावाचा विठ्ठलभक्त आहे, छान कीर्तने करतो, लोकांचा खूप आवडता आहे वगैरे गोष्टी कानावर येत असत. आम्हाला त्याचे काही विशेष वाटले नाही. गावोगावी लोकांचे आवडते कीर्तनकार असतात, गवई असतात. त्यातलाच हा एक असे वाटले. पुढे असे झाले की, लोकांच्या तोंडी त्याचे अभंग घोळू लागले आणि पांडुरंगाचा गजर कमी इतका ह्याचा होऊ लागला. त्यात कुणी सांगितले, यांच्याकडे महाजनकी होती आणि दुष्काळात ह्याने कर्जाच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या, लोकांना कर्जमुक्त केले. हे ऐकून तर अनेकांनी त्याला वेड्यातच काढले होते. लोक म्हणत, कसला माणूस आहे हा? ज्याला आपले, आपल्या कुटुंबाचे हित कळत नाही तो लोकांना आपले हित कशात आहे हे सांगतो! हे सारे असे चालू असले तरी ब्राह्मणांना तुकोबांचे फारसे सोयरसुतक नव्हते. मात्र एका यज्ञस्थळी यज्ञकर्म होऊन भोजने झाली आणि एका ब्राह्मणाने चिठोरा काढला आणि सर्वांना मोठ्याने वाचून दाखविला. तुकोबांचा अभंग होता –

 

बहुतांच्या आह्मी न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ।।
विचार करितां वायां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचे ।।
तुका ह्मणे तुह्मी करा घटपटा । नका जाऊं वाटा आमुचिया ।।

 

हा अभंग सांगून तो ब्राह्मण कडाडला, कोण हा तुका? आह्माला बोलतो? आम्हां ब्राह्मणांना बोलतो? समस्त ब्राह्मणांनो ऐका, ऐका, हा तुका काय म्हणतो ते… तो म्हणतो… माझ्या वाटेला तुम्ही जाऊ नका! तुमची घटापटा तुमच्यांत चालू द्या! ती तुम्ही करीत बसा! घटापटाची चर्चा निरर्थक, वेळ वायां दवडणारी आहे. नसत्या गोष्टीची संगत केली की फजितीच व्हायची! कोणा कोणाच्या कशा कशा भावना असोत, त्यांचे बहुमत असले तर असो, आमचे त्यांचे जुळायचे नाही! अभंगाचा हा अर्थ सांगून तो ब्राह्मण पुढे म्हणाला, माझ्या ब्राह्मण बांधवांनो, हा तुकाराम कोण ह्याचा शोध घ्या. तो आम्हाला आव्हान कसे देतो? घटापटादी चर्चांना व्यर्थ कसे म्हणतो? हा तुकाराम कुठे शिकला हे? कोणी शिकविले त्याला? मुळात आपल्यातील घटापटांचा विषय त्याच्यापर्यंत पोहोचलाच कसा? आणि समजा पोहोचला तरी त्यास व्यर्थ, लटिके असे संबोधून पुढे हा आम्हांस म्हणतो कसा की माझ्या वाटे जाऊ नका? ही भाषा आली कोठून? हा ब्राह्मण असे तावातावाने बोलत असता, अजून एक उभा राहिला व त्यानेही एक तुकोबांचा अभंग ऐकविला –

 

वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाही ।।
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरीचे सार लाभ नाहीं ।।
देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणां पाषाण पूजी लोभें ।।
तुका ह्मणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ।।

 

हा अभंग सांगून हा दुसरा ब्राह्मण म्हणू लागला, आधीचा ऐकलात तो अभंग काहीच नाही असा हा अभंग मी तुम्हाला आत्ता ऐकविला. ह्यात त्या तुक्याने आपल्याला सरळसरळ शिवीगाळ केलेली आहे. मला त्याचे अजून असे बरेच अभंग माहीत आहेत पण ते उच्चारण्यासही मला लाज वाटते. ह्या अभंगात तो तुक्या आपल्याला शिंदळीचे म्हणालाय. हे आवरले पाहिजे. बरे, तो नुसती शिवीगाळ करीत नाही, लांबडे वर्णनही करतो. म्हणतो भूमी मिळावी म्हणून, द्रव्य मिळावे म्हणून, राज्य मिळावे म्हणून हे वृत्ती मिळवितात, हा तुका सांगतो आहे की तुम्ही निश्चित समजा हे लोक देव नव्हेत! भाडे घेऊन एखाद्याने भार वाहावा त्या लायकीचे हे होत. ह्यांना अंतरीचा देव कधीही भेटायचा नाही! ह्या लोकांचे मन देवपूजेवर फार. प्रत्यक्ष काय होत असते, तर एक पाषाण दुसऱ्या पाषाणाची पूजा करीत असतो. आणि ती ही काही लोभाने. पूजेतून काय मिळेल त्या फळाचाच यांच्या मनात विचार असतो. त्यांचे गोड बोलणे पाहून समजा की ते वेशेच्याच पोटी जन्माला आले असले पाहिजेत! तुकोबांच्या अभंगाचा असा अर्थ सांगून तो ब्राह्मण म्हणाला, तुकारामाची चौकशी करावी अशी मागणी मी ही करतो. ह्या मागणीला मग सारेच उचलून धरू लागले. तुकोबांचे एक एक अभंग बाहेर येऊ लागले. एक म्हणाला, तुकारामाने शिवीगाळ केली ती बरी की तो आपल्याला ठक म्हणाला यात अधिक बरे काय ते तुम्ही ठरवा. तुकाराम म्हणतो,

 

