माझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३५

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक :  जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

 

तुकोबांचे ते एकूण वागणे बोलणे पाहून मी केवळ स्तंभित झालो होतो. हा मनुष्य स्वतःचे कर्म सरळसरळ विठ्ठलावर ढकलून देत होता. होय, मी असे बोललो, हे शब्द माझेच आहेत असे तो मान्य करीत नव्हता. त्याचे म्हणणे, त्याच्या तोंडून पांडुरंगच बोलतो!

रामभट झाली कथा पुढे वर्णन करीत होते.

मी स्वतःच्या मनाशीच बोलत होतो. धर्मसभेत हे सारे सांगायला हवे. हा मनुष्य पूर्णपणे वेडा तरी आहे किंवा अत्यंत बनेल तरी. आपल्या तोंडून पांडुरंग बोलतो असे म्हणणे याचा अर्थ तसा त्याला भास होतो हाच असू शकतो. सगुणभक्तीच्या वेडापायी अनेक जिवांना कसले कसले भास होत असतात. त्यातलाच हा एक प्रकार म्हणायचा. ह्या माणसाची काव्यशक्ती फार आहे, यात शंका नाही. हा मनुष्य अत्यंत बुद्धिमान आहे ह्यातही काही शंका नाही. इतकेच नव्हे तर तो शीघ्रकवीही आहे. असे असले तरी विठ्ठल विठ्ठल करता करता आपल्या मुखी विठ्ठलच येऊन बसला आहे, असे खुळ्यागत त्याला वाटते हे ही सत्य आहे. बुद्धिमान माणसाला वेड लागू नये असे थोडेच आहे? अर्जुनासारखा बुद्धिमान मनुष्य मार्गावरून ढळला होता आणि आपलेच कसे बरोबर हे श्रीकृष्णाला समजावून सांगत होता! द्यूत खेळू नकोस असे लोक सांगत असताही युधिष्ठिर स्वतःला आवरू शकला नाही. त्याने त्या वेडाच्या भरात राज्यच गमावले नाही तर बायकोही पणाला लावली. लक्षात घ्यायचा मुद्दा हा की त्याने हे सारे त्याने धर्माच्या नावाखाली केले! खरेच, वेड कुणालाही लागू शकते. सीतेला रावणाने पळविले तेव्हा वृक्षवेलींना धरून धरून राम शोक करीत होता आणि सीता कुठाय ते विचारीत होता. भावनेचा भर वाढला की माणसे काही करतात. आप्तवियोगाने कुणी चितेवर उडी मारतात! तुकारामाचे प्रकरण असेच काहीसे दिसते. तुकोबा आणि त्यांच्या बरोबरीचे निघून गेले तरी माझे मन शांत होई ना. तुकोबा जे बोलून गेले ते पुन्हा पुन्हा आठवू लागले.

 

बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जाती कुळ ॥
करा क्षमा कांही नका धरू कोप । संत मायबाप दीनावरि ।।
वाचेचा चालक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥
तुका ह्मणे घडे अपराध नेणता । द्यावा मज आतां ठाव पायीं ।।

 

माझे जातीकुळ तुम्हाला माहीत आहे, माझ्यावर काय रागावता? मी दीन आहे, क्षमा करा. नेणतेपणातून अपराध झाला, तुमच्या पायी मला जागा द्या! तुकोबांचे हे बोल ऐकून कुणीही विरघळला असता. पण मी सावध होतो. हे म्हणत असतानाच तुकोबा मध्येच हे ही म्हणाले होते –

 

वाचेचा चालक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥

 

माझ्या वाचेचा जो चालक, त्याने मला वर्म दाखविले, उचित धर्म काय तो सांगितला! थोडक्यात जे उचित आहे तेच माझ्याकडून बोलले गेले आहे! मी अनुचित बोललेलो नाही पण माझे जातीकुळ पाहून तुम्ही मला क्षमा करा असे तुकोबांचे म्हणणे होते! ही लबाडाची भाषा झाली! बरे, हे तुकोबा एकदा चुकून म्हणाले असे नव्हे. ते लगोलग पुन्हा म्हणाले होते –

