भक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

झुंडीतली माणसं (लेखांक तेरावा)

लेखांक बारावा : त्रिपुरा निकाल, निरव मोदी आणि काँग्रेस – परिवर्तनाचे झोके आणि झोपाळे : भाऊ तोरसेकर

===

भक्त हा शब्द आजकाल मुख्य प्रवाहातील माध्यमे किंवा सोशल माध्यमात सरसकट वापरला जात असतो. तो वाचताना भक्त म्हणजे मोदीभक्त किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंधानुयायी, असा अर्थ घ्यायचा असतो. काही शब्द सातत्याच्या वापराने गुळगुळीत होऊन जातात. त्याचा शब्दकोषातील अर्थ आणि व्यवहारी अर्थ यामध्ये जमिन अस्मानाचा फ़रक पडत असतो. तसाच भक्त हा शब्द मागल्या दोनतीन वर्षात आपला पारंपारिक संदर्भ गमावून बसला आहे.

पण जे कोणी मोदी समर्थकांवर भक्त असल्याचा आरोप करीत असतात, ते भक्त वा अंधानुयायी नसतात काय? किंबहूना अशा मोदी विरोधकांची मोदीभक्ती तितकीच कडवी असते.

कुठलाही विषय समोर आणला गेला तरी त्यांना त्यात मोदी दिसत असतो. त्यातही मोदीविरोधाची भावना उफ़ाळून येत असते. जी कथा विरोधकांची असते, तीच मोदीभक्त वा समर्थकांचीही असते. असे लोक कशाचा तरी विरोध करण्यात इतके मग्न झालेले असतात, की समोर काय आले आहे वा आणले गेले आहे, त्याच्याशी त्यांना अजिबात कर्तव्य नसते. कडवे कम्युनिस्ट वा धर्मविरोधक कट्टर धर्मसंप्रदायाच्या पठडीतून बोलताना आपल्याला ऐकावे लागत असते.

आपल्याला अंतिम सत्य गवसले आहे, अशी जी एक पक्की धारणा त्यांच्यामध्ये असते, ती त्यांच्या चिकित्सक विवेकी बुद्धीला नामोहरम करून टाकत असते.

त्यांनी मनात पकडून ठेवलेल्या अशा भ्रमाला किंचीत जरी धक्का लागत असेल, तर असे सच्चे अनुयायी त्या काल्पनिक हल्ल्याच्या विरोधात प्राणपणाने लढायला मैदानात उतरल्याशिवाय रहात नाहीत. जिहाद करायला मुंबई काश्मिरात येऊन मारला जाणारा कोणी पाकिस्तानी वा तितक्याच हिरीरीने चकमकीत मारला जाणारा नक्षलवादी, एकाच पठडीतले सच्चे अनुयायी होत. ते खरे भक्त असतात. त्यांना वास्तव जगाशी कुठलेही नाते जोडता येत नाही. वास्तवाची त्यांना किती भिती वाटत असावी?

 

Rahul-Gandhi-inmarathi
www.theweek.in

‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्यासमोर मांडले गेले आहे त्या जगावर माझा इतका दृढ विश्वास आहे की त्यातील शब्द न शब्दाला आपण घट्ट धरून रहायला हवे असेच मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन.’ (प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर)

प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर त्याचीच अशी ग्वाही देतो. येशूला देवाने धर्म सांगितला आणि देवदूताच्या मार्फ़तच आपले संदेश पाठवलेले आहेत. असे देवदूत काय म्हणतात वा सांगतात, त्यावरही विश्वास ठेवायचा नाही. तर येशूला देवदूत भेटला व त्याने असा धर्म सांगितलेला आहे, त्यावर निस्सीम श्रद्धा ठेवता आली पाहिजे. तरच तुम्ही भक्त होत असता. कुठल्याशा चित्रपटातला एक हिरो म्हणतो,

‘एक बार मैने कुछ तय किया, फ़िर मै अपनी भी सुनता नही.’