माया ब्रह्म ऐसे ह्मणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ।।
विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागे नाद्या होऊनि फिरे ।।
करूनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ।।
औषध द्यावया चाळविले बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ।।
तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांची ।।
तुका ह्मणे जयां पिंडाचे पाळण । न घडे नारायणभेट तयां ।।

 

ऐका मंडळी, ह्या कवितेत हा तुका आपल्याला धर्मठक म्हणतो आहे! आपण लोकांना ब्रह्म मायेच्या गोष्टी सांगून नागवितो असे म्हणतो आहे! आपल्याला विषयांत बुडालेले लंपट असेही म्हणतो आहे! हा म्हणतो, आपण लोकांना कुविद्या शिकवितो! अापले मन जिकडे जाईल तिकडे आपण मनाच्या नादी लागून म्हणे फिरत असतो! बरे का, दाखले देण्यात हा तुका मोठा पटाईत आहे. आपण लोकांना कसे फसवितो ते सांगण्यासाठी त्याने लहान बाळाला गूळ पुढे करून औषध देतात त्याचा दाखला दिलाय. म्हणजे आपण लोकांना खोटी आमिषे दाखवून लुटतो असा ह्याचा सरळसरळ अर्थ झाला! पुढे हा तुका आपल्या बोलण्याला नुसता वारा असे संबोधतोय. आपले बोलणे वांझोटे म्हणतोय. आणि आता तो सल्ला देतोय, आधी वेदवाणी शोधा! म्हणजे काय हो? ह्याला काय माहीत वेद काय सांगतात ते? आमच्या बापजाद्यांचे जन्म वायाच गेले म्हणायचे! त्यांना कळले नाही ते ह्या तुक्याला कळले! ह्या तुक्याचे म्हणणे असे की आम्ही नुसते देह पोसणारे आहोत, आम्हाला नारायण कधी भेटायचा नाही! ह्याला का हो आमची इतकी काळजी? आम्ही त्यास काय छळले? मी ही सर्वांना आवाहन करतो की ह्या तुक्याला आवरा. घटापटाची चर्चा करणाऱ्या आदि शंकराचार्यांना बोल लावण्याची कुण्या ब्राह्मणांत तरी क्षमता आहे काय? की कुणी ब्राह्मणानेच ह्याला गुप्तपणे काही शिकविले? शोध घ्या. तसा कुणी ब्राह्मण सापडला तर त्याची पैठणला तक्रार करू.

त्या यज्ञाच्या ठिकाणची इतकी कथा सांगून झाल्यावर रामभटांनी थोडी उसंत घेतली आणि ते पुढे सांगू लागले,

असे अनेक ब्राह्मण एकामागोमाग बोलू लागले. वातावरण क्षुब्ध झाले. शेवटी एक म्हातारे शास्त्री उठून उभे राहिले आणि म्हणाले, आज जो येथे विषय झाला तो अत्यंत नाजूक आहे. सर्वांनी आपल्या भावना आवरून धराव्या असे मी आधी म्हणतो. तुकारामाचे तुम्ही दिलेले दाखले गंभीर आहेत यात शंका नाही. ह्या प्रकरणाची आपण रीतसर चौकशी करू. मात्र चौकशी झाल्याशिवाय हा विषय तुम्ही आता बाहेर बोलू नये. मी असे का म्हणतो? तर, माझ्याकडेही तुकारामाचे काही अभंग आलेले आहेत. तुम्ही म्हणता ती गोष्ट मी खोटी म्हणत नाही परंतु आता त्याच तुकारामाचे दोन अभंग ऐकवितो, ते ऐका.

 

नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ।।
आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ।।
कैचा तेथ यावा सांडी । आपण कोंडी आपणा ।।
तुका ह्मणे कल्प जाला । अस्त गेला उदय ।।

 

बरे का लोक हो, ज्याच्याबद्दल तुम्ही इतका वेळ बोलत होतां त्याचीच ही रचना आहे. मी त्याची स्तुती करतो आहे म्हणून नाराज होऊ नका. पण सांगा, ह्यात काय म्हणतो आहे तुका? अहो, हे नासदीय सूक्त आहे! तुम्हाला आम्हाला सर्वांना येते! पण ह्याला जसे येते तसे आपल्याला येते काय? प्रामाणिकपणे सांगा, आपल्यापैकी किती जणांना नासदीय सूक्त कळले आहे? आपण ब्राह्मण, तो शूद्र. आपल्याला कळत नाही ते त्याला येते कसे हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. तुम्ही चौकशी जरूर करा पण तो वेद शिकलेला नाही हे मी नक्की सांगतो. त्याला ब्रह्मपिशाच्चच वश असले पाहिजे. ते त्याच्या कानात बोलत असल्याखेरीज हे असे शब्द निघायचे नाहीत. मंडळी, नासदीय सूक्त, विश्वाचा कल्पांत सांगते. साधकाच्या जीवनात तशी वेळ आल्यावर काय होते ते सांगताना हा तुकाराम म्हणतो,

 

अग्निमाजी गेले । अग्नी होऊन तें च ठेलें ।।
काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ।
लोह लागे परिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ।।
सरिता ओहळा ओघा । गंगे मिळोनि जाल्या गंगा ।।
चंदनाच्या वासें । तरू चंदन जाले स्पर्शे ।।
तुका जडला संतापायी । दुजेपणा ठाव नाही ।।

 

तर, माझे ऐका, सावधान असा. ह्या वाघोलीच्या रामभटाला काम द्या. त्याने तुकारामास गाठावे व ब्रह्मनिंदेबद्दल विचारणा करावी. जी होईल ती गोष्ट आपल्या पुढील यज्ञात विदित करावी. आपण नंतर निर्णय करू.

इतके सांगून रामभट म्हणाले,

अशा रीतीने हा अवघड विषय माझ्या गळ्यात येऊन पडला!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?