डोकलाम : चीनची माघार आणि भारताचा कुटनितीक विजय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

लेखक : प्रवीण कुलकर्णी

===

शत्रूला नामोहरम करण्यासाठी चाणक्याने साम, दाम, दंड आणि भेद ही चतुःसूत्री सांगितली आहे. साम आणि दाम याचा उपयोग कमकुवत राजांनी करावा तर शक्तीशाली राजांनी दंड व भेद याचा वापर करावा असा सल्ला दिला आहे. सैन्य क्षमतेच्या दृष्टीने दुर्बळ आणि सबळ राजे आपल्या सोयीप्रमाणे या चतुःसूत्रीतल्या कोणत्याही तीन सूत्रांचा नेहमीच वापर करतात. क्वचित प्रसंगी सर्व चारही सूत्रं वापरल्याचं दिसतं. आपल्या देशाच्या सामरीक व व्यापारी हितासाठी अनेक देशांशी वेगवेगळे करार केले जातात. परस्परावलंबी व्यवस्था निर्माण करून उभय देशांचा सर्वांगीण विकास साधला जातो.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरु झाला. सन १७१३ मध्ये मुघलांच्या वतीने सय्यद बंधू व मराठ्यांच्या वतीने पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यात करार झाला. त्यानुसार मराठ्यांना सहा प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळाले त्या बदल्यात मुघल साम्राज्यावर म्हणजेच दिल्लीवर आक्रमण झाल्यास मराठे आपल्या सैन्यासह मुघलांचे रक्षण करतील असे ठरले. १७१३ चा हा तह मराठ्यांनी १७६१ मध्ये पानिपतच्या लढाईत पाळला.

चीन हा विस्तारवादी देश आहे. माओच्या नितीप्रमाणे येनकेनप्रकारे आजूबाजूचे छोटे देश गिळंकृत करणे हा त्याचा एककलमी कार्यक्रम आहे. चीनचा आपल्या शेजारील अनेक देशांशी सीमावाद आहे. दुसऱ्या देशातील प्रदेश चीन आपलाच मानतो. याच साम्राज्यवादी भूमिकेतून चीनने तिबेट गिळंकृत केला. तेव्हा भविष्यात तो भारताचे लचके तोडू शकतो ही बाब दुर्दैवाने त्यावेळी आपल्या राज्यकर्त्यांच्या लक्षातच आली नाही. आपण गाफील राहिलो.

china-india-marathipizza01
coalpost.in

परीणामी १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले व अरुणाचल प्रदेशाचा साठ हजार चौरस किलोमीटर भाग हडपला. पुढे मूळ भारताचा भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मीरचा एक मोठा तुकडा त्याने पाकिस्तानकडून हस्तगत केला. ईशान्येकडील सर्व राज्ये ही त्यांचाच भाग असल्याची त्याची धारणा आहे. चीनची भारताचे सत्तावीस तुकडे करण्याची दुष्ट योजना आहे. त्यामुळेच पाकिस्तान प्रायोजित अतिरेकी कारवायांना त्याची सर्वतोपरी मदत असते. पण १९६२ च्या युद्धापासून आपण सावध झालो व डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचे रक्षण करू लागलो आहोत.

भारताचे लचके तोडण्याच्या कुटील हेतूने व साम्राज्यविस्ताराच्या या अट्टाहासापायी चीनने आता भूतानला आपले लक्ष्य बनवले आहे. या रणनितीचा भाग म्हणून त्याने भूतानच्या हद्दीतल्या प्रदेशात रस्ता बांधायला सुरवात केली. तेव्हा भूतानने याचा विरोध केला. परंतु चीनच्या तुलनेत भूतानचे सामर्थ्य नगण्य असल्याने चीनने त्याच्या विरोधाला जुमानले नाही. तुटपुंजे सैन्यबळ आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा अभाव असल्याने सामर्थ्यशाली चीनपुढे भूतानचा निभाव लागणार नाही हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे चीनी सेना भूतानचा घास घेण्यासाठी टपली आहे.

वर सय्यद बंधू व पेशवे यांच्यात झालेल्या तहाचा उल्लेख आला आहे. तसाच एक करार भारत व भूतान या देशादरम्यान झाला आहे. भूतानवर परकीय आक्रमण झाल्यास भारत भूतानचे रक्षण करील असा तो करार आहे. भूतानचा विरोध डावलून चीनने त्याच्या हद्दीत रस्त्याचे काम चालूच ठेवले ही बाब भूतानने भारताला सांगितली. चीनच्या भूतानच्या हद्दीतील रस्त्यामुळे भारताच्या सिलिगुडी कॉरीडॉरला नुकसान होऊ शकते. तसेच चीनने भूतान गिळंकृत केल्यास त्याचा भारताच्या ईशान्य भागाच्या संरक्षणाच्या दृष्टीने विपरीत परीणाम होऊ शकतो. म्हणून करारानुसार भारत भूतानच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. या प्रकरणात भूतान एकटा पडेल व तिबेट गिळला तसा भूतान गिळता येईल ही चीनची आशा फोल ठरली. भारत एवढी खंबीर भूमिका घेईल व ठामपणे भूतानच्या बाजूने उभा राहील हे चीनला अपेक्षितच नव्हते.

India-Bhutan-marathipizza
futuredirections.org.au

लोकी लोक मेळविले।तेणे अमर्याद जालें।भूमंडळी सत्ता चाले।गुप्तरूपे।।

असं समर्थ रामदासस्वामींचे एक वचन आहे. राजकारणात गुप्तता अत्यंत आवश्यक असते. लोक जोडावे लागतात,संकल्पसिद्धीसाठी त्यांची मोट बांधावी लागते.

चीनचे कुटील मनसुबे हाणून पाडण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यापासून अनेक देशांचा दौरा केला. त्यांच्याशी संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान विषयक करार केले व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेचे समर्थन करणारे मित्रदेश निर्माण केले. शपथविधीच्या वेळी भारतीय उपखंडातील सर्व देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले. त्यांना एकत्र करून त्यांची पाकिस्तानविरुद्ध मोट बांधली. अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या विरुद्ध उभे केले. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा एल्गार केला. श्रीलंका, नेपाळ व बांगलादेश या चीनच्या वळचणीला जाऊन बसलेल्या देशांना चीनपासून तोडले व पुन्हा भारताशी जोडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले. पाकिस्तान एक दहशतवादी देश असून त्याला चीनचे पाठबळ आहे ही गोष्ट जगाने मान्य केली.

म्हणूनच डोकलाम प्रकरणात अमेरीका, जपान सारख्या देशांनी भारताला उघड समर्थन दिले. अतिशय धिरोदात्तपणे सगळी परिस्थिती हाताळली.

narendra-modi-marathipizza
indianexpress.com

युद्धजन्य स्थितीत आवश्यक शस्त्रसज्जता, आंतरराष्ट्रीय जनमानस भारताच्या बाजूने उभे करणे, व्यापारात चीनची आर्थिक नाकेबंदी व कुटनीती याचा प्रभावी वापर भारताने केला. उपखंडात भारत हाच मोठा भाऊ आहे ही गोष्ट सिद्ध झाली. त्यामुळेच आज अडीच महिन्यानंतर चीनने डोकलाम मधून सपशेल माघार घेतली आहे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?