एकाच वेळी अनेक औषधं घेणं धोकादायक असू शकतं का? वाचा तज्ञ काय म्हणताहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हल्लीच्या युगात माणसे तब्येतीने बरीच नाजूक झालेली आहेत. पूर्वी सारखं भेसळ विरहित आहार नसल्याने सगळ्यांची पाचन शक्ती, सहनशक्ती, रोग प्रतिकारक शक्ती सगळेच ढासळायला लागले आहेत.

पूर्वीची म्हातारी माणसे आठवा घरातील. ना त्यांना सारखे ताप येत असत ना त्यांचे पोट बिघडत असे. डॉक्टरकडे सारखे जाणे म्हणजे लज्जास्पद वाटते असे त्यांना.

आणि आता.. जरा कुठे सर्दी पडसे झाले की पळा दवाखान्यात, ताप आला तर घ्या इंजेक्शन, डोकेदुखी देखील फार काळ सहन करू शकत नाही कोणी.

ऍसिडिटी तर तरुण वयाची सोबती झालेली आहे कित्येकांची. अति रक्तदाब, मधुमेह, अल्सर काहींच्या पाचवीला पुजलेले असतात. सतत काही ना काही होत असतं.

लोकांनी घरात फर्स्ट एड बॉक्स भरून ठेवलेले असतातच. पण त्याच्या सोबत हल्ली सर्दीच्या गोळ्या, घसा दुखीच्या गोळ्या, डोकेदुखीचा गोळ्या तापाच्या गोळ्या, अशा असंख्य गोळ्या. खोकल्याचे सिरप, हे सिरप अन ते सिरप अशी डब्बे भरून वेगवेगळी औषधं देखील घरात ठेवलेली असतात.

 

medicines-inmarathi
zeenews.india.com

छोटं मोठं काही झालं तर ‘सर्वसामान्यांंसाठी महाग होत चाललेल्या वैद्यकीय चिकित्सेच्या’ भानगडीत न पडता लोकांना स्वतःच स्वतः वर औषधांचे प्रयोग करून घ्यावेसे वाटतात. टीव्ही वरच्या जाहिरातींना भुलून नवनवीन गोळ्या, बाम, सिरप आणले जातात आणि सेवन केले जातात.

तसेच औषधे घेताना काय खावे किंवा खाऊ नये ह्याचा विचार देखील केला जात नाही. फळांवर किंवा इतर काही पदार्थांवर काही औषधे घेऊन चालत नसते. त्याने उलटी प्रक्रिया घडू शकते.

खूप जास्ती त्रास होत असेल तर चक्क स्वतःच्या मर्जीने डोस कमी जास्त केले जातात. किंवा डॉक्टरकडे जाऊन तात्पुरत्या अतितीव्र औषधी आणल्या जातात. त्याचे प्रमाण किंवा घ्यायच्या वेळा नीट न पाळता कसेही ते घेतले जाते. त्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार कोणी करतो का?

दोन तीन वेगवेगळ्या गोळ्या एक वेळेला घेतल्या गेल्या तर त्यांचे उपयोग होत असताना दूरगामी दुष्परिणाम देखील होत असतात.

एका औषधांच्या गोळीची दुसऱ्या गोळीवर रासायनिक प्रक्रिया होत असते. त्यामुळे एकावर एक खाल्ल्या गेलेल्या गोळ्यांमुळे मळमळ होणे, उलटी होणे, जुलाब होणे असे परिणाम त्वरित होऊ शकतात.

 

medicines-inmarathi01
choice.com.au

काही लोकांना हे देखील लक्षात येत नाही की, स्वतःच मर्जीने किंवा स्वयंघोषित घरगुती वैद्यांच्या सांगण्यावरून औषध घेतल्यास त्यांचा परिणाम एकमेकांना मारक देखील होऊ शकतो. त्यामुळे रोग बरा होण्याच्या ऐवजी तो वाढू शकतो किंवा त्याबरोबर आणखी एखादा आजार उद्भवू शकतो.

ह्याला विज्ञानाच्या भाषेत ‘पॉलीफार्मसी’ असेही म्हणतात. म्हणजे एक वेळी ४ ते ५ गोळ्यांचे डोस घेतले जात असतील तर परिणामांसोबत अनेक दुष्परिणाम ही शरीरावर होतात.

डॉक्टर जेव्हा गोळ्या प्रिस्क्राईब करतात, तेव्हा सहसा गोळ्यांचे दुष्परिणाम होणार नाहीत अशा गोळ्या ते एकसाथ देतात. कधी कधी त्यांचा ही नाईलाज असतो. कारण काही आजारांवर वेगवेगळ्या गोळ्या उपलब्ध असतात ज्यांचा एकमेकांवर परिणाम होऊ शकतो.

तरीही डॉक्टर त्या परिणामांना ध्यानात ठेऊन त्यावरच उतारा म्हणून अजून एखादी गोळी आधी किंवा नंतर खाण्यास लिहून देत असतात.

हे सगळे फक्त डॉक्टरला जमू शकते. मेडिकल शास्त्रातील अभ्यास असल्याने कधी केंव्हा कोणते औषध द्यायचे हे त्यांना चांगलेच कळते. पण स्वतःच स्वतःसाठी औषधे ठरवणारी माणसे औषधांच्या दुष्परिणामाला (साईड इफेक्टस ना) नक्कीच बळी पडतात.

