वेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

आबा तुकोबांच्या घरी काही महिने राहून आला होता. त्यांच्या घरच्या पावित्र्याचा, मांगल्याचा अनुभव त्याने घेतला होता. रामभटाच्या घरचे वातावरण वेगळे होते. त्याने पाहिले की रामभट सूर्योदयापूर्वी उठून स्नानसंध्या होईपर्यंत तोंडातून चकार शब्द काढीत नसत. नंतर अग्निहोत्र करीत. त्यांची संध्या होईपर्यंत आसपासची ब्राह्मण मुले वेदाध्ययनासाठी येत. काही मुले रामभटांच्या घरीच वेदशिक्षणासाठी राहिलेली होती. ती ही आपले आवरून आपापल्या संध्या आटोपून पठणास बसत. थोड्याच वेळात घर वेदघोषाने भारले जाई. मागोमाग गवळी येई. काही दूध स्वयंपाकघरात जाई तर काही वेदशाळेसाठी केलेल्या चुलीवर लगेच तापण्यासाठी ठेवले जाई. प्रत्येक मूल आपापला पेला घेऊन आलेला असे. काही काळ वेदपठण झाले की सर्वजण दुग्धपान करीत. आबाला गवळ्याकडून कळले की गावातली कुणी कुणी धनिक मंडळी ह्या मुलांचा दुधाचा खर्च करतात. दुग्धपानानंतर पुन्हा वेदपठणास प्रारंभ होई. जी गावातील मुले असत ती थोड्यावेळाने आपापल्या घरी जात. तोवर स्वयंपाकघरात न्याहरी तयार होई. त्यांची पंगत बसे. सारा कारभार अतिशय शांततेत व आखल्यासारखा क्रमवार चाले.

दुपारच्या जेवणाआधी रामभट बलिवैश्वदेव करीत. एखादा मुलगा गावभरांतील देवळे फिरून आलेला असे, कुणी अतिथी आहे का ते पाहण्यासाठी. कुणीतरी नवा माणूस रोज पंगतीला असेच. अन्न साधे असे. आबाला थोड्या तिखट जेवणाची सवय होती. नव्याने हे मिळमिळीत वाटे. पुढे जीभ बसली. दिवसभरात अनेक लोक काही ना काही शंका घेऊन येत. रामभट त्याचे निरसन करीत. तो संवाद आबाच्या कानी पडू लागला. बऱ्याचदा संस्कृतात बोलणे होई ते मात्र आबास कळत नसे. त्यावरून आबा एकदा रामभटांना म्हणाला,

मला बी संस्कृत याया हवं हुतं.

रामभटांनी विचारले,

कशासाठी संस्कृत यायला हवं होतं?

आबा उत्तरला,

तुमी वेद काय म्हन्ता त्ये थोडं कळलं आसतं

आबाचे उत्तर ऐकून रामभटांना इतके हसू आले की शेवटी ठसका लागला. ते पाहून जरा लांब उभा असलेला नारायण चटकन पाण्याचा तांब्या घेऊन पुढे आला आणि त्याने लगबगीने फुलपात्रातून काकांना पाणी दिले. आबाला मात्र काय करावे ते कळे ना आणि आपले काय चुकले ते ही कळे ना. दोन घोट पाणी पोटात गेल्यावर रामभट जरा शांत झाले आणि नारायणाला म्हणाले,

बघ रे नारायणा, हे आबा काय म्हणतात? संस्कृत आलं असतं तर वेद कळले असते म्हणतात! अहो आबा, वेदांचा अर्थ कुणाला लागला हो? आम्ही वेदाध्ययन करतो म्हणजे वेदपठण करतो. वेद मुखोद्गत करतो. यापलिकडे ही जी मुले शिकायला येतात त्यांचा आणि वेदांचा संबंध काही नाही. वेदांचा अर्थ कळायला ज्ञानबातुकोबांसारखे ज्ञानी लागतात.

आबाने विचारले,

तुकोबांस्नी कुटं संस्कृत येतंया? मग त्येंना वेद कसे वाचतां आले? वेदांचा अर्थ त्येना कसा लागला?

