' दगडाचीच मूर्ती बनते आणि दगडाचीच पायरीही बनते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १४ – InMarathi

दगडाचीच मूर्ती बनते आणि दगडाचीच पायरीही बनते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १४

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३

===

पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ।।
सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले ।।
उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ।।
तुका ह्मणे हें भाविकांचें मर्म । येरीं धर्माधर्म विचारावे ।।

“आबा, दगडाचीच मूर्ती बनते आणि दगडाचीच पायरीही बनते. लोक एकीला पूजतात आणि एकीवर पाय देतात! हे पाहून सार काय निघते? आपण त्या वस्तूत जो भाव ओततो तोच खरा. आपण ठरवायचे की ती मूर्ती आहे की पायरी आणि कोणाशी कसे वागायचे. नदीचे पाणी सर्वांसाठी सारखेच गोड असते. पण तिला गंगा म्हणायचे की नाही हे आपणच ठरवायचे असते. जे तिला गंगा म्हणत नाहीत त्यांना पाण्याची चवच नाही असे नसते. पाण्याची चव तीच कळूनही गंगेस पावित्र्य बहाल करणे हा भाव झाला.

 

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

 

भाविक माणसाचे मर्म इथेच आहे! सारखे बरोबर-चूक करत बसणे, धर्माधर्माच्या गोष्टी करीत राहणे हे बाकीच्यांचे काम. भाविकांसाठी ही मूर्ती विठ्ठलाचीच आहे! किंवा म्हणा त्यांच्यासाठी तोच विठ्ठल आहे!

भावाचे बळ सांगताना एकनाथ महाराजांनीही काय म्हटलंय पाहा –

एका जनार्दनी भाव ते कारण । सच्चिदानंदाची दावी खूण ।।

अहो, भाव हे कारण आहे! किंवा कारण जे तेच भाव आहे! कारण कशाचे? ह्या विश्वाचे आदिकारण. जे विश्व उभारते ते कारण. त्यालाच भाव असे म्हणतात. भाव हेच कारण आहे आणि म्हणून भावाचे बळ फार आहे. तोच भाव आपण मूर्तीत ओतला की ती मूर्ती आहे हा विचार नष्ट होऊन तो देव आहे असा अनुभव येतो.

आबा, तुम्हाला प्रश्न पडला आहे की हा दगड आहे, त्याला आपणच मानवी रूप दिले आहे आणि नामही दिले आहे. असे असता ते नाम घेण्यात अर्थ तो काय? प्रश्न चूक नव्हे पण तुम्ही तसा विचार करताना हे विसरलात की दगडाला नामरूप देणारे जसे आपण आहोत तसेच त्यात भाव ओतणारेही आपणच आहोत!

आबा, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. आपणच दगडाचा देव केला. त्याला विठ्ठल म्हटले. त्या विठ्ठलाचे नाव अखंड मुखी राहू द्या असे मी म्हणतो आहे. माझ्या अंतरीचा भाव मी त्या विठ्ठलाला अर्पण केल्यानंतर माझ्यात आणि त्याच्यात आता खरे तर काही अंतर उरलेले नाही. तरीही मी त्याचे नांव घ्या म्हणतो आहे.

अहो, त्याला भाव अर्पण केलेला मी एकटा नव्हे! युगानुयुगे लोकांनी तेथे आपले भाव अर्पण केलेले आहेत! साधी गोष्ट नव्हे ही. काळाने सिद्ध केलेले ठिकाण आहे ते. अवघा जनता जनार्दन त्या मूर्तीत एकवटलेला आहे. किंवा म्हणा, की जनता जनार्दनाच्या अंतरीच्या एकात्म भावाचे हा विठ्ठल हे दृष्य रूप आहे! आपली चित्तशुद्धी व्हायची असेल तर नामाला पर्याय नाही आबा.”

इतके बोलून तुकोबा जरासे थांबले तो अवसर साधून आबा म्हणाला,

ह्ये जरा अवघड आहे कळाया. आपुनच जर नाम ठरिवले, रूप ठरिवले तर त्याचा अार्थ त्ये खरे न्हाई असाच हुनार. आन् जे मुळात न्हाईच त्येचं आपुनच ठ्येविलेलं नाम घ्येत राहनं म्हंजी येळ वाया घालीवणं अासं हुनार.

आबाचे हे बोलणे ऐकून तेथे बसलेला एक देहूकर ताडकन उभा राहिला आणि म्हणाला,

काय बोलता काय आबा? अहो, इथे देहूतच पूर्वी एक प्रसंग झाला. प्रसंग कसला, लढाईच ती! अनेक विद्वान जमले, त्यांनी सभा घेतली आणि तुकोबांवर आरोप लावला की नामाचा प्रसार करून तुकोबा लोकांना वाया घालवीत आहेत. तेव्हा तुकोबांनी त्यांना विचारले,

 

नाम घेतां वाया गेला । ऐसा कोणें आईकिला ।।
सांगा विनवितो तुह्मांसी । संत महंत सिद्ध ऋषी ।।
नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ।।
सलगीच्या उत्तरा । तुका ह्मणे क्षमा करा ।।

