जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग १

सांजवेळ झाली. देहूचे विठ्ठलमंदिर माणसांनी वाहू लागले. तुकोबांचे शब्द कानांत साठविण्यासाठी जो तो आतुर झाला. आबा पाटलाला घेऊन तुकोबाही आले. आबाला पुढे बसविले. हातात झांज घेतली आणि आपण कीर्तनाला उभे राहिले. गावची काही मंडळी हाती टाळ घेऊन मागे उभी राहिली. मंगलाचरण झाले, विठुरायाचा गजर झाला, ज्ञानदेवादी संतांचाही गजर झाला आणि तुकोबा बोलू लागले,

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

स्रोत

“लोकहो, पाहा, ह्या पांडुरंगाचा, ह्या विठोबाचा महिमा पाहा. त्याच्या प्रेमाखातर किती लोक आले आहेत पाहा! मी त्याच्याकडे आलो आहे आणि तुम्हीही त्याच्याकडेच आला आहात. का यावेसे वाटते आपल्याला त्याच्याकडे? दिवसभराची कामे आटोपली की का वळतात आपली पावले इकडे? मला करमत नाही आणि तुम्हालाही करमत नाही. सारखं मनात येत असतं.”

बोलता बोलता तुकोबा गाऊ लागले,

जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ।।
देवा सांगो सुखदुःख । देव निवारील भूक ।।
घालू देवासी च भार । देव सुखाचा सागर ।।
राहो जवळी देवापाशी । आतां जडोनी पायांसी ।।
तुका ह्मणे आह्मी बाळें । या देवाची लडिवाळे ।।

“देवा, खरोखर आम्ही तुझे लाडके आहो. तुझी बाळेच आम्ही. तुझ्या पायाशीच घुटमळत असायचे! आमचा भार आम्ही तुझ्यावर घालावा. तू काय, तू सुखाचा सागर आहेस! त्यातून आम्ही सुख तरी किती उपसणार? आम्ही आमची सुखदुःखे तुला सांगावी आणि आमची भूकही तूच निवारण करावीस. खरोखर, देवा, पांडुरंगा, तुझ्यापाशी आमच्या जिवाला खरा विसावा आहे! देवा, इथे आलं की तुझ्या गावाला आल्यासारखं वाटतं. मन शांत होतं. माझं होतं, माझ्या ह्या गावकऱ्यांचं होतं. तूच आमचा सांभाळ करतोस ह्यात मला तरी शंका नाही! तू आम्हा सर्वांचा आहेस याबद्दलही मला अजिबात शंका नाही!”

देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ।।
देव आहे देव आहे । जवळी आह्मां अंतरबाहे ।।
देव गोड देव गोड । पुरवी कोडाचे ही कोड ।।
देव आह्मां राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ।।
देव दयाळ दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ।।

“लोकहो, खरंच सांगतो, ह्या तुक्याचा सांभाळ हा दयाळू पांडुरंगच करतो! फार दयाळू, फार दयाळू तो. मलाच नव्हे, आपल्या सर्वांना तोच राखतो. अहो, कळिकाळाला काखेत घालणारा तो! आम्ही मागू तेच नव्हे तर न मागू ते ही कोड पुरविणारा हा देव आहे बरं! फार गोड वाटतो तो मला. फार गोड वाटतो.”

“लोकहो, आणि ऐका! नेहमीच सांगतो मी, आजही सांगतो, देव आहे बरं, देव आहे! विचारा बरं, कुठे आहे? अगदी आपल्या जवळ आहे! जवळ म्हणे किती जवळ? अगदी आपल्या आत, अंतरात आहे! आणि हो, बाहेरही आहे. अहो, आत पाहा, तो आहे, बाहेर पाहा, तो आहे! जिकडे पाहाल तिकडे तो आहे! लोकहो, ऐका. अजून ऐका! मन लावून ऐका. मी सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐका. आपला जीव, आपल्या सर्वांचा जीव… तोच देव आहे! आपला जीव तोच आपला देव! तुमचा जीव तो देव, माझा जीव तो देव! जीव आहे ना? मग देव आहे! आपल्यात आंत आंत पाहा, जीव आहे. जीव आहे म्हणून आपण आहो ना? म्हणून देव आहे! बाहेर दुसरा बघा. त्याच्या आंतही जीव आहे! म्हणून बाहेरही देव आहे! अंतर्बाह्य आहे त्यालाच देव म्हणतात हो! तो आहे म्हणून आपण आहो. तो आहे म्हणून जग आहे! म्हणून जगात देव आहे! देव आहे! ”

तुकोबांच्या रसाळ बोलण्यात सारे जण रंगून गेले. आबा पाटलाचा हा पहिला अनुभव. मनात काही शंका घेऊन आला होता. ती शंका पुढे येई ना! मन रंगले! मन रंगले! देहभान हरपले!

तुकोबा पुढे सांगू लागले, म्हणाले, ” अहो, आपल्या आंत पाहा म्हणजे देव तुम्हालाही दिसेल. कसा दिसेल माहीत आहे?

