१० वर्षात ५००० झाडे लावायचा विक्रम रचणाऱ्या जोडप्याची लव्हस्टोरी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

“शादी का लड्डू, खाए तो भी पछताए, न खाए तो भी पछताए” असं आपल्या इथे गंमतीने म्हटलं जात असलं, तरीही प्रत्येकजण आपल्या विवाह सोहळ्याची स्वप्नं बघत असतो.

आपल्या आयुष्याला अर्थ देणारा हा सोहळा अनोख्याच पद्धतीने आणि अविस्मरणीय व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं, त्यासाठीच तर वेडिंग थीमपासून ते डेस्टिनेशन वेडिंग पर्यंत प्रत्येक गोष्टीवर सखोल विचार केला जातो.

काही जणांसाठी लग्नसोहळा म्हणजे आपल्या घराण्याची श्रीमंती, आपलं वैभव मिरवण्याचा दिवस असतो; तर काही जण आपल्या मुलांच्या लग्नासाठी त्यांच्या जन्मापासूनच पै-पै जमवत असतात. असं असलं तरीही फार कमी लग्नसोहळे हे समाजाला प्रेरणादायी ठरत असतात.

आम्ही आज तुम्हाला केरळमधल्या एका अशा दांपत्याविषयी सांगणार आहोत; ज्यांनी आपल्या लग्नाच्या दिवसासाठी केलेला विचार हा संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरेल हे निश्चित!

ही गोष्ट आहे केरळमधल्या विजित आणि वाणी या निसर्गप्रेमी दांपत्याची! खरंतर त्यांच्या निसर्गप्रेमानेच त्यांना एकमेकांशी जोडलंय; पण त्यांनी त्यांच्या लग्नात नेमकं काय केलं होतं ज्याने जगाचं लक्ष त्यांच्याकडे वळलंय?

 

vijit & veena inmarathi
the better india

 

ह्या गोष्टीची सुरुवात होते ती अलप्पुझा जिल्ह्यातील हरिपाद गावातल्या एका शेतकरी कुटुंबात. त्या शेतकरी कुटुंबातील एक मुलगी वाणी लहानपणापासूनच निसर्गप्रेमाने पछाडलेली होती.

इतकी की करिअर ऍप्टीट्यूड टेस्टच्या निकालाने मेडिकल सायन्सची वाट दाखवल्यानंतर B. Sc.(Agriculture) करण्यासाठी ती आपल्या नातेवाईकांशी भांडली.

दुसरीकडे विजित सुरुवातीला आपल्या उद्दिष्टांविषयी वाणीसारखा ठाम नव्हता, त्याने घरच्यांच्या दबावाखाली येऊन इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतले.

असं असलं तरीही लहान असल्यापासूनच व्हिजितच्या मनात निसर्गाविषयी ओढ होती आणि त्या ओढीतूनच तो जमेल तसा प्रत्येक पर्यावरणविषयक शिबिराला उपस्थित राहू लागला.

कॉलेजला गेल्यावर अशा शिबिराला उपस्थित राहण्याचं त्याचं प्रमाण वाढतच गेलं आणि मित्रांसोबत अनेक वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांत तो सहभाग घेऊ लागला.

 

The Better India

 

विजित आपल्या निसर्गप्रेमाचे श्रेय अशाच कॅम्पमध्ये भेटलेल्या दोन व्यक्तींना देतो. त्या व्यक्ती म्हणजे केरळमधील पर्यावरणविषयक चळवळींमध्ये सहभागी असणारे सुप्रसिद्ध पर्यावरणरक्षक कै. शिव प्रसाद सर आणि मोहन कुमार सर.

विजित सांगतो की “या दोन्हीही व्यक्ती मार्गदर्शक म्हणून कॅम्पमध्ये सहभागी होत असत. त्यांच्या ज्ञान आणि अनुभवांतूनच मी आज पर्यावरण-जागरूक झालो आहे.”

अशाच एका उपक्रमात विजित आणि वाणी यांची पहिली भेट झाली. त्यापुढे काही दिवस एका अनोख्या कारणासाठी ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. याविषयी सांगताना विजित म्हणतो;

“एका वृक्षारोपण उपक्रमाच्या दरम्यान माझ्या मनात एक विचार आला आणि तेव्हापासून मी एलंजी, जांभूळ अशा काही झाडांच्या बिया मी साठवू लागलो. यासाठी मला माझे मित्रही मदत करत असत. जर कोणाला काही रोपं/बिया हव्या असतील तर त्याही मी देत असे.

