भारतीय सैन्य झिंदाबाद! सर्जिकल स्ट्राईक दिनी, आणखी एक स्ट्राईक करून हुतात्म्याचा प्रतिशोध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारत आणि पाकिस्तान ही दोन शेजारी राष्ट्रे, १९४७ ला भारताचे दोन तुकडे पाडून इंग्रजांनी स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र पाकिस्तानची निर्मिती केली.
स्वातंत्र्याच्या काहीच काळानंतर पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून भारताच्या कुरापती काढण्यास सुरवात केली, ज्या आजतागायत सुरू आहेत.

स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान पाच मोठी युद्ध झाली, पैकी पाचही युध्दांमध्ये पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून सपाटून मार खावा लागला असल्याने पाकिस्तानचा भारताप्रतिचा द्वेष आणखीच वाढत गेला.

प्रत्यक्ष युद्धात पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्या पुढे टिकू शकणार नाही हे एव्हाना पाकिस्तानी सैन्य अधिकारी आणि आय.एस.आय.च्या (पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा) लक्षात आले असावे, आणि म्हणूनच पाकिस्तानने भारतासोबत थेट युद्धात न उतरता दहशतवाद्यांच्या साहाय्याने ‘छुपे युद्ध’ Proxy war लढण्याचा निर्णय घेतला.

संपूर्ण जगात इस्लामिक झंडा फडकवण्यासाठी जीव द्यायला आणि घ्यायला तयार असणारे कित्येक धर्मांध तरुण आज पाकिस्तानच्या दहशतवादी ट्रेनिंग कँप्स मध्ये तयार होत आहेत.

गेल्या काही काळात काश्मीर सहित भारतातल्या निरनिराळ्या शहरांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे याच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे.

 

Terrorism-Pakistan-marathipizza
http://www.wishesh.com

पाकिस्तान मधून घुसखोरी करून काश्मीर मध्ये शिरणाऱ्या दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यात वेळोवेळी सुरक्षा यंत्रणांनावर हल्ले केले जातात, १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरच्या उरी भागात भारतीय सैन्याच्या तळावर असाच एक भ्याड हल्ला करण्यात आला.

पहाटे पाच वाजताच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार करत सैन्य छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला.

भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्याने चारही दहशतवादी मारले गेले मात्र आपल्या १९ भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले.

या घटनेने संपूर्ण देशात असंतोषाची एकच लाट उसळली, सर्वसामान्य व्यक्ती पासून ते देशातल्या विरोधी पक्षांनी सरकारकडे पाकिस्तान कडून सूड उगवण्याची मागणी केली.

पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची चर्चा सुरू असताना भारतीय सैन्याच्या स्पेशल फोर्सने पाकिस्तान व्याप्त काश्मीरस्थित दहशतवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याची बातमी सैन्याच्या ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ यांनी संपूर्ण देशाला सांगितली.

देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले पण सोबतच विरोधी पक्षांच्या दुर्दैवी राजकारणास देखील सुरवात झाली, मात्र तो वेगळा मुद्दा असल्याने त्याची चर्चा आता नको.

भारतीय सैन्याने केलेल्या या अद्वितीय कामगिरीबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात सैन्याप्रति नितांत आदर आहे. सैन्याने कशा प्रकारे ‘लाईन ऑफ कंट्रोल’ ओलांडून शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्यांचीच दाणादाण उडवली या बद्दल सविस्तर जाणून घेतल्या नंतर तो आदर द्विगुणित होईल यात तिळमात्र शंका नाही.

 

indian-army-surgical-strike-inmarathi
theweek.com

चला तर मग जाणून घेऊयात भारतीय सैन्याच्या या साहसी सर्जिकल स्ट्राईकची कहाणी..

२८ आणि २९ सप्टेंबर २०१६ ला भारतीय सैन्याच्या ‘पॅरा कमांडोज’नी पाकव्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी तळांवर हल्ले करत तब्बल ५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

या सर्जिकल स्ट्राईक मध्ये पॅरा रेजिमेंट च्या १९ कमांडोजनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.

चौथ्या आणि नवव्या बटालियनचा एक कर्नल, पाच मेजर, दोन कॅप्टन, एक सुभेदार, दोन नायब सुभेदार, तीन हवालदार, एक लांस नायक आणि चार इतर पॅरा कमांडोज यांनी मिळून या सर्जिकल स्ट्राईकला पार पाडले. सर्जिकल स्ट्राईकची योजना आखण्याचे काम कर्नल हरप्रित संधू यांना देण्यात आले होते.

योजनेअंतर्गत अमावस्येची रात्र स्ट्राईक साठी योग्य ठरवण्यात आली.

१८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री योजनेला मूर्त रूप देण्याचे ठरले. योजनेनुसार चौथ्या बटालियनचे ऑफिसर मेजर सूरी यांच्या नेतृत्वात ८ कमांडोजनी लाईन ऑफ कंट्रोल पार करून दहशतवाद्यांच्या तळापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला.

या कमांडोजनी दहशतवादी तळांच्या ५० मीटर पर्यंत जवळ जाऊन आधी २ दहशतवाद्यांना मारून पाडले. तदपश्चात त्या ठिकाणाला बेचिराख करून टाकत इतर दहशतवाद्यांना यमसदनी धाडले.

