लैंगिक क्षमता वाढवण्याच्या ६ ऑथेंटिक आणि आरोग्यपूर्ण टिप्स
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लैंगिक संबंध आणि त्या अनुषंगाने येणारे इतर विषय आजही आपल्याकडे अस्पृश्य मानले जातात. लैंगिक शिक्षण देण्याच्या बाबतीत तर उघड विरोध सामाजिक पातळीवर दिसून येतो. त्यामुळे तरुण आणि प्रौढ या दोन्ही पिढ्यांमध्ये लैंगिक गोष्टींबाबतचे अज्ञान प्रकर्षाने जाणवते.
“शिस्तशीर समाजा” च्या चौकटीत राहण्याचा वृथा सोस या अज्ञानाला कारणीभूत आहे.
अश्लीलता या एका भीतीपोटी आवश्यक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे थेट कानाडोळा केला जातो, आणि त्यातून अनेक गैरसमज जन्माला येतात.
मग त्यामुळेच “मर्दाना ताकद बढाने के लिये हर मंगलवार मिले” अशा पाट्या मोकळी जागा दिसेल तिथे चिटकावून अनैसर्गिक उपाय सांगून मजबूत पैसा कमावणाऱ्या बाबा बुवांची संख्या वाढते.

वास्तविक लैंगिक ताकद वाढवणे वगैरे या गोष्टींचा संबंध थेट अश्लीलतेशी लावून तो विषय निकालात काढणारेही कधीतरी हे उपाय जाणून घेण्याच्या मार्गाला जातात हेही वेगळे सांगायला नको.
पण ते उपाय नैसर्गिक असावेत आणि आरोग्यास हानिकारक नसावेत ही खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी चुकीचे उपाय न अवलंबता काय करता येईल? त्यापैकी काही गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
१. क्षमतेच्या बाहेर जाऊन टिकून राहण्याचा दबाव टाळा
संभोगादरम्यान जास्त काळ टिकून राहणे ही आपल्याकडे “ताकदवान” असण्याची खूण मानली जाते. ही धारणा मुळात चुकीची आहे आणि अशीच गैरसमजातून पसरलेली आहे. याने होते असे की “पुढे आपण किती काळ टिकून राहू” या दबावापोटी व्यक्ती संभोगाचा अनुभव खराब करून घेते.

त्या काळजीने येणारा न्यूनगंड हळूहळू तुमची ताकद कमी करतो. हे लैंगिक ताकद कमी असण्याचे एक महत्वपूर्ण कारण आहे. त्यातूनच उत्तेजक द्रव्यांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम लगेच जाणवला तरी दीर्घकालीन क्षमतेसाठी ते घटक असते.
त्यामुळे शारीरिक संपर्कादरम्यान क्षमतेच्या बाहेर जाऊन टिकून राहण्याचा दबाव टाळा.
२. संभोगापूर्वीची कामक्रीडा महत्वाची आहे
वात्सायनाच्या कामसुत्रात त्याने संभोगापूर्वीच्या कामक्रीडेला विशेष महत्व दिले आहे. याला वैद्यकीय कारण आहे. संभोगाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी लैंगिक अवयव ओलसर असणे अत्यंत महत्वाचे असते. याला डॉक्टरी भाषेत lubrication (स्निग्धीकरण) असे म्हणतात.
स्निग्धीकरण झालेले नसेल तर संभोगाच्या दरम्यान लैंगिक अवयवांना इजा होण्याची दाट शक्यता असते.