माझ्या याच सवयीमुळे काही रोपांच्या निमित्ताने वाणी मला भेटत होती.”

 

vijeet wife inmarathi

 

वेगवेगळ्या रोपांच्या निमित्ताने होणाऱ्या या भेटींतून वाणी आणि विजितची मैत्री वाढत होती.

वाणी तोपर्यंत BSc(Agriculture) मध्ये ग्रॅज्युएट झाली होती. एव्हाना वाणी थ्रिसूरच्या जलोत्सारण खात्यात जॉब करू लागली होती आणि विजित अथणीच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये(विद्युत वितरण विभागात) सबस्टेशन ऑपरेटर म्हणून काम करत होता.

या दरम्यान विविध पर्यावरणप्रेमी उपक्रमांमध्ये दोघेही भेटत होते आणि प्रत्येक भेटी गणिक अधिकाधिक जवळ येत होते.

वाणीला असलेली शेतीकामाची आवड बघून विजितचा या उपक्रमातला इंटरेस्ट ही वाढत जात होता. दोघांनीही पॉंडीचेरी युनिव्हर्सिटीमधून M.Sc in Ecology and environmental sciences करण्याचं ठरवलं.

दोघे एकत्र युनिव्हर्सिटीत जाऊ लागले खरे, पण दैव नेहमीच साथ देत नाही तर मध्येच एखादी अडचण आणून प्रेमाची परीक्षा बघतं.

कोर्स सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी वाणीचे वडील आजारी पडले आणि आपल्या पालकांची आणि आजीची काळजी घेण्यासाठी वाणीला शिक्षण सोडावं लागलं. असं असलं तरीही वाणीच्या कुटुंबात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता आणि ते विविध भाज्या आणि कंदांचे उत्पादन घेत असत.

कुटुंबातील प्रत्येकालाच शेती, बागायत आणि आयुर्वेद यांचं ज्ञान होतं. उपजीविकेसाठी वाणी हरीपादमधल्या आपल्या परंपरागत जमिनीवर शेती करू लागली.

कोर्स सोडल्यावर विजितही आपल्या काही मित्रांसोबत त्या साडेचार एकर जमिनीवर काम करू लागला.

 

The Better India

 

विजित या काळात वाणीकडून शेतीच्या विविध पद्धती अधिक सखोलपणे शिकू लागला आणि याचं श्रेय विजित वाणीच्या दृष्टिकोन, ज्ञान आणि अनुभवांना देतो.

तो म्हणतो, “माझ्यासाठी ही शेती आणि जैवविविधता संवर्धनासाठी वाहिलेल्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. या जमिनीवर बऱ्याचशा भागात पेरणी करून झाली होती, त्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजपासून जे (वृक्षारोपण आणि संवर्धन) करत होतो तेच करायचं ठरवलं. याच दरम्यान वाणीने विजितला प्रपोज केलं. “

“तिच्या मनात नेहमीच या भावना होत्या. सुरुवातीला मित्र म्हणून, मग जोडीदार म्हणून इतक्या वर्षांच्या एकत्र आयुष्यात ती तिच्या गरजांविषयी, भावनांविषयी आणि विचारांविषयी नेहमीच ठाम आणि सुस्पष्ट होती, आहे आणि तिची निर्णयक्षमताही उत्तम आहे.

मला वाणी नेहमीच आवडत होती, तरीही तिने प्रपोज करेपर्यंत मी लग्नाचा विचार केला नव्हता.” असं विजित हसतहसत म्हणतो.

लग्नाच्या विचारासोबतच वाणी अजून एका विचारावर ठाम होती आणि हाच विचार या दोघांच्या लग्नाला अविस्मरणीय करणारा ठरला.

 

vijeet vaani inmarathi

 

“आपल्या लग्नाच्या दिवशी आपण लोकांना जे स्नेहभोजन देऊ त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं उत्पादन आपण आपल्याच शेतात घ्यायचं.” असा तो विचार होता आणि विजितनेही या विचाराचं हसतहसत स्वागत केलं.

आज आपल्या लग्नासाठी असे काहीतरी वेगळे विचार करणं हे सर्वसामान्यांतही रुजलं असलं तरीही दहा वर्षांपूर्वी हे असं नव्हतं. पण दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची ही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी खंबीर साथ दिली आणि अशा प्रकारे एकमेकांच्या सोबतीने हा एक अनोखा प्रवास सुरु झाला होता.

