भारतातल्या राजकारणी बाबूंनी नवीन वर्षाचे हे संकल्प घेतले तर भारतीय त्यांचे मनापासून आभार मानतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

चांगल्या वाईटाच्या बेरीज वजाबाकीसह २०१८ हे वर्ष संपले. नवीन स्वप्न आणि आव्हान घेऊन २०१९ हे नवे वर्ष उजाडले आहे.

नव्या वर्षात प्रत्येकाचे काही आपल्यापुरते असे संकल्प असतीलच. मात्र असे काही संकल्प आपल्या देशातील राजकारणी करत असतील का?

त्यांनी स्वतःसाठी काही संकल्प जरूर करावेत, पण काही संकल्प देशातील जनतेच्या हितासाठी केले तर भारतीय जनता त्यांचे मनापासून आभार मानेल.

हे संकल्प फार काही कठीण नाहीत किंवा कोणत्या पक्षाच्या विचारसरणी विरुद्ध देखील नाही. पण देशाच्या फायद्याचे मात्र नक्की आहे.

 

 

काय आहेत ते संकल्प जे राजकारण्यांनी जरूर करावेत?  

१)  पाश्चात्त्यांना दोष देणे थांबवा.

काळ बदलतो तशा चालीरितीही बदलत असतात. नवीन विचारांची देवाण-घेवाण होत असते. नवी पिढी त्याला सहज सरावते आणि मग राजकारणी पाश्चात्त्य संस्कृतीच्या  आक्रमणाच्या नावाखाली पाश्चात्त्यांना दोष देत असतात.

याचा अतिरेक होतांना दिसतो आहे. राजकारण्यांनी हे टाळून आपल्या समाजातील दोष दूर करण्याचे प्रयत्न केले तरी प्रश्न  सुटतील.

२) धार्मिक कारणावरून हिंसा करण्यास अटकाव करा. 

धार्मिक कारणावरून दोन गटात तेढ निर्माण होते त्याला राजकारण्यांनी खतपाणी घालू नये. स्वतःचे प्राबल्य वाढवण्यासाठी अशा घटनांचा आधार घेऊन आपली पोळी शेकण्याचे  राजकारण आजवर सर्वांनीच पाहिले आहे.

असे हीन राजकारण न करता दोन गटात वाद झाल्यास शांतता कशी नांदेल यासाठी पुढाकार घ्यावा.

३)  तृतीयपंथीयांना आदराने वागवा

तृतीयपंथी हे देखील समाजाचा एक घटक आहे.

कधी भाषणात टाळ्या मिळवण्यासाठी तर कधी स्वतः चा मर्दपणा दाखवण्यासाठी जाहीरपणे त्यांची हेटाळणी करणे हे आता तरी थांबायला हवे.

तुमचं नेतृत्व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालत असेल तरी ते सिद्ध होईल. तेव्हा  राजकारण्यांनी तृतीयपंथीयांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या देखील आदराने वागले, तरी समाजापुढे एक आदर्श असेल.

४) बलात्कारांचे समर्थन करू नका. 

बलात्कारा सारख्या ओंगळवाण्या घटना समाजात घडत असतात. जाणते-अजाणतेपणी नेते या घटनांची समर्थनही करताना दिसतात. अशी काही उदाहरणे गेल्या वर्षात घडली.

राजकारण्यांनी एखादी बाजू घेण्याच्या नादात बलात्काराचे समर्थन चुकूनही करू नये.

५) स्त्रियांनी कसे वागावे हे ठरवू नका. 

स्त्रियांनी कसे वागावे, कोणते कपडे घालावे, त्यांची जीवनशैली कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार त्यांना स्वतःला आहे.

आपले नेतेपण मिरवण्याच्या नादात स्त्रियांनी काय करावे, काय करू नये हे सांगणे टाळले तर स्त्रियांच्या अजून भरपूर समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्याला अधिक वेळ मिळेल.

६) अतार्किक कारणावरून सणांवर बंदी घालू नका. 

आपल्या देशात विविध धर्मांचे लोक नांदत आहेत.

 

 

कुठल्याही सणांवर काही अतार्किक कारण दाखवून बंदी घालण्याचा प्रयत्न करू नका.

सणात सहभागी होणे अथवा न होणे ही आपली निवड आहे, पण बंदी हा काही पर्याय नाही.

