अनाथ मुलगा ते लोकप्रिय नट : अर्शद वारसीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक असे काही प्रसंग घडतात की तो मोडून पडतो.

पण एखादा असाही असतो जो कोणत्याही वाईट प्रसंगाने मोडून पडत नाही तर त्यातून बाहेर येऊन आयुष्यात आणखी काही जगण्याचे मार्ग आहेत का ते शोधून त्या मार्गावर चालू पडतो आणि आपला स्वतःचा मार्ग स्वतःच आखून त्यावरून चालू लागतो.

असाच एक धडपड करत भारतीय चित्रसृष्टीतील एक उत्तम नट बनलेला माणूस म्हणजे अर्षद वारसी.

अर्षदचा जन्म १९ एप्रिल १९६८ चा..म्हणजे आज तो आहे ५१ वर्षांचा. या ५१ वर्षांचा आढावा घ्यायचा झाला तर सर्वात प्रथम त्याच्या लहानपणात डोकवावे लागेल.

 

arshad warsi inmarathi
Hindustan Times

अर्षद लहान असताना घरी सगळे ठीकठाक होते परंतु त्याच्या वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्या वडिलांना बोन कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि काही महिन्यातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

अर्षद आणि त्याची आई दोघांवर दुःखाचा पहाड कोसळला. हे दुःख कमी होते म्हणूनच की काय दोन वर्षांनी त्याची आई पण स्वर्गवासी झाली. अर्षद पोरका झाला. कोणीच सावरणारे नव्हते.

एखादा या आघाताने कोलमडून पडला असता, पण अर्षदने संकटांशी मुकाबला करायचे ठरवले.

त्याच्याकडे त्यांचे रहाते घर उरले होते. त्यातील काही भाग पैशांसाठी भाड्याने दिला होता. संकट कधी एकट्याने येत नाही. भाडेकरूंनी त्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन घर सोडायचे नाकारले आणि तो आसरा देखील त्याच्या हातून सुटून गेला.

अर्षद खऱ्या अर्थाने पोरका झाला.

आता पोटापाण्यासाठी काहीतरी करणे भागच होते. अर्षदने घरोघरी जाऊन सौंदयप्रसाधने विकायला सुरवात केली.लिपस्टिक सारखी उत्पादने चांगली खपू लागली. या दरम्यान जातायेता त्याला नृत्य अकादमीचा फलक खुणावत होता.

अर्षदच्या डोक्यात नृत्य शिकायचे वेड घुसले आणि काम करता करता तो नृत्य शिकू लागला. यात त्याची प्रगती वेगाने होऊ लागली.

 

arshad warsi early life inmarathi
FoodieFilmy

जीवनात आलेली दुःखं आणि संकटं माणसाला एकतर गर्तेत लोटून देतात किंवा जो त्या संकटांशी मुकाबला करतो त्याला पुन्हा उभं राहायला मदत करतात.  अर्षद कोसळला नाही.

भले त्याला शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षण दहावी झाल्यावर सोडून द्यावे लागले, पण अनुभवांच्या शाळेत तो शिकत राहिला. सौंदर्यप्रसाधनांची विक्री आणि नृत्य प्रशिक्षण चालूच ठेवत तो पुढे जाऊ लागला.

आता अतिरिक्त खर्च भागवण्यासाठी आणखी मेहनत जरूरीची होती. अर्षदने फोटो लॅबमध्ये काम केले.

नृत्य शिकल्यावर त्याने एक एक डान्सग्रुप जॉईन केला आणि त्यांच्या सोबत कार्यक्रम करू लागला. आयुष्यातील ह्या एक निर्णयामुळे त्याचे नशीब पालटले. १९९१ मधे त्याने इंडियन डान्स कॉम्पिटिशन जिंकली.

देखणं रूप आणि एवढी मोठी नृत्यस्पर्धा जिंकलेली..अर्षदकडे चित्रसृष्टीतील काहींचे लक्ष वेधले गेले.

दरम्यान त्याने स्वतःची डान्स ऍकॅडमी “ऑसम” नावाने सुरू केली. याच ठिकाणी त्याची विद्यार्थिनी म्हणून शिकायला आलेल्या मारिया गोरेटीवर त्याचा जीव जडला. तिच्याकडून देखील प्रेमाचा प्रतिसाद मिळाल्यावर अर्षद सुखावला.

