शरद पवार हा पर्याय सोनिया गांधींनी नाकारला..आणि नरसिंहराव पंतप्रधान झाले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

१९८४ मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्यावर आरूढ होत राजीव गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले.

मात्र हा करिष्मा राजीव गांधी यांना टिकवता आला नाही. परिणामी १९८९ मध्ये काँग्रेस आपल्या यशाची पुनरावृत्ती करू शकला नाही.

विश्वनाथ प्रताप सिंह यांनी भारतीय जनता पक्ष आणि माकप यांच्या पाठिंब्यावर आघाडी सरकार स्थापन केले. पण हा प्रयोग देखील फसला त्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले तरी यातून फार काही निष्पन्न झाले नाही.

या पार्श्वभूमीवर १९९१ मध्ये पुन्हा देश निवडणुकांना सामोरा जात होता. काँग्रेस पक्षाला पुरागमनाची खात्री होती मात्र त्यांची वाट इतकी सोपी नव्हती.

 

rajeev-gandhi-inmarathi
indiatoday.com

निवडणुकीच्या या धामधूमीतच २१ मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मानवी बॉम्ब चा वापर करून हत्या करण्यात आली. एलटीटीई ने ही हत्या तामिळनाडू मधील श्रीपेराम्बदूर येथे काँग्रेस पक्षाच्या भर प्रचार सभेत घडवून आणली.

देशासाठी हा एक मोठा धक्का होता. मात्र काँग्रेस पक्षासमोर अजून एक चिंता होती. राजीव गांधी यांच्यानंतर कोण? 

२१ मे रोजी राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजे २१ जून १९९१ रोजी पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

सत्तेच्या शिखरावर आरूढ होणे पी. व्ही. नरसिंहराव  यांच्यासाठी इतके सहज होते का? याचे उत्तर २१ मे ते २१ जून या एक महिन्यात घडलेल्या घटनाक्रमातून मिळते.

राजीव गांधी यांच्या पार्थिवावर अजून अंत्यसंस्कार झाले नव्हते तितक्यात काँग्रेस चा पुढचा अध्यक्ष कोण याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना स्पष्ट होत्या “सोनिया लाओ, देश बचाओ” या घोषणा निनादत होत्या.

दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी यांनी दोन ओळींचे निवेदन प्रसृत करत याला ठाम नकार दिला.

 

sonia-inmarathi
zeenews.india.com

अर्थात तसे अपेक्षितही होते. कारण काँग्रेस पक्षात सत्तासंघर्ष पेटला होता आणि एकमेकांना शह देण्यासाठी सोनिया गांधींचे नाव पुढे करण्यात आले होते. सोनियांच्या नकाराने आता उघड स्पर्धा सुरु झाली होती.

सर्वात पहिला मुद्दा होता आता तात्पुरता काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार?

२४ अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात खलबते सुरु झाली. अखेरीस प्रणव मुखर्जी यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांचे नाव पुढे केले. ते स्वीकारले गेले.

गांधी घराण्याला दिलेली साथ, ज्येष्ठत्व आणि पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नसलेले व्यक्तिमत्व हे तीन निकष राव यांच्या बाजूने होते.

हा सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला होता त्यावेळेस पी. व्ही. नरसिंहराव यांचे राजकारणात नक्की काय स्थान होते.

तर १९९१ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरु झाली होती त्यावेळी आपण राजकारणातून निवृत्त होऊन लिखाण करू इच्छितो असे त्यांनी राजीव गांधी यांना कळवले होते.

राजीव गांधी यांनी त्यास नकार दिला नाही मात्र काँग्रेस च्या जाहीरनाम्याला रावांनी अंतिम स्वरूप द्यावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळेस त्यांची तब्येत देखील त्यांना साथ देत नव्हती.

 

pv-narsimha-rao-inmarathi
indiatoday.com

असे म्हणतात काँग्रेस च्या अध्यक्षपदाच्या ही रस्सीखेच सात जणांमध्ये सुरु होती. कारण हे अध्यक्षपद भावी पंतप्रधानपदाकडे जाणारे होते. सर्वात आघाडीवर नावे होती त्यात अर्जुनसिंह हे एक महत्वाचे नाव!

भावी पंतप्रधान म्हणून आजतागायत एक नाव पुढे येते ते म्हणजे शरद पवार! ही दोन नावे सर्वात आघाडीवर होती.