हे वाक्य अनेक हिरो बोलून गेले आहेत. पण त्याचा आशय काय आहे? तर आपल्याला एकदा जे खरे वाटले वा आपण सत्य म्हणून स्विकारले, मग त्यात आपण कुठलाही बदल सहन करत नाही. म्हणजे आपली बुद्धी प्रत्येक वेळी व प्रत्येक बाबतीत आपण वापरत नाही. आणि आपली बुद्धी चिकित्सक पद्धतीने नित्यनेमाने वापरत नसल्याचा किती अभिमान आहे बघा. याला भक्त म्हणतात. दोन हजार वर्षापुर्वीचा येशूचा धर्म असो वा चौदाशे वर्षापुर्वीचा महंमदाचा धर्म असो, दोन्हीकडे त्याचीच प्रचिती येत असते.

पाच हजार वर्षांचे वेद असोत किंवा पुराणे असोत, दोनशे वर्षापुर्वीचा मार्क्सवाद किंवा आज कालबाह्य झालेले विज्ञान असो, त्यातून माणसे बाहेर पडायला राजी होत नाहीत.

अर्थात ही बाब केवळ धर्मपंथ मानणार्‍यांपुरती मर्यादित नाही. कुठल्याही वैचारिक वा वैज्ञानिक पंथबाजीतही तितकीच कट्टरता असते. त्या त्या पंथ परंपरांचा जो कोणी मूळपुरूष असतो, त्याचे शब्द इतके प्रमाण मानले जात असतात, की त्यानेही ते शब्द बदलले तरी त्याच्यावर त्याचेच भक्त तुटून पडायला मागेपुढे बघत नाहीत. ही भक्ताची व्याख्या वा व्याप्ती असते. त्यातला उद्धारक वा प्रेषित दुय्यम असतो आणि त्याचा संदेश भक्तापर्यंत घेऊन येणारा महत्वाचा व निर्णायक असतो. देव वा प्रेषित यांच्यावर आपली निष्ठा वा श्रद्धा रुजवणारा निर्णायक असतो.

 

bhakt-inmarathi
soniahalliday.com

आज जगाच्या व्यवहारातून कम्युनिझम किंवा मार्क्सवाद जवळपास हद्दपार झाला आहे. जिथे कुठे त्याचे अवशेष आहेत, तिथल्या राज्यकर्त्यांनी मार्क्सच्या तत्वापासून कधीच फ़ारकत घेतलेली आहे. पण भारतातले वा अन्य काही देशातले मार्क्सवादी तो बदल बघू शकले आहेत काय? शतकापुर्वी रशियात सर्वप्रथम ब्लादिमीर लेनिन या नेत्याने कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली. त्याची पहिली सत्ता स्थापन झाल्यापासून तिला तथाकथित पाश्चात्य भांडवलशाहीचा धोका असल्याचे जगभरच्या मार्क्स भक्तांच्या मनात पक्के रुजवून देण्यात आले आहे.

आ्ज जग कुठल्या कुठे बदलून गेले, तरी मार्क्सचे अनुयायी अजून आपली शिकवण सोडताना दिसलेले नाहीत. किंबहुना त्यापेक्षा वेगळे काही होताना दिसले किंवा मार्क्सच्या तत्वांची विचारांची चिकित्सा होताना दिसली, तरी त्यांना आपल्या जीवावर बेतले आहे अशी भिती वाटू लागते.

ल्युथर म्हणतो, तसे ते डोळे कान घट्ट मिटून घेतात आणि आपल्या तत्वांना चिकटून बसतात. शीतयुद्धाच्या कालखंडात म्हणजे तब्बल अर्धशतकापुर्वी अमेरिका हे भांडवलशाहीचे साम्राज्य होते आणि सोवियत युनियन हे समाजवादी साम्राज्य होते. मग जगभरचे कम्युनिस्ट आपोआप अमेरिकेचे शत्रू होते. आता ती स्थिती राहिलेली नाही आणि उरलेले व्हीएतनाम वा चीन यासारखे कम्युनिस्ट देशही अमेरिकेशी भांडवलशाही व्यवहार करून आपली प्रगती करून घेत आहेत.