७)  नैतिक पोलिस बनू नका. 

समाजाच्या दृष्टीने काय चांगले आहे काय वाईट आहे याबाबत आपला दृष्टिकोन आपण सांगू शकता. तो आपल्या  अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण त्यासाठी कृपया पोलिसगिरी करू नका.

त्यापासून लांब राहा. जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर पोलीस प्रशासन  त्यामध्ये हस्तक्षेप करेल.

८) आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध कटकारस्थान करू नका. 

राजकारणात सत्तास्पर्धा नेहमी चालू असते कधी ती विरोधकांत सोबत असते तर कधी स्वकियांविरूद्धच! पण हे करत असतांना उगीच कटकारस्थान करू नका.

विरोधी पक्षातील असो वा स्वपक्षातील, लोकशाहीत हे सर्व लोकप्रतिनिधी आपले सहकारी असतात याचे भान राखून कटकारस्थान करणे टाळा.

कटकारस्थान मुळे कुणाचा फायदा कुणाचा तोटा होईल हे सांगता येत नाही, पण जनतेच्या हाती मात्र यातून काहीच लागत नाही.

९) कालबाह्य विचारांना प्रोत्साहन देऊ नका. 

प्रसिद्धीच्या नादात राजकारणी जुनाट विचारांना विनाकारण जखडून बसलेले असतात. लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवावे अथवा न ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

तेव्हा राजकीय नेते या मुद्द्यावरून चारित्र्य प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. हे टाळले तर आपले हसू होणार नाही हे नेत्यांनी लक्षात घ्यावे.

१०)  तरुणांना विनाकारण उपदेशाचे डोस देऊ नका. 

प्रत्येक पिढीतला तरुण काळाप्रमाणे बदलत असतो. नवीन विचार, नवीन जीवनशैली आत्मसात करून मार्गक्रमण करत असतो.

नेत्यांनी तरुणांना मार्गदर्शन जरूर करावे पण जे स्वतःला पटत नाही ते तरुणांसाठी अनावश्यक आहे हा भ्रम मात्र बाळगू नये. विनाकारण उपदेशाचे डोस देऊन काहीच साध्य होत नाही.

त्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या समस्या समाजात आहेत, तरुणांना सोबत घेऊन त्याचे निराकरण केले जाऊ शकते.

 

youth-inmarathi02
hindustantimes.com

११) आजच्या प्रश्नांवर धर्मिक ग्रंथांचे संदर्भ देऊ नका. 

लैंगिक स्वातंत्र्य असेल अथवा समलिंगी संबंध, पवित्र धर्मग्रंथातील आधार घेऊन या गोष्टींना विरोध केला जाऊ नये.

कदाचित विरोध करण्याचा राजकारणी लोकांसाठी हा सोपा मार्ग असेल. मात्र यामुळे संबंधित व्यक्तींमध्ये अपराधीपणाची भावना तर बळावते शिवाय पवित्र ग्रथांमध्ये प्रत्येक समस्येचे निराकरण असेलच असे नाही.

तेव्हा आजचे प्रश्न सोडविण्यासाठी आजच्या कायद्यांचा आधार घ्या.

१२)  लोकप्रिय घोषणांचा मोह टाळा. 

निवडणूक जिंकण्याचा सोपा मार्ग म्हणजे लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडणे हा झाला आहे.  आजच्या राजकारणात हा साथीचा रोग प्रत्येक पक्षाला झाला आहे.

अल्पकाळासाठी या घोषणा फायद्याच्या वाटत असल्या तरी त्यातून अंतिम समाधान कधीच निघत नाही. हे समाजासाठी घातक आहे.

देशाच्या समस्या सोडविण्यासाठी निवडलेला शॉर्टकट समाजाला अधिक दुबळं करतो आहे. तेव्हा राजकीय नेत्यांनी दूरदृष्टी दाखवत लोकप्रिय घोषणांचा मोह टाळावा.

१३) करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करू नका. 

देशाचा नागरिक कष्टाने कमावलेल्या पैशातून देशाच्या विकासासाठी कररूपाने हातभार लावत असतो.

 

multiplicity-of-taxes-marathipizza

लोकांचे प्रतिनिधी म्हणून राजकीय नेत्यांनी राज्याची, देशाची तिजोरी काटकसरी गृहिणीप्रमाणे हाताळावी.