त्यानंतर उत्तर प्रदेशातील नारायण दत्त तिवारी हे देखील एक प्रबळ दावेदार होते. तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा, माधवराव शिंदे, राजेश पायलट अशा या सहा नावांतून नक्की कोण ही बाजी जिंकणार याची चर्चा सुरु होती.

या स्पर्धेत सातवे नाव होते पी. व्ही. नरसिंहराव यांचे होते. ज्यांना कोणी गृहीत धरले नाही असे ते दावेदार होते.

अखेर एक सोय म्हणून इतर स्पर्धक पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नावावर तडजोड करण्यास तयार झाले. सोनिया गांधी यांनी पी. व्ही. नरसिंहराव की शरद पवार हा पेच दूर केला आणि पी. व्ही. नरसिंहराव एकमताने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

असे असले तरी नेतृत्वाची ही लढाई संपली नव्हती. काही स्पर्धक या लढाईतून बाद झाले होते इतकेच.

आता संसदेतला काँग्रेसचा नेता ठरवण्याची वेळ आली होती आणि शरद पवार यांची पंतप्रधान पदाची दावेदारी अजून कायम होती.

 

PAWAR FEATURED
inida.com

मात्र काँग्रेस पक्षातच पवारांना पुरेसा पाठिंबा नाही हे वेळ जात होता तसे स्पष्ट झाले आणि पी. व्ही. नरसिंहराव यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला. अर्थात पी. व्ही. नरसिंहराव यांना हे अलगद काही हातात पडले नव्हते.

कधी सत्तेची समीकरणं त्यांच्या बाजूने होती तर कधी त्यांनी वापरलेले डावपेच अगदी मुरलेल्या राजकारण्याला शोभतील असे होते.

मात्र शरद पवारांच्या तुलनेत “विश्वासार्हता” हा निकष त्यांना तारणारा ठरला असे राजकीय पंडितांचे विश्लेषण अगदीच काही बाद करता येत नाही.

पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंहराव यांची कारकीर्द स्वतंत्र भारतातील एक महत्वाचा अध्याय म्हणता येईल.

त्यांची कारकीर्द मुख्यतः ओळखली जाते ती आर्थिक सुधारणांचा धडक कार्यक्रम राबविण्यात ते यशस्वी ठरल्याने!

दुसरीकडे सोविएत युनियन चे विघटन झाले आणि काश्मीर प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्याचे आव्हान होते. या आघाडीवर देखील ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले.

मात्र बाबरी मशीद याच काळात पडली, हर्षद मेहताने याच काळात शेअर बाजारात केलेला घोटाळा बाहेर आला आणि याप्रकरणी थेट पंतप्रधानांवर आरोप केले. अशी संमिश्र स्वरूपाची त्यांची कारकीर्द पुढील निवडणुकीत काँग्रेस ला यश मिळवून देण्यात अपयशी ठरली.

 

narsimhababri_inmarathi
post.jagran.com

अवघ्या १४० जागांवर काँग्रेस रोखली गेली. मात्र असे असले तरी गांधी- नेहरू कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती पंतप्रधानपदाची पाच वर्ष पूर्ण करते, हे घडवणारे ते काँग्रेसचे पहिलेच पंतप्रधान होते.

पुढे पराभवामुळे ते सत्तावर्तुळातून बाहेर पडले मग सोनिया गांधींच्या राजकारणातील प्रवेशाने ते बाजूला सारले गेले. सोनिया गांधी आणि त्यांच्यात काहीसे अंतर असल्याचे वारंवार दिसले.

याचे पहिले कारण म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्व हे मितभाषी होते. तेव्हा हे अंतर कमी होऊ शकले नाही. राजीव गांधींच्या हत्येच्या तपासाबाबत सोनिया गांधी समाधानी नव्हत्या, हे अजून एक कारण सांगितले गेले.

याशिवाय बाबरीच्या पतनाने हे अंतर अजून वाढले अशी यादी वाढतच गेली.

२३ डिसेंबर २००४ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने पी. व्ही. नरसिंहराव यांचे देहावसान झाले. मात्र मृत्यूनंतरही त्यांचा सन्मान करण्यात काँग्रेस कमी पडली.

त्यांच्यावर हैद्राबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष असूनही त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले नाही.

 

manmohan_narsimha_rao_inmarathi
outllookindia.com

त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांची इच्छा होती असे संजय बारू यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. पण त्यांना ते शक्य झाले नाही.

पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे त्यांनी देशाच्या विकासात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल इतिहास त्यांचे निश्चितच सदैव स्मरण करेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?