 

arshad warsi wife inmarathi
pinterest.com

लवकरच त्या दोघांनी लग्न करायचं निर्णय घेतला आणि पोरक्या अर्षदच्या आयुष्यात मारियाने आपलं पाऊल टाकलं.

अर्षदच्या एकटेपणाला आता पूर्णविराम मिळाला. तिचं त्याच्या आयुष्यात येणं त्याच्यासाठी भाग्याचं ठरलं. काही दिवसांतच त्याला १९९३मधे ‘रुपकी रानी चोरोंका राजा’ सिनेमाचा टायटलट्रॅक कोरिओग्राफ करायचे काम मिळाले आणि तो बॉलिवुडमधे दाखल झाला.

चित्रपट आपटला पण ‘रोमिया नाम मेरा’ ह्या गाण्याचा कोरिओग्राफ खूप गाजला. नंतर तो महेशभट यांच्या हाताखाली असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करू लागला. ‘ठिकाना’ आणि ‘काश’ ह्या चित्रपटांसाठी त्याने असिस्टंट डिरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्याच्या मेहनतीचे फळ लवकरच त्याला मिळाले.

अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल या प्रोडक्शन कंपनीच्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटात काम करण्याची संधी १९९६ मधे मिळाली ती खुद्द जया बच्चन यांच्यामुळे.

ह्या चित्रपटातील सहनायकाच्या भूमिकेने त्याचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले आणि पदार्पणातच त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि तिथून पुढे अभिनयक्षेत्रात तो पुढे जातच राहिला.

राजकुमार हिरानी सारख्या दिग्गजाचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्यांच्यातील कलागुण हेरून त्यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधे त्याला संजयदत्त रंगवणार असलेल्या मुन्नाभाईचा जिवलग साथीदार ‘सर्किट’ याची भूमिका ऑफर केली.

 

arshad warsi circuit inmarathi
Hindustan Times

पिक्चर रिलीज होताच त्याचा ‘सर्किट’ इतका गाजला की संजयदत्तपेक्षा त्याचेच डायलॉग जास्त गाजले. संजयदत्तपेक्षा काकणभर जास्तच प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली.त्याचा काळा कुर्ता फॅशन सिम्बॉल बनला.

या यशाने तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. राजकुमार हिरानी यांनी पाठोपाठच ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट याच जोडगोळीला घेऊन सुरू केला.
या दोन्ही चित्रपटांनी त्याच्या समोर यशाच्या पायघड्या घातल्या.

या नंतर ‘इष्कीया’ ‘जॉली एलएलबी’ हे त्याचे गाजलेले चित्रपट. इष्कीया मधील त्याचा व्हीलन महेंद्र फौजी चांगलाच गाजला. पण इथेही तो सहाय्यक भूमिकेत होता.

जॉलीचा रोल आधी शाहरुख खानला देऊ केला होता, पण बहुतेक शाहरुखला तो फारसा रुचला नाही आणि अर्षदकडे ती वकिलाची भूमिका चालून आली.
अर्षदने त्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले.

 

arshad warsi lawyer inmarathi
News Nation

बोमन इराणीचा बेरकी वकील आणि अर्षदचा सरळ साधा नियमानुसार चालणारा वकील यातील नाट्य, वेगळी वळणे, शेवटी ‘सत’ चा ‘असत’वर विजय…हे सर्वच प्रेक्षकांना भावले.

‘सर्किट’ प्रसिद्ध होऊनही त्याच्या हातात काम नव्हते तेव्हा तो खूप नर्व्हस झाला होता.

“माझ्यात काय कमी आहे म्हणून मला काम मिळत नाही?मी बाहेरच एखादा चांगला जॉब करू का?” असे उद्विग्नपणे त्याने राजकुमार हिरानी याना विचारले होते. “तू उत्कृष्ट नट आहेस.बाहेर जॉब करू नकोस”. असे हिरानी म्हणाले होते.

पण नंतर इष्कीया आणि जॉली एलएलबी यांनी त्यांच्यातील टॅलेंट सिद्ध केले.

