वैष्णवांचे पृथ्वीवरील वैकुंठ – तिरुपती बालाजी देवस्थानाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. श्री वेंकटेश्वरांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील संकटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला अशी मान्यता आहे. म्हणूनच ह्या जागेला कलियुगातील वैकुंठ म्हणतात, तर भगवान श्री वेंकटेश्वरांना कलियुगातील प्रत्यक्ष देवता असे संबोधले जाते.

ह्याच देवळाला तिरुमला मंदिर किंवा तिरुपती मंदिर किंवा तिरुपती बालाजी मंदिर असेही म्हटले जाते आणि श्री वेंकटेश्वरांना भक्त बालाजी, गोविंदा आणि श्रीनिवास अशीही संबोधने देतात.

 

tirupati-marathipizza01
mouthshut.com

तिरुमला पर्वतरांगा ह्या शेषाचलम पर्वतरांगांचा एक भाग आहे. ह्या पर्वतरांगा समुद्रसपाटीपासून ८५३ मीटर उंचावर आहेत. ह्या पर्वतरांगेची सात शिखरे ही आदिशेषाची सात शीरे आहेत असे लोक म्हणतात. शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री व वेंकटाद्री अशी ह्या सात शिखरांची नावे आहेत. हे देऊळ वेंकटाद्री ह्या शिखरावर आहे. म्हणूनच ह्या देवळाला ‘सात शिखरांचे मंदिर (Temple of Seven Hills) असे म्हटले जाते.

हे देऊळ श्री स्वामी पुष्करणी ह्या पवित्र जलकुंडाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे देऊळ इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात द्राविडी पद्धतीने बांधलेले आहे आणि ह्या देवळातील गर्भगृहाला आनंदनिलायम असे म्हणतात. हे तीर्थक्षेत्र स्वयंभू विष्णू क्षेत्रांपैकी एक आणि १०६ वे म्हणजेच पृथ्वीवरील शेवटचे ‘दिव्य देसम’ मानले जाते.

हे देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानले जाते. रोज जवळजवळ ५०,०० लोक येथे दर्शनासाठी येतात आणि भरपूर देणगी देतात. ज्यांची इच्छा असेल किंवा नवस असेल असे स्त्री पुरुष येथे आपल्या केसांचे देखील दान करतात. ह्या ठिकाणी दर वर्षी जो ब्रह्मोस्तव साजरा केला जातो, त्यावेळी देवाच्या दर्शनाचा लाभ घ्यायला जवळजवळ ५,००,००० लोक येतात.

द्वापार युगात आदिशेष हे पृथ्वीवर शेषाचलम पर्वताच्या रुपात निवास करून होते. वायुदेवाशी एका स्पर्धेत पराभव झाल्यामुळे त्यांना पर्वताच्या रुपात पृथ्वीवर राहावे लागले. पुराणात तिरुमला क्षेत्राला आदिवराह क्षेत्र असे म्हटलेले आहे. हिरण्याक्ष नावाच्या असुराचा वध केल्यानंतर आदिवराहांनी ह्या ठिकाणी निवास करण्याचा निर्णय घेतला.

 

tirupati-marathipizza02
india.com

ह्या देवस्थानाबद्दल एक कथा प्रचलित आहे.

कलियुगात एकदा काही ऋषी यज्ञ करीत होते. या यज्ञाचे फळ त्रिमुर्तींपैकी कोणाला द्यावे ह्याबद्दल देवर्षी नारदांनी ऋषींना सल्ला दिला. भृगु ऋषींना त्रिमूर्तींची परीक्षा घेण्यासाठी पाठवण्यात आले. ह्या ऋषींना त्यांच्या पायाच्या तळव्याजवळ एक डोळा होता. ते आधी ब्रह्मदेवांना भेटायला गेले आणि नंतर त्यांनी भगवान शंकर ह्यांची भेट घेतली. पण ह्या दोन्ही ठिकाणी त्यांची दखल घेण्यात आली नाही.