 

ते लोक जणू तुकोबांवर तुटूनच पडले होते तरी आमचे तुकोबा अगदी शांत होते. त्यांच्या उद्धटपणाकडे तुकोबांनी दुर्लक्षच केले आणि उलट त्यांचा मान राखीत ते म्हणाले,

 

मी सलगीने स्पष्ट विचारतो त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा पण हे संतमहंतानो, हे सिद्ध ऋषींनो, माझी विनंती ऐका आणि सांगा की नाम घेऊन वाया गेला असा कोणी तुमच्या पाहण्यात आहे काय? इतकेच काय की मी विचारतो, नामाने तरला नाही असा कोणी तुमच्या पाहण्यात आहे काय? असला तर निवडून दाखवा मला…

हे ऐकून आबा म्हणतो,

मग पुढे काय झालं?

आबाचा हा प्रश्न ऐकून दुसरा एक देहूकर खवळलाच! तो म्हणू लागला,

ते तुम्हाला काय करायचंय आबा? देव नाही हा तुमचा निर्णय झालाय ना? मग इथे येऊन तुकोबांना का त्रास देताय? नका घेऊ नाम तुम्ही! एक तुकोबांसारखा देवमाणूस भेटला म्हणून इतका काथ्याकूट करता? अहो, त्यांचे बोल अनुभवाचे आहेत. तुम्ही मात्र ते जे जे म्हणतील त्याला चूक म्हणताय!

तो मनुष्य अजून बरेच काही बोलला असता पण तुकोबांनी हात करून त्याला थांबविले आणि म्हणाले,

माझ्या शांत राहण्याचा दाखला देता आणि त्यांच्यावर इतके रागावता? अहो, हे प्रश्न लोकांना पडतच राहणार. त्यांना उत्तर देणे, त्यांचे समाधान करणे हेच आपले काम नव्हे काय? आणि ‘भांडावे तो हित’ हे मीच नव्हे का त्यांना सांगितले?

पण आजच्या सभेचा रागरंग वेगळाच होता. तिसरा देहूकर उभा राहिला आणि बोलू लागला,

तुम्ही लई सांगितलं हो. पण भांडणाऱ्याने तरी काही विचार नको करायला? मला आज तर तुमचाही राग येतोय. तुम्ही किती सहन करता? तुम्हीच ना मागे म्हणाला होतात –

 

जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ।।
शत्रु तो म्यां केला न ह्मणे आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ।।
जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका ह्मणे ।।

तुकोबांच्या अभंगाचा असा दाखला तुकोबांनाच दिल्याने वातावरण क्षणभर एकदम गंभीर झाले. तेव्हा एक चौथा देहूकर उभा राहिला आणि त्या आधीच्या देहूकराकडे पाहात म्हणू लागला,

अरे, तू तुकोबांच्या संगतीत इतके दिवस आहेस तरी तुकोबा कुणाला शत्रू मानत नाहीत हे तुला अजून कळले कसे नाही? त्यांचेच शब्द त्यांच्याच अंगावर फेकून तू काय पराक्रम केलास? तुकोबांनी पूर्वी कोण्या प्रसंगात केलेले बोलणे असे शब्दात पकडून फेकल्याने झाले काय? देव आहे की नाही, असला तर कसा आहे हे आबा विचारीत आहेत. त्यांचे समाधान होईपर्यंत उत्तरे देण्याचे तुकोबांनीच कबूल केले आहे ना? आणि अजून आबांचा निर्णय कुठे झालाय? का हो आबा?

आता आबा पुन्हा उभा राहिला,

मला क्षमा करा आशी म्यां तुमा सर्वास्नी इनंती करतु. ह्यो आबाच्या मनात तुकोबास्नी तरास द्यायचं येऊ शकत न्हाई. काई कमीजास्ती शब्द ग्येला बी आसंल माज्या तोंडून, पन तसं मनात काई न्हाई. तुकोबा सांगतील त्ये करायची माजी तयारी हाय. नाम बी घीन.

इतके बोलून आबा तुकोबांकडे वळला व त्यांच्याकडे पाहात म्हणू लागला,

माज्या मुळं आज तुम्हांस तरास जाला द्येवा. माजं चुकलं. म्हनाल तसं करतु.

आबा बोलत असता तुकोबांनी आबाकडे प्रेमाने पाहिले व म्हणाले,

आबा, काही मनाला लावून घेऊ नका. विचारणे हे तुमचे काम आहे आणि उत्तर देणे हे माझे. आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती शांतपणे समजून घ्या. तीवर विचार करा आणि तसे वागायची सुरुवात करा. पुढे हळूहळू सारा विषय कळेल.

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।।
आवडी आवडी कळिवराकळीवरी । वरिली अंतरी ताळी पडे ।।
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ।।
तुका ह्मणे एकें कळों दुसरें । बरियाचें बरे आहाचाचे आहाच ।।

 

मंडळी, आज खूप शीणलात. उशीरही झाला. चला, जाऊ आता घरी.

तुकोबांनी आजची सभा अशी समाप्त केली.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?