' १ रुपयाला एक इडली विकणाऱ्या “इडली अम्मा”च्या बिझनेसमध्ये आनंद महिद्रांना “इन्व्हेस्ट” करायचंय! – InMarathi

१ रुपयाला एक इडली विकणाऱ्या “इडली अम्मा”च्या बिझनेसमध्ये आनंद महिद्रांना “इन्व्हेस्ट” करायचंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पहाटे सूर्य उगवण्याआधी ती उठते. अंघोळ करून, पूजा आटोपून, ती आपल्या मुलासोबत शेतात जाते. शेतातील ताजा भाजीपाला स्वतः निवडून आणते. घरी आल्यावर ओला नारळ आणि इतर मसाला पाट्यावर वाटून चटणी बनवते.

आणलेल्या भाज्या चिरून सांबर फोडणी देते. सकाळी सहा वाजता पण, तिच्या घराचा दरवाजा इडली खायला येणाऱ्या ग्राहकांसाठी उघडा असतो. गेल्या तीस वर्षापूर्वी सुरु केलेला हा व्यवसाय याच नियमाने ती आजही चालवते.

वयाच्या ८० व्या वर्षी देखील तिच्या या दिनक्रमात कोणताही फरक पडलेला नाही.

गावातील गरीब लोकांना स्वस्त दरात चविष्ट, गरमागरम आणि ताजी इडली मिळावी म्हणून आजच्या ‘प्रॉफिट’च्या जमान्यातही माफक दरात, इडली विकणाऱ्या “इडली अम्मा”च्या स्टोरीने सर्वांनाच एक नवी उर्जा दिली.

 

Idli amma InMarathi
Indiatimes.com

इतक्या कमी दरात इडली विकून तिला काही फायदा मिळत असेल का? हो तिला फायदा होतो पण, अत्यंत माफक! पण, यापेक्षा जास्त फायद्याची तिला अपेक्षा देखील नाहीये. खरं तर, हे काम ती फायदा मिळविण्यासाठी करतच नाही.

पैसे नाहीत म्हणून कुणी उपाशी राहायला नको एवढीच तिची माफक अपेक्षा! “कारण, वादिवेलंपलयम मध्ये येणारे लोक हे गरीब मजूर असतात, रोजच्या मिळणाऱ्या मजुरीवरच त्यांना त्यांच्या संसाराचा गाडा ओढायचा असतो. अशा लोकांना कमी दरात इडली उपलब्ध होईल याच अपेक्षेने मी हा उद्योग सुरु केला,” असे कमलथल सांगते.

तिचे हे काम अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. तर, काहींना तिच्या या उदार कार्याबद्दल अचंबा देखील वाटत आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या वाचनात देखील तिची ही कहाणी आली. तिच्या बद्दल वाचल्यानंतर त्यांना तिच्या या कामाचे मनापासून कौतुक केले.

कमलथल सारखं लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणणारे किंवा त्यांना थेट फायदा होईल असं काम करणारे खूप कमी लोक आहेत. स्वतःच्या फायद्याचा विचार न करता या वयातही ती ज्या उर्जेने काम करते त्यातून खूप काही शिकायला मिळते.

 

kamlla_paati_InMarathi
Patrika

वस्तुत: कमलथलची माहिती देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला होता. तो पहिल्या नंतर आपण खरेच भावूक झालो असे आनंद म्हणाले.

आपल्या ट्विटर हँडलवरून आनंद यांनी अशा अर्थाची पोस्ट केली आहे. आपल्या या पोस्ट मध्ये ते लिहितात, “तुम्ही जे काम करता ते यांच्या कामाच्या १ टक्के इतके तरी परिणामकारक आहे का? असा विचार करायला भाग पडणारी आणि अतिशय भावूक करणारी ही गोष्ट आहे.

तिचा व्हिडीओ पहिल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, ती अजूनही चुलीवरच इडल्या बनवते. तिच्या या व्यवसायात मी देखील थोडीफार गुंतवणूक करू इच्छितो. चुली ऐवजी तिने एलपीजी गॅसचा वापर करावा म्हणून मी तिला गॅस घेवून देऊ इच्छितो.”

