“तुम्हारी सुलू”चा दुर्लक्षित पैलू – वयाच्या तिशीत, बदलांना सामोरे जाणाऱ्या तरुणाईचा प्रवास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक: श्रीनिकेत देशपांडे 

===

बदल हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी त्याला सामोरे जाणे तितके सोपे नाही. गेल्या १५ वर्षात तंत्रज्ञानामुळे सामाजिक बदल इतका झपाट्याने घडला आहे की सध्या तिशीत असलेली पिढी अनेक आघाड्यांवर त्यामुळे गोंधळलेली आहे.

मागच्याच आठवड्यात तुम्हारी सुलू सिनेमा बघितला आणि असे वाटले की हा सिनेमा जितका विद्या बालन चा आहे त्याहून जास्त तिच्या नवऱ्याचा आणि या कंफ्युज्ड थर्टीज् वाल्या पिढीचा आहे.

लहान वयात आर्थिक जबाबदारी अंगावर आली की करिअर फ्रंट कडे दुर्लक्ष होते आणि ते करेक्ट करायला पुढची किमान दहा बारा वर्षे जावी लागतात आणि तेही सर्वांना जमेल असे नाही. आपण मागे पडलो याचे दुःख या सिनेमातल्या अशोकला म्हणजे सुलुच्या नवऱ्याला असावे असे वाटतेे पण जोडीदार मनासारखी असल्याने तो त्याची फारशी तक्रार करतांना दिसत नाही.

 

manav-kaul-in-tumhari-sulu-inmarathi
resize.indiatvnews.com

एका छोट्या गारमेंट फॅक्टरी मध्ये बारा वर्षांपासून मॅनेजरचा जॉब करणारा आणि विरारला 1bhk फ्लॅट मध्ये राहणारा अशोक दुबे रोज मुंबईत अपडाऊन करत असतो. त्याला आपल्या बायकोच्या ऍक्टिव असण्याचे कौतुक आहे.

तिच्या बालिश आयडिया तो कधीच झिडकारून लावत नाही, तिच्या घरच्यांसमोरही तो तिच्याच बाजूने उभा असतो. त्याच्या घरचे आपल्याला दिसत नाहीत हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.

आपल्या बायकोची धडपड समजून घेताना तिला प्रोत्साहन देणारा अशोक जेव्हा तिला कामात सूर गवसतोय असे दिसते तेव्हा तिच्या पायात सेकंड बेबी ची बेडी अडकवायला बघतो आणि त्याचा आपल्याला राग यायला लागतो.

स्टोरीचा हा भाग इतका प्रामाणिक आहे की प्रत्येकाला यात आपले जवळपासचे लोक आणि आपण स्वतः दिसू शकतो पण ते कदाचित दिग्दर्शकाला अपेक्षित नसल्याने हा भाग आपल्या इंटरप्रिटेशनवर सोडून दिला आहे.

पुढे सुलुच्या कामाला गती येते आणि अशोकच्या कामाला ब्रेक लागतो.

 

tumhari-sulu-inmarathi
youtube.com

कामाच्या ठिकाणी काही वर्षांनी आपण इर्रेलेव्हेण्ट होण्याचे सध्या दिवस आहेत. पूर्वीसारखे एकच एक काम आयुष्यभर करणे कोणालाही शक्य असेल असे वाटत नाही. याच नियमाला अनुसरून अशोकच्या डोक्यावर त्याच्या कंपनीच्या मालकाचा नातू बॉस म्हणून येतो आणि अशोकचे घरानंतर नोकरी हे दुसरे फाउंडेशन सुद्धा हादरते.

त्याने १२ वर्षात जे सहन केले, कंपनीच्या म्हाताऱ्या मालकांच्या तब्येतीची काळजी घेतली, अकौंट्स फायनान्स, सेल्स सगळे बघितले, वर्कर लोकांना सांभाळून घेतले ते सगळे इर्रेलेव्हेण्ट अर्थात मातीमोल होते. त्याचे केबिन काढून त्याला चपराशाची वागणूक दिली जाते.

एक बाजूला इतके हादरे बसत असतांना त्याची बायको आपले जग विस्तारत असते. घर सांभाळण्यासाठी आपणही काम करावे ही तिची तळमळ त्याला कळत असली तरी आपण आजपर्यंत घेतलेले कष्ट आज आपल्या कामाला येत नाहीत ही भावना त्याला आतून पोखरत असते.

 

manav-kaul-vidya-balan-tumhari-sulu-inmarathi
firstpost.com

या सगळ्यात सुलुच्या घरचे तिच्या नवीन कामाबद्दल अनादर दाखवतात, तिच्या मुलाला शाळेत प्रॉब्लेम येतात. हे योगायोग थोडे फिल्मी अंगाने जाणारे असल्याने इंग्लिश विंग्लिश ची आठवण करून देतात.

या सगळ्यातून सुलू स्वतःसोबत आपल्या नवऱ्यासाठीही नवीन संधी शोधते आणि सिनेमाचा गोड शेवट होतो.

स्वतःसोबत लढताना घरच्यांशी आणि बाहेरच्या जगाशी लढणारी सुलू टिपिकल वर्किंग वूमनचा संघर्ष पडद्यावर छान उभा करते.

पण तरीही आपल्याला लक्षात राहतो तो तिचा नवरा अशोक. आपल्या अपयशात बायकोची साथ अपेक्षित असणारा आणि तिच्या अतिशय बावळट जोकवर खुश होऊन हसणारा मध्यमवर्गीय अशोक दुबे..

बऱ्याच जणांचे आयुष्य तिशीत चालू होते. त्या सर्वांना हा अशोक आपलासा वाटू शकतो. अनेकदा आपल्याला स्वतःचा राग येतो तसाच तो अशोकचाही येतो. त्याने घेतलेले काही निर्णय चुकीचे वाटतात.. पण आपण एक व्यक्ती म्हणून त्याच्या प्रेमात पडतो.. मग त्यात आपल्याला आपले बाबा दिसतात किंवा आपण स्वतः..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?