हिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारतीय नौदल कमांडर अभिलाष तोमी हे तीन दिवस हिंदी महासागराच्या मध्यभागी अडकून पडले होते. त्यांच्या सुटकेसाठी कुठून? कसे? प्रयत्न झाले, कोणत्या कारणाने ते एवढ्या मोठ्या समुद्राच्या मध्यभागी अडकून पडले? त्यांच्यावर कोणते संकट आले? ह्याची आत्ताच म्हणजे २४सप्टेंबर २०१८ ला घडलेली सुटकेची ही रोमहर्षक कहाणी.
“गोल्डन ग्लोबल रेस” (a Circumnavigation Challenge Tournament) नावाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्वज्ञात आहे. ह्यात अनेक नावाजलेले स्पर्धक भाग घेतात आणि ह्यावर्षीचे एक स्पर्धक म्हणून नेव्ही कमांडर अभिलाष तोमी यांनी भाग घेतला.

तारीख होती २१ सप्टेंबर २०१८. यॉटिंग स्पर्धा एक अतिशय अवघड आणि साहसी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. जागतिक स्तरावरचे अतिशय कसलेले दर्यावर्दी ह्यात भाग घेतात.
हवेच्या झोताप्रमाणे चालणाऱ्या ह्या छोट्या शिडाच्या बोटीं प्रसंगावधान राखून एकट्यानेच चालवायच्या असतात. ह्या बोटींची लांबी फक्त ३६ फूट असते. एवढ्या मोठ्या अथांग सागरात ३६ फुटी बोट म्हणजे एखाद्या कडी सारखी. म्हणूनच ही साहसी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
हिंदी महासागर हा खूप विस्तीर्ण असल्यामुळे ह्या समुद्रात ही स्पर्धा घेतली जात असावी. मैलोनमैल अथांग सागर, बाकी दुसरे काहीच नाही, फक्त पाणी आणि बोट, आणि ती चालवणारा स्पर्धक अशी परिस्थिती असते.
पाणी आणि जोराचे वारे ह्यावर चालणारा हा खेळ. त्यात निसर्गात सतत अनेक बदल होत असतात, त्यामुळे हवेचा दाब सतत बदलत असतो. अशा परिस्थितीत ही बोट पुढे न्यायची असते. कधी कधी हवेत बदल होतात आणि वादळे निर्माण होतात. ही वादळे कुठे व कधी निर्माण होतील ह्याचा काही नेम नसतो.
अशीच ही २०१८ ची स्पर्धा सुरू झाली. कमांडर अभिलाष यांनी बोट घेऊन अनेक मैलांचे सागरी अंतर पार केले. पण अचानक निर्माण झालेल्या एका समुद्री वादळात त्यांची बोट सापडली.
वादळाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, त्या वादळाच्या तडाख्यामुळे बोटीचे शीड तुटून गेले. बोटीने अनेक कोलांट्या खाल्ल्या. पाण्याच्या प्रचंड तडाख्यामुळे बोटीची अनेक ठकाणी मोडतोड झाली आणि बोट समुद्राच्या मध्यभागीच बंद पडली.

खूप मोठाल्या लाटांचे तांडवच सुरू होते. एक एक लाट ४०फुटांची असावी, जोरदार फटक्यांनी बोट खिळखिळी झाली आणि आतल्या अनेक भागांचे तुकडे झाले. कल्पना करा की त्या बोटीवर असलेल्या कमांडर अभिलाष यांचे काय झाले असेल?
अनेक वेळा बोट उलटी पालटी झाल्यामुळे अभिलाष अनेकवेळा इकडून तिकडे फेकले गेले आणि त्यांच्या पाठीला जबर मार बसला. कसेबसे सावरून त्यांनी भारतीय नौदलाला मेसेज पाठवले की,
बोट वादळात सापडल्याने मला पाठीला जबर मार लागला आहे. मी बोटीतच अडकून पडलो आहे, मला हलताच येत नाही. मी पाणी सुद्धा पिऊ शकत नाही आणि काही खाऊही शकत नाही. मला मदत हवी आहे.
एवढाच मेसेज कसाबसा त्यांनी पाठवला आणि सॅटेलाईट फोनचाही संपर्क तुटला. बोट पाण्याचे तडाखे खात होती. पण जवळपास कित्येक मैल कोणीही त्यांची सुटका करू शकणारे नव्हते.
हे वादळ आले तो शुक्रवार होता. शनिवारी हा मेसेज कळाला. पण ताबडतोब कमांडर तोमी यांना ह्या संकटातून वाचवायला कोणीही पोहोचू शकत नव्हते. म्हणून भारतीय नौदलाने अभिलाष यांचे अपघाताचे ठिकाण शोधायला एका विमानाची तयारी केली.
समुद्रात दूरवर शोध घेणारे भारतीय मेरिटाइमचे गस्त घालणारे Poseidon 8 I (P8i) हे विमान मॉरिशसहून पाठवले. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि भारत ह्या तीनही राष्ट्रांच्या मध्यभागी असलेल्या हिंदी महासागराच्या मध्यभागी ही घटना घडली होती.