देव भला देव भला । मिळोनी जाय जैसा त्याला ।।
देव उदार उदार । देता नाही थोडेंफार ।।
देव बळी देव बळी । जोडा नाही भूमंडळीं ।।
देव वाहवा देव वाहवा । आवडे तो सर्वां जीवां ।।
देव चांगला चांगला । तुका चरणी लागला ।।

“लोकहो, देव फार भला आहे हो! थोर आहे हो! पण तुम्ही जसे असाल तसा देव तुम्हाला भेटेल! तो फार उदार आहे, फार उदार आहे! थोडफार देईल आणि वाटेला लावील असा कंजूष दाता तो नाही! त्याचे सामर्थ्य फार आहे! फार आहे! त्याच्या जोडीचा, त्याच्यासारखा ह्या विश्वात कुणी नाही! जो सर्व जीवांचा तो आवडता त्याची वाहवा मी करू किती? त्याचा चांगुलपणा सांगू किती? हा तुका त्याच्या चरणी आहे हो! सतत त्याच्या चरणी लागलेला आहे हो!”

तुकोबांचे डोळे भरून आले, श्रोत्यांचे डोळे भरून आले, आबा पाटलाचे डोळे भरून आले!

तुकोबा भानावर आले, म्हणू लागले,

देवा, आज आमच्यात हे आबा पाटील आलेत. दूरवरून आलेत. त्यांना काही शंका आहेत. त्या सोडव बरं. विचारा हो, आबा, विचारा तुमची शंका. आमचा पांडुरंग ती नक्की सोडवेल.

आबा पाटील उभा राहिला, सभेला दंडवत घातलं आणि बोलू लागला,

काही इचारायचं म्हनूनच आलो हुतो. पर आज न्हाई जमायचं. आज ह्ये सारं पाह्यलं, मन भरून पावलं. तुमी लोक लई भाग्यवान. न इचारता प्रश्न सुटत्यात तुमचे! फार बरं वाटलं बघा. तुकोबा, आज ह्यो आनंद असाच असू द्या. तुमाजवळ ऱ्हायची परवानगी द्या, पुढील येळी इचारतो!

तुकोबांनी स्मितहास्य केले आणि कीर्तन आटोपते घेतले…

हेचिं दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा….. 

(क्रमशः)

===

ज्ञानदेवी लावीत असताना जो शब्दांचा कीस मी पाडीत असे आणि पाडत असतो ते पाहून एका सहकाऱ्याने  मला प्रत्येक शब्द वा विचार लागला की नोंद करायचा सल्ला दिला होता. ते माझ्याकडून झाले नाही व होत नाही. तशीच गोष्ट तुकोबांच्या अभंगांचीही होते. ज्ञानदेवांचे शब्दवैभव विलक्षण आणि शब्दांची रूपे करण्याची त्यांची पद्धत अनोखी. तर, तुकोबांची शब्दयोजना आणि क्लिष्टता अचाट.

अशांचे वाङ्मय लावताना सारखे अडायला होत असते. उपरोक्त लेखामध्ये असाच एक अभंग आहे तो पुढीलप्रमाणे:

देव भला देव भला । मिळोनी जाय जैसा त्याला ।।
देव उदार उदार । देता नाही थोडेंफार ।।
देव बळी देव बळी । जोडा नाही भूमंडळीं ।।
देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ।।
देव चांगला चांगला । तुका चरणी लागला ।।

ह्या अभंगाचा प्राण ‘ मिळोनी जाय जैसा त्याला ‘ ह्या विचारात आहे. तो स्पष्ट आहे.

गीतेत

देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि
भूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती ।। (९-२५, गीताईमधून)

असा श्लोक आहे. तसाच अभिप्राय वरील अभंगात तुकोबांनी व्यक्त केला आहे. पुढे अजून विस्तार तत्कालिन वेळेस, श्रोत्यांस व संदर्भास अनुकूल झाला असणार.

त्यात ते म्हणतात ‘ देव व्हावा देव व्हावा ‘

म्हणजे काय?

कोण देव व्हावा?

माझा देव व्हावा, तुमचा देव व्हावा, आपला देव व्हावा?

जर हा विचार तुकोबांना येथे मांडायचा असता तर ‘मिळोनी जाय तैसा त्याला’ हा दुसरा मोठा विचार तेथे आला नसता. बरे, दोनही विचार मांडायचे असतील असे समजले तर, पुढील मागील विषय जुळला पाहिजे. ते होत नाही.

अशा वेळी तो अभंग वा ती ओळ पुन्हा पुन्हा म्हणणे हाच उपाय उरतो. (ओळ लागली नाही तर आपल्याला हवा तसा अर्थ लावून गोलमाल गोडगोड लिहिण्याची सोय ह्या विषयात फारच आहे म्हणून वाचणाऱ्यांनी सावधच राहिले पाहिजे.)

तर, ती ओळ पुन्हा पुन्हा म्हणताना ऐकू आले,

देव वाहवा देव वाहवा!

आणि अर्थ लागला, पुढे मागे जुळला, अभंग एकजीव झाला.

काल तसा पाठ दिला आहे व अर्थही तसाच सांगितला आहे.

( तुकोबांनी केलेला शब्दोच्चार लिहिण्यापर्यंत पोहोचेतोवर असे घडू शकेल हे गृहित धरले पाहिजे. ज्ञानदेवीतही अशा जागा आहेत कारण बोलणारा लिहित नाही आहे. )

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

2 thoughts on “जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?