पण या युगुलाने एक गोष्ट आपल्या मनाशी पक्की केली होती, आपण आपल्या लग्नासाठी जे काही उत्पन्न घेऊ ते निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोचवता, निसर्गासाठी हितकारक आणि सेंद्रिय पद्धतीनेच उगवायला हवं. यासाठी वाणी आणि विजित दोघेही ‘कृषीविषयक राजकारणा’बाबत सजग होते.

विजित म्हणतो, “कृषीविषयक राजकारण म्हणजे असं की, संकरित आणि संस्कारित बियाण्यांच्या प्रसारामुळे, नैसर्गिक पिकांच्या उत्पादनात घट होतेय आणि त्यातील काही प्रजाती तर नष्टच होण्याच्या मार्गावर आहेत.

 

vijeet family farm inmarathi

 

आम्हाला ह्या नष्ट होणाऱ्या प्रजातींचं पुनरुत्पादन करायचं होतं कारण त्या आमच्या परिसरातील परिसंस्थेमध्ये उत्तमरीत्या रुजत होत्या आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही उत्तम होती.”

“तसेच या मातीची गुणवत्ता आणि भूजलपातळी योग्य प्रमाणात राहण्यासाठीही या प्रजाती उपयोगी ठरत असत, जिथे संकरित प्रजाती काही वेळा घेतल्यानंतर मातीची गुणवत्ता ढासळत जाते आणि सर्व उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा आपल्या गरजेप्रमाणे मोठ्या प्रमाणात वापर करून घेते.

या नंतर नैसर्गिक बियाणे आणि रोपे साठवायला आणि त्यांचं जतन करायला आम्ही सुरुवात केली. यात आम्ही विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि औषधी प्रजातींचा शोध घेऊ लागलो.” असे ही विजित सांगतो.

 

 

विविध प्रकारचे कडधान्य, भेंडी, चेना(सुरण), चेंबू(अळू), काचील(घोरकंद), वांगी, केळी, आंबा अशा वेगवेगळ्या झाडांच्या नैसर्गिक प्रजातींचा शोध सुरू झाला. नानाविध प्रकारच्या उत्तम नैसर्गिक प्रजातींचं संवर्धन करायला सुरुवात झाली होती.

त्यांच्या वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या अथक प्रयत्नांना यश येऊ लागलं होतं.

त्यांच्या स्वयंपूर्ण जमिनीवर ५,०००हुन अधिक झाडे आणि रोपांची लागवड झाली होती. आपल्या जमिनीचा काही भाग त्यांनी ‘कावू’ अर्थात देवराई म्हणून राखीव ठेवली.

आज त्यांच्या जमिनीवर छोटेमोठे असे १० तलाव आहेत, त्यातले काही आधीपासूनच होते तर काही या निसर्गप्रेमी युगुलाने आणि त्यांच्या मित्रमंडळींनी बांधलेले आहेत.

पिकांसाठी फक्त घरी तयार केलेले सेंद्रिय खत आणि कंपोस्ट खत वापरल्यामुळे घरगुती गरजेपेक्षा जास्त उत्पादन यायला सुरुवात झाली.

सुरुवातीला या दोघांनी आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना हे उत्पादन विकताविकता गावातील एक रिकामा गाळा खरेदी करून तिथे दुकान काढलं. यात विजितच्या आई आणि बहिणीने दुकानाचे रिनोव्हेशन करताना विजितला मदत केली.

 

 

 

कदाचित दरवर्षी वर्षभर दुकानात विकण्यासाठी पुरेल इतकं उत्पादन येणार नाही या विचारातून आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘कलेक्टिव्ह फार्मिंग’ची योजना आखण्यात आली.

इतर शेतकऱ्यांनाही त्यांचे उत्पादन विजितच्या ‘प्रकृती जैव कलावरा’ नावाच्या दुकानात विक्रीला ठेवण्याची संधी मिळाली होती. हळूहळू दुकानात कृषीआधारीत इतर उत्पादने ही विक्रीला ठेवण्यात आली.

आपलं घर पर्यावरणपूरक रहावं यासाठी त्यांनी आपल्या शेतजमिनीवर ३ बायोगॅस यंत्रणा उभारल्या.