 

करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥
काय मी पामर जाणें अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदे ॥
निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हें स्वामिसत्ता ॥
तुका ह्मणे आहे पाईक चि खरा । वागवितो मुद्रा नामाची हे ।।

 

 

हे कवित्व माझे नव्हे! ही वाणी माझी नव्हे! काहीतरी युक्ती योजून मी बोलत नाही! तो विश्वंभर माझ्याकरवी बोलतो! मला बोलविता करतो! नाहीतर, मला काय कळते? मी पामर, शब्दांमधील अर्थछटा मला काय कळणार? तो सांगतो आणि मी बोलतो! मी माझ्या वाणीचा स्वामी नाही आणि म्हणून माझ्या वाणीवर माझी सत्ताही नाही! दुकानात मापटी भरून द्यायला माणूस बसवितात तसा मी! तुकाराम असे माझे नाव मी सांगत असलो तरी खरी गोष्ट ही की, मी केवळ त्या विश्वंभराच्या नोकरासारखा आहे! तुकोबांचे हे बोलणे त्यांच्या लबाडीची साक्ष देणारे होते याबद्दल माझी खात्री होऊ लागली. एक क्षण विचार आला, वेडा माणूस दिसतोय, सोडून दिलेला बरा. वेड्यांच्या नादी फार लागू नये, आपल्याला वेड लागायची वेळ येते आणि खरेच, त्या प्रसंगाने मला वेड लागायची वेळ आली. विषय सोडून द्यायचा विचार आल्यावर तुकोबांचे नंतरचे शब्द आठवले आणि संतापाने मला थरथर सुटली –

 

सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ।।
सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ।।
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ।।

 

ह्यांत तुकोबांनी स्वतःचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, आपल्या अंगणात कल्पलता आहेत! कल्पतरू शब्द प्रसिद्ध आहे, हा मनुष्य कल्पलता असा शब्द वापरतो! ही हुषारी! हा रस्त्यावरून सहज चालत असता पायाला लागणारे दगडगोटे ह्याच्यासाठी चिंतामणी रत्ने बनतात! तो सर्वसाक्षी हरि ज्याचा साह्यकर्ता सखा त्या तुकारामाच्या तोंडून वाणी सहज प्रसवित असते त्यांत नवल ते काय? अहो, त्याच्या घरी वेदांत पाणी भरतो! तुकोबांचे हे बोलणे मी धर्मसभेला जाऊन सांगायचे होते! हे सारे ऐकून धर्मसभेत केवढा गोंधळ होईल ह्याची मी कल्पना करू लागलो. हा वाद इथल्या इथे मिटेल की पैठणपर्यंत जाईल? तुकारामाला शिक्षा होणार ह्याबाबत मला शंका राहिली नाही. बाकी भाषा लबाडीची असली तरी वेदांत आपल्या घरी पाणी भरतो ही भाषा टोकाच्याअहंकाराची होती. औधत्याची होती. वेदांत ही गोष्ट कुणी इतकी सामान्य करून टाकावी हे धर्मसभेला कधीच पटले नसते. धर्मसभेपुढे हा सारा वृत्तांत कसा सादर करावा याचा विचार मग माझ्या मनात चालू झाला. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तरी माझे मन क्षुब्धच राहिले होते. जेवावयास पाटावर बसलो तोवर तोंडून शब्द निघाला नव्हता.

चित्राहुती घातल्या, आचमन आदि केले आणि एक दोन घांस तोंडात घातले असतील तोच आमची मंडळी आमच्याकडे पाहून समजावू लागली,

प्रसंग कठीण खरा, पण मी म्हणते पानावर बसून क्रोध करू नये. परमेश्वर आहे ना? जेवावे शांतपणे.