कधी स्वतःसाठी अधिक सोयीसुविधा, तर कधी जनतेच्या भावनेला आव्हान करून पुतळ्यांची भावनेचं राजकारण करून उभारणी, महोत्सवाच्या नावाखाली पैशांची होणारी उधळपट्टी टाळली पाहिजे.

हा जनतेचा पैसा आहे, तो जनतेच्या हितासाठीच कामात यावा याचा विचार करून उधळपट्टी होणार नाही ही दक्षता घ्यावी.

१४) कलेला आडकाठी करू नका. 

कुठल्याही मोकळे वातावरण असणाऱ्या समाजात कला, साहित्य यांना आडकाठी करणे ही समाजाला मागे नेण्याची लक्षण आहे.

तेव्हा पर्यायी सेन्सॉर बोर्ड न बनता चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी आमची परवानगी घ्या अशा सरंजामी मानसिकतेतून बाहेर पडणे राजकीय नेत्यांना आवश्यक आहे.

१५) कुठल्याही आणि प्रत्येक घटनेवर भावना दुखावून घेऊ नका. 

विविधतेतून एकता हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे.

तेव्हा कुठेही काही आपल्या चालीरीती विरुद्ध विपरीत झाले आणि कधी कधी तर काही झाले नाही तरी राजकीय नेते आपल्या भावना दुखावून घेत असतात आणि जनतेलाही यात सामील करून घेतात.

तेव्हा उदारता दाखवत भावना भडकावण्याच्या खेळात सहभागी होऊ नये आणि इतरांनाही त्यापासून रोखावे.

१६)  भ्रष्टाचार करू नका. 

भ्रष्टाचार आणि राजकीय जीवन हे तर एका नाण्याच्या दोन बाजू  आहेत, इतपत राजकारणी त्यात गुंतले आहेत. हे चित्र निर्माण करण्यात ते स्वतःच जबाबदार आहेत.

तेव्हा भ्रष्टाचारापासून दूर जाण्याचा संकल्प राजकारण्यांनी नक्कीच करावा.

 

corruption-marathipizza05

 

 

१७) शोषितांना लज्जित करू नका. 

समाजात अप्रिय घटना होत असतात. कधीतरी राजकीय नेते बोलण्याच्या ओघात त्यांची ओळख उघड करतात तर कधी अशा घटनांसाठी शोषितांना जबाबदार धरतात.

कुठल्याही जबाबदार नेत्याला हे वागणे शोभणारे नाही. असे वक्तव्य करून राजकीय नेते शोषितांना लज्जित करत असतात.

शोषितांना आधार देणे,त्यांचे समाजात स्थान निर्माण करणे यात राजकारण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित असते.

१८) बोलण्याआधी तथ्य जाणून घ्या. 

राजकारणी बोलतात फार, ही तर एक समस्याच झालेली आहे. त्यामुळे विनाकारण वाद निर्माण होऊन मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत असते.

एखादी बाब सत्य आहे अथवा असत्य याची पडताळणी न करता आपल्याला सोयीचे ते बोलताना दिसत असतात. तेव्हा सर्वपक्षीय राजकारण्यांनी  बोलण्याआधी सत्य जाणून घेतले तर निदान नवीन समस्या तरी निर्माण होणार नाही.

१९) पूर्वग्रह टाळा. 

ज्यांनी मत दिले आहे त्यांचेच काम करणार, सार्वजनिक जीवनात कामे करताना तो आपला आहे का परका, असे पूर्वग्रह न पाळता समाजासाठी काम करण्याची आवश्यकता असते.

मात्र राजकीय नेते पूर्वग्रहदूषित विधान असो व आपले मत मांडताना पूर्वग्रह बाळगून अनुकूल प्रतिकूल मत देत असतात.

वर दिलेले एकोणवीस संकल्प राजकारण्यांनी अमलात आणले तर त्यांचा फायदा तर होईलच शिवाय जनताही याबद्दल राजकारण्यांचे आभार व्यक्त करेल.

अर्थात २४ तास बातम्या चालवण्यासाठी वृत्तवाहिन्यांना नवीन काही शोधावं लागेल पण त्यात सर्वांचे हित आहे. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?