पण भारतातले कट्टर मार्क्स-लेनिन भक्त अमेरिकेचे नाव घेतले तरी चवताळून उठतात. २००८ सालात अमेरिकेशी अणुकरार करायला निघाले, म्हणून डाव्या आघाडीने मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्याचा इथल्या राजकारणाशी वा भारताच्या हिताशी काय संबंध होता? इथले मार्क्सवादी पन्नास वर्षे जुन्या आपल्या अंधश्रद्धेतून बाहेर पडले आहेत काय? मग भक्त कोणाला म्हणायचे?

दोनचार वर्षे ज्यांना आजचा पंतप्रधान व त्याचा कारभार पसंत आहे म्हणून मोदी समर्थन करतात, ते भक्त आहेत. मग तीन दशकापुर्वीच अंतर्धान पावलेल्या डाव्या विचारांच्या राजकारणाची नाळ घट्ट पकडून बसलेल्या दिवाळखोरांना काय म्हणायचे?

या भक्तांचा मोदी त्यांच्या समोर आहे आणि काही धडपड तरी करतो आहे. पण शंभराहून अधिक वर्षे आपल्या कल्पना व संकल्पनांचे विविध अपयशी प्रयोग करून अस्तंगत झालेल्या विचारांच्या आहारी जात आजही त्याचीच भजने गात बसलेल्या शहाण्यांना काय म्हणायचे? ते मार्क्सचे भक्त असतात की मार्टीन ल्युथरचे सच्चे अनुयायी असतात? बायबल वा कुराणात देवाचा संदेश कोणासाठी असतो? ‘श्रद्धाळू लोकहो’, अशी त्याची सुरूवात असते. म्हणजे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी तो संदेश असतो. जे त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाहीत वा त्याविषयी शंका घेतात, त्याना आपोआप धर्माचे वा समाजाचे शत्रू मानायचे असते. ते शत्रू का आहेत? असाही प्रश्न विचारायचा नसतो. तसा प्रश्न विचारणे म्हणजेच इश्वराच्या अस्तित्वावर शंका घेणे आहे आणि त्यातून श्रद्धेला बाधा येत असते.

 

digvijay-singh-inmarathi
akm-img-a-in.tosshub.com

इश्वराचा शत्रू तो म्हणून श्रद्धाळूचाही आपोआप शत्रू असतो. इतकी निष्ठा असली तरच कोणी सच्चा अनुयायी होऊ शकतो. त्याला भक्त मानता येते. पण मोदी समर्थक भक्तांपेक्षाही त्यांच्या विरोधातील लोकांमध्ये तशी अभेद्य निष्ठा, श्रद्धा वा भक्तीची लक्षणे जास्त आढळून येतात. मोदी काय करतो वा संघाने काय केले, त्याची चर्चा नसते. पण त्याने काहीही केलेले असले तरी तो चुकलेला असतो. याविषयीची विरोधी एकवाक्यता अशा भक्तीची साक्ष असते. गुजरात विधानसभेच्या निकालानंतरच्या उत्तेजित प्रतिक्रीया त्याचा पुरावा देत असतात.

राहुल गांधींचा विविध विरोधी पक्ष वाहिन्यांवर बचाव करतात, त्यातून अशा भक्तीची लक्षणे आपण बघू शकत असतो.