हे साईड इफेक्ट टाळण्यासाठी काय काय करावे?

१. स्वतःची तब्येत जाणून घ्या :

स्वतःची प्रकृती स्वतः जाणून असले की, आपल्याला काय बाधते आणि कशापासून दूर राहिल्यास आपले स्वास्थ्य बिघडणार नाही. कोणत्या औषधांचे आपल्याला आधी वाईट रिऍक्शन झाले होते.

 

medicines-inmarathi02
yourhealth.net.au

कोणत्या औषधांचा चांगला गुण आला होता हे सगळे स्वतःला माहीत असले पाहिजे. जमल्यास एक वही बनवून त्यात नमूद देखील केल्यास उत्तम..!

२. फॅमिली डॉक्टर :

सहसा अख्ख्या कुटुंबाचा एकच डॉक्टर असावा. काहीही होत असल्यास त्याच्याकडे जाऊनच नेहमी औषध घ्यावे. तुम्हाला कोणत्या प्रकारचे औषध चालते किंवा कशा प्रकारचे औषध देता कामा नये हे तुमच्या फॅमिली डॉक्टरला माहीत असते.

 

medicines-inmarathi03
perceptionhealth.com

बाकी काही अवघड आजारांसाठी त्यांनी शिफारस केलेल्या डॉक्टर्सकडे जावे.

३. डॉक्टर ला सगळे सांगणे :

डॉक्टरकडे जाऊन तात्पुरत्या आजारावर औषध पाणी करण्यापेक्षा आपल्याला अजून काय काय होतंय. आधी झालं होतं का? कायमस्वरूपी काही आजार आहेत का? आणि असतील तर त्यांची कोणती औषधे चालू आहेत हे सगळे डॉक्टरला सांगणे गरजेचे आहे.

ह्याआधी ह्याच आजारासाठी येऊन गेले असल्यास तेव्हा दिलेल्या औषधांची चिट्ठी सोबत ठेवणे उपयोगाचे असते.

 

medicines-inmarathi04
livemint.com

एखादे औषध नवीन वाटल्यास त्याच्या बद्दल डॉक्टर कडून माहिती घेणे हितावह असते. आपण स्वतःहून काही औषधे घेतली असल्यास तेही डॉक्टरना नक्की सांगावे.

४. आहार आणि औषध ह्यांची सांगड :

 

medicines-inmarathi05
medicalnewstoday.com

आपल्याला झालेल्या आजारावरील औषधे घेताना काही पथ्ये पाळावयाचे असल्यास ती डॉक्टर ला विचारून घेणे. करण काही औषधांचा काही प्रकारच्या पदार्थांसोबत रासायनिक प्रक्रिया होण्याचा संभव असतो. जर पथ्ये पाळली गेल्यास दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात.

५. औषधांचे नियम पाळणे :

औषधे ही काही अंतराने घेण्यास आपल्याला डॉक्टरांनी सांगितले असल्यास त्या वेळा पाळाव्यात. जितकी मात्रा सिरपची सांगितलेली असेल त्याच्यापेक्षा जास्ती सिरप घेणे टाळावे.

 

medicines-inmarathi06
lareine.com.kh

डॉक्टरांनी सांगितलेले इतर नियम देखील काटेकोरपणे पाळावेत नाहीतर साईड इफेक्टसना आपण स्वतःच जबाबदार असू.

६. औषधांच्या रिऍक्शन :

 

medicines-inmarathi07.jpg
medshadow.org

औषधांच्या  रिऍक्शनकडे लक्ष असू द्यावे काही वेगळे वाटल्यास ते वयोमानाप्रमाणे होतंय असे गैरसमज ना करून घेता डॉक्टरकडे जाऊन त्याची शहानिशा करून घ्यावी. कुठल्याही प्रकारे औषधांच्या रिऍक्शन कडे दुर्लक्ष करू नये. त्याने जीवाला धोका देखील असू शकतो.

७. औषधांशी निगडित प्रश्न :

औषधे किती काळासाठी देण्यात आली आहेत आणि ती संपल्यावर परत घेणे गरजेचे आहे का? ह्याचे निरसन डॉक्टर कडून करून घ्यावे. काही वेळेला दिलेला डोस पूर्ण न करता मधेच सोडून दिल्यास त्याचा हवा तसा गुण येत नाही.

 

medicines-inmarathi08
nia.nih.gov

किंवा पूर्णतेच्या नंतर घेत राहिल्यास भलताच परिणाम भोगावे लागू शकतो. ४-६ गोळ्या एकाच वेळेस घ्यावयाच्या असल्यास कोणत्या क्रमाने घ्यायच्या ह्याची खातरजमा करून घेतल्यास बरे..!

८. एकसारख्या नावाची औषधे घेताना सावधानी बाळगावी :

 

medicines-inmarathi09
consultqd.clevelandclinic.org

खासकरून वयोवृद्धांनी औषधे घेताना एकच औषध एकाच वेळी दोनदा घेतले जात नाहीये ना ह्याची खबर घ्यावी. कारण तो दुहेरी डोस होऊ शकतो आणि शरीर स्वास्थ्यास अत्यंत घातक ठरू शकतो. औषध घेण्यापूर्वी कोणाची मदत घेतल्यास उत्तम.

ह्या सगळ्या नियमांचे पालन केल्यास आपण संभाव्य दुष्परिणामांपासून दूर राहतो आणि आजारातून लवकर बरे होऊ शकतो..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?