त्यानंतर ते भगवान विष्णूंना भेटायला गेले. परंतु भगवान विष्णूंनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी मुद्दाम त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ह्यामुळे क्रोधीत होवून त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर पायाने प्रहार केला, तेव्हाही भगवान विष्णूंनी त्याकडे दुर्लक्ष करून उलट ऋषींची त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीसाठी माफी मागितली.

असे करत त्यांनी भृगु ऋषींच्या पायात असलेला डोळा नष्ट करून टाकला. हे बघून लक्ष्मीदेवी रागावल्या व वैकुंठ सोडून पृथ्वीवर कोल्हापूर येथे जाऊन ध्यानस्थ बसल्या.

त्यानंतर भगवान विष्णू ह्यांनी श्रीनिवास म्हणून मानव अवतार घेतला आणि ते वैकुंठ सोडून पृथ्वीवर आले. लक्ष्मीदेवींचा शोध घेता घेता ते ध्यानस्थ झाले. इकडे लक्ष्मी देवींना भगवान विष्णू ह्यांची स्थिती समजली आणि त्यांनी महादेव व ब्रह्मदेव ह्यांची प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी व महादेवांनी गाय व वासराचे रूप धारण केले आणि लक्ष्मीदेवींनी त्यांना तिरुमलाचा राजा चोला ह्याच्याकडे त्या गायीला व वासराला सुपूर्त केले.

ती गाय रोज चरायला जाई तेव्हा श्रीनिविसांना दूध देत असे. एकदा गवळ्याने हे बघितले आणि त्याने काठीने गाईला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीनिवासांच्या शरीरावर वळ उठले. ह्यामुळे श्रीनिवास क्रोधीत झाले आणि त्यांनी राजा चोला ह्याला राक्षस बनण्याचा शाप दिला. कारण धर्मानुसार नोकराच्या चुकीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मालकाची असते. राजाने श्रीनिवासांची माफी मागितली तेव्हा श्रीनिवास त्याला म्हणाले की,

पुढील जन्मी त्याला आकाशराजाचा जन्म मिळेल आणि तेव्हा त्याने त्याच्या मुलीचा, पद्मावतीचा विवाह श्रीनिवास ह्यांच्याशी करून द्यायचा.

त्यानंतर श्रीनिवास त्यांच्या मातेकडे वकुला देवी ह्यांच्याकडे गेले आणि त्यांनी काही काळ तिरुमला पर्वतावर वास्तव्य केले.

शाप मिळाल्यानंतर चोला राजाने आकाशराजा म्हणून जन्म घेतला आणि एका मुलीला जन्म दिला जिचे नाव पद्मावती असे ठेवले. ह्या कन्येचा जन्म पद्मपुष्करिणीमध्ये झाला होता. ह्यानंतर श्रीनिवासांनी पद्मावतीशी विवाह केला आणि ते तिरुमला पर्वतावर राहावयास गेले. काही काळाने जेव्हा लक्ष्मी देवींना श्रीनिवास ह्यांच्या विवाहाविषयी कळले तेव्हा त्या तिरुमला पर्वतावर त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या. असे म्हणतात की पद्मावती व लक्ष्मीदेवींनी श्रीनिवासांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी स्वतःचे रुपांतर एका दगडाच्या मूर्तीमध्ये केले. हे बघून ब्रह्मदेव व महादेव तिथे प्रकट झाले व त्यांनी असे होण्याचे कारण विचारले. तेव्हा दोन्ही देवींनी सांगितले कि

देवांनी मानवाला कलीयुगातील संकटांपासून तारण्यासाठी इथे राहण्याचा निर्णय घेतला.

ह्यानंतर देवींनी सुद्धा देवांबरोबर इथे राहण्यासाठी मूर्ती स्वरुपात तिरुमला पर्वतावर राहण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच लक्ष्मीदेवी देवांच्या डाव्या बाजूला तर पद्मावती देवांच्या उजव्या बाजूला स्थानापन्न आहेत.