 

रामभट समजावणीच्या सुरात म्हणाले,

अहो आबा, आणि तू ही नीट ऐक रे नारायणा, ही आमच्यासारखी वेदांची घोकंपट्टी न केल्यामुळेच त्यांना वेदांचा अर्थ लागला आणि ते गर्जना करू शकले की –

 

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ।।
उत्पत्ति पाळणं-संहाराचे निज । जेणे नेले बीज त्याचे हाती ।।
तुका म्हणे आम्हा सांपडले मूळ । आपणचि फळ आले हाता ।।

 

पाहा आबा, तुकोबा आम्हा वेदपठण करण्यांबद्दल काय म्हणतात! धनाच्या गोण्या वाहून नेणारे मजूर आम्ही! अन्नाकडे लांबून पाहणारे! लांबून अन्न खाणाऱ्याला चव कशी कळणार? जो अन्न खाईल त्यालाच ती कळायची! आबा, तुकोबा हा वेदांचे अन्न खाल्लेला मनुष्य आहे. इतकेच नव्हे तर ते पचविलेला मनुष्य आहे. ते स्पष्टच सांगत आहेत की वेदांचे मूळ आम्हाला गवसले आहे आणि त्या वृक्षाचे फळ आमच्या हाती आपोआप आलेले आहे! असे असल्याने अर्थ न कळता वेदपठण करणाऱ्यांना ते ठणकावून सांगू शकतात की तुम्ही त्या वेदांना डोक्यावर घ्या, त्यांचा भार जन्मभर वाहा. अर्थाची गोष्ट असेल तर तो मात्र आम्हालाच ठाऊक आहे! नारायणा, आबा, मी तुकोबांचे हे म्हणणे पूर्णपणे मानतो. आम्ही वेदपठण करण्यात भले पटाईत असू पण त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्हाला तुकोबासारख्यांचेच पाय धरावे लागतात. तुकोबांना संस्कृत येत नसेल पण त्यांना ज्ञानाची भाषा येते आबा! तुकोबा ज्ञानभाषेत बोलतात! आपल्यांत आणि त्यांत भाषेचाही फरक आहे बरं का!

आबाने शंका काढली,

आसं आसेल तर ह्यो वेदशाळा कशापायी चालिवत्यात? म्हनतात की हजारो वर्स जाली, ह्ये आसंच चालू हाय. ज्ये कळतंच न्हाई त्ये जपायां कशाला हुवं?

रामभट उत्तरले,

आबा, तुकोबांनी आम्हाला हमाल म्हटलं खरं पण आम्ही वाहून काय नेतो ते ही सांगितलं ना त्यातच? ऐका, आम्ही विद्येचे धन वाहणारे प्रशिक्षित हमाल आहो. एक काना मात्रा इकडची तिकडे होऊ न देता आज हजारो वर्षे हे संचित प्रत्येक पिढी पुढे नेते आहे. ते नष्ट न होऊ देणे हे आमचे काम. त्याचा अर्थ सांगणारी माणसे वेगळी. तसे शतकानुशतकांत मोजके जन्माला येतात. आम्ही वाहून आणलेल्या गोण्या तेच फोडू शकतात. किंबहुना ती लोकं त्यासाठीच जन्माला आलेली असतात. हा आम्ही वाहून आणलेला माल मग ते जनतेत लुटतात. ज्ञानोबांनी, नामदेवांनी, एकनाथांनी पूर्वी हेच केले आणि आता तुकोबाही तेच करीत आहेत. तुकोबांचे सांगणे ऐकले की वाटते की आपण ह्या विषयावर कधी बोलूच नये. नारायणा, तुला तुकोबा उगीच नाही रागे भरले. आपण आपल्या शब्दबळावर काही बोलून वेळ काढू शकतो पण तुकोबांची शब्दतनु जिवंत असते आणि आपली निष्प्राण. आपल्यासारख्या शिकून बोलणाऱ्यांबद्दल तुकोबा म्हणतात,

 

शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणां ।।
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळतील अर्था निजसुखा ।।
तुका ह्मणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाही ठावी वस्तु ।।

 

