देहू गावांत विठ्ठल आपल्याला तुकोबांच्या रूपात दर्शन देतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १६

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १५

===

संध्याकाळ सरत आली तसे देहूचे विठ्ठलमंदिर तुडुंब भरले. नारायणभटाच्या कीर्तनाची बातमी वेगाने गावभर झाली आणि आसपासच्या वाड्यावस्त्यांतही पोहोचली. नारायणभटाने विठ्ठलाचे दर्शन घेतले, समोर बसलेल्या तुकोबांचे पाय शिवले आणि टाळ धरलेल्या हाताने सर्वांना नमस्कार करीत सुरुवात केली :

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

धन्य पुण्यभूमी आळंदी हे गांव
समाधिस्थ झाला जेथे ज्ञानदेव
तेथें चि जवळी तुकयाचे देहू
उभयांसी वंदू जोडोनिया बाहू…..

सर्वांचे हात जोडले गेले आणि नारायणभटाने पुढे लगेच सुरु केले….

जय जय राम कृष्ण हरि
राजा राम कृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरि….

आणि रूपाचा अभंग गाण्यासाठी उंच पट्टीत सूर लावला –

रूप पाहतां लोचनी । सुख झाले हो साजणी ।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।
बहुत सुकृताची जोडी । ह्मणूनी विठ्ठलीं आवडी ।।
सर्व सुखांचे आगर । बापरखुमादेवीवर ।।

नारायणभटाचा आवाज मूळचा गोड, त्यात गायनाचा अभ्यास झालेला. नमनानेच त्याने श्रोत्यांना जिंकले आणि पूर्वरंगासाठी अभंग घेतला –

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेला ।।
हरि मुखे ह्मणा हरि मुखे ह्मणा । पुण्याची गणना कोण करी ।।
असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ।।
ज्ञानदेव ह्मणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरी ।।

मंडळी, ज्ञानोबा माऊलींचे शब्द तुम्ही ऐकलेत! ते तुम्हांसमोर उच्चारण्याचे धाडस मी केले! जे अखंड विठ्ठलासोबत राहतात त्यांना क्षणभर देवासमोर जाण्याचे महत्त्व सांगणारा अभंग आज मी घेतला आणि म्हटले तर अपराध केला! ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबांचे शब्द ऐकले त्यांना वाटते, आपण त्या काळात आणि ह्या प्रदेशात का नाही जन्माला आलो? त्या बालयोग्याला आपण डोळे भरून पाहिले असते, त्याच्या चरणांवर आपल्याला डोके ठेवता आले असते. संतमहात्मे असतात कसे, दिसतात कसे, बोलतात कसे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आला असता. विठ्ठलाचे सगुण रूप असते तरी कसे आपल्याला कळले असते!

मंडळी, आम्ही तुम्ही किती भाग्यवान की त्याच इंद्रायणीच्या काठी ह्या, ह्या देहू गावांत विठ्ठल आपल्याला तुकोबांच्या रूपात दर्शन देतो आहे! कुणी म्हणतात की विठ्ठल हेच एका निर्गुण निराकार परमात्म्याचे सगुण रूप आहे. म्हणोत बापडे!

आमच्यासाठी तुकोबा हेच ईश्वराचे सगुण रूप आहे. फार मोठ्या मोठ्या लोकांनी परमेश्वराचे निर्गुण रूप कसे असेल ह्याचे वर्णन केले आहे. तरीही सगुण रूपाची मोहिनी त्यांच्यावरही असतेच, पाहा ना, ज्ञानोबा माऊली काय म्हणते –

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।
पतितपावन मानस मोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।
ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।
ज्ञानदेव ह्मणे आनंदाचे गान । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।

जे रूप आपल्याला आवडते त्याचे नामही आपल्याला आवडते. म्हणूनच ज्ञानोबा म्हणाले की सनातन ब्रह्माच्या सगुण रूपाचे ध्यान करा. सनातन ब्रह्माचा ध्यास धरा. त्याचे नाम घ्या. ते गान आनंदाचे असते. नामदेव महाराज अखंड नाम घेत असत. ते म्हणतात,

अमृताहूनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां बा नेघे ॥
सांग पंढरिराया काय करुं यासी । कां रूप ध्यानासि नये तुझें ॥
कीर्तनीं बैसतां निद्रे नागविलें । मन माझें गुंतलें विषयसुखा ॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । नये माझ्या चित्तीं नामा ह्मणे ॥

श्रोतेहो, नामाचा महिमा सर्व संतांनी गायिला आहे. नामाचा महिमा अगाध आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा.

आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे ||
नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे ||
सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही ||
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे ||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला ||

मंडळी, आपण म्हणतो आपले भोग म्हणजे आपले प्रारब्ध आहे. खरे आहे ते. पण जो नाम घेईल त्याच्या प्रारब्धाचा नाश हरि करील हे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. अहो, सर्व जीवांचा सांभाळ तोच करीत नाही काय? मग तो तुमच्यावर कृपा करणार नाही असे होईलच कसे?