 

tirupati-marathipizza03
youtube.com

अश्या तिरुपती बालाजी मंदिराविषयी आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

१. वेंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवर जे केस आहेत ते खरे केस आहेत. असे म्हणतात की हे केस कधीही गुंतत नाहीत आणि नेहेमी मउ मुलायम राहतात.

 

२. वेंकटेश्वर स्वामी म्हणजेच श्री बालाजी ह्यांच्या मूर्तीचा जो पाठीमागचा भाग आहे तो नेहेमी पाण्याने ओला असतो. ह्या मूर्तीकडे लक्ष देऊन कान लावून ऐकल्यास मूर्तीमधून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.

 

३. मंदिराच्या दाराजवळील उजव्या बाजूला एक छडी ठेवलेली असते. असे म्हणतात की ह्या छडीचा उपयोग देवांच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीवर जखम झाली होती. ह्या कारणाने त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावण्याची सुरवात झाली.

 

tirupati-marathipizza04
honeymoonpackagesdeals.com

४. साधारणपणे आपण गर्भगृहात बघतो तेव्हा आपल्याला वाटते की गर्भगृहाच्या केंद्रस्थानी मूर्ती आहे. पण खरे तर बाहेरून बघितल्यास देवांची मूर्ती ही उजव्या बाजूला स्थानापन्न आहे असे दिसते.

 

५. देवांच्या मूर्तीला वाहिलेली सर्व फुले व तुळशीची पाने प्रसाद म्हणून भक्तांना न देता मागील बाजूस असलेल्या विहिरीत ती टाकून दिली जातात. इतर ठिकाणी मात्र देवाला वाहिलेले हार व फुले दर्शनाला येणाऱ्यांना प्रसाद म्हणून दिले जातात.

 

६. दर गुरुवारी देवांच्या मूर्तीवर पांढऱ्या चंदनाचा लेप लावला जातो. जेव्हा हा लेप काढतात तेव्हा मूर्तीवर लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेली दिसून येतात.

 

७. मंदिरातले पुजारी जेव्हा जेव्हा पूजा करतात तेव्हा देवाला वाहिलेली सर्व फुले मागील बाजूस असलेल्या विहिरीत वेळोवेळी टाकून देत असतात पण एकदाही त्या टाकून दिलेल्या फुलांकडे बघत नाहीत. ती फुले बघणे चांगले नसते असे म्हणतात.

 

८. १८व्या शतकात हे मंदिर तब्बल १२ वर्ष बंद ठेवले होते. कारण एका राजाने १२ लोकांना मृत्युदंड देऊन मंदिराच्या भिंतींवर फाशी दिले होते. असे म्हणतात की हे बघून तेव्हा स्वयं वेंकटेश्वर स्वामी तिथे प्रकट झाले होते.

 

tirupati-marathipizza05
youtube.com

९. ह्या मंदिरात एक नंदादीप आहे जो सतत तेवत असतो. हा दिवा गेली अनेक वर्ष अखंड तेवतो आहे. कोणालाही नेमके आठवत नाही की नेमका केव्हापासून हा दिवा मंदिरात प्रज्वलित करण्यात आला आहे.

 

१०. देवाच्या मूर्तीला पंचाई कर्पुरम लावले जाते. हे कापरापासून बनवले जाते . असे म्हणतात की हा लेप जर साध्या दगडाला लावला तर तो दगड भंगतो पण ह्या पंचाई कर्पूरम चा देवाच्या मूर्तीवर कुठलाही परिणाम होत नाही.

तर असे हे भारतातील सर्वात वैभवशाली असलेले देवस्थान अतिशय निसर्गरम्य स्थानी वसलेले आहे. तिकडे गेल्यानंतर भक्तांचा ‘गोविंदा हरी गोविंदा, वेंकटरमणा गोविंदा’ हा जप ऐकून, देवाची भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती बघून प्रत्येकाला प्रसन्न वाटते. देवाचे शांत रूप पाहून आपलेही मन शांत होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?