तुकोबा म्हणतात, इथे घोकून शिकून बोलणारे अनेक सापडतील आणि वेदांचा अर्थ असा की तसा यावर वादही उभा करतील. पण जे बोलतो त्याचा प्रत्यय जीवनात येण्यासाठी जी साधना करावी लागते तीच जर केली नसेल तर अनुभवाने शब्दांतील, विचारांतील भेद जसे कळतात तसे यांना कुठून कळणार? स्वतःस पंडित म्हणवून घेणारी ही मंडळी कथा उत्तम सांगतील पण साधनेअभावी त्याचा अर्थ न लागून अंतरीचे सुख कसे प्राप्त करतील? मूळ घटना काय घडली हे माहीत नसतानाही लाचेच्या आशेने जसे काही साक्षीदार न्यायासनासमोर पढवलेले बोलतात तशीच यांची वाणी. जी जाणायची ती वस्तु गवसलेली नसताना त्यावरील बोलणे अर्थहीनच व्हायचे. आबा, तुकोबांनी वेदांचे गुह्य जाणून त्याचे वाटप जनांत चालविले आहे. तुम्ही म्हणता त्यांना संस्कृत येत नाही. थोरांबद्दल एकदम असे म्हणू नये. ज्याला ज्ञानभाषा साधली त्याला संस्कृत कळणे काहीच जड नाही. वेदांचे मूळ आपल्या हाती आले असे तुकोबांनी म्हटल्याचे नुकतेच ऐकलेत ना? ते मूळ काय हे सांगणारा त्यांचा अभंग ऐका म्हणजे तुम्ही पुन्हा तसे म्हणणार नाही. तुकोबा सांगतात,

 

ॐतत्सदिती सूत्राचे सार । कृपेचा सागर पांडुरंग ।।
हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ।।
गोब्राह्मणहिता होऊनी निराळे । वेदाचे तें मूळ तुका ह्मणे ।।

 

हा अभंग सांगून रामभट गप्पच झाले. ते पाहून आबा आर्जवाने म्हणतो,

गुरुजी, याचा अर्थ सांगता ना?

रामभट म्हणाले,

नाही आबा, ह्या अभंगाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार नाही. हा अभंग मला तुम्हाला शिकवावा लागेल. शिकवायचे म्हटले तर सुरुवात इथून करून चालणार नाही. पहिल्यापासून सांगावे लागेल. तुकोबांनी तुम्हाला माझ्याकडे शिकायला पाठविला आहे तर शिकविणे माझे काम आहे. परंतु, मला अजून तुमचा अंदाज आलेला नाही. तुम्हाला प्रश्न पडतात आणि तुम्ही ते विचारता. हे लहानपण आहे. तुम्ही आता मोठे व्हायला हवे. मोठे होण्यासाठी रीतसर अभ्यासाला लागले पाहिजे. लोक बरेच काही बोलत असतात. त्या प्रत्येकावर आपल्याला प्रश्न पडू शकतात. पण अशाने आपण आपल्यात गुंतायचे सोडून इतरांच्यात गुंततो. जो स्वतःत गुंतत नाही तो कोणाच्या उत्तरांनी समाधानी होणार? त्याला सर्वांचेच थोडे बरोबर आणि थोडे चूक वाटणार. आबा, लक्षात ठेवा, प्रश्नांची उत्तरे बाहेरून येत नसतात. परमेश्वराने तुमच्यात जेथे प्रश्नांची निर्मिती केली आहे तेथेच उत्तरेही ठेवली आहेत. प्रश्न त्यांचे ते वर येतात, उत्तरे आपल्याला आणावी लागतात. उत्तरे आंतूनच आली पाहिजेत. त्यासाठी आधी तुम्ही शांत झाले पाहिजे. म्हणून तुकोबांनी तुम्हाला नामाचा मार्ग सांगितला होता. तर तुम्ही त्यावरही शंका काढल्यात. आबा, नाम म्हणजे मौन हो! लोकांताकडून एकांताकडे जाण्याचा मार्ग तो. सारखे उलटे प्रश्न काय विचारता? आजपासून आधी तुकोबांचे ऐका. नाम घेणे सुरू करा. नाम घेणे पटत नसेल तर काही दिवस मौन पाळा. एकही प्रश्न वर येणार नाही असे बघा. शास्त्र असे सांगते की ज्याला मौन साधले त्याला सारे साधले. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मग सहज मिळतील. हे मी माझा मनचे सांगत नाही. ज्ञानदेव माऊलींचा अभंग आहे, तो लक्षात ठेवा –

 

एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरिसी करुणा येईल तूझी ॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्‍गद्‍ जपे आधी ॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिका पंथा जाशी झणी ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदा ॥

 

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

One thought on “वेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?