भारतात रुजलेल्या ‘सुंदरतेच्या’ ठोकळेबाज संकल्पनेचं करायचं काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सौंदर्याची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी भारतीय समाजमनात सुंदरतेबद्दल काही ठोकताळे आहेत. रंग, शरीराची ठेवण, बांधा इत्यादी घटकांवर ती आधारित आहे. वैयक्तिक भावना किंवा पूर्वग्रह यावर सौंदर्याविषयक मत ठरते.

उत्क्रांतीच्या ज्या पायरीवर मानवाला सौंदर्यदृष्टी, सौंदर्यासाठीची विशेषणे, जास्त सुंदर- कमी सुंदर असा भेद करून त्यापैकी जास्त सुंदर ते निवडण्याची संधी सहज मिळू लागली त्या काळात आजच्या सौंदर्यविषयक संकल्पनांचे मूळ सापडते.

उदाहरणार्थ, एकेकाळी आफ्रिकेतील निग्रो लोकांना जास्तीत जास्त काळ्या आणि जाड ओठांच्या स्त्रिया सुंदर वाटत असत, पण अमेरिकन निग्रो लोकांना कोकेशियन वंशाच्या स्त्रिया जास्त सुंदर वाटत.

 

beuty inmarathi
Egyptyoday.com

याचाच अर्थ सौंदर्य ही निश्चित करता येणारी गोष्ट नसून व्यक्ती, स्थान यानुसार बदलत जाणारी गोष्ट आहे.

आता भारतीय समाजमनात असणाऱ्या सौंदर्याच्या संकल्पनेबद्दल बोलू. आपल्याकडे सौंदर्य ही संकल्पना सुरुवातीला प्रामुख्याने लोकवाङ्मय, लोककला, पुढे पुढे नाटके, चित्रपट या माध्यमातून आकारास येत गेली.

सुंदर या अर्थाने वापरण्यात आलेली प्रतीके, विशेषतः स्त्रिया या सामान्य जीवनात सौंदर्याचे परिमाण ठरल्या. मुळात सुंदर असणं हा स्त्रीचा गुणाधार नसून केवळ एक विशेषण आहे हा महत्वाचा फरक नेमका इथे दुर्लक्षित झाला.

‘सुंदर’ या शब्दाने खरंच एखाद्या गुणधर्माचा निर्देश होतो का? होत असला तर त्याचे निकष काय? त्याची व्याख्या काय? कोणत्या गोष्टीना सुंदर म्हणावं? कोणत्या निकषांमुळे त्या सुंदर ठरतात?

या सर्व प्रश्नांची निश्चित उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. म्हणजे सौंदर्य ही व्यक्तिसापेक्ष संज्ञा आहे हे उघड आहे.

 

beutyful inmarathi
ahe.com

असं सगळं असताना आता प्रश्न उरतो तो म्हणजे एकच एक रंगाच्या, शरीराच्या ठेवणीच्या व्यक्तींना, विशेषतः स्त्रियांना सुंदर समजण्याचा जो प्रघात भारतीय जनमानसात रुजलाय त्याचा.

चित्रपटाच्या माध्यमातून नकळतपणे जाणिवेत प्रस्थापित झालेले सौंदर्याचे हे निकष ‘सुंदर कुणाला म्हणावे’ याची अनिश्चीतता दुर्लक्षित करून सौंदर्याची थेट परिभाषा ठरवण्यात दुर्दैवाने यशस्वी ठरले.

सुंदरतेच्या या संकल्पना कालौघात लोकांच्या जाणिवेत खोलवर ठाण मांडून बसल्या.

नितळ गोरी त्वचा आणि शरीराची आकर्षक बांधणी हा एक निकष पूर्ण केला की ती स्त्री सुंदर, हे नसेल तर ती या ‘सुंदर’ च्या व्याख्येतच बसत नाही असं चित्र तयार झालं. याचे दूरगामी परिणाम तर होणारच होते.

