' पांडुरंगाने आपल्याला लेकरू मानावे आणि तशी कृपा करावी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २४ – InMarathi

पांडुरंगाने आपल्याला लेकरू मानावे आणि तशी कृपा करावी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २४

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २३

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

रामेश्वरभटांच्या घरी सर्वांचे स्वागत फारच छान झाले. नारायणाने आबाची ओळख करून दिली. गेल्या दोन दिवसांतील हकिगती सांगितल्या. तुकोबांनी एक मनुष्य आपल्याकडे शिकण्यासाठी पाठविला हे पाहून रामभटांना गहिवरून आले. ते म्हणाले,

आबा, तुम्ही तुकोबांचे शिष्य आहात. मी तुम्हाला काही शिकवायचे हे मला कसेतरीच वाटते. पण शेवटी गुर्वाज्ञा आहे, ती पाळली पाहिजे. तुम्ही काही संकोच न करता इथे राहा. मला जमेल ते मी तुम्हाला शिकवीन. मात्र, एक लक्षात ठेवा, मला काही विशेष येते म्हणून तुकोबांनी तुम्हाला इकडे पाठविलेले नाही. ते सिद्ध पुरुष आहेत. अध्यात्मातील काहीही शिकायचे त्यांनी शिल्लक ठेवलेले नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शिकलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी आचरणात आणलेली आहे. असा पुरुष होणे विरळा. मी तसा नाही. माझी कथा वेगळी आहे. मी कधीतरी तुम्हाला ती सांगेन. पण विचार तोंडाने बोलणे आणि प्रत्यक्ष रोजच्या आचरणात आणणे माझ्याकडून झालेले नाही. मी अजून विद्यार्थी दशेत आहे आणि त्यातून इतक्यात बाहेर पडेन असे नाही. विद्यार्थी म्हणून ते माझी परीक्षा बघत आहेत असे मी समजेन आणि त्या भावनेने तुम्हाला शिकवेन.

आबा म्हणाला,

तुकोबांनी ज्येंच्याकडं शिकाया पाठीवलं त्ये कुनी साधं मानूस नसनार इतकं म्यां जाणतुया.

रामभट म्हणाले,

माझ्या कौतुकाचं, आबा, तुम्ही मनात आणूच नका. तुकोबांचा तो प्रसिद्ध अभंग तुम्हाला माहीत नाही काय?

 

बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ।।
अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ।।
त्याचा होईन किंकर । ठाकेन जोडोनी कर ।।
तुका ह्मणे देव । त्याचे चरणी माझा भाव ।।

 

तुकोबांना बोलेल तसा वागणारा मनुष्य सहजी दिसला नाही याचा हा अभंग म्हणजे पुरावा आहे, आबा. आबा, तुम्ही खूप फिरलात आणि तुकोबांपाशी विसावलात याचे कारण दुसरे नाही. माणसाला तेज काही बोलण्याने यायचे नाही. आधी योग्य ते बोलले पाहिजे आणि मग तसे वागलेही पाहिजे. हे फार कठीण आहे हे मी स्वानुभवाने सांगतो. बोलण्यात मी पटाईत होतो पण माझे वागणे कसे झाले ते तुम्ही ऐकून असाल. बोलण्यासारखे तर सोडाच पण जे मी बोलत होतो त्याच्या विपरीत वागत होतो. त्याहीपेक्षा वाईट भाग असा की जे चुकीचे वागत होतो त्याचे समर्थन करण्यासाठी मग मी हळूहळू चुकीचे बोलू लागलो. मनुष्य एकदा अधोगतीला लागला की तो सावरणे कठीण. पण तुकोबांची कृपा झाली आणि मी बदललो. तुकोबा माझ्या आयुष्यात आले नसते तर मी किती अवनत झालो असतो याची कल्पनाही आता मला करवत नाही. मी नुसता अवनत झालो नसतो तर हिऱ्यांचे कोळसे करणाराही झालो असतो. माझ्या सहवासातील माणसेही माझ्यासारखीच वागू बोलू लागली होती. हे सारे माझे दोष न पाहता तुकोबांनी मात्र माझे सोने केले हो. अशांनाच संत म्हणतात बरें.

 

लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी ।।
जैसी तैसी तरी वाणी । मना आणी माऊली ।।
लेकराचे स्नेहे गोड । करी कोड त्या गुणे ।।
मागे पुढे रिघे लोटी । साहे खेटी करी तें ।।
तुका विनवीं पांडुरंगा । ऐसे सांगा आहे हें ।।

 

आपल्या साधकावस्थेत तुकोबांनी पांडुरंगाला दिलेला निरोप आहे हा. ते म्हणतात, त्या पांडुरंगाला जाऊन सांगा की परीस लोखंडाचे दोष न पाहता त्याचे सोने करतो. आपले लेकरू कसेही बोलो ते माता गोड करून घेते. लेकराच्या मायेपोटी त्याचे सारे कोड ती पुरविते. ते लेकरू तिच्या सारखे मागेपुढे करते, अंगाला खेटते, ढकलाढकली करते पण ते सारे ती सहन करते. तुकोबांची अपेक्षा अशी की पांडुरंगाने आपल्याला लेकरू मानावे आणि तशी कृपा करावी. आणि त्या विदेही पांडुरंगाने त्यांच्यावर तशी कृपा मग केलीही. तुकोबांचा भाव इतका शुद्ध होता की पांडुरंगाने त्यांचे सोने नाही केले तर त्यांचा परीस केला! अशा परीसाकडे तुम्ही राहून आलात आबा. नारायणालाही त्यांचा उपदेश झाला. तुम्हांवर पांडुरंगाची कृपा झालेली आहे असे समजा आणि आनंदाने इथे राहा. शिका. मोठे व्हा. तुकोबांना रूचेल असे करा.

