‘हार्ट अटॅक आलाय’ हे कसं कळावं? आला तर ताबडतोब काय करावं? वाचा, लक्षात ठेवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

आजकाल वर्तमानपत्र उघडलं की कोणाचा तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात हार्ट अॅटॅक? असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं आहेत त्याला/तिला, आता त्यांचं कसं होणार?

यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल एक सहानुभूतीची भावना निर्माण होते.

होतंय असं की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होत आहे.

कामाच्या ठिकाणी असलेले ताण, जबाबदाऱ्या आणि घरच्या आघाडीवर असलेल्या जबाबदाऱ्या यांचा मेळ घालणं कधी कठीण होऊन बसतं.

परंतु, अशा दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका (हार्ट अॅटॅक) आलेला काही वेळा कळतसुद्धा नाही.

 

heart-attack-inmarathi
hindustantimes.com

केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इथपासून ते त्याचे प्रकार, उपचार आणि त्याची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे.

जे हृदय आपल्या संपूर्ण शरीराचं संतुलन सांभाळतं ते महत्त्वाचं असणारच ना ? म्हणूनच त्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे!

 

keep-heart-healthy-marathipizza00

 

आजकाल आपल्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे कित्येकदा अचानक काही कारण नसताना, कोणतेही लक्षण न दाखवता अचानक हार्ट अॅटॅक येऊ शकतो.

आज आपण हार्ट अॅटॅक आला तर काय प्रथमोपचार म्हणून काय करावं हे पाहणार आहोत. त्यापूर्वी त्याची दृश्य लक्षणे काय असू शकतात हे पाहू.

प्राथमिक लक्षणे :

१) छातीत दुखणं – सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं.

उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण.

२) उलटी किंवा मळमळ – बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो, पण तो हृदयापासून असू शकतो. अॅसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू शकतो.

३) चक्कर येणं – काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं.

हार्ट अॅटॅकच्या वेळी रक्तप्रवाह बंद होतो आणि त्यामुळे तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने चक्कर यायला लागते. त्यामुळे जर ती व्यक्ती पडली तर समजावे की तिला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता आहे.

 

 

४) छाती जड वाटणं – छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं.

५) दम लागणं/ श्वास घेण्यात अडथळे निर्माण होणं – श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणं.

जर तुमच्या जवळ बसलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत असतील, किंवा श्वास कमी पडतोय असं वाटत असेल तर हे हार्ट अॅटॅक येऊ शकतो याचे लक्षण आहे.

६) घाम येणं – काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं.

७) कोरडा खोकला – दुसऱ्या कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहणं.

८) अस्वस्थता – चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भीती वाटणं. श्वास कोंडल्यासारखं वाटणं.

९) डोकं भणभणणं – जर अचानक विनाकारण डोकं घणाचे घाव घातल्यासारखं दुखायला लागलं तर हार्ट अॅटॅकची शक्यता बळावते.

अशी लक्षणं दिसताच काय करावं असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल.

तर अशावेळी हे करा :

 

heart-care-marathipizza

 

१) क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरला बोलवा आणि ऍम्ब्युलन्स मागवून घ्या.

सर्व अॅम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराची तातडीने सेवा उपलब्ध असते. त्याबरोबर डॉक्टरही असतात. जवळच्या आधुनिक अद्ययावत सेवा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाणं जरुरीचं आहे.

या नंतरची पूर्ण उपचारपद्धती अद्ययावत सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होईल अशा हॉस्पिटलमध्येच जावं.

२) अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या देणं. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवणं.

३) आता आपल्याला त्याच्या हृदयाचे ठोके चालू आहेत की नाही याकडे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी रुग्णाचे पल्स चेक करा.

 

Plane-heart-attack-inmarathi01.jpg
clevelandclinic.org

चालू असतील तर ठीकच.

पण नसतील तरी ती व्यक्ती गेली असे मानून चालू नका.

पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास व बाहेरून हृदयाला कृत्रिम दाब (कार्डिअॅक मसाज) देणं हे यावेळी गरजेचं असतं.

पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत हे उपाय करत राहावेत. अन्यथा याबाबत प्रथमोपचाराची माहिती नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणं आजकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत.

हे “सीपीआर” कसं करावं ?

 

first-aid-inmarathi
youtube.com

१) रुग्णाच्या तोंडामध्ये लांब श्वास सोडावा.

२) नंतर त्याच्या छातीवर जोराने दाब द्यावा. हे साधारण ८० ते १०० वेळा करावं.

त्यानंतर रुग्णाची छाती तोवर दाबत राहावी जोवर डॉक्टर येत नाहीत किंवा रुग्ण श्वासोच्छ्वास करायला लागत नाही.

३) छाती प्रेस करताना हा विचार करू नका की पेशंटची हाडं फ्रॅक्चर होतील. त्या क्षणी रुग्णाचा जीव वाचणं अधिक महत्त्वाचे आहे.

तर हे आहेत काही तात्काळ करता येण्यासारखे उपाय.

या उपायांनी हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. जीव वाचल्यानंतर पुढे वैद्यकीय उपचार करून असा रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.

पण तरीही prevention is better than cure. त्यामुळे आपल्या हृदयाची हाक त्याने वॉर्निंग देण्याआधीच ऐकायचा प्रयत्न करूयात…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?