आठ दिवसात सुंदर करण्याचे वचन देणाऱ्या फेअरनेस क्रीम्स, सौंदर्य प्रसाधने यांचे पेव फुटले. सुंदरतेचा प्रस्थापित व्याख्येत बसण्यासाठी हजारो स्त्रियांची, पुरुषांची अतोनात धडपड सुरु झाली.

परिणामी जागतिक बाजारपेठेत “कॉस्मेटिक” या एकाच शाखेने आज खूप मोठी जागा व्यापली आहे.

 

cosmetic inmarathi
SheKnows.com

चित्रपटात काम मिळवायचे असेल, मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल, इतकेच काय, केवळ लग्न करायचे असले तरी गोरा रंग असणे हा महत्वाचा निकष मानला जाऊ लागला.

रंगाचा, शारीरिक बांधणीचा निकष हा व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीसाठी पात्र असण्याचा निकष ठरणे हा सौंदर्याच्या ठाशीव व्याख्येचा सर्वात दुर्दैवी परिणाम.

सौंदर्याच्या या बंदिस्त संकल्पनेने दीर्घकाळ व्यापला. महागड्या कॉस्मेटिक कंपन्यांनी जागतिक बाजारात चांगला जम बसवलाय.

हे सगळं पडद्यामागे इतकं नकळतपणे घडत गेलं की आपण सौंदर्य ही संकल्पना इतकी बंदिस्त केली तरी आपल्याला त्याची चाहूल लागली नाही.

गोरी त्वचा म्हणजे सुंदरता हे नॅरेटिव्ह पसरवण्यात सौंदर्य प्रसाधनांच्या कंपन्यांची जाहिरातबाजी, चित्रपट क्षेत्रातील ठोकळेबाज अस्थेटिक यांनी महत्वाचा वाट उचलला.

रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर येत राहणारं हे वास्तव माणसाच्या मनावर प्रभाव टाकत राहिलं. याचा परिणाम म्हणजे आज आपल्याला सुंदर म्हटलं की फक्त गोरी त्वचा आणि शरीराची आखीव ठेवण हेच चित्र डोळ्यासमोर येतं.

 

yami inmarathi
pinterest.com

गेली अनेक वर्ष आपल्या मनावर ह्याच जाहिरातींचा भडीमार होतो आहे.

आपण सुद्धा मुर्खासारखे गोरे तेच सुंदर समजून ह्यांची विविध उत्पादने घेऊन त्याचा मारा आपल्या सावळ्या पण निरोगी त्वचेवर करून आपल्या त्वचेचा नैसर्गिक चांगला पोत त्यावर केमिकल्सचा मारा करून खराब करून घेत आहोत.

ह्या जाहिराती करणाऱ्या नट्या सुद्धा गोऱ्याच असाव्या लागतात. सुरुवातीला तर सावळ्या रंगाच्या नट्यांना सुद्धा काही स्थान नव्हते. नंतर नंतर लोकांची मानसिकता बदलू लागली. तरीही आपले गोरेपणाचे खूळ अजनही तसेच आहे.

या बंदिस्तपणाची कल्पना चित्रपटात काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या जाणत्या लोकांना झाली याची काही उदाहरणे देता येतील.

अलीकडेच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली.

 

sai pallavi inmarathi
IndiaWords.com

अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनीं सौंदर्याची संकल्पना बंदिस्त करणाऱ्या अशा जाहिराती करायला नकार दिला आहे. ही या बाबतीत बदलाची नांदी म्हणावी लागेल. सौंदर्याची प्रस्थापित व्याख्या बदलणे हे जाणत्या जणांची जबाबदारी आहे.

जी संकल्पना एका विशिष्ट निकषात बसवता येत नाही तिचे झालेले बंदिस्तीकरण थांबवणे आणि सुंदरतेच्या कक्षेत ‘गोरी त्वचा, शरीराची विशिष्ट ठेवण’ नसलेल्या लोकांनाही सामावून घेणे ही सामाजिक जबाबदारी ओळखून त्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

असे झाले तर सुंदरतेच्या व्याख्येची चोहोबाजूंनी झालेली कोंडी आपण सोडवू शकू यात शंका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?