देहूकरांनो, सर्व संतांचा निरोप आहे, नाम घ्या. तो निरोप सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम कीर्तनकाराचे. ते मी अज्ञ असूनही केले. काही चुकले माकले असेल तर क्षमा करा. मी नामाचा हा महिमा सांगितला कारण ह्या सर्व संतांप्रमाणेच तुकोबांनीही म्हटले आहे की

करावें कीर्तन । मुखी गावे हरिचे गुण ।।
मग कांही नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ।।
शांतीखङ्ग हातीं । काळासी ते नागविती ।।
तुका ह्मणे दाता सखा । ऐसा अनंतासरिसा ।।

तर मंडळी हरिचे गुण गाण्यासाठी आपण जमलो आहोत, नामसंकीर्तन करीत आहोत, ह्या आनंदाला काही मोजमाप आहे काय? अहो, ज्ञानदेव महाराज म्हणूनच म्हणतात, हरि मुखे ह्मणा, हरि मुखे ह्मणा, पुण्याची गणना कोण करी. आनंदाला पारावार नाही आणि पुण्याची गणना नाही. हरिचे नाम अखंड घेतल्याने जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा पांडवाघरी प्रत्यक्ष देव धावून गेला हा दाखला खुद्द माऊलींनी दिला आहे. तो सांगून माऊली म्हणते , देवाच्या दारी क्षणभर तरी उभे राहा –

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेला ।।
हरि मुखे ह्मणा हरि मुखे ह्मणा । पुण्याची गणना कोण करी ।।
असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ।।
ज्ञानदेव ह्मणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरी ।।

नारायणभटाने पूर्वरंग आटोपला, गावकऱ्यांनी हार बुक्का शाल श्रीफळाचे ताट पुढे आणले. तुकोबांनी नारायणभटाच्या कपाळी बुक्का लावला, गळ्यात हार घातला, शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि नारायणभटाला वाकून नमस्कार केला.

हे पाहून आबा बाजूला बसलेल्या कान्होबांना विचारतो,

तुकोबा का म्हनून पाया पडले? ह्यो ल्हान नव्हं?

कान्होबा म्हणाले,

हा नमस्कार गादीला हो. नारदाची गादी ती म्हणून. वयाचं नात्याचं काही नसते तेथे.

इकडे नारायणाने गजर मांडला –

जय जय विठोबा रखुमाई
जय जय ज्ञानराज माऊली
बुवांसोबत लोकही गाऊ लागले –
जय जय विठोबा रखुमाई
जय जय ज्ञानराज माऊली

लय वाढत चालली आणि नारोबा नाचू की लागला! टाळघोष प्रचंड झाला, आसमंत दणाणून गेला, भक्तीचा पूर वाहिला.
नारायणभटाने प्रल्हादाचे आख्यान लावले. प्रल्हाद कसा विष्णुभक्त होता, त्याचा त्याच्या बापाने कसा छळ केला, तरीही त्याने नाम कसे सोडले नाही हे रंगवून रंगवून सांगितले आणि शेवटी नरसिंहाने प्रल्हादाचे रक्षण कसे केले हे सांगून कीर्तन संपविले. आख्यानात नारोबाने लोकांना किती वेळा हसवले आणि किती वेळा रडवले हे सांगता येणार नाही. लोकांना त्याने अगदी भारून टाकले. म्हणतातच ना की कीर्तनकार हा म्हटला तर वक्ता, म्हटला तर गवई, म्हटला तर नट. नारोबाकडे हे सारे गुण होते. ते सर्व त्याने मुबलक वापरले आणि देहूकरांना खूष केले.

आख्यान संपल्यावर नारोबाने पुन्हा ‘देवाचिये द्वारी’ हा पूर्वरंगाचा अभंग म्हटला आणि सर्वांस दंडवत घालून ‘हे चिं दान दे गा देवा । तुझा विसर न व्हावा’ ह्या तुकोबांच्या अभंगाने कीर्तनाचा शेवट केला.

कीर्तन संपले तशी नारायणभटांना नमस्कार करण्यासाठी एकच झुंबड उडाली. कित्येकांनी मिठ्या मारल्या. कितीकांनी पुन्हा येण्याचे वचन घेतले तर कितीकांनी आपल्याला कीर्तन शिकवा अशी गळ घातली.

हे सर्व होईतोवर बराच उशीर झाला. आवराआवरी झाली आणि मग नारायणभटाला घेऊन तुकोबा आबासह काशीबाईकडे जेवायला निघाले. रस्त्यात तुकोबा विचारतात,

काय आबा, कसे वाटले आमच्या नारायणाचे कीर्तन तुम्हाला?

आबा म्हणतो,

लई छान! बुवांचा आवाज लई ग्वाड हाय. आसं गानं मी कुनाचं आईकलं नव्हतं. रागदारी म्हन्तात ती हीच काय?

तुकोबा म्हणाले,

अहो, ह्यांच्या घरातच गाणे आहे. पिढ्या न् पिढ्या संगीताची उपासना आहे हो. म्हणून असे गायले नारोबा. नारोबा, चला, आता लवकर पावले उचला, ती म्हातारी पाने मांडून वाट बघत असेल.

इतका वेळ देहूकरांनी केलेल्या कौतुकात न्हालेल्या नारबाला आता तुकोबांच्या बोलांनी भुकेची जाणीव झाली आणि त्याची पावले आबातुकोबांसारखी जलद पडू लागली.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?