तुरुंगात पडलेल्या आसाराम बापूविषयी त्याच्या भक्तांच्य मनात आजही कितीशी शंका आहे? बापू चुकला असे त्यांना वाटत नाही. फ़ुलपुर व गोरखपुर या निवडणूका भाजपाने आपल्या कर्माने गमावल्या. त्यानंतर तिथे सपा-बसपा एकत्र आल्यामुळे पराभव असला युक्तीवाद करणारे भाजपाचे समर्थक किती केविलवाणे दिसत होते? पण तेव्हा त्यांचे केविलवाणे युक्तीवाद हास्यास्पद ठरवणारे शहाणे कमी भक्त वा श्रद्धाळू नसतात. त्यांना गुजरातच्या पराभवातही नैतिक विजय दिसतच असतो ना?

गोरखपूरचा भाजपा पराभव आणि गुजरातचा कॉग्रेस पराभव यात नेमका कुठला फ़रक असतो? पण राहुल गांधींनी त्याच पराभवाला नैतिक विजय ठरवले आणि अनेक पुरोगामी डावे प्राध्यापकही वाहिन्यांवर येऊन त्याच पराभवाला नैतिक विजयाच्या आरत्या ओवाळत होते ना?

त्यालाच भक्ती म्हणतात. इकडल्या वा तिकडल्या कोणाही भक्तांना आपला विजय बघायचा असतो. म्हणूनच त्या बुडत्यांना अशा युक्तीवादाची काडी हवीच असते आणि ती पुरवू शकेल तोच त्यांना नेता होऊ शकत असतो. तो त्यांच्या भक्ती व श्रद्धेला मजबूत बांधून ठेवणारा धागा पुरवित असतो. पण असे धागे तोपर्यंतच मजबूत असतात, जोवर भक्त श्रद्धाळू अन्य काहीही डोळसपणे बघू शकणार नाही. म्हणून शिकवण काय असते? तर साक्षात देव किंवा त्याचे देवदूत स्वर्गातून खाली उतरून आले आणि काही भिन्न सांगू लागले तरी आपले डोळे कान बंद करून घ्यायचे. जगाला ओरडून सांगायचे, ही फ़ेक न्युज आहे. सांगणारा फ़ेकू आहे. अर्थात त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. पण आपले सच्चे अनुयायी टिकवून ठेवायला असा डावपेच उपयोगी असतो.

भक्त हा चिकित्सक बुद्धी गहाण टाकलेला असावा लागतो आणि त्याने आपली बुद्धी वापरू नये, यावर भक्तीचे तारू टिकलेले असते. शिक्षण, वाचन वा व्यासंगाचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. भक्ती हा भावनाविकार असतो.

उम्मीदपे दुनिया चलती है, अशी हिंदीतली उक्ती आहे. उम्मीद म्हणजे कल्पनांच्या मागे धावणे वा आशेवर जगणे होय. ते चुकीचे नाही. पण समोर साक्षात भलतेच दिसत असताना त्याकडे पाठ फ़िरवण्याने उमेद खरी ठरण्याची शक्यताच संपत असते. मतविभागणीमुळे मोदींनी लोकसभा जिंकली किंवा मतदाराची दिशाभूल झाली असे सांगण्यातून आपलीच दिशाभूल होत असते. कारण ते सत्य नसते. आजवरच्या सर्व निवडणूका जिंकणार्‍यांनी मतविभागणीचा लाभ उठवूनच जिंकलेल्या आहेत आणि सत्ताही बळकावलेली आहे.

 

raga-fans-inmarathi
www.miscw.com

मुलायम मायावतींसह नेहरू इंदिरा गांधींनाही मतविभागणीचेच वरदान लाभलेले होते. मग तो युक्तीवाद काय कामाचा? त्याने लोकांची किती फ़सगत होईल ठाऊक नाही. पण आपली मात्र फ़सगत होत असते आणि तेच आजच्या युगात मोदींना निवडणूक जिंकण्यातले अस्त्र झालेले आहे. त्यांचे विरोधी भक्त वास्तवाला सामोरे जायला तयार नाहीत, म्हणून भाजपा जिंकतो. मतविभागणी टाळली तरी कॉग्रेसला पुर्वीच सत्ताभ्रष्ट करता आले असते आणि तसेही यापुर्वी झालेले होते. पण पुन्हा विरोधकात दुफ़ळी माजली आणि कॉग्रेस सत्तेत परतली होती.