त्याचा शोध लागला आणि ते विमान परत गेले. तोपर्यंत भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्री मदतीसाठी सगळीकडे मेसेज पाठवले आणि जोरदार शोधकार्य सुरु झाले. हा दिवस होता २३ सप्टेंबर.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळीकडे मेसेज मिळताच, ऑस्ट्रेलियाच्या नौदलानेही एक विमान पाठवून घटनास्थळ शोधून काढले. भारतीय नौदलाने आपल्या आय. एन. एस. – सातपुरा आणि आय. एन. एस. ज्योती ह्या बोटींना घटनास्थळाकडे वळवले.
त्यांच्यावर असलेल्या दोन्ही टीमनी एकत्रितपणे शोध कार्य हाती घेतले. अंतर खूप लांबचे होते म्हणून ज्या ठिकाणी अभिलाष यांची बोट निकामी होऊन अडकली होती त्याच्या जवळपास कोणती बोट आहे का ह्याचा शोध सुरू झाला.
ऑस्ट्रेलियाच्या मेरिटाइम रेस्क्यू को-ऑरडीनेशन सेंटर वरून ही विचारणा झाली. रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीने यांची एक बोट ह्या शोध कार्यासाठी तातडीने पाठवली. ती होती HMAS – Ballarat.
–
- अंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण
- लान्सनाईक हनुमंतअप्पा यांच्या सियाचीनमधून केलेल्या बचावाची थरकाप उडवणारी कहाणी
–
आणखी दोन बोटी मदतीला आल्या. त्यातली एक होती फ्रेंच गस्त घालणारी बोट – ओरिसिस आणि दुसरी होती त्याच स्पर्धेत भाग घेतलेल्या एका आयरिश स्पर्धकाची म्हणजे ग्रेगोर मॅक गुकीन यांची बोट.

ग्रेगोर मॅक गुकिनची बोट सुद्धा त्याच वादळात सापडली होती. पण वादळामुळे त्या बोटीचे किरकोळ नुकसान झाले होते आणि ती ताबडतोब दुरुस्त झाली होती. म्हणूनच ती कमांडर अभिलाष यांच्या बोटीपासून जवळ होती.
आपल्याच सहकारी स्पर्धकाच्या मदतीला दुसरा स्पर्धक तात्काळ धावून आला. हे सगळे मदतीला निघाले तो दिवस रविवार होता म्हणजे २३ सप्टेंबर. तोपर्यंत कमांडर अभिलाष त्याच परिस्थितीत बोटीतच काही उपचाराविना पडून होते. शरीराची काहीच हालचाल त्यांना करता येत नव्हती.
फ़्रेंच गस्ती नौका ही बरीच पुढे होती म्हणून ती सगळ्यात आधी पोहोचू शकणार होती. तसेच झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधकार्याची मदत मागितली म्हणून अनेक ठिकाणाहून ह्या कामाला मदत मिळाली आणि यशही मिळाले.
सगळ्यात जवळ असलेली ही ओरिसीस बोट सोमवारी दुपारी म्हणजे २४ सप्टेंबरला कमांडर अभिलाष यांच्या बोटीजवळ पोचली. वेळ होती दुपारी १:०३. त्या बोटीमध्ये डॉक्टर आणि काही वैद्यकीय सेवा साहित्यही उपलब्ध होते.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून अभिलाष यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करायच्या सूचना दिल्या. त्यातल्या जवानांनी अभिलाष यांना ताबडतोब स्ट्रेचरवर उचलून घेतले आणि त्यांच्या जवळच्या उपचार केंद्राकडे निघाले.
अभिलाष यांच्यावर ताबडतोब उपचार करणे जरुरीचे होते म्हणून त्यांनी कोणाचीही वाट न पाहता ऍमस्टरडॅम बेटावर अभिलाष यांची उपचाराची व्यवस्था केली. हा भाग फ्रान्स मध्ये येतो.

तिथल्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या एका हॉस्पिटल मध्ये कमांडर अभिलाष यांना दाखल केले आणि तशा सूचना सगळीकडे दिल्या.
कमांडर अभिलाष यांना आय. एन. एस. सातपुरा ह्या भारतीय नौदलाच्या बोटीने मॉरिशस ला पुढच्या वैद्यकीय उपचारासाठी न्यायचे असे ठरले होते. पण फ़्रेंच बोट आधी पोचली म्हणून त्यांना ऍमस्टरडॅम इथे नेले.
उपचारानंतर डॉक्टरांनी कमांडर अभिलाष शुद्धीत आसल्याचे सांगितले आणि ते बोलू शकतात अशी माहिती दिली. त्यामुळे अभिलाष यांची पत्नी काळजीतून मुक्त झाली.
अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय सहकार्यातून कमांडर अभिलाष यांची सुटका केली गेली. भारतीय नौदल, ऑस्ट्रेलियन नौदल, फ्रेंच नौदल आणि आयरिश स्पर्धक ह्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काम यशस्वी झाले.
एवढ्या प्रचंड वादळातून कमांडर अभिलाष यांची सुटका झाली आणि ते सुखरूप आहेत हे महत्वाचे.. ही गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच घडलेली घटना आहे…
–
- देशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी
- “बचेंगे तो और भी लडेंगे” म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.