चुलीऐवजी एलपीजीमुळे तीचा त्रास तरी थोडाफार कमी होईल अशी आशा वाटते. म्हणूनच आनंद महिंद्रा यांनी स्वतः तिच्या या व्यवसायात काही गुंतवणूक करू इच्छित असल्याची पोस्ट केली आहे.

इतकेच नाही तर, तिला कायम सिलिंडर मिळत राहील याची व्यवस्था आमची तामिळनाडूची टीम करेल असेही ते म्हणाले.

कमलथलला कुणी इडल्यांची किंमत वाढवण्यास सांगितले तर, ती नकार देते. कारण, तिला माहितेय वादिवेलंपलयम मध्ये येणारे लोक एक तर निम-मध्यमवर्गीय किंवा गरीब असतात, ज्यांना एक प्लेट इडलीसाठी १५-२० रुपये देणे शक्य नसते.

 

idli_amma Anand Mahindra InMarathi
Indiatimes.com

म्हणून अनेक जणांनी तिला दर वाढवण्याचा सल्ला देऊन देखील ती माफक दारात इडली विकण्याचं काम सोडत नाही. गेली कित्येक वर्षे माफक दारात इडल्या पुरवण्याचा तिचा हा व्यवसाय अगदी सुरळीत सुरु आहे.

यातून तिला मिळणारा मोबदला अगदी तोकडा आहे. पण, ती नफा कमवण्यासाठी हा व्यवसाय करत नाहीच. पैसे नाहीत म्हणून कुणावर उपाशी राहण्याची वेळ येउ नये म्हणून हे ती करते.

इडल्या बनवण्यासाठी ती आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासूनच कामाला लागते. इडलीसाठी आवश्यक असणारे पीठ ती मिक्सरवर नाही तर, आजही हातानेच वाटते. हे पीठ तयार करण्यासाठीच तिला चार तास लागतात.

आदल्या दिवशी पीठ तयार ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी स्वादिष्ट इडल्या बनवायच्या. १ रुपयाच्या इडलीसोबत ती चविष्ट सांबर आणि चटणी देखील देते. तिच्या हातच्या इडल्यांची चव देखील अप्रतिमच! 

लहानपणापासून मोठ्या कुटुंबात वाढल्याने तिचा बहुतांश वेळ सगळा मुदपाकखान्यातच जातो. तरीही, या वयातही हे काम ती स्वेच्छेने आणि आनंदाने करते. त्यातही लोकांना ताज्या इडल्या मिळाल्या पाहिजेत असा तिचा अट्टाहास असतो.

दररोज तिला किमान हजारभर इडल्या तरी कराव्या लागतात. दहा वर्षापूर्वी ती एक इडली ५० पैसे दराने विकत होती. गेल्या काही वर्षात तिने हा भाव वाढवून १ रुपया केला आहे.

 

idli-dadi InMarathi
Chalta Purza

सूर्य उगवण्याआधी भल्या पाहते उठून तिला कामाला सुरुवात करावी लागते. जवळजवळ गेली तीस वर्षे ती हा व्यवसाय करत आहे. इडलीसाठी लागणारी सगळी तयारी ती स्वतः करते.

इडलीसाठी लागणारे सगळे साहित्य ती हातानेच वाटून घेते. त्याची तयारी करण्यासाठीच तिला चार तास लागतात. आदल्या दिवशी संध्याकाळी पीठ तयार करून ठेवते. दुसऱ्या दिवशी फुगलेल्या पिठाच्या ताज्या ताज्या इडल्याच ती गिऱ्हाईकांसाठी देते.

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टनंतर HPCL आणि BPCL दोन्ही कंपन्यांनी इडली अम्माला गॅस कनेक्शन देण्याची तयारी दाखवली. BPCL ने सर्व साहित्यानिशी गॅस कनेक्शन तिच्यापर्यंत पोचवलं देखील.

आत्ता तिचा त्रास देखील थोडा कमी होईल. एलपीजी कनेक्शन सोबतच ते तिला ग्राइंडरदेखील देणार आहेत, ज्यामुळे पाट्यावर पीठ वाटण्याचे तिचे कष्ट वाचतील आणि तिच्या व्यवसायाची वृद्धी होण्यास मदत होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?