घरातील शौचालयही त्यातल्या एका प्लँटला जोडले आहे. गावातील हॉटेलमधून रात्री उरलेले अन्न गोळा करण्यात येऊ लागले आणि ते बायोगॅस यंत्रणेत टाकून त्यापासून कंपोस्ट तयार केले जाते.

दिवसरात्र विद्युतपुरवठा व्हावा यासाठी सौरविद्युत यंत्रणा उभारण्यात आली आहे.

यासोबतच एक अभिनव कल्पना वाणी आणि विजितने आपल्या शेतजमिनीवर अगदी सुरुवातीपासूनच राबवली आहे.

पर्यावरण, निसर्ग यांवर प्रेम करणाऱ्या आणि शेतीची कामं करण्याची हौस आहे. त्यांना शेतजमीन खुली करून देण्यात आली आहे. आपल्याला हवं ते पीक हव्या त्या प्रमाणात आपण थेट त्यांच्या शेतातून खुडून घेऊ शकतो.

 

 

The Better India

 

वाणी आणि विजित विशेषतः लहान मुलांना या गोष्टींमध्ये रमू देण्याविषयी आग्रही आहेत. आजूबाजूच्या गावांतून लहान मुलं विजित आणि वाणीच्या शेतांमध्ये येतात, दिवसभर रमतात. त्यांच्यासाठी एकदिवसीय पर्यावरणविषयक जनजागृती उपक्रम राबवले जातात.

“मुलं इथे एकदा आली की त्यांचा पाय निघत नाही, ते पुन्हा पुन्हा येऊ लागतात. याच मुलांकडे बघून आम्हाला दीर्घकालीन शिबिरांची प्रेरणा मिळाली. त्याचाच एक भाग म्हणून आता गेल्या वर्षीपासून उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जाते.” असं विजित सांगतो.

या एप्रिलच्या सुरुवातीलाही त्यांनी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते. अशा प्रकारची शिबिरे ही नव्या पिढीला पर्यावरण-सजग करतील आणि त्यांना निसर्गाची, बागकामाची आणि शेतीची आवड मुलांमध्ये रुजवतील याबाबत विजित सकारात्मक आहे.

शेतीतील पुढच्या योजनांबद्दल बोलताना विजित सांगतो की “आम्ही आमच्या जमिनीपैकी तीन छोटे तुकडे हे आता फळझाडांसाठी आखून घेतले आहेत. मान्सून आभ्यासल्यावर आम्ही शेवटच्या आठवड्यात त्या जागेत फळझाडांची लागवड करायला घेणार आहोत.”

पण ही गोष्ट फक्त एवढ्यावरच थांबत नाही. विजित शेती आणि दुकान यांचा व्याप सांभाळत असताना वाणी मात्र तिरुअनंतपुरममध्ये राहून UPSC च्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करते आहे.

 

The Better India

 

आपल्या पत्नीचं कौतुक करताना विजित म्हणतो की “तिच्या म्हणण्यानुसार, आज शासकीय प्रणालीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याची गरज आहे.

एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून आपण ते बदल घडवून आणू शकत नाही, तर त्यासाठी व्यवस्थेचाच एक भाग व्हावंच लागेल. मी ही या दृष्टीने एक वर्ष प्रयत्न केला होता, पण मला जमलं नाही. पण ते वाणीला नक्कीच जमेल आणि ती त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेते आहे.”

अशा निसर्गासाठी, जैवविविधता संवर्धनासाठी आपल्याला शक्य असलेले छोटे-छोटे मार्ग शोधून ते अंमलात आणणाऱ्या आणि इतरांनाही आपल्या मार्गावर चालायची प्रेरणा देणाऱ्या निसर्गप्रेमी पर्यावरण सजग विजित आणि वणीची आज जगाला गरज आहे.

त्यांच्या मार्गावर चालण्याची बुद्धी निसर्ग इतरही अनेक तरुणांना देवो. आम्ही विजित आणि वाणीला त्यांच्या संसारासाठी या शुभेच्छा देतो !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “१० वर्षात ५००० झाडे लावायचा विक्रम रचणाऱ्या जोडप्याची लव्हस्टोरी!

 • May 15, 2019 at 5:33 pm
  Permalink

  अप्रतिम निसर्ग वेडे

  Reply
 • July 16, 2019 at 8:15 am
  Permalink

  Can u provide me their contact details.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?