भारतीय संघाचा पराभव, इतिहासाची पुनरावृत्ती नको रे बाबा! : द्वारकानाथ संझगिरी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

२५ जून ते २८ जून १९३२, भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्डस्ला पहिला कसोटी सामना रंगला. उत्तम खेळाचे प्रदर्शन करूनही आपण तो सामना हरलो. सध्याच्या स्थितीतही ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाहीये ना अशी शंका वाटत आहे.

ह्यावर प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी त्यांंच्या फेेसबुक पेजवर उत्कृष्ट कारणमीमांसा केली आहे.

ती इनमराठीच्या वाचकांसाठी पुढे देत आहोत-

 

आपण टी-20 मालिका जिंकली. वाटलं, लग्न जमलं. कसोटी मालिका जिंकून लंडनच्या सेंट जॉन्स कॅथेड्रेलमध्ये लग्न होणार.

पहिली वनडे जिंकली. लग्नाचा सूट शिवला.

वनडे मालिका हरली. लग्नाचा सूट ट्रायलच्या वेळीच उसवला. रफू करायची गरज आहे असं वाटायला लागलं. इथून लग्नापर्यंत कसोटीची पाच पावलं चालायची आहेत. काय होणार? अक्षता पडणार?

सूट उसवलाच कसा? कापड उच्च प्रतीचं नाही, की शिंप्याच्या चुका झाल्या. जगातल्या सर्वोत्कृष्ट ब्रॅण्डस्ना टक्कर देणाऱया कंपनीचं असं काय झालं?

त्याची थोडी काही मीमांसा अशी –

 

englandvs india-inmarathi05
financialexpress.com

हिंदुस्थानी संघाचं क्षेत्ररक्षण सर्वच सामन्यांत रद्दी झालं. अलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गलथान क्षेत्ररक्षणाला क्षमा नाही. सीमारेषेजवळ किंवा इतरत्र कुठेही उंच झेल हे आता ‘परीक्षा’ या सदरातही मोडत नाहीत. तो रोजचा अभ्यास आहे.

दीड महिना आयपीएल खेळूनही तो कच्चा कसा राहिला हे गूढ आहे.

बरं, मैदानातून चेंडू यष्टिरक्षकाकडे किंवा गोलंदाजाकडे जाणं हा सध्या पत्राचाच काय, कुरीयर सिस्टमचा भाग राहिलेला नाही. अगदी पूर्वी चेंडू रमतगमत पत्रासारखा यायचा.

मग कुरीयरचा वेग त्याला आला. आता मेसेजचा वेग आणि अचूकता लागते. ती आपल्याकडे नव्हती. चेंडू अडवण्यासाठी खेळाडूंनी ड्राइव्ह मारल्या.

पण तो चेंडू अडवण्यापेक्षा अडवण्याच्या अभिनयाचा भाग वाटला.

कॅमेरा आपल्याकडे रोखलेला आहे ही जाणीव प्रत्येक खेळाडूला असते. त्यामुळे चेंडू गलथानपणामुळे सुटल्यावरही अभिनय करावा लागतो. थोडक्यात, ‘प्रयत्न केल्याची’ भावना सर्वत्र पोहोचावी ही अपेक्षा त्या ड्राइव्हज्मागे होती.

 

englandvs india-inmarathi

एकंदरीत हिंदुस्थानी संघाचं इतकं गचाळ क्षेत्ररक्षण मी खूप दिवसांनी पाहिलं. त्याबद्दल आधी मी लिहिलंसुद्धा होतं.

आपल्या यशाची किल्ली ‘कुलदीप यादव’ होती. जी तीन कुलुपं आपण उघडली, ती प्रामुख्याने या किल्लीने! मग कडीकोयंडे काढण्याचं काम फलंदाजांनी केलं. यावेळी ‘मास्टर की’चा इंग्लिश फलंदाजांनी नक्कीच अभ्यास केला. तसा तो अपेक्षित होताच.

आज स्क्रीनवर प्रत्येक चेंडूचे राई राईएवढे तुकडे करणे सोपे असल्याने कुलदीपच्या गोलंदाजीचा ‘रॅपिड कोर्स’ घेण्यात आला असावा आणि त्यात इंग्लंडचा आणि जगातला एक उत्कृष्ट फलंदाज पहिला आला…

तो होता जो रूट.