मी म्हटले,

गोविंद!

मला मंडळींचे पटले. क्रोधाग्नी आणि क्षुधाग्नी यांना एकत्र आणणे योग्य नव्हते. मी संयम केला. तोच मंडळी पुढे बोलू लागली,

देहूस मुलगा पाठविला आहे ना? तिकडील वृत्तांतही येऊ द्यावा. सावकाशीने अनुमान काढावे. असा क्रोध पाहून मला बाई भीती वाटते. आणि जरी तो तुकाराम काही वेडेवाकडे बोलला असला तरी शेवटी काय म्हणाला ते आठवते ना?

मंडळींनी हे बोलताच मला आमचा शेवटचा संवाद आठवला, हातातला घास हातात राहिला आणि घशातला घशात. मोठा ठसका लागला, इतका की जीव कावराबावरा झाला. मंडळींनी पाणी पुढे केले, पाठीवरून हात फिरविला तरी जीव राही ना. आयुष्यात पहिल्यांदा मी जेवणावरून अर्धवट उठलो आणि हात धुवून बाहेर येऊन बसलो. मंडळी काय काय समजावीत होत्या पण तिकडे माझे लक्ष नव्हते.
तुकोबांनी धर्मसभेला निरोप दिला होता, द्याल ती शिक्षा भोगेन. ती मी विठ्ठलाचीच आज्ञा असे समजेन!

सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ।।
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ।।
समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तयापरी ।।
तुका ह्मणे तरी ह्मणवावे सेवक । खादले ते अन्न हक होय ।।

हा तुकाराम म्हणतो,

स्वामीची आज्ञा सेवकाला प्रमाण असलीच पाहिजे नाही तर त्याच्या नावे खाल्लेले अन्न व्यर्थ गेले! आज्ञापालन करताना सेवकाचा प्राण गेला तरी चालेल!

थोडक्यात ब्रह्मवृंदाने दिलेली आज्ञा पाळण्यास तुकोबा तयार होते! ती आज्ञा म्हणा वा शिक्षा, ती भोगताना देहांत झाला तरी तुकोबा कचरणार नव्हते! इतक्या मोठ्या शिक्षेची कल्पना करून तुकोबा माझ्याशी बोलत होते म्हणायचे! मला घाम फुटला! आणि माझ्या तोंडून गेलेले शब्द मला आठवू लागले. मी म्हणालो होतो,

हे कवित्व जर तुझे नव्हे तर ते इंद्रायणीत बुडीव अशी आज्ञा झाली तर?

मी हे बोलल्याक्षणी तुकोबांनी माझे बोलणे तोडले होते व आपण हीच आज्ञा समजतो असे ते म्हणाले होते! वास्तविक मी बोलण्याच्या नादात वादासाठी काहीतरी बोललो पण तीच जणू आज्ञा झाली असे समजून तुकोबा म्हणाले होते,

नये पुसों आज्ञा केली एकसरें । आह्मांसी दुसरें नाही आता ।।

बाप रे! हे काय झाले? हे काय होऊन बसले? तुकोबा खरेच माझ्या बोलण्यालाच आज्ञा समजले तर? हा मनुष्य मनस्वी असावा. आज्ञा देण्याचा अधिकार मला नाही, तो केवळ धर्मसभेलाच. आपण एक कल्पना बोलून दाखविली इतकेच. आपल्याला आज्ञा देण्याचा अधिकार नसला तरी तीच आज्ञा असे समजण्याचा अधिकार तुकारामाला नाही असे मला कसे म्हणता येईल?

आता काय होईल? ह्याने ह्याचे कवित्व इंद्रायणीत बुडविले तर दोष मला येईल! आणि मी अन्याय केला असे होईल. पुढे होणाऱ्या भयंकर प्रकाराच्या कल्पनेने मी हादरलो, माझे त्राण गेले आणि मला मूर्छा आली!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?