कामक्रीडेदरम्यान विशिष्ट प्रकारचा द्रव स्त्रवत असतो. हा द्रव स्निग्धीकरणाचे काम करतो. आणखी एक कारण म्हणजे संभोगाच्या क्रियेसाठी शरीराला आणि मनाला तयार करण्याचे, एकमेकांच्या क्षमता जाणून घेण्याचे काम संभोगापुर्वी केलेल्या कामक्रीडेतून साध्य होते.
३. दारू आणि सिगारेटच्या व्यसनावर नियंत्रण ठेवा
दैनंदिन जीवनातल्या अनेक सवयींचा आपल्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होत असतो. त्यातली सर्वात जास्त प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे दारू आणि सिगारेट सारख्या व्यसनांचे प्रमाणाबाहेर सेवन करणे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम तर होतोच, पण लैंगिक क्षमतेवरही ही व्यसने अपायकारक परिणाम करतात.
अल्कोहोल प्रामुख्याने मध्यवर्ती चेतासंस्थेच्या कार्यात अडथळा आणण्याचे काम करते.

संभोगादरम्यान व्यक्ती उत्तेजित होण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या टेस्टोस्टेरोन आणि अड्रेनलीन सारख्या हार्मोन्सच्या स्त्रवण्याच्या प्रक्रियेत अल्कोहोलच्या मात्रेमुळे बाधा येते. अल्कोहोलमुळे लैंगिक क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याचे हे प्रमुख कारण आहे.
४. संभोगादरम्यान तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी जाणून घ्या
लैंगिक संपर्काच्या दरम्यान प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे व्यक्तीला काही गोष्टी हव्याहव्याश्या वाटतात. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. त्याने उत्तेजनासाठी आवश्यक असणाऱ्या हार्मोन्स च्या स्त्रवणकार्यांत मदत होते.
hindustantimes.com
आणि महत्वाचे म्हणजे लैंगिक संबधात एक प्रकारचा सहजपणा येतो. ही गोष्ट तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि परमोच्च आनंदाच्या क्षणाचा काळ वाढवण्यासाठी महत्वाची ठरते.
५. कायम क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करा
दैनंदिन जीवनात कायम कृतीशील राहणे तुमच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी आवश्यक आहे. रोज नियमित व्यायाम करणे – हा त्याचा उत्तम मार्ग. रक्ताभिसरणाची प्रक्रिया तुमच्या शरीरात जितकी सहजपणे होत राहील तितकी तुमची लैंगिक क्षमता समृध्द राहील.
सकस, पौष्टिक अन्न – हा देखील व्यायामाप्रमाणेच फक्त तंदुरुस्त शरीरासाठी आवश्यक भाग नसून, लैंगिक क्षमतेवर प्रभाव पडणाराही आहे. आणि बरोबरीने, शांत, पुरेशी झोप…!

नियमित व्यायाम, चौरस आहार, पुरेशी झोप या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास कोणताही अनैसर्गिक उपाय करण्याची गरज उरणार नाही.
६. संभोगाची वारंवारिता नियंत्रणात ठेवा
लैंगिक क्षमतेचे शिखर गाठण्यासाठी ठराविक काळानंतर संभोग करत राहणे जितके गरजेचे आहे, तितकाच त्याचा अतिरेक होऊ न देणे गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीतील रस ती जास्त वेळा केल्याने हळुहळू कमी होत जातो असे म्हणतात.

हे लैंगिक क्षमतेच्या बाबतीतही जसेच्या तसे लागू होत असते. त्यामुळे संभोगाची वारंवारिता खूप कमी किंवा खूप जास्त होणे लैंगिक क्षमतेच्या दृष्टीने विपरीत परिणामकारक आहे.
क्षमतेत वृद्धी होण्यासाठी हे काही सोपे उपाय आहेत.
वात्सायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथात वैद्यकीय चिकित्सेच्या दृष्टीने लैंगिक संबध आणि एकंदरीतच लैंगिक आयुष्याच्या दृष्टीने उपयुक्त माहिती आलेली आहे. हा ग्रंथ सहज उपलब्ध आहे.
अनैसर्गिक आणि अंधश्रध्द उपायांच्या आहारी जाण्यापेक्षा त्या नैसर्गिक उपायांचा अवलंब करून लैंगिक क्षमता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे जास्त सोयीचे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.