पहिल्या दोन-तीन सामन्यांत जो रूटला कुलदीपचा चेंडू धुक्यात घेऊन गेला होता. त्याचा कधी गुगली, कधी चायनामेनने वेध घेतला होता. पण रूटने आपली हुशारी, आपली गुणवत्ता आणि दर्जा पणाला लावला. फिरकी गोलंदाजी खेळताना त्याने बॅटिंग क्रिझचा मागे जाण्यासाठी सुंदर उपयोग केला.

त्याचं क्रिझमधलं फुटवर्क किंवा पुढे जाऊन फटका खेळणं, मधेच एखादा स्वीप मारणं हे डोळे चोळायला लावणारं होतं.

मुख्य म्हणजे, कुलदीपला ‘किस चिडिया का नाम है’ म्हणत फेकून देण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला गरज पडेल तेव्हा बचावात्मक आदर दाखवला, पण विकेटस् दिल्या नाहीत.

आता त्यातून शिकायची पाळी कुलदीपवर आहे. आणि धावा वसूल करायला वेगवान गोलंदाज होतेच. दुखापतीतून सावरलेला भुवनेश्वर कुमार अजून सावरायचाय.

त्याच्या प्रसिद्ध त्या स्विंगचा शोध घेण्यासाठी ‘आपण यांना पाहिलंत काय?’ जाहिरात द्यायची गरज आहे.

इंग्लिश फलंदाजांचा प्राण हा आखूड टप्प्याच्या चेंडूत आहे, हे आपल्या इतर नवख्या गोलंदाजांना कुणी सांगितलं? की पुढे टाकला तर ड्राइव्हची भीती त्यांना सतावत होती? बेअरस्ट्रॉ, रूट, मॉर्गनच्या वाढदिवसालासुद्धा इतकी आखूड टप्प्याच्या चेंडूची प्रेझेंटस् त्यांना कुणी पाठवली नसतील.

त्यामुळे चेंडू इतक्या वेगात सीमापार होत होता की, उसेन बोल्टलाही कॉम्प्लेक्स आला असेल.

 

englandvs india-inmarathi01

 

उरली फलंदाजी!

अचानक मधली फळीच पळून गेल्यासारखी वाटते. धक्कादायक म्हणजे, गेल्या दोन मॅचेस्मध्ये धोनी हा ‘शेपटाचा भाग’ वाटला. पंडय़ा कधी ‘धड’ असतो कधी ‘शेपूट.’

त्यामुळे जाऊन येऊन डोळे लागतात धवन, रोहित, कर्णधाराकडे!

धवन फॉर्मात आला म्हणायला आणि बाद व्हायला एकच गाठ पडते. रोहित एक दिवस ‘सम्राट’ असतो, रोल्स रॉईसमधून फिरणारा. दुसऱया दिवशी होंडात दिसतो. आणि तिसऱया दिवशी बसच्या लायनीत!

आता मॅच असती तर पुन्हा सम्राट वाटला असता. त्याचा दिवस असताना जगातल्या सर्वोत्तम फटक्यांच्या ‘क्राउन ज्युएल्स’चा तो मालक वाटतो. नाहीतर असा बाद होतो की, शाळेच्या मास्तरनेही वर्गाबाहेर उभं करावं.

बरं, यापेक्षा एक गोष्ट जिव्हारी लागली.

गेल्या दोन सामन्यांत इंग्लिश फिरकी गोलंदाजीने आपल्याला नामोहरम केले. एक मोईन, दुसरा रशीद! जणू एक प्रसन्ना, दुसरा सुभाष गुप्ते!

इंग्लंडमध्ये स्विंग, सिम, अगदी बाऊन्सने आपल्या फलंदाजांना दाती तृण धरून शरण आणणं आपण समजू शकतो. त्याला पिढय़ान् पिढय़ांचा इतिहास आहे. पण फिरकी गोलंदाजीचा पेपर आपल्याला जड जावा?

म्हणजे आचार्य अत्रेंनी नाटकाचा पेपर टाकून उठावं, असं आहे.

एक जुना किस्सा सांगतो.

१९३२ साली हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये लॉर्डस्ला पहिला कसोटी सामना खेळला. आपल्या निस्सार-अमरसिंग या वेगवान जोडीने उत्तम गोलंदाजी टाकली. पण आपण हरलो.

englandvs india-inmarathi02
newsin.asia

कुणी हरवलं? तर लेगस्पिन गोलंदाजांनी. आपल्याला हरण्याला निमित्त लागते.

नको रे बाबा इतिहासाची पुनरावृत्ती!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?