बोलता बोलता रामभटांना भावनावेग अनावर झाला. उपरण्याने डोळे पुसत ते म्हणाले,

चला, आता स्नाने उरका आणि पाटावरच या.

रामभटांच्या अशा स्नेहाळ बोलण्याने आबाच्या मनातील संदेह दूर झाला आणि त्याचा ताण गेला. तो म्हणाला,

गुरुजी, आपलं बोलनं आईकलं आनी मन साफ झालं. आपन शिकाल त्ये मी मन लावून शिकंन. तुमी तुकोबांचं सांगितलं त्ये सारं खरं हाय. आसे लोक न्हाईत मिळत पाहाया. पन, येक वाटतुया की त्येंना म्हना द्येवानंच धाडलं हाय. आपुन काई तसे न्हाई. तुमची गोष्ट बी येगळी हाय. काही म्हनलं तरी तुमी बामनाचे, तुकोबा द्येवाचे. आमी साधे व्हो. आमचं कुळ सादं हाय. तुमच्या ह्या नारायनापरीस न्हाई.

यावर रामभट उत्तरले,

कसलं काय कुळाचं घेऊन बसला आबा तुम्ही? हा विचार मनातून अगदी काढून टाका. हे खरं असतं तर ब्राह्मणाच्या घराघरांत संत जन्मले असते. तुकोबांचा एक अभंग कायम लक्षात ठेवा म्हणजे असे हीन, चुकीचे विचार मनात यायचे नाहीत.

 

पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ।।
कर्मधर्म त्यांचा झाला नारायण । त्यांचेनि पावन तिन्ही लोक ।।
वर्णअभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ।।
अत्यंजादि योनी तरल्या हरिभजने । तयांची पुराणे भाट झाली ।।
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहीदास ।।
कबीर मोमीन लतिफा मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ।।
कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनी अभेदु हरीचे पायी ।।
चोखामेळा बंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ।।
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवे ।।
मैराळ जनक कोण कुळ त्यांचे । महिमान तयांचे काय सांगो ।।
यातायाती धर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ।।
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणो किती ।।

रामभटांच्या ह्या सांगण्याने आबाचे पूर्ण समाधान झाले आणि तो म्हणाला,

आता म्यां अजून काय बोलतुया? जे म्यां कदीं मागितलं ही न्हाई ते मला मिळतंया.

रामभट म्हणाले,

इतके दिवस मागितलं नसेल तर यापुढे मागायला शिका. तुकोबांनी पांडुरंगाकडे काही मागायचे शिल्लक ठेवले नाही. ते पांडुरंगाला म्हणत,

 

हें चि सुख पुढें मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ।।
जन्मजन्मांतरी तुझा चि अंकिला । करूनी विठ्ठला दास ठेवीं ।।
दुजा भाव आड येऊं नेदीं चित्ता । करावा अनंता नास त्याचा ।।
अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ।।
तुका ह्मणे आह्मी जे जे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ।।

हे ऐकून नारायण म्हणतो,

मागायचं असतं हा मोठा धडा मिळाला यातून. आपल्याला शिकवलेलं असतं कोणाकडे काही मागू नये. आणि इथे तर तुकोबा पांडुरंगाला म्हणताहेत की मला जी जी इच्छा होईल ती तू पुरव! माझ्यासारख्या माणसाला आज हे खाऊ आणि उद्या ते खाऊ ह्यापलिकडे काही इच्छाच होत नाही! मला वाटायचं की बरं आहे हे! आपल्याला फार इच्छा नसतात ह्याचेही मला कौतुक वाटायचे. आता लक्षात येतंय की मागायचं तर काही इच्छाच नाही हे वाईट झालं. आणि पांडुरंगासारखा दाता असेल तर मी मागू तरी काय? काका, खरंच मला काही कमी नाही हो. राहायला घर, देवासारखे आईवडील, लक्ष्मीसारखी बायको, गोजीरवाणी मुलं, बाहेर मानसन्मान, मनासारखे उत्पन्न! काही कमी म्हणून नाही. परवा तुकोबांनी टोचेपर्यंत मी अशाच भावनेत होतो. काका, मला मागायला शिकवाल का?

नारायणाचे हे बोलणे होते तोच आतून आवाज आला,

ऐकलं का? स्वयंपाक होत आलाय. उरका म्हणावं लवकर. भुका लागल्या असतील.

ह्या सूचनेने तिघे भानावर आले आणि आबा, नारायण स्नानाला पळाले. तिकडे गाडीवानाचे मात्र सर्व आवरले होते. इतक्या वेळात त्याने रामभटांकडे द्यायचे जिन्नस आत आणून ठेवले, बैलांचे पाहिले, स्नान केले व आता लवकर जेवायला मिळू दे अशी ‘इच्छा’ करीत तो ओट्यावर येऊन बसला!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?