नंतर त्याने ‘बेताबी’ ‘होगी प्यार की जीत’ ‘सलाम नमस्ते’ ‘कुछ मिठा हो जाय’ ‘धमाल’ सारखे सिनेमे केले पण त्यातील अभिनय चांगला असूनही भूमिका मात्र दुय्यमच मिळाली.

 

arshad warsi dhamaal inmarathi
YusraBlog.com

जॉली एलएलबी पार्ट 2 मधील रोल अक्षयकडे गेला तेव्हा अर्षद खूप नाराज झाला होता. बोमन इराणी ऐवजी अन्नूकपूर आला. अर्षदसाठी हा मोठा धक्का होता. तरीही त्याने ट्विट करून अक्षयकुमारचे अभिनंदन केले.

मात्र मीडियाशी बोलताना त्याने कडवटपणे खंत व्यक्त केलीच.

“मी आणि बोमन असतो तर चित्रपट आणखी कमाई करू शकला असता, कारण अक्षकुमारसाठी जेवढे मानधन मोजण्यात आले त्यापेक्षा आम्ही स्वस्तात मिळालो असतो व साहजिकच आर्थिक फायदा झाला असता.आम्ही दोघांनी हा रोल आणखीन जास्त उंचीवर नेला असता”.

आता जॉली एलएलबी चा पार्ट 3 येतोय,त्यात अर्षद अक्षयकुमार बरोबर असणार आहे अशी चर्चा आहे. अर्षद मात्र सावध प्रतिक्रिया देतोय. “मी असे ऐकून आहे”, एवढेच तो सांगतो. फिल्म इंडस्ट्रीमधे केव्हाही काहीही घडू शकते याचा अनुभव त्याने घेतलाय.

मुन्नाभाई 3 मधे तो पुन्हा दिसणार आहे. मधल्या काळात तो रोल दुसऱ्याला मिळणार अशी अफवा होती . पण आता तोच हा रोल करणार असल्याचे नक्की झालेय.

तरीही अर्षद त्यावर फार भाष्य करीत नाही.  कटू अनुभवातून गेल्यावर तो एवढेच करू शकतो. सध्या त्याची ‘गोलमाल’ सिरीज चांगलीच गाजतेय.

 

arshad warsi in golmal again
Catch News

देखणा चेहरा, मजबूत शरीरयष्टी हेच नायकाच्या भूमिकेसाठीचे मापदंड असतील तर अर्षदकडे ते आहेतच.  उलट नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान सारखे चांगले चेहरे नसलेले अभिनेते सोलो रोल घेऊन जातात मग अर्षद कायम दुय्यम भूमिकेतच कसा अडकून पडलाय?

अभिनयक्षमता तर त्याने वेगवेगळ्या भूमिका करून सिद्ध केलेली आहेच.

त्याला मुख्य भूमिका मिळाली तर तो त्याचे सोने करेलच यात काहीच शंका नाहीय. तरीही ती मिळत नाहीय ही केवळ त्याचीच खंत नाहीय तर त्याच्या लाखो चाहत्यांची आहे.

आशा करूया की तो एखाद्या अप्रतिम मुख्य भूमिकेत आपल्याला भेटेल आणि आपली अभिनयाची जादू सर्वदूर पसरवेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अनाथ मुलगा ते लोकप्रिय नट : अर्शद वारसीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे

 • June 7, 2019 at 10:20 pm
  Permalink

  अर्शद उत्कृष्ट नट आहे व तो एकट्याने सिनेमा तोलून धरू शकतो हे त्याने जॉली एलएलबी मध्ये सिद्ध केले.

  इरफान खान व नवाजुद्दीन यांच्या तुलनेत तो कमी नाही.

  सर्किट ही भूमिका गाजली पण चापलुसी करणारे पात्र रंगवल्याने त्याची भूमिका दुय्यम ठरली!

  बॉलीवूडमध्ये नायकाचा चमचेगिरी करणारा मित्र खलनायकापुढे दुय्यम ठरतो कारण तो नायकाला उठाव देणारा असल्याने त्याला कोणतीच शेड नसते व तो फिका ठरतो!

  गोलमाल सारख्या गर्दीत काम करण्यापेक्षा त्याने खलनायक म्हणून नशीब आजमावे!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?