जवळच्याच जंगलात संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे मेजर सुरींनी आपला मोर्चा तिकडे वळवला, आपल्या जीवाची पर्वा न करता मेजर सुरींनी अत्यंत शिताफीने तिथे असलेल्या दोन दहशतवाद्यांना मारून टाकले.

या सोबतच अन्य एका मेजरने आपल्या टीम सहित सर्जिकल स्ट्राईकच्या ४८ तास आधीच सीमारेषा ओलांडून शत्रूवर देखरेख ठेवण्याचे काम पार पाडले होते, या टीम ने शत्रूच्या ठिकाणांचे नकाशे तयार केले. त्यांच्या शस्त्रास्त्रांची माहिती गोळा केली तसेच सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाल्यावर जवानांना सुखरूप भारतात पोहोचण्यासाठीचा मार्ग देखील शोधून ठेवला होता.

 

surgicalstrike-inmarathi
financialexpress.com

हल्ल्यादरम्यान या मेजरच्या टीमने दहशतवाद्यांचे एक शस्त्रागार नष्ट केले तसेच दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

दुसऱ्या शस्त्रागारातून आपल्या टीम वर जबरदस्त फायरिंग होत असल्याचे बघून या धाडसी मेजरने एकट्यानेच त्या शस्त्रागारावर हल्ला करत तिथे एका दहशतवाद्याला ठार केले आणि शस्त्रागार नष्ट केले. ज्यासाठी नंतर त्यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तिसऱ्या मेजरच्या टीमने दहशतवादी छावणीच्या अत्यंत जवळ जाऊन हल्ला केला आणि छावणीत स्थित १० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच दुसऱ्या टीमच्या कामांडोजना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवण्याचे कार्य देखील याच मेजरने पार पाडले होते.

चौथ्या मेजरने दहशतवाद्यांच्या एका शस्त्रागाराला ग्रेनेड ने उडवले ज्यात दोन दहशतवादी मारल्या गेले.

या पाच टीम पैकी एक टीम दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अडकून पडलेली असतांना पाचव्या मेजरने आपल्या जीवाची पर्वा न करता ३ ग्रेनेड लॉंचरने सज्ज असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला आणि त्यांना कंठस्नान घातले.

ही स्ट्राईक सोप्पी वाटत असली तरी प्रत्यक्षात ती तेवढी सोप्पी अजिबात नव्हती, पाकिस्तानी सैन्याचा डोळा चुकवून लाईन ऑफ कंट्रोल पार करणे, शत्रूच्या प्रदेशात आत घुसून दहशतवादी तळांवर हल्ला करणे सोपे काम नसते.

महत्वाचे म्हणजे या स्ट्राईक मध्ये भारताच्या एकाही कमांडोला आपले प्राण गमवावे लागले नाही, शत्रूचा पाठलाग करतांना एका कमांडोचा पाय ‘माईन’ वर पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली मात्र त्या कमांडोने हार न मानता अगदी शेवट पर्यंत स्ट्राईक मध्ये आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली.

 

armed.com

१९ जणांच्या या टीमच्या साहसाचा गौरव करण्यासाठी कर्नल हरप्रित संधू यांना ‘युद्ध सेवा मेडल’, मेजर सूरी यांना ‘कीर्ती चक्र’ आणि इतर कमांडोना चार ‘शौर्य चक्र’ आणि १९ ‘सेवा मेडल’ देण्यात आले.

भारताच्या दृष्टीने ही अत्यंत गौरवास्पद बाब होती, भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रत्येकाला या नंतर जबरदस्त प्रतिउत्तर दिला जाईल असा कठोर संदेश या स्ट्राईकच्या माध्यमातून दिला गेला.

ज्याचा प्रत्यय अगदी काल परवा २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी आला.

काही दिवसांपूर्वी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स च्या हवालदार नरेंद्र सिंह यांची पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमने अत्यंत निर्घृण हत्या केली होती. ज्याचा बदला घेण्यासाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका टीमने पाकिस्तानात घुसून हल्ला केल्याचे बी.एस.एफ. चे डायरेक्टर जनरल के.के.शर्मांनी सांगितले आहे.

मात्र हा हल्ला कशा प्रकारचा होता हे सांगण्यास त्यांनी टाळले असले तर लवकरच या हल्ल्या संबंधीचा तपशील पुढे येईल असा विश्वास देखील दिला आहे.

प्रत्यक्ष युद्धात भारतीय सैन्य नेहमीच पाकिस्तानी सैन्यापेक्षा वरचढ ठरलं आहे. पाकिस्तानच्या छुप्या कारवायांना देखील भारतीय सैन्याने जबरदस्त प्रतिउत्तर दिलेले आहे.

एवढे असूनही भारतीय सैन्य कधीही स्वतःहून शत्रूवर हल्ले करत नाही मात्र गोष्ट जेव्हा भारतमातेच्या सुरक्षेची असते तेव्हा हेच सैन्य अगदी शत्रूंच्या घरात घुसून त्यांना यमसदनी धाडण्यास देखील धजावत नाही. भारतमातेच्या अशा या शूर वीरांना इनमराठी टीम आणि वाचकांतर्फे ग्रँड सॅल्युट..!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतीय सैन्य झिंदाबाद! सर्जिकल स्ट्राईक दिनी, आणखी एक स्ट्राईक करून हुतात्म्याचा प्रतिशोध!

  • October 1, 2018 at 3:42 pm
    Permalink

    खूप छान वाटले

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?