आज कॉग्रेसपाशी तितकी संघटना उरलेली नाही आणि भाजपाने भक्कम व्यापक संघटना उभी केलेली आहे. हे त्यातले सत्य आहे. म्हणूनच भाजपा किंवा मोदींना यश मिळते आहे.

आपल्या अतिरेकी मतभेद व विस्कळीत संघटनांच्या दुर्बलतेतून विरोधक बाहेर पडू शकले तर मोदी अजिंक्य नसतात. कॉग्रेस व डावे त्रिपुरात एकत्र आले तर भाजपा इतके मोठे यश मिळवू शकला नसता. विरोधकांची उमेद मोदींना पराभूत करण्यापुरती नसून एकमेकांचेही पाय ओढण्याची आहे. त्याचे काय करायचे ते ठरले पाहिजे ना? एकजुट करताना अखिलेशला मायावतींना एक राज्यसभेची जागा सोडण्याचा त्याग करता येत नसेल, तर मतविभागणीला पर्याय कुठे उरतो? ते शक्य नसेल तर आघाडीची स्वप्ने बघणार्‍या पुरोगामी भक्तांचे काय?

जे कोणी कडवे मोदी विरोधक आहेत, तेही तितकेच अंधभक्त आहेत. म्हणूनच त्यांना सत्य बघता येत नाही की मोदीना पराभूत करणे शक्य होत नाही. त्यांना नुसते मोदी पराभूत झाले वा होतील असले युक्तीवाद ऐकून खुश व्हायचे असते.

सहाजिकच त्यांना तसली खुळी स्वप्ने दाखवणारे व्यापारी उदयास येतात आणि त्यांना खुश करीत असतात. पण वास्तवात कुठलाही फ़रक पडत नाही. भाजपा वा मोदीविरोधी जे कोणी आहेत, त्यांनी कान डोळे उघडावेत आणि सत्याला सामोरे जावे. आपली भक्ती सोडून आपले दोष बघावेत आणि ते दुर करण्यासाठी कंबर कसावी. कारण त्यांच्यासमोर मोदी हे आव्हान नसून त्यांच्यातल्या त्रुटी हेच आव्हान आहे. ते बाजूला करणे वा त्यावर मात करणे त्यांच्याच हाती आहे. अशा खुळ्या कल्पनातून मोदी व त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बाहेर पडला व त्याने कॉग्रेस हरत नाही, या समजुतीला छेद दिला.

सात दशकात कॉग्रेसला कोणी एकहाती पराभूत करू शकत नसल्याचा भ्रम मोदींनी सोडला आणि घडलेला चमत्कार आपल्या समोर आहे. मोदी नावाच्या माणसाचे यश त्याने झिडकारलेल्या भ्रमात आहे.

मोदी अजिंक्य वा आव्हान असल्याच्या भावनेतून पुरोगामी भक्त बाहेर पडू शकले, तर आघाड्यांवर विसंबून न रहाता, आपापले पक्षीय बळ वाढवण्याच्या कामाला लागतील आणि त्यातून जे राजकीय आव्हान उभे राहिले ते मोदींना भयभीत करून टाकणारे असेल. कारण तेच मोदींच्या यशाचे रहस्य आहे. उलट विरोधकांच्या झुंडीला आपल्या भ्रमातून बाहेर पडायचीही भिती वाटत असेल, तर मोदींच्या यशाला कोणी रोखू शकणार नाही.

भाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते. तपस्या करणार्‍यांना देवालाही आव्हान देणे शक्य असते. भक्तांनी आरत्या कराव्यात, शापवाणी उच्चारावी किंवा सच्चा अनुयायी होऊन फ़रफ़टत आयुष्य खर्ची घालावे.

(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

    bhau-torsekar has 29 posts and counting.